मुख्यमंत्र्यांच्या तुळजाभवानी दर्शनाला भाजपचा आक्षेप
मुख्यमंत्र्यांच्या तुळजाभवानी दर्शनाला भाजपचा आक्षेप
उस्मानाबाद – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तुळजापूर दौऱ्यात तुळजाभवानीचे दर्शन घेतले याला भाजपने आक्षेप घेतला असून ऑनलाईन दर्शन घ्यायला हवे होते याची आठवण करून दिली आहे.https://youtu.be/g6zkYDNT2Ic
उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आले होते. त्यांनी तुळजापूर तालुक्यातील काटगाव, कात्री, अपसिंगा या गावाची पाहणी केली आणि त्यानंतर पत्रकारांसोबत वार्तालाप करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात ते तुळजापूर मध्ये आले होते. त्यांनतर त्यांनी ठाकरे घराण्याची कुलस्वामीनी असलेल्या तुळजाभवानीची महाद्वार येथे जात पूजा करून दर्शन घेतले. हाच मुद्दा पकडत भाजपने मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. नवरात्र सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने देवीच्या भक्तांना तुळजापुरात न येण्याचे आवाहन केले होते तसेच तुळजापूर येथे प्रवेश बंदी देखील केली गेली आहे. त्यामुळे अनेक भक्त हे देवीच्या दर्शनापासून वंचित आहेत. असे असताना देखील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांना असणाऱ्या विशेष अधिकाराचा वापर करत महाद्वारातून दर्शन घेतले आहे. यालाच भाजपने विरोध केला असून भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी देवीचे मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी केली आहे.
राज्यात सगळीकडं सारखंच नुकसान आहे, तुमच्यात काय बघायचं आहे -विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचे वक्तव्य
कवठेएकंद येथे भाजप पंचायत समिती सदस्य संतोष आठवले व कार्यकर्त्याकडून नाराजी व्यक्त करीत विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा निषेध
तासगाव प्रतिनिधी दि.२१
‘अतिवृष्टीमुळे राज्यासह सर्व तालुक्यात सगळीकडे सारखंच नुकसान झाले आहे. तुमच्या गावात काय वेगळं असणार. तुमच्यातील नुकसान हे सगळीकडेच आहे.तसेच असणार. त्यामुळे काय पहायचे आहे’. भाजपचे विधानपरिषदेचे विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या या वक्तव्यावरून तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील शेतकरी चांगलेच संतापले. तर दरेकरांना एवढी मग्रुरी कशाला पाहिजे, असा सवाल व्यक्त करीत भाजपच्या कार्यकर्त्यांनीच त्यांचा निषेध करीत घरचा आहेर दिला. गेल्या आठवड्यात राज्यभरात जोरदार अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान, दरेकर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर कवठेएकंद येथे भेट देणार होते. कवठेएकंद येथील शेतकऱ्यांची भेट व पाहणीचे नियोजन दुपारी साडेबारा वाजता नियोजित होते. त्यामुळे गावातील भाजपचे पंचायत समितीचे सदस्य संतोष आठवले यांच्यासह सर्व भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दरेकरांना नुकसान झालेले क्षेत्र दाखवण्याचे नियोजन केले होते. शिवाय गावातील अतीनुकसान झालेल्या कुटुंबांना मदतीचे किट देण्याचे नियोजनही भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले होते. हे किट दरेकरांच्या हस्ते देण्यात येणार होते. मात्र दरेकर यांना कवठेएकंद येथे नुकसान ग्रस्त शेतकरी व नागरिकांचे घरांचे नुकसान पाहणी दौरा आयोजित केला होता. परंतु येण्यास साडेचार वाजले तरीही दरेकर आले नसल्याने. शेतकरी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते दरेकर यांची वाट पाहून कंटाळले होते. मात्र कवठेएकंदमार्गे सांगलीला जाताना दरेकर कवठेएकंद येथे थांबले नाहीत. केवळ गाडी थांबवली. गाडीची काच खाली घेतली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी दरेकर यांना नुकसानीची पाहणी करा. शिवाय नुकसानग्रस्तांना मदतीचे किट तुमच्या हस्ते द्या, अशी मागणी केली.
मात्र, दरेकर यांनी गाडीतून खाली न उतरताच केवळ आपल्या आलिशान गाडीची काच खाली करून ‘सगळीकडे सारखेच नुकसान झाले आहे. तुमच्यात काय वेगळं असणार. त्यामुळे इथे काय पहायचे’, असे वक्तव्य केले आणि शेतकऱ्यांची कोणतीही विचारपूस न करता गाडीच्या काचा वर करीत एसीची हवा खात ते निघून गेले. दरेकरांच्या या वक्तव्यावर कवठेएकंद येथील शेतकरी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन सडकून टीका केली आहे. संतप्त शेतकरी व कार्यकत्यांनी दरेकरांचा निषेध केला आहे. दरेकर यांना भाजपच्याच कार्यकर्त्यांकडून दिल्या गेल्या या घरच्या आहेराबाबत चर्चा आहे. यावेळी दीपक घोरपडे, दीपक जाधव, जयवंत माळी, बाळासो शिरोटे, बाळासो पवार, राहुल शिरोटे, गुंडाभाऊ मेणगुदले, आनंदराव काळे, संजय शिरतोडे, महादेव काळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
दरेकरांना एवढी मग्रुरी कशाला पाहिजे : संतोष आठवले पं.स. सदस्य
कवठेएकंद परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर भयाण संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांना मदतीची व आधाराची गरज आहे. मात्र भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कवठेएकंद येथे गाडीतून उतरण्याचीही तसदी घेतली नाही. ते भुर्रकन निघून गेले. कवठेएकंद येथील भाजपच्यावतीने नुकसानग्रस्तांना मदतीचे किट दरेकर यांच्याहस्ते देण्यात येणार होते. मात्र त्यासाठीही त्यांनी वेळ दिला नाही. ते जरी आमच्या पक्षाचे असले तरी त्यांना एवढी मग्रुरी कशाची आली आहे, असा संतप्त सवाल भाजपचे पंचायत समितीचे सदस्य संतोष आठवले यांनी केला आहे. दरेकरांच्या या वागणुकीचा त्यांनी निषेध केला आहे.
अवकाळी पावसामुळे तासगाव तालुक्यातील सत्तर ते ऐंशी टक्के शेत जमिनीचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे बरेच गावांमध्ये ओढ्याचे पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्यामुळे घराचे नुकसान झाले आहे. कवठे एकंद येथील हद्दीतील शेतीच्या व घराच्या नुकसान झाले आहे.त्या पार्श्वभूमीवर महा विकास आघाडीचे कृषी राज्यमंत्री ना डॉक्टर विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांच्या समवेत कवठे एकंद येथे दौरा केला होता नुकसान झालेल्या द्राक्ष शेतीचे व बौद्ध समाजातील घरांचे झालेले नुकसानीची पाहणी केली होती. तासगाव कवठेमहांकाळ च्या आमदार श्रीमती सुमनताई पाटील यांनीही राष्ट्रवादी कार्यकर्ते समवेत कवठे एकंद गावाचा दौरा करून तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. परंतु विरोधी पक्ष भाजपाकडून विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनाही कवठे एकंद येथे आणण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता परंतु ते आले परंतु नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिक यांची भेट न घेता उर्मट भाषा वापरून निघून गेले यामुळे कवठे एकंद गावच्या भाजपचे कार्यकर्ते व पंचायत समिती सदस्य संतोष आठवले यांच्या जिव्हारी ही गोष्ट लागली आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये, लवकरच कवठे एकंद गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या असल्याने प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते हे येन केन प्रकारे शेतकरी व लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्नशील आहेत असे दिसत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पत्रकारांना टाकले वाळीत
उस्मानाबाद – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. अतिवृषटी झालेल्या भागांची ते पाहणी करणार आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पत्रकारांना वाळीत टाकण्याचा घृणास्पद प्रकार घडला आहे. जिल्हा माहिती कार्यालयाकडून पोलीस प्रशासनाला ४३ पत्रकारांची यादी पाठवण्यात आली. मात्र त्यातील केवळ मोजक्याच पत्रकारांना पासेस देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.आज सकाळी पत्रकार पास घेण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयात गेले असतात तेथील कर्मचारी पवार यांनी छोट्या पत्रकारांना पास दिले नाहीत. या संतापजनक प्रकारानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांना संपर्क केला असता त्यांनी पोलीस निरीक्षक बाबर यांना संपर्क करण्यास सांगितले. बाबर यांना संपर्क साधला असता आम्ही जिल्हा माहिती कार्यालयाकडून आलेल्या यादीनुसार पास दिले असल्याचे सांगितले. माहिती कार्यालय सांगते यादी पाठवली, श्री बाबर म्हणतात पास दिले मग नावांची छाटणी कोणी केली? तो करण्यामागे त्यांचा काय उद्देश होता? पत्रकारांना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी का करून घेतले नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पत्रकारांना पास देताना नेमका कोणता निकष लावण्यात आला? मोजक्याच लोकांना पास द्यायचे होते तर सर्वांकडून फोटो का मागवण्यात आले? याचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागणार आहे. पत्रकारांसोबत असा भेदभाव केव्हाच झाला नव्हता. मुख्यमंत्री स्वतः एका वर्तमानपत्राचे संपादक राहिले आहेत. त्यांच्याच दौऱ्यात पत्रकारांना दूजाभाव मिळत असेल तर इतरांकडून काय अपेक्षा करणार.
दूजाभाव करणाऱ्या प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांचा शोध घेऊन उचित कारवाई करण्यात यावी. वृत्तपत्र लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. ती एक मोठी व्यापक चळवळ आहे. त्यांच्या हक्काना नख लावण्याचा प्रकार लाजिरवाणा आहे.
बिभीषण लोकरे
संपादक दैनिक मराठवाडा केसरी
सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे ऊस दरप्रश्नी वंचित बहुजन आघाडीचे धरणे
शेतकरी संघटनांची विश्वासहर्ता संपल्याचा जाहीर आरोप
तासगाव प्रतिनिधी दि.२०
वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने ऊसाला एकरकमी ३५०० रु. एफ.आर.पी. देण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. उसाला एकरकमी ३५०० रु. दर जाहीर करावा, मागील थकबाकीदारक साखर कारखान्यांना यंदा गाळपास परवानगी देऊ नये, ऊस नियंत्रण आदेशांची शासन व प्रशासनाने योग्यरित्या अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांना ऊसबिले १४ दिवसात देण्यात यावी, उसाला ३५०० रु. दर देताना साखरेचे भाव वाढणार नाहीत यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, तसेच मागील आठवड्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ भरपाई द्यावी या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले, यावेळी साखर सहसंचालक कोल्हापूर यांच्या प्रतिनिधींनी आंदोलस्थळी भेट घेत सदर मागण्या पूर्ण करणेबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन देत आंदोलन स्थगितीची विनंती केली. सदर मागण्या मान्य न झाल्यास पुढील महिन्यापासून सर्व साखर कारखान्यांसमोर बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचा इशारा युवक जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांनी दिला.
शेतकरी संघटनांची विश्वासार्हता संपलेली आहे
पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी संघटना अनेक वर्षांपासून ऊस दरावरून आंदोलने करत आहेत मात्र अलीकडच्या काळात ऊस प्रश्नावरून राजकीय संधीसाधूपणा करत राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न शेतकरी नेते करत असल्याने आज शेतकऱ्यांच्या मनात शेतकरी संघटनांच्या बाबतीत विश्वासार्हता राहिलेली नाही असा आरोप जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांनी केला तसेच या जगाचा पोशिंदा शेतकरी स्वाभिमानाने जगलाच पाहिजे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी प्रश्नावर सक्षम पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी काम करेल असेही गायगवाळे यांनी सांगितले.
अटीशर्थी मान्य केल्याशिवाय मोळीपूजनास परवानगी देऊ नका- ऊस दर प्रश्नावर ऊस नियंत्रण आदेशाचे पालन करण्याच्या अटी व शर्थीं सर्व साखर कारखान्यांना बंधनकारक केलेशिवाय प्रशासनाने मोळी पूजनास परवानगी देऊ नये व सदरचे करार हे कागदावरच न ठेवता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रशासनाने करावी अशी मागणी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष प्रशांत कदम यांनी केली.
यावेळी किरण कांबळे, विशाल कुरणे, रोहन धुमाळे, डॉ. राजेश साठे, निखिल कांबळे, अमित बनसोडे, सागर आठवले यांसह जिल्ह्यातील युवक आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोहारा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
मुलीवर लातूर मध्ये उपचार सुरू
तालुक्यातील एका खेडेगावात नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी या मुलीवर पाळत ठेऊन अत्याचार करण्यात आला त्यानंतर पीडितेची प्रकृती खालावली . तिच्या पालकांनी तिला स्पर्श ग्रामीण रुग्णालयात दाखल केले . त्यावेळी तिच्या आई – वडिलांनी उलट्या , जुलाब होत असल्याचे सांगितले . परंतु , डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केली . त्यात तिने चौघांनी अत्याचार केल्याचे सांगितले . याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाल्यानंतर पीडितेला पुढील उपचार व तपासणीसाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले . याबाबत पोलिस अधीक्षक राजतीलक रोशन यांना संपर्क साधला असता त्यांनी, महिला सपोनी तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या आहेत काल देखील त्या गेल्या होत्या मात्र पीडितेच्या कुटुंबीयांनी एफ आय आर नोंदवली नसल्याचे सांगितले.






















































