Home Blog Page 252

अज्ञाताकडून प्रौढ व्यक्तीचा खून; ईट हादरले

 

ईट-(प्रतिनिधी)ईट येथे विठ्ठल सोनबा चव्हाण यांची अज्ञाताने दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली . ही घटना ईट जातेगाव रोडवर ईरीकेशन कॉलनी जवळील आंबरईत  घडली. सदर घटनेमुळे ईट परिसर हादरला असून मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे .तसेच नागरिकातून वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत.  याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 22 ते 23 जानेवारी च्या राञी अज्ञात मारेकर्‍यां कडून दगडांनी  विठ्ठल चव्हाण यांचे तोंडावर दगड मारून  हत्या करण्यात आली . प्रकरणाच्या तपासासाठी डॉग स्काॅडला  पाचारण करण्यात आले होते. तसेच घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असून उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. 

दैनिक जनमत २३ जानेवारी E paper

 

अर्नब गोस्वामी यांच्यावर कठोर कारवाई करा – उस्मानाबाद काँग्रेस

उस्मानाबाद : रिपब्लिक टी.व्ही.चे संपादक अर्नब गोस्वामी आणि B.A.R.C. चे C.E.O. पार्थोदास गुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सी.आर.पी.एफ. जवानांवर झालेल्या हल्यानंतर पाकिस्तानातील बालकोटवर भारताने हवाई हल्ला केला . या कारवाईची माहिती अर्नब गोस्वामींना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे . देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी आली ? देशाच्या संरक्षण विषयक महत्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर असून लष्करी कारवाई संदर्भातील माहिती बाहेर कशी आली ? ही माहिती गोस्वामीला कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी म्हणजे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी कशी काय मिळाली ? त्याने अजून कोणाला ही माहिती दिली का ? तसेच त्याने स्वतः सांगितले आहे की , ज्याने त्याला ही माहिती दिली तो मोदी सरकार मधील मोठा व्यक्ती आहे . त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे . अर्नब गोस्वामी याचे हे कृत्य Official Secrets Act – १९२३ , Sec.५ नुसार कार्यालयीन गोपनियतेचा भंग करणारे आहेतच पण हा देशद्रोहाचा प्रकार आहे. असे उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी निवेदनात नमूद केले आहे

 पत्रकार अर्नब गोस्वामीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.  गोस्वामी आणि त्यांच्या रिपब्लिक टी.व्ही.ने अनेक बेकायदेशीर कृत्य केली असून दुरदर्शनची सॅटेलाईट फ्रिक्वन्शी बेकायदेशीर वापरून प्रसार भारतीचे करोडो रुपयांचे नुकसानही केले आहे . रिपब्लिक टी.व्ही . ने दुरदर्शनला पैसे न देता त्यांच्या फ्रिक्वन्शी वापरने हा गुन्हा आहे . टी.आर.पी. घोटाळ्याची चौकशी करताना या बेकायदेशीर कृत्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे . दुरदर्शनने माहिती व प्रसारण मंत्री राजवर्धन राठोड यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली असता राठोड यांनी ती तक्रार बाजूला ठेवली असे या संभाषणातून दिसून येत आहे . याचाच अर्थ मोदी सरकारचा गोस्वामीला पाठींबा आहे . जनतेचा पैसा लुबाडणाऱ्या अर्नब गोस्वामी विरोधात केंद्र सरकार कारवाई का करत नाही असा प्रश्न काँग्रेस कमिटीने या निवेदनात उपस्थित केला आहे. 

 व्हॉट्सअप चॅट वरून अर्नब गोस्वामी यांचे पंतप्रधान , गृहमंत्री यांच्यासह सरकार मधील मंत्र्यांशी अत्यंत निकटचे संबंध असून त्यांनी त्याला नियमाच्या पलीकडे जावून व्यवसायीक मदत केली असल्याचे स्पष्ट आहे . त्या सोबतच पुलवामा हल्ला हा मोठ्या व्यक्तीच्या फायद्याचा आहे तो निवडणुक जिकेल असा उल्लेख ही या चॅट मध्ये आहे . त्यामुळे भाजपने निवडणुक जिंकण्यासाठी शहीद जवानांच्या बलीदानाचा वापर केला का ? याचे उत्तर ही केंद्र सरकारने दिले पाहिजे. अर्नब गोस्वामी आणि केंद्रातील भाजप सरकारचे साटेलोटे हा माध्यम स्वातंत्र्य , देशाची सुरक्षा आणि लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे निवेदनातील सर्व गंभीर बाबींची चौकशी करून अर्नब गोस्वामी यांना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गृहमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देऊन करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष धीरजभैय्या पाटील, कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, संघटक राजेंद्र शेरखाने, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सय्यद खलील सर, प्रशांत पाटील, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, मा.नगरसेवक दर्शन कोळगे, युवक प्रदेश सचिव उमेश राजेनिंबाळकर, मूहिब शेख, खुद्दुस सिद्दीकी, हरिभाऊ शेळके, मिलिंद गोवर्धन, विश्वजित शिंदे, राहुल लोखंडे, अभिजित देडे, प्रसन्न कथले कृष्णा तवले, सचिन धाकतोडे, समाधान घाटशिळे, सुरेंद्र पाटील, मेहराज शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

बिनविरोध गोरडवाडीच्या नूतन सदस्यांना दिला १११ वर्षीय आजोबांनी आशीर्वाद

 

विश्वजीत गोरड/पिलिव प्रतिनिधी : सोलापूर- सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवरील माण- माळशिरस तालुक्याच्या मध्यावर माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी हे सधन गाव असून या गावातील वयोवृद्ध, तरुण व सर्वसमावेशक घटकांनी एकत्र येऊन गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून आदर्श निर्माण केला. त्या आनंदाप्रीत्यर्थ माजी सरपंच  नानासाहेब कर्णवर पाटील यांनी कर्णवर पाटील परिवारातर्फे नूतन बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान ,त्यांचे वडील आबाजी कर्णवर पाटील यांच्या १११ व्या वाढदिवसाचे व मुलगा सद्गुरू श्री श्री साखर कारखाना लिमिटेड राजेवाडी श्री श्रीनगर चे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या आजोबां- नातूं च्या  औक्षणाच्या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नुकताच वाढदिवस झालेले सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन एन शेषागिरी राव यांना निमंत्रित केले होते ‌.त्याच वेळी तालुक्यातील जुन्या पिढीतील,नव्या पिढीतील सर्व जेष्ठ,श्रेष्ठ मंडळींच्या उपस्थितीत वाढदिवसाचा आनंद घेत औक्षणाचा कार्यक्रम आनंदात पार पाडीत. १११ वयाच्या पित्याकडून बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यांचा व पत्रकार दिनाचे महत्त्व ओळखून तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करून नवनिर्वाचित सदस्यांना आशीर्वाद देऊन मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे नियोजन ए.पी.आय. सोमनाथ कर्णवर, अजित बापू कर्णवर , शामराव कर्णवर,सचिन  कर्णवर व अतुल आवाड यांनी केले तर आभार पै.गणेश कर्णवर यांनी मानले. गोरडवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यामुळे उत्सवमूर्तींचे नातू ए.पी.आय सोमनाथ कर्णवर यांनी ५१ हजार रुपये गावच्या विकासासाठी दिले.

जिल्हा परिषदांच्या महिला व बालकल्याण समितीअंतर्गत विविध योजनांमध्ये सुधारणा

 मुलींना हॉस्टेलकरीता मिळणार १० हजार रुपयांपर्यंत अनुदान

मुलींना जुडो कराटे, योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षणाच्या अनुदानातही वाढ

अंगणवाडी सेविका, आशा वर्करना मिळणार पुरस्कार, १० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान

अतितीव्र कुपोषणमुक्त गावाला मिळणार ५० हजारांचे बक्षीस

– ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई, दि. १९ : जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बालकल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नातून राबविल्या जाणाऱ्या योजनेंतर्गत आता तालुकास्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी हॉस्टेलकरीता ७ हजार रुपये  व जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी १० हजार रुपये एक रकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली. याशिवाय मुलींना स्वसंरक्षणासाठी व त्यांच्या शारीरीक विकासाठी प्रशिक्षण या योजनेमध्ये जुडो कराटे, योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षण यासाठी आता प्रति प्रशिक्षणार्थी ६०० रुपयांऐवजी १ हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. इयत्ता सातवी ते बारावी पास मुलीना संगणकाबाबतचे ज्ञान, कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील कुटुंब तसेच ज्या कुटुंबाचे उत्पन्न ५० हजार रुपये असलेल्या कुटुंबातील मुलींना देण्यात येत होता. आता कुटुंबाची उत्पन्नाची मर्यादा १ लाख २० हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहितीही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.

महिला व बालकल्याण विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम राबविण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांमध्ये महिला व बालकल्याण समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात या समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नाचे १० टक्के निधीतून विविध योजना राबविण्यात येतात. या योजनेअंतर्गत काही नवीन बाबी तसेच काही बाबींची दर्जान्नत्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

अंगणवाडी सेविका, आशा वर्करना पुरस्कार

बालवाडी व अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, आशा वर्कर आणि जिल्हा परिषदेअंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत कर्मचारी यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या योजनेसाठी प्रत्येक जिल्हा परिषदेत वार्षिक १५ लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यात येणार आहे. बालवाडी व अंगणवाडीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका व आशा वर्कर आणि जिल्हा परिषदेअंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत महिला कर्मचारी यांना आदर्श पुरस्कार तसेच ५ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे.

अतितीव्र कुपोषणमुक्त गावाला मिळणार ५० हजारांचे बक्षीस

दारिद्र्य रेषेखालील कुटुंब तसेच ज्या कुटुंबाची उत्पन्नाची मर्यादा १ लाख २० हजार रुपयांपर्यत आहे अशा कुटुंबातील मुलींना कन्यादान साहित्य वाटप करण्यात येईल. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या बालविकास प्रकल्पातील ज्या गावात किंवा ग्रामपंचायत क्षेत्रात अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या शुन्य होईल त्या ग्रामपंचायतीला दरवर्षी अतितीव्र कुपोषित बालक (SAM ) मुक्त ग्रामपंचायत म्हणून घोषित करण्यात येवून त्या ग्रामपंचायतीला ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. स्वत:च्या इमारती असलेल्या परंतु पिण्याच्या पाण्याची सोय, विद्युत सुविधा, शौचालय सुविधा नसलेल्या अंगणवाडी केंद्राना प्राधान्यक्रमाने या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहितीही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.

पिठाची गिरणी, छोटे किराणा दुकान, मिनी दाल मील आदींसाठी मिळणार महिलांना अनुदान

जिल्हा परिषदेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलींचा बारावी नंतर सत्कार यापूर्वी करण्यात येत होता. आता दहावी व बारावीच्या १८ वर्षाच्या आतील मुलांचा व मुलींचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांना विविध साहित्य पुरविणे या योजनेंतर्गत पिठाची गिरणी, सौर कंदिल, शिलाई मशीन, पिको फॉल मशीन तसेच प्रचलित परिस्थितीनुसार पल्वराईझर (ओले/ सुके उळण यंत्र), पशुधन संगोपन ज्यात शेळीपालन, कोंबड्यापालन, छोटे किराणा दुकान, मिनी दाल मील, घरगुती फळ प्रक्रीया उद्योग, घरगुती मसाला उद्योग साहित्य पुरविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. वस्तु वाटप करताना प्रति महिला जास्तीत जास्त २० हजार रुपयांऐवजी ३० हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. दारिद्र्य रेषेखालील महिला लाभार्थी पुरेशा प्रमाणात न सापडल्यास १ लाख २० हजार रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या अन्य महिलांना लाभ देण्यात येणार आहे.

घरकुल योजनेंतर्गत घटस्फोटीत व परित्यक्त्या याव्यतिरिक्त गरजू महिला यांबरोबरच आता राज्यातील भिक्षेकरी गृहातून सुटका होवून जिल्ह्यात पुनर्वसनासाठी वास्तव्यास आलेल्या महिलांचा देखील समावेश करण्यात आला आहे. ज्या महिलांकडे हक्काचे घर नाही अशा दारिद्र्य रेषेखालील व वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपयांपर्यंत असणाऱ्या महिलांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून ५० हजार रुपयांपर्यंत घरकुलासाठी खर्च करण्यात येणार आहेत.

अनाथ अथवा एकल पालक (आई किंवा वडील) असलेल्या तसेच अंगणवाडी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या मुलींसाठी शालेय साहित्य, दप्तर, शालेय फी व इतर आवश्यक खर्चासाठी डीबीटीद्वारे २ हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येईल. या योजनेचा लाभ ज्या मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपयांपर्यंत असेल अशा मुलींना देण्यात येणार आहे.

किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर, आरोग्य, कुटुंबनियोजन, कायदेविषयक प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शकांना २०० ते ५०० रुपयांपर्यंत मानधन देण्यात येत होते. आता तज्ञ मार्गदर्शकांना १ हजार रुपयांपर्यंत मानधन तसेच प्रवास भत्ता व महागाई भत्ता देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.

००

इंदापुरात भाजपकडे 38 ग्रामपंचायती – हर्षवर्धन पाटील यांचा दावा

   – 4 ग्रामपंचायती संमिश्र   

– भाजपचे वर्चस्व सिद्ध !

प्रतिनिधी -आदित्य बोराटे 

                  इंदापूर तालुक्यात 38 ग्रामपंचायतींवर भाजपची निर्विवादपणे सत्ता आली आहे, तर 4 ग्रामपंचायती संमिश्र आहेत. भिगवण, वालचंदनगर आदी प्रमुख ग्रामपंचायतींवर भाजपने एकतर्फी सत्ता  मिळवली आहे. या निवडणूक निकालातून इंदापूर तालुक्यावरील भाजपचे वर्चस्व निर्विवादपणे  सिद्ध झाले आहे,अशी माहिती भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निकालानंतर बोलताना सॊमवारी दिली.

             इंदापूर तालुक्यातील जनता भाजपच्या  पाठीमागे असल्याचे मतदारांनी दाखवून दिले आहे. इंदापूरच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात  जनतेने मतपेटीतून दिलेला हा स्पष्ट कौल असल्याचे प्रतिपादनही भाजप नेते पाटील यांनी केले.

              या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या ताब्यातील अनेक ग्रामपंचायती भाजपने ताब्यात घेतल्या आहेत. भाजपच्या ताब्यात तालुक्यातील सुमारे 70 टक्के ग्रामपंचायती आल्या आहेत. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी कारखान्याच्या  उपाध्यक्ष पद्माताई भोसले, नीरा-भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, इंदापूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे आदींसह भाजपचे सर्व पदाधिकारी, गावोगावच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत विजयासाठी परिश्रम घेतल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. आगामी काळातील सर्वच निवडणुका जिंकून भाजप आपली ताकद दाखवून देईल, असा विश्वासही हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

         नीरा नरसिंहपूर, गोंदी,ओझरे, पिठेवाडी, भोडणी, भांडगाव, कचरवाडी( बा.), टणू,  सरडेवाडी, बाभुळगाव,गलांडवाडी नं.1, गलांडवाडी नं.2, वरकुटे खुर्द, जाधववाडी, रेडा, सराफवाडी, पिटकेश्वर, निमसाखर, भिगवण, तक्रारवाडी, पोंधवडी, शेटफळगढे, अकोले, निरगुडे, निंबोडी, पिंपळे, व्याहळी, गोतोंडी, दगडवाडी, निरवांगी, तावशी, भादलवाडी, वालचंदनगर, कळंब,सपकळवाडी, लोणी देवकर,बळपुडी, भावडी, चांडगाव या 38 ग्रामपंचायती भाजपकडे आल्या आहेत.

  दरम्यान,या विजयी उमेदवारांचे हर्षवर्धन पाटील यांचेसह आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, राजवर्धन पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार  आदींनी अभिनंदन केले आहे.