Home Blog Page 213

डोंगरेवाडीत मोरया गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर संम्पन्न

 


 पारा (राहुल शेळके ):वाशी तालुक्यातील डोंगरेवाडी येथील कुरुंद वस्तीवरील मोरया गणेश मंडळाच्या वतीने 17सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

       या शिबिरास ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण 55 रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले.यावेळी रक्त दान केलेल्या सर्वाना एक भेट वस्तू देण्यात आली.

यावेळी सोसायटी चेअरमन पोपट कुरुंद, सुभाष कुरुंद, बालाजी कुरुंद, नितीन भराटे, महादेव कुरुंद, दत्तात्रय कुरुंद, मोरया गणेश मंडळाचे अध्यक्ष आदेश कुरुंद,शुभम कुरुंद,सूरज कुरुंद,ऋषीकेश कुरुंद,मधुकर कुरुंद, रणजित भराटे, रोहित कुरुंद, मुकुंद कुरुंद, रणजित कुरुंद, किरण कुरुंद, अक्षय कुरुंद,श्रीहरी कुरुंद,नरसिंग कुरुंद आदी सह पदाधिकारी उपस्थित होते.

हिप्परगा येथे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा




सलगरा, दि.१७ (प्रतिक भोसले)

 हिप्परगा रवा येथील राष्ट्रीय शाळेचे शताब्दी वर्ष व ७५ व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयात आ. ज्ञानराज चौगुले यांच्या ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने सुरु केलेल्या वाचनालयाचा शुभारंभ दि.१७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार तथा ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानराज चौगुले हे होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व आ. ज्ञानराज चौगुले यांनी येथील स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. या वाचनालयात विविध साहित्यिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भविष्यात या ठिकाणी भव्य असे वाचनालय उभे करून त्यातून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा संपूर्ण इतिहास व या लढ्यातील हिप्परगा येथील राष्ट्रीय शाळेचे महत्त्व या बाबतची सखोल माहिती लोकांना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या वेळी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्रामाला ज्या शाळेतून खरी उर्जा मिळाली, त्या लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील राष्ट्रीय शाळेला या वर्षी १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वामी रामानंद तीर्थ यांनी येथे मुख्याध्यापक म्हणून फक्त ज्ञानदानाचेच कार्य न करता देशभक्ती अन स्वातंत्र्यलढ्याचे धडेही विद्यार्थ्यांना दिले आहेत. 

उस्मानाबाद – हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झालेले उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक आयुष्यभर क्रियाशील राहिले आणि आजही क्रियाशील आहेत, ज्यांनी या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला, अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची सदैव जाणीव राहील, मराठवाडा मुक्ती संग्रामातील थोर हुतात्म्यांच्या बलिदानाच्या प्रेरणेमुळे मराठवाड्याचा विकास झाल्याचे प्रतिपादन या वेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले. जिल्हा प्रशासनामार्फत मुक्तीसंग्रामातील महत्त्वाची स्मारके, संग्रामाचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. हिप्परगा (रवा) येथील राष्ट्रीय शाळेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दलही वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या मुळे मुक्तीसंग्राम लढ्याला निश्चितच उजाळा मिळेल असे सुद्धा जिल्हाधिकारी बोलताना म्हणाले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले, परंतु हैद्राबाद, काश्मीर व जुनागढ संस्थानांतील जनता गुलामीतच होती. मराठवाडा निजामाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन छेडले गेले. त्यात उस्मानाबाद जिल्हा आघाडीवर होता. या लढयात अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, निजाम शरण येण्यास तयार नव्हता त्या वेळी भारत सरकारने पोलीस ॲक्शन सुरु केली. व शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या जुलूमी राजवटीतून मुक्त झाला. या लढयामुळे भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले. मराठवाडा मुक्ती संग्रामानंतर मराठवाडयाची उस्मानाबाद जिल्हयासह सर्वांगीण विकासाकडे वाटचाल सुरु झाली, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले.

या कार्यक्रमा वेळी हैदराबाद मुक्तिसंग्राम पुस्तकाचे लेखक वसंतराव पोतदार यांच्या पत्नी सुशीलाबाई वसंतराव पोतदार यांच्यासह रूक्मीनबाई पंढरी मुळे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संतोष रुईकर, गटविकास अधिकारी सोपान अकेले, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, माजी नगराध्यक्ष रजाक आत्तार, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, सरपंच राम मोरे, माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजीत लोमटे, मुख्याध्यापक एस.बी.भुईटे, चेअरमन संतोष गवळी, तंटामुक्ती अध्यक्ष बाजीराव जाधव, धर्मवीर जाधव, विजय पवार, किरण गायकवाड, रूक्मीनबाई होनाळकर, ज्ञानज्योती संस्थेचे विजय वडदरे, अमर सरगर, बी.के. पवार, सरपंच नामदेव लोभे, जगन  पाटील, प्रेम लांडगे, शिवा सुतार, जगदीश लांडगे, अभिमान खराडे, शाम नारायणकर, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष भरत सुतार यांच्या सह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

वारणा दूध संघ ५३ वी वार्षिक सभा संपन्न


वारणा दूध संघ उत्पादकांच्या जनावरांसाठी ५० हजारांचे विमा संरक्षण देणार-अध्यक्ष आमदार विनय कोरे यांची सभेत माहीती 

‘ We Warana  ‘ या नवीन ॲपचा शुभारंभ –

वारणानगर – वारणा दूध संघामार्फत दूध उत्पादकांच्या  जनावरांसाठी ५० हजारांची विमा सरंक्षण योजना राबविणार असून म्हैसांना व मुऱ्हा जातीच्या रेडी संगोपणासाठी ३० हजार रूपये अनुदान  देणार असल्याची घोषणा वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे यांनी सभेत बोलताना केली.तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा सहकारी दूध संघाची ५३ वी ऑनलाईन वार्षिक सभा वारणा शिक्षण संकुलात झाली दूध उत्पादक शेतकरी व दूध संघ यांच्यातील समन्वयासाठी ‘ We Warana App ” या वारणा दूध संघाच्या नवीन अॅपचे उद़घाटन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते झाले.आमदार कोरे म्हणाले, वारणा दूध संघाने शेतकरी उत्पादकांचे कायमच हित पाहीले उत्पादकांच्या दोन जनावरांसाठी विमा कवच योजना राबाविणार असून दूध उत्पादकांचे प्रती जनावर ५०० रू व संघ ५०० रु अशा १००० रु विमा रक्कमेतून जनावरे दगावल्यास प्रती जनावरास ५० हजार रूपये संरक्षण देणार आहे दूध उत्पादकानी म्हैसांना व मुऱ्हा जातीच्या रेडीचे संगोपन करून ती रेडी पहिल्या वेत्तास व्याल्यास त्यापोटी ३० हजार रू. व दुसऱ्या वेत्तास १५ हजार तर देशी गायीस संगोपन केल्यास १५ व ७ हजार रू दोन वेत्तास अनुदान देण्यात येणार आहे दूध उत्पादक शेतकरी व संघ यांच्यातील समन्वयासाठी संघाने नवीन अॅपची संकल्पना  आणली असून उत्पादकांच्या तक्रारीचे निरसन,पशूवैद्यकीय सेवे बरोबर इतर सुविधा व माहिती मिळणार आहे.वारणा दूध संघाने कोरोनाच्या महामारीत अहवाल सालात ९३४ कोटीची वार्षिक उलाढाल करून ६४ कोटी ३९ लाख रूपयांचा  ढोबळ नफा झाला आहे पावडर व बटरमध्ये मोठे नुकसान होऊन देखील १३० कोटी रूपये बँक कर्जाची परतफेड केली दुग्ध पदार्थाच्या विक्री व्यवस्थेत बदल करुन  रिलायन्स,डी-मार्ट, शेतकरी संघ यांच्याशी करार करणेत आल्याने वारणाची दूध व दुग्ध उत्पादने ग्राहकापर्यंत पोहचवण्याचे काम संघाने केले असून  भारतीय सैन्य दल,रेल्वे,बिहार राज्य,आदिवाशी शाळानां तूप,दूध, पावडरची मागणी वाढली आहे बोर्नव्हिटा या कंपनीची मागणी वाढल्याने माल्टेड फूडची क्षमता वाढवण्यासाठी ३० कोटी रूपयांचा नवा प्रकल्प डिसेंबर अखेर सुरु करण्यात येणार असून परिसरातील १५० लोकांना रोजगार मिळणार आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून अॅग्रीकल्चरल डेअरी  डिप्लोमा व पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आमदार कोरे यानी सांगीतले.


संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी नोटीस वाचन व श्रध्दांजलीचा ठराव मांडला सभेपूढील सर्व विषय सभासदांनी मंजूर केलेत.व्यासपीठावर संघाचे उपाध्यक्ष एच.आर. जाधव,संघाचे सर्व संचालक, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील,वारणा बॅंकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, बॅंक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी अमितकुमार उपस्थित होते.शीतल बसरे व राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर  उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांनी आभार मानले.


तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा सहकारी दूध संघाच्या ५३ व्या  वार्षिक सभेत संघाचे अध्यक्ष व आमदार डॉ.विनय कोरे यांनी  मार्गदर्शन केले यावेड़ी  संघाचे उपाध्यक्ष एच.आर.जाधव, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर,सर्व संचालक मंडळ,कारखा न्याचे प्रतापराव पाटील, बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील आदी



अतिवृष्टीमुळे बाधित झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही-पालकमंत्री शंकरराव गडाख

 

                                           
उस्मानाबाद,दि.17(प्रतिनिधी):-  जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे तर काही ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा सर्व शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. तेंव्हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत केली जाईल. एकही अतिवृष्टग्रस्त किंवा पावसाने ओढ दिल्याने बांधित झालेला शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आज येथे केले.
जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारगाव येथे अतिवृष्टीने बांधित झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. 14 ऑगस्ट रोजी मी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो होतो. तेंव्हा दोन-तीन आठवडे पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची पीके सुकत होती, त्याची पाहणी करुन मी तेंव्हा पीक विमा कंपनी आणि महसूल प्रशासन यांना संयुक्त पीक पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. ते कामही सुरु झाले होते. त्यानंतर काही दिवसातच जिल्हयात पावसाचे पुन्हा आगमन झाले. जिल्हयातील काही भागात अतिवृष्टी होऊन पुन्हा पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर अतिवृष्ठीग्रस्त पिकांचीही पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. या पंचनाम्याचे काम अंतीम टप्यात आहे. केवळ आपल्याच जिल्हयात नव्हे तर मराठवाडयातील बहुतेक जिल्हयात अतिवृष्‍टीने पिकांचे नुकसान झाले आहे. मुंबईत याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेऊन राज्यशासन शेतकऱ्यांना मदत करेल. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सरकार शेतकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल, या मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पीक पाहणीस उशिरा सुरुवात झाली असली तरी एकही शेतकरी या पाहणीतून सुटणार नाही.उशिरा पीक पाहणी सुरु झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करुन पारगाव येथील मांजरा नदीच्या पात्रा शेजारच्या शेतीतील पिकांचे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करुन श्री.गडाख यांनी तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेतल्या. सोलापूर-धुळे महामार्गाजवळच्या मांजरा नदीच्या पात्राशेजारच्या शेतीत पुराचे पाणी येत असेल तर त्याला थांबविण्यासाठी येथून जवळच असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. परंतु अनेक शेतकरी अशा कामास विरोध करतात. त्यांना आपली शेती जाण्याची भिती असते. तेंव्हा या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्ती, नदीचे खोलीकरण आणि संबंधित इतर कामे करण्याची गरज आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी लेखी हमी देऊन काम करण्याची मागणी केल्यास या बंधाऱ्यांचे काम केले जाईल. त्या कामास निधीची कमतरता कमी पडू दिली जाणार नाही. पण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या कामास सहकार्य करावे, शासन आपल्या पाठीशी आहे, असे आश्वासनही पालकमंत्री श्री.गडाख यांनी शेतकऱ्यांना दिले.
मागच्या सरकारच्या काळातील जलसंधारणाच्या कामात अनियमितता झाल्याचा अक्षेप कॉगने नोंदविला आहे. कॉगने दोन हजारांवर कामांची तपासणी केली असता त्यापैकी नऊशे ते एक हजार कामात अनियमितता आढळून आली आहे.गेल्या सरकारने राज्यात जलसंधारणाची एक लाख कामे केली होती.या कामांबाबत राज्यातील शेतक-यांकडून अजूनही मोठया प्रमाणावर तक्रारी येत आहेत. या तक्रारींची चौकशी जिल्हाधिकारी, एस.आय.टी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून करण्यात येणार आहे,अशी माहितीही त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एक प्रश्नाच्या उत्तरात दिली.
ई-पीक पाहणी हा नवा प्रयोग आहे. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन शेतक-यांना जलद गतीने मदत करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.यात काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करता येतील.पण शेतकऱ्यांनी हे नवे तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
          यावेळी पालकमंत्री यांचे खाजगी सचिन बपासाहेब थोरात,कळंबच्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ,वाशीचे तहसीलदार श्री.जाधव,शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

१८ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक  १८ सप्टेंबर  २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये   १२  लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस
       उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक १८ सप्टेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १२  लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २  वाजेपर्यंत आहे. दिनांक १७ सप्टेंबर २०२१  रोजी सायंकाळी चार  वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.



२) दिनांक १८ सप्टेंबर २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील  ११  लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोविशील्ड लसीचा डोस
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक १८ सप्टेंबर  २०२१ रोजी  ११ लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८  वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


    लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

लहान बालकांच्या खाऊत आळ्या! तेर येथील अंगणवाडीत निकृष्ट खाऊचा पुरवठा

 




तेर – उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या वतीने पोषण महिना साजरा केला जात आहे. किमान या महिन्यात तरी लाभार्थ्यांना सकस आहाराचा पुरवठा होईल अशी अपेक्षा होती मात्र ही अपेक्षा फोल ठरली असून तेर येथील अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या खाऊत आल्या आढळून आल्याने निकृष्ट आहार पुरवठ्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.

याबाबतीत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे एकात्मिक बालविकास प्रकल्पातंर्गत चालविणयात येणाऱ्या तेर मधील  अंगणवाडी मधये निकृष्ट दर्जाचे खाऊ पुरविण्यात येत असून या प्रकारामुळे पालकामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.गुरुवार दि.१६ जागरूक पालक हनुमंत कानाडे यांच्या बाळाला अंगणवाडी क्रमांक २०७ मधून  दिलेल्या पुड्यात चक्क अळ्या आढळून आल्या.तेर येथील एका बचत गटाकडून हा खाऊ पुरविला जात आहे. तो निकृष्ट असल्याने यापूर्वी ही बहुतांश पालकांनी अंगणवाडी च्या सेविकांना खाऊ घेऊन जाण्यास  नकार दिला आहे.दरम्यान तेर प्रकल्पाचे प्रकल्प आधिकारी जे.जी.राठोड,विस्तार अधिकारी पी.बी.वळसे पर्यवेक्षिका मनीषा पाटील यांनी या प्रकारणांचा पंचनामा केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मंगेश पांगरकर, अविनाश इंगळे वैभव वैरागकर, सुरज इंगळे, आमन कोळपे, महेश गाढवे, हनुमंत कानडे, राजेंद्र कानडे यांच्या पंचनाम्यावर सह्या आहेत.दरम्यान अंगणवाडी मधील बालकांना पुर्वी प्रमाणेच पोषण आहार चे वाटप करण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य मंगेश पांगरकर यांनी केली.

पारा परिसरात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

 

पारा (राहुल शेळके ): वाशी तालुक्यातील पारा व परिसरात  17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती  संग्राम दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच राजेंद्र काशीद, जि. प. के. प्रा. शाळेत मुख्याध्यापक जोगदंड, वि. का. सेवा सहकारी सोसायटीत चेअरमन बाळासाहेब भराटे, औट पोस्ट पारा येथे जमादार मोहसीन खान पठाण, जय भवानी विद्यालयात मुख्याध्यापक दिलीप मोरे, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. अमर तांबडे, ग्रामीण विध्यालय लाखणगाव येथे संस्थेचे अध्यक्ष सुरेश लाखे पाटील , जि. प. शाळा लाखणगाव येथे मुख्यध्यापक संतोष झांबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच या कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते स्वामी रामानंद  तीर्थ, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमात गावातील मंडळी, विध्यार्थी, पत्रकार उपस्थित होते.

उस्मानाबाद जिल्हयातील 89 योजनांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत साडेचौदा कोटी मंजूर

उस्मानाबाद जिल्हयातील 89 योजनांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत साडेचौदा कोटी मंजूर

पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नांना यश; जिल्हयातील 2139 हेक्टर सिंचन क्षेत्र वाढणार

      

उस्मानाबाद,दि.16(प्रतिनिधी):- राज्यातील पूर्ण झालेल्या जलसंधारण योजनांपैकी देखभाल आणि दुरुस्ती आवश्यक असलेल्या योजनांचे परिक्षण आणि दुरुस्ती करुन सिंचन क्षमता पुनर्स्थापित करण्याच्या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री जल संवर्धन योजना राबविण्यात येत आहे.त्याअंतर्गत उस्मानाबाद जिल्हयातील 89 योजनांच्या दुरुस्तीच्या 14 कोटी 46 लाख 54 हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास राज्य शासनाने आज प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रकल्पांच्या दुरुस्तीनंतर जिल्हयात 2138.74 हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होऊन 106.94.70 स.घ.मी.पाणी साठा पुनर्स्थापित होणार आहे.राज्याचे मृत व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नामुळे ही प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

  या कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला होता.औरंगाबाद येथील जलसंधारण अधिकारी,मृद व जलसंधारण विभाग यांनी आपल्या स्तरावर सर्व अंदाजपत्रकांची छाननी आणि तपासणी केले आहे.सर्व बाबींचा विचार करुन उस्मानाबाद जिल्हयातील 89 कामे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेच्या सुधारित आराखडयात द्वितीय प्राधान्यक्रमात समाविष्ट असल्याने प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याचे विचाराधीन होते.त्यानुसार मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत औरंगाबाद प्रादेशिक जलसंधारण विभागातील एकून 89 दुरुस्ती योजनांची अंदाजपत्रकीय किंमत 14 कोटी 46 लाख 54 हजार इतकी आहे.

या किंमतीच्या अंदाजपत्रकांना पुढील अटीं आणि शतींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यात पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी ठेकेदारास निविदेत अटी घालून बंधनकारक करण्यात आले आहे. पाणी वापर संस्थांची स्थापना होईपर्यंत निविदेच्या 10 टक्के रक्कम ठेकेदाराच्या देयकातून कपात करण्यात येणार आहे. पाणी वापर संस्था स्थापन झाल्यानंतर ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत संस्था स्थापित होऊ शकत नसल्यास सविस्तर कारणमीमांसेसह प्रस्ताव शासनास सादर करुन शासनाच्या मान्यतेनंतर कपात केलेला 10 टक्के निधी वितरीत करण्यात येणार आहे. पाणी वापर संस्था स्थापन केल्याबद्दल ठेकेदारास मृद व जलसंधारण विभाग शा.नि.क्र.: लपायो-2018/प्र.क्र : 177/ जल-1 दि. 20-07-2018 मधील भाग C नुसार मानधन देण्यात येणार आहे.

याबरोबर शासन निर्णय दि. 20 जुलै 2018 मधील तरतुदीनुसार दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास सक्षम प्राधिकारी यांनी तांत्रिक मान्यता द्यावी, दुरुस्तीच्या कामाचा दोष दायित्व कालावधी (Defect Liability Period) हा पाच वर्ष राहील, दुरुस्तींच्या कामांचे Geotag आणि वेळेसह व्हिडीओ चित्रिकरण बंधनकारक राहील, हे काम झाल्यानंतर 50 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर, 75 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर, 100 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर या कामात पाच टप्प्यात Geotag व्हिडीओ चित्रिकरण करण्यात यावे. प्रत्येक टप्प्याच्या व्हिडीओ चित्रिकरणाचा कालावधी किमान तीन मिनिटांचा आवश्यक राहील. काम सुरु करण्यापूर्वी एका बाजूने चित्रिकरण सुरुवात करुन दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण चित्रिकरण करण्यात यावे. 

व्हिडीओ चित्रिकरण करताना प्रत्येक वेळेस कामाचे जलसंधारण अधिकारी आणि कंत्राटदार त्यांच्या प्रशिक्षित तांत्रिक कर्मचारी यांची उपस्थिती अनिवार्य आहे. किमान दोनवेळेस खुद्द कंत्राटदाराची उपस्थिती आवश्यक आहे. चित्रिकरणांमध्ये किमान दोन टप्प्यामध्ये उपअभियंता व एका टप्प्यामध्ये कार्यकारी अभियंता यांची उपस्थिती अनिवार्य आहे. देयके पारित करताना मोजमाप पुस्तिका सोबत चित्रिकरणाचा पेनड्राईव्ह सादर करावा. तसे मोजमाप पुस्तिकेत नमुद करावे. या चित्रिकरणाची प्रत कार्यकारी अभियंता यांनी तपासावी आणि या निर्णयातील सूचनांप्रमाणे चित्रिकरण नसल्यास देयक पारित करु नयेत. चित्रिकरणाची किमान 15 सेकंदाची संक्षिप्त प्रत विभागाच्या जिओ पोर्टलवर अपलोड करण्यात यावी. 

कामाची गुणवत्ता उत्तम दर्जाची राहील याची सर्वस्वी जबाबदारी जलसंधारण अधिकारी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी , जिल्हा जलसंधारण अधिकारी यांची राहील. गुणनियंत्रण चाचण्या मापदंडानुसार कराव्या लागणार आहेत. क्रॉस चेकिंगसाठी इतर विभागाच्या अखत्यारीतील उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांनी दुरुस्तीचे काम सुरु असताना तपासणी करावयाची आहे. त्यांची नियुक्ती प्रादेशिक जलसंधारण अधिकारी यांनी करावयाची आहे. काम पूर्ण झाल्यानंतर कामाची गुणनियंत्रणाच्या दृष्टीने विभागाच्या दक्षता आणि गुणनियंत्रण पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे. ज्या योजनांची अंदाजपत्रकीय किंमत, दुरुस्तीचा खर्च हा 20 टक्क्यांपेक्षा जास्त येत असेल अशा योजनांची दुरुस्तीची अंमलबजावणी शासन निर्णय 20 जुलै 2018 मधील मार्गदर्शक सूचना क्र.7(1) मधील तरतुदीनुसार करण्यात यावी.

गाळ काढण्याचे काम हे लोकसहभागातून, रोहयोतून किंवा यांत्रिकी विभागामार्फत करण्यात यावे. कामांची द्विरुक्ती होणार नाही याची दक्षता घेण्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा जलसंधारण अधिकारी आणि उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांची असेल. दुरुस्तीचे प्रस्ताव प्रादेशिक जलसंधारण अधिकारी यांच्या स्तरावर तपासणी केली असल्यास प्रस्तावात अपूर्ण माहिती किंवा चुकीची माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास त्यास सर्वस्वी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी आणि त्यांच्या अखत्यारीतील संबंधित क्षेत्रीय अधिकारी जबाबदार राहतील. केलेल्या कामाचा तपशील ग्रामसभेसमोर ठेवण्यात यावा. ज्या योजनांची दुरुस्ती केल्यावर सिंचन क्षेत्र पुनर्स्थापित होत नाही, अशा योजनांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येऊ नये. शासन निर्णय मृद व जलसंधारण विभाग क्र. मुजयो-2020/प्र.क्र.76/जल-1,दि. 17 फेब्रुवारी 2021 मध्ये देण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागणार आहे.