Home Blog Page 208

शासकीय कर्मचारी संघटनांची आंदोलने ठरणार निष्फळ?

उस्मानाबाद – आपल्या न्याय हक्क मागण्यांसाठी लढणाऱ्या विविध शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांची आंदोलने निष्फळ ठरणार आहेत. वारंवार होणाऱ्या आंदोलनामुळे शासकीय कामकाज ठप्प होत असल्याने त्याचा विपरीत परिणाम होतो. तो टाळण्यासाठी नव्या मार्गदर्शक सूचना काढल्या असून २०१७ मध्ये काढलेल्या एका शासन निर्णयाचा आधार घेत या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जिल्हा / विभागामध्ये कार्यरत कर्मचारी संघटना तसेच अशा इतर संघटना ज्या श्रमिक अधिनियमाखाली, धर्मादाय आयुक्त किंवा इतर कायद्यान्वये नोंदणीकृत असल्या तरी या अशा संघटनांना जर शासन मान्यता नसेल तर अशा संघटनांकडून येणा-या कुठल्याही निवेदनाची/ अभिवेदनाची/पत्र व्यवहाराची दखल घेण्यात येऊ नये असे परिपत्रकात म्हटले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालये, क्षेत्रिय कार्यालये यांचेकडे संघटनांची निवदेने प्राप्त झाल्यास त्या संघटनांच्या लेटरहेडवर शासन मान्यता प्राप्त असल्याचा सामान्य प्रशासन विभाग, कार्यासन १६-अ व्दारा निर्गमित शासन आदेशाचा क्रमांक व दिनांक स्पष्ट नमूद केल्याखेरिज त्यांच्या पत्रव्यवहाराची वा शिष्टमंडळांची दखलही घेण्यात येऊ नये. असेही परिपत्रकात म्हटले आहे.



कोरोनामुळे तुळजापूरात शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने होणारी यात्रा रद्द पण भावीकांना दर्शन घेता येणार- जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने मंदिर संस्थानातर्फे जबाबदाऱ्या निश्चित

   उस्मानाबाद,दि.27(प्रतिनिधी):- राज्य शासनाने मंदिर उघडण्या अनुषंगाने निर्देश दिल्यामुळे तुळजापूर येथे श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाची पूर्व तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने मंदिर संस्थानचे प्रतिनिधी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने होणारी तीन दिवसीय यात्रा यावर्षी भरवण्यात येणार नाही. पण यानिमित्ताने सर्व पूजा आणि विधी होणार असून भावीकांना कोरोनाचे नियम पाळून दर्शन घेता येणार आहे,अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक नीवा जैन, तुळजापूरचे तहसीलदार तथा विश्वस्त सदस्य सौदागर तांदळे, तहसीलदार तथा व्यवस्थापक मंदिर संस्थान योगिता कोल्हे, पोलिस अधिकारी काशीद, वाय.एम.बागुल,  सिध्देश्वर इंतुले, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह भराडे, तालुका आरोग्य अधिकारी सुहास पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंचला बोडके, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक विजय चिंचाळकर, एस.टी.चे विभागीय नियंत्रक अमृता ताम्हणकर, अश्वजीत जानराव, जिल्हा पुरवठा विभागातील सचिन काळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एस.व्ही.घोडके, कर्नाटक एस.टी. महामंडळाचे आर.बी.जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेल्लोरे, महामार्ग 52 चे देवेंद्रसिंग, राष्ट्रीय महामार्गाचे अनिल विपट, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एम.डी.बोडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन यावर्षी शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्य शासनाने कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून मंदिर उघडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शारदीय नवरात्र महोत्सवातील सर्व पूजा, विधी सर्व प्रकारचे पावित्र्य राखण्यात येईल. भक्तांना दर्शनाची सोयही कोरोनाचे नियम पाळून करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुळजापूर शहरात कोरोना लसीकरणाचे विशेष शिबीर घेण्यात येत आहेत. प्रामुख्याने पुजारी, सेवेकरी आणि मानकऱ्यांबरोबरच संबंधित प्रशासकीय अधिकारी, मंदिर संस्थानशी संबंधित कर्मचाऱ्यांचे आणि नागरिकांचे लसीकरण करण्यास भर देण्यात येत आहे. नवरात्र महोत्सव काळातील यात्रा बंदी असली तरी पुजारी, सेवेकरी आणि मानकऱ्यांकडून करण्यात येणारी पूजा आणि इतर विधी कोरोनाचे सर्व नियम पाळून करण्यात येणार आहे, असे सांगून यानिमित्त आवश्यक त्या सर्व प्रकारच्या आपत्ती व्यवस्थापनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रामुख्याने वाहतुकीचे व्यवस्थापन, बॅरिकेटींग, सुरक्षा, आरोग्य विषयी बाबींवर अधिक भर देण्यात येणार आहे. असेही ते म्हणाले.

या महोत्सवानिमित्त सुरक्षेच्या अनुषंगाने मंदिरातील सी.सी.टी.व्ही.कॅमेऱ्यांचे काम व्यवस्थीत सुरु असल्याची खात्री करुन घेण्यात आली आहे.तसेच नगरपालिकेने बसविलेले काही ठिकाणचे सी.सी.टी.व्ही.कॅमेरे सुरु करण्याची गरज असेल तर तेही काही मंदिर संस्थानतर्फे करण्यात येणार आहे, असे सांगून श्री.दिवेगावकर यांनी समाज विघातक आणि समाज कंटकाच्या हद्दपारीची कार्यवाही पोलिसांनी तातडीने करावी. तसेच समाज माध्यमातून जनतेत भितीचे वातारण पसरवणाऱ्यांचाही बंदोबस्त करावा. अवैध दारु आणि अंमली पदार्थावर बारीक नजर ठेवण्यात यावी. याबाबत राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांनी स्वत: लक्ष घालावे. या नवरात्र महोत्सवानिमित्त ज्याकडे जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत त्यांची नावे, फोन नंबर 29 सप्टेंबर 2021 च्या दुपारपर्यंत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास संबंधित कार्यालय प्रमुखाने कळवावी, असेही ते म्हणाले.

या महोत्सवानिमित्त वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशांचे आणि सूचनांचे संबंधित अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंर्तगत कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री.दिवेगावकर  यांनी सांगितले. यावेळी आमदार पाटील यांनीही विविध सूचना करत हा महोत्सव यशस्वी करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी श्रीमती कोल्हे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे या महोत्सवातील विविध विभागांच्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती दिली.

******

दैनिक जनमत २८ सप्टेंबर २०२१ E paper

पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

             

       उस्मानाबाद,दि.27(प्रतिनिधी):- येथील जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत , त्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले आहेत .   जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत-2021 22 या अर्थिक वर्षासाठी (10 + 1) शेळ्यांचे गट वाटप करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत .  जिल्ह्यास एकूण 44 शेळी गटाचे उदिष्ठ आहे. शेळीगटाची एकूण प्रकल्प किंमत रुपये 1 लाख 3 हजार 545 रुपये असून ७५ टक्के अनुदान रुपये 77 हजार 659 रुपये  अनुज्ञेय राहील. यामध्ये शेळीगटाचा तीन वर्षाच्या विम्याचा समावेश आहे . शेळी गटाची खरेदी प्राधान्याने पुण्यश्लोक आहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास महामंडळ यांच्याकडून करण्यात येईल.

  लाभार्थींची निवड:- दारिद्र रेषेखालील, अत्याल्प भूधारक, अल्प भूधारक,सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात चालू नोंद असलेले),महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र.१ ते ४ मधील) या प्राधान्य क्रमानुसार राहील. महिलांना ३० टक्के आणि दिव्यांगासाठी पाच  टक्के आरक्षण राहील. लाभार्थी निवड समिती, शेळी गट खरेदी समिती शासन नियमानुसार खरेदी प्रक्रिया पूर्ण  करण्यात येईल. योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावा. 

 जिल्हास्तरीय अनुसुचित जाती उपयोजने अंतर्गत अनुसूचित जाती, नवबौध्द लाभार्थ्यांना  पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देण्यासाठी अर्ज  मागवण्यात येत आहेत. 

उस्मानाबाद जिल्ह्यासाठी प्रती तालुका ३० प्रशिक्षणार्थी या प्रमाणे एकूण २४० प्रशिक्षणार्थीचे उदिष्ठ आहे. पंचायत समितीस्तरावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थींची निवड अनुसुचित जाती मधून करण्यात येईल. त्यामध्ये ३० टक्के महिला  आणि पाच  टक्के अपंगासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजनाअंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थींना प्रधान्याने प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण तीन दिवसांचे असेल.  शासन निर्णयानुसार प्रती प्रशिक्षणार्थी एक हजार  रुपये मर्यादेत (सर्व अनुषंगिक बाबीवर) खर्च करण्यात येईल.

अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करावयाचे आहेत. अर्जासोबत जातीचा दाखला, ग्राम पंचायत शिफारस, साक्षांकित फोटो , आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे.

 जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत दुभत्या जनावरांच्या गटाचा पुरवठा करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. 2021-22 या वर्षासाठी उस्मानाबाद जिल्ह्यास एकूण ५६ गाय, म्हैस गटाचे उदिष्ठ आहे.  गाय, म्हैस गटाची एकूण प्रकल्प किंमत रुपये ८५ हजार ०६१ रुपयांच्या ७५ टक्के शासन अनुदान ६३ हजार ७९६ रुपये  अनुज्ञेय राहील. यामध्ये तीन वर्षाच्या विम्याचा समावेश आहे. 

लाभार्थीची निवड : दारिद्र रेषेखालील,अत्यल्प भूधारक,अल्प भूधारक,सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात चालू नोंद असलेले), महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र.१ ते ४ मधील) या प्राधान्य क्रमानुसार राहील. महिलांना ३० टक्के आणि दिव्यांगासाठी पाच टक्के आरक्षण राहील. लाभार्थी निवड समिती, गाय गट खरेदी समिती आणि खरेदी प्रक्रिया शासन नियमानुसार पूर्ण करण्यात येईल. योजनेअंतर्गत लाभ  घेण्यासाठी अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावा. 

 एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत एकदिवसीय सुधारीत कुक्कुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत ५० टक्के अनुदानावर एक दिवसीय सुधारीत कुक्कुट पक्षांच्या 100 पिल्लांचे गट वाटप करणेसाठी  2021-22 या वर्षासाठी एकूण 131 गटाचे उदिष्ठ आहे . प्रकल्प किंमत रुपये १६ हजार रुपये आहे. ५० टक्के शासकिय अनुदान म्हणजेच आठ हजार रुपये अनुज्ञेय राहील. यामध्ये  दोन हजार रुपयांची पिल्ले आणि सहा हजार रुपयांचे  खाद्य याचा समावेश आहे. उर्वरीत ५० टक्के लाभार्थी हिसा आठ हजात रुपयांमधून लाभार्थीने पक्षांचा निवारा, खाद्याची भांडी, पाण्याची भांडी, औषधी यावर खर्च करावयाचा आहे. 

लाभार्थींची निवड : दारिद्र रेषेखालील,भूमिहिन शेतमजूर (तलाठी यांचे भूमिहिन असल्याचे प्रमाणपत्र).  मागासवर्गिय (अनु. जाती/जमाती).अत्याल्प आणि अल्प भूधारक, या प्राधान्य क्रमानुसार राहील. महिलांना ३० टक्के आणि  दिव्यांगासाठी पाच टक्के आरक्षण राहील. लाभार्थी निवड समिती, शासनाने निश्चित केलेली आहे . योजने अंतर्गत लाभ  घेण्यासाठी अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावा. 

 जिल्हा वार्षिक आदिवासी उप योजनेअंतर्गत शेळ्यांचे गट वाटप करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

2021-22 या वर्षीसाठी एकूण १८ शेळी गटाचे उदिष्ठ आहे .  उस्मानाबाद जिल्ह्यात या योजनेअंतर्गत एकूण प्रकल्प किंमत  ७१ हजार २३९ रुपये आहे . ७५ टक्के अनुदान  ५३ हजार ४२९ रुपये अनुज्ञेय राहील. यामध्ये शेळीगटाचा तीन वर्षाच्या विम्याचा समावेश आहे. शेळी गटाची खरेदी प्राधान्याने पुण्यश्लोक आहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यांचेकडून करण्यात येणार आहे. 

लाभार्थीची निवड : दारिद्र रेषेखालील, अत्याल्प भूधारक, अल्प भूधारक,बचत गटातील लाभार्थी (अ.क्र.१ ते ४ मधील) या प्राधान्य क्रमानुसार राहील. ( सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात चालू नोंद असलेले),  महिलांना 30 टक्के दिव्यांगासाठी पाच  टक्के आरक्षण असणार आहे. लाभार्थी निवड समिती, शेळी गट खरेदी समिती शासनाने निश्चित केली आहे,  त्या प्रमाणे खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. योजनाअंतर्गत लाभ  घेण्यासाठी अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावा. 

 जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजने अंतर्गत दोन दुधाळ जनावरांचा गट वाटप करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

 उस्मानाबाद जिल्ह्यास 2021-22 या वर्षासाठी एकूण १५ गाय गट वाटपाचे  उदिष्ठ आहे . प्रकल्प किंमत ८ ५ हजार ६१ रुपये आहे . ७५ टक्के अनुदान म्हणजेच रुपये ६३,७९६/- अनुज्ञेय राहील. यामध्ये तीन वर्षाच्या विम्याचा समावेश आहे.

लाभार्थीची निवड:- (दारिद्र रेषेखालील, अत्याल्प भूधारक,  अल्प भूधारक, सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात चालू नोंद असलेले),  महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र.१ ते ४ मधील) या प्राधान्य क्रमानुसार राहील. महिलांना ३० टक्के व दिव्यांगासाठी ५ टक्के आरक्षण राहील. लाभार्थी निवड समिती, गाय गट खरेदी समिती शासनाने निश्चित केली आहे त्या प्रमाणे खरेदी प्रक्रिया पुर्ण करण्यात येईल. योजने अंतर्गत लाभ  घेण्यासाठी अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावा. 

 अनुसूचित जमातीच्या लाभार्थीना 100 एकदिवसीय सुधारीत कुक्कुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप अर्ज मागणी :-

एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत ५० टक्के अनुदानावर 100 एक दिवसीय सुधारीत कुक्कुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करणेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता एकूण १२५ गटाचे उदिष्ठ असून प्रकल्प किंमत रुपये १६,०००/- आहे. ५० टक्के शासकिय अनुदान म्हणजेच रुपये ८,०००/- अनुज्ञेय राहील. यामध्ये रुपये २,०००/- ची पिल्ले व रु. ६,०००/- चे खाद्याचा समावेश आहे. उर्वरीत ५० टक्के लाभार्थी हिसा रुपये ८,०००/- मधून लाभार्थीने पक्षांचा निवारा, खाद्याची भांडी, पाण्याची भांडी, औषधी यावर खर्च करावयाचा आहे.

लाभार्थीची निवड :- दारिद्र रेषेखालील, भूमिहिन शेतमजूर (तलाठी यांचे भूमिहिन असल्याचे प्रमाणपत्र).मागासवर्गिय (अनु. जाती/जमाती).अत्याल्प व अल्प भूधारक, या प्राधान्यक्रमानुसार राहील. महिलांना ३० टक्के व दिव्यांगासाठी ५ टक्के आरक्षण राहील. 

लाभार्थी निवड समिती, शासनाने निश्चित केली आहे. योजने अंतर्गत लाभ  घेण्यासाठी अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावा. 

 दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम (वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम) :-

या योजने अंतर्गत १०० टक्के अनुदानावर दुभत्या  जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम (वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम) अंतर्गत वैरण बियाणे वाटप करण्यासाठी 2021-22 या वर्षासाठी एकूण 875 लाभार्थीचे उदिष्ठ असून यामध्ये रुपये 1500/- मर्यादेत सुधारित वैरण बियाणे / ठोंबे  वाटप करण्यात येतील. 

      लाभार्थींची निवड:- अल्प, अत्यल्प भुधारक शेतकरी,  लाभार्थीकडे 3 ते 4 जनावरे असणे आवश्यक आहे.योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावा.असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी  केले आहे.

                                                 

कोऱ्या फॉर्मवर सही करू नका – आ. कैलास पाटील



उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे विमा कंपनी मार्फत पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइन तक्रार दाखल करताना शेतकरी बांधवांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे पिकविमा प्रतिनिधी यांच्याकडे ऑफलाईन तक्रार दाखल करत आहेत. पंचनामे करणारे विमा कंपनीचे अधिकारी, प्रतिनिधी नुकसान भरपाईच्या फॉर्मवर फक्त शेतकऱ्याचे नाव टाकून कोऱ्या फॉर्मवर कोणतीही नुकसान भरपाईची आकडेवरी न टाकता शेतकऱ्यांच्या सह्या घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. आपण कोरे फॉर्मवर सही केल्यास आपल्या सहीचा फॉर्मवर विमा कंपनीचे अधिकारी आपले झालेले नुकसान कमी दाखवून आपल्याला मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या लाभापासून वंचित ठेवू शकतात. त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी पिक विमा योजनेच्या फॉर्म वर आपली पूर्णपणे नुकसान भरपाईची टक्केवारी आणि योग्य रित्या संपूर्ण फॉर्म भरलेली पडताळणी केल्याशिवाय सही करू नये, असे आवाहन आ. कैलास पाटील यांनी केले आहे.

२८ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

१) दिनांक  २८ सप्टेंबर  २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये   १३ लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस

       उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २८ सप्टेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १३ लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे

२) दिनांक २८ सप्टेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील २४ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोविशील्ड लसीचा डोस

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २८ सप्टेंबर २०२१ रोजी २४ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


  लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

एकता फाउंडेशन व संस्कृती प्रतिष्ठानचा शिक्षक रत्न पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न






      उस्मानाबाद – माणूस घडविण्यामध्ये आई वडिलांनंतर शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून अशा शिक्षकांचा सन्मान आज एकता फाउंडेशन व संस्कृती प्रतिष्ठान तर्फे जो होत आहे ते अतिशय अभिनंदनीय आहे असे मत अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले यांनी व्यक्त केले. एकता फाउंडेशन व संस्कृती प्रतिष्ठान उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने  दिनांक 26 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे आयोजित जिल्हास्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.

           यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा आस्मिता कांबळे, डेप्युटी कंट्रोलर आँफ अकाउंट्‍स मुंबई ज्ञानेश्वर वीर, जिल्हा युवा कार्यक्रम अधिकारी धनंजय काळे, शिक्षकतज्ञ एम.डी.देशमुख, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील, संस्कृती प्रतिष्ठानचे सचिव दीपक भराटे, एकता गणेश मंडळाचे अध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, संस्कृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अमित कदम, कार्याध्यक्ष विशाल थोरात व संस्कृती प्रतिष्ठाण अध्यक्ष राम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

           एकता व संस्कृती या संस्था समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदत करण्यासाठी अतिशय प्रयत्नशील काम करत असून अशा कामामुळे संस्थेचे समाजामध्ये आदराचे स्थान निर्माण झाले आहे. शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना त्या क्षेत्रातील बापमाणूस होण्यासाठी प्रयत्न करावे अशी ही अपेक्षा यावेळी रूपाली आवले यांनी व्यक्त केली.

          शिक्षकांनी केलेल्या आजपर्यंत च्या कामाचा या पुरस्काराच्या माध्यमा तून गौरव होत असून गेल्या पाच वर्षापासून या फाउंडेशन मार्फत गौरव सोहळा होत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे. कोवीडच्या महामारी मध्ये सुद्धा शिक्षकांनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली असून त्याबद्दल आम्ही सर्व ऋणी राहू अशी भावना जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी व्यक्त केली. अशा पुरस्कारामुळे शिक्षकांना पुढील चांगल्या कार्यासाठी नेहमी ऊर्जा मिळत असून ज्याच्याकडे पाहून आम्ही घडलो व इथपर्यत आलो ते केवळ शिक्षकांमुळे ज्याप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप ठेवतो त्याप्रमाणे एकता फाउंडेशन व संस्कृती प्रतिष्ठान या परिवाराने या गुणवंत शिक्षकांना त्यांच्या कार्याबद्दल या सत्कार सोहळ्यातून शिक्षकांचे कौतुक केले असुन याबाबत दोन्ही संस्थेचे आभिनंदन करत असे कार्य भविष्यात करत राहावे अशी ही अपेक्षा यावेळी अस्मिता कांबळे यांनी व्यक्त केली.

           शिक्षक पेशा हा जगातील सर्वात मौल्यवान पेशा आहे असे मत डेप्युटी कंट्रोल ऑफ अकाउंट ज्ञानेश्वर वीर यांनी व्यक्त केले. ज्या शिक्षकांनी मला शिकवले त्यांच्यासोबत आज माझ्या हस्ते शिक्षकांचा सन्मान होत आहे ही बाब माझ्यासाठी अतिशय आनंदाची असून भविष्यात अशा कार्यक्रमासाठी मी सदैव संस्थेच्या पाठीशी राहील असे मत ज्ञानेश्वर वीर यांनी बोलताना व्यक्त केले. शिक्षकांनी स्पर्धा परीक्षा मध्ये विद्यार्थी जास्तीत जास्त उत्तीर्ण कसे होतील याकडे लक्ष देऊन शिक्षकांनी शिक्षक म्हणून नाहीतर आचार्य म्हणुन विद्यार्थी घडवले पाहिजेत अशी भावना ज्ञानेश्वर वीर यांनी व्यक्त केली.

           कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात एकता फाउंडेशन कार्याध्यक्ष विशाल थोरात यांनी फाउंडेशन च्या कार्याचा आढावा सांगून शिक्षक रत्न पुरस्कार निवड समितीचे बाबतची माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व वृक्षाला पाणी देऊन करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एकता गणेश मंडळाचे अध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर व सूत्रसंचालन एकता फाउंडेशन सचिव आभिलाष लोमटे यांनी केले.

           भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार सुधीर पाटील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद यांना देण्यात आला. श्री. विक्रम माणिकराव पाटील जि.प. कन्या प्रा. शाळा बेंबळी, श्री. संतोष काकासाहेब घार्गे श्रीपतराव भोसले माध्य व उच्च माध्य विद्यालय उस्मानाबाद, श्री. धनंजय सदाशिव डोळस छञपती संभाजी विद्यालय जवळा ता. कळंब, श्री. प्रदीपकुमार अरुण गोरे नुतन विद्यामंदीर उस्मानाबाद, श्री. भालचंद्र भारत कोकाटे जि.प.प्रा.शाळा शिवाजीनगर ता. उस्मानाबाद, श्री. सुशिलकुमार सुधाकर तीर्थकर

विद्याभवन हायस्कुल कळंब ता. कळंब, श्रीमती. प्रणिता हरिश्चंद्र भंडारे छञपती शिवाजी माध्य व उच्च माध्य विद्यालय उस्मानाबाद ता.उस्मानाबाद, श्रीमती. सुनीता शंकरराव शिंदे जि. प. प्रा. शाळा गौडगाव ता. उस्मानाबाद, श्री. संजय प्रभाकर देशमुख जि. प. शाळा पळसवाडी ता. उस्मानाबाद, श्री. ज्ञानेश्वर गुरलिंगआप्पा माशाळकर भारत विद्यालय बेडगा ता. उमरगा, श्री. लक्ष्मण संभाजी शेळके न्यु हायस्कुल चिंचोली ता.भुम, श्री. अर्जुन चिंतामण जाधव जि.प. कन्या शाळा कळंब ता. कळंब, श्रीमती. ज्योती दिलीप पाटील केंद्रीय प्राथमिक शाळा लोहारा ता. लोहारा, श्री. संघपाल पंडीत सुकाळे जि.प. शाळा झिन्नर ता. वाशी, श्री. अनिल आभिमान शिंदे

जि.प. प्रा.शाळा हिंगणगाव ता. कळंब, श्री. तुकाराम विष्णु वाडकर जि.प.प्रा.शाळा सांगवी काटी ता. तुळजापुर, श्री. श्रीमंत संदिपान चौरे जि.प. प्रा. शाळा पाचपिंपळा ता. परंडा, श्री. विठ्ठल उत्तम नरवडे जि.प. प्रा.शाळा पिंपळा बुद्रक ता. तुळजापुर, सौ प्रज्ञा विकासराव कुलकर्णी कल्याण सागर माध्यमिक विद्यालय परंडा ता.परंडा, श्री संजय ज्ञानोबा देशमुख भारत विद्यालय उमरगा ता.उमरगा, श्री गौरीशंकर करबसप्पा कलशेट्टी जि.प.प्रा. शाळा माकणी ता. लोहारा, श्री चंद्रकांत लक्ष्‍मण तांबे श्री गुरुदेव दत्त हायस्कूल भूम ता. भूम, श्रीमती सुषमा श्रीकांत मसे जि.प. प्रा. शाळा बाभळगाव ता.कळंब, श्री रवींद्र शिवाजीराव माने जि.प.प्रा. शाळा करंजखेडा ता. उस्मानाबाद, श्री सुनील गोविंदराव काळे हरिभाऊ घोगरे प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उपळा ता.उस्मानाबाद, श्री सचिन बाळासाहेब छबिले छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी ता वाशी, श्री दत्तात्रय प्रभाकर काशीद जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा चिंचपुर ता. परंडा, सौ. सुलभा गजानन देशमाने आर्य चाणक्य प्राथमिक विद्यालय धाराशिव, श्री हरिश्चंद्र भगवान शिंदे छत्रपती शिवाजी माध्य. व उच्च माध्य विद्यालय उस्मानाबाद, श्री नितीन दशरथ ढगे जि.प. प्रा. शाळा मसला खुर्द ता. तुळजापूर, श्रीमती. कांचन गौतम काशीद जि. प. प्रा. शाळा केमवाडी ता. तुळजापूर या सर्वांचा सन्मानचिन्ह, शाल, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ व मानाचा फेटा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गोरे प्रवीण, प्रसाद देशमुख, विकास माळी, बलराज रणदिवे, माऊली जोगी, केदार लगदिवे, शिवलिंग गुळवे, अक्षय गांधी, शिवरुदप्रताप भुतेकर, संतोष माळी, ओम नाईकवाडी, लखन मुंडे, प्रशांत जाधवर, सलमान शेख, असलम शेख, शिवाजी गवळी,दीपक जाधव, शिवाजी दहिहंडे, शेषनाथ वाघ, सौरभ ढोबळे, एकता फाउंडेशन चे सचिव आभिलाष लोमटे व दोन्ही संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाबँक कर्मचाऱ्यांचा नोकर भरती साठी एल्गार





 उस्मानाबाद –  देशभरात बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आज दिनांक 27 सप्टेंबर 2019 रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला. हा संप या बँकेतील 4 कर्मचारी संघटना यांच्या एकत्रित फोरम द्वारे आयोजित करण्यात आला. यामध्ये ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्पलॉइज फेडरेशन, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघ, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना व महाबँक नवनिर्माण सेना या कर्मचाऱ्याच्या सर्व संघटनांनी मिळून या बँकेत नोकर भरती साठी आज देशभरात आपल्या बँकेसमोर निदर्शने केली. या बँकेचा गेल्या 5 वर्षात व्यवसाय हा 3 पटीने वाढला असून गेली 2 वर्ष ही बँक नफा नोंदवत आहे. याच वेळी या बँकेतील लिपिक वर्गातील कर्मचारी संख्या जवळपास 2 हजारांनी कमी झाली, शिपाई पदाच्या 700 हून अधिक जागा रिक्त  झाल्या आणि सर्वात तळात काम करणारा सफाई कर्मचारी याची या बँकेत जवळपास 1200 ते 1300 शाखेमध्ये कायमस्वरूपी नेमणूक नाही. बँक कर्मचारी संघटनेने याप्रश्नी मार्च महिन्यात एक दिवसाचा संप घोषित केला होता पण त्याच वेळी देशभरात बँकांच्या खाजगीकरणाचे वारे जोरात वाहत होते आणि याच्या विरोधात देशभरात सर्व राष्ट्रीयीकृत बँकात दोन दिवसाचा संप घोषित केला होता त्यावेळी व्यवस्थापनांनी याबाबत तडजोडीची भूमिका विभागीय कामगार आयुक्त यांच्यासमोर घेऊन संघटनेस हा संप पुढे ढकलण्यास सांगितले.मार्चनंतर या बँकेने दाखविलेल्या ताळेबंदतील  आकडेवारीने या बँकेने विविध निकशावर  प्रथम क्रमांक मिळविला. बँकेत ठेव वृद्धि , कर्ज वृद्धि , थकीत कर्जाची वसुली, थकीत कर्जाचे प्रमाण कमी करण्यात यश मिळवलेले आहे. या सर्व प्रमुख व्यवसाय वृद्धि च्या निकषांना या बँकेने         घवघवीत यश संपादून आपला छोट्या आकारातील राष्ट्रीयीकृत बँकेत पहिला नंबर मिळविला. पण याच वेळी निवृत्ती, मृत्यू, राजीनामे, बढती या अनेक कारणांनी लिपिक वर्गातील संख्या ही जवळपास 2 हजारांनी कमी झाली. आणि गेल्या पाच वर्षात अतिशय नगण्य अशी नोकर भरती या बँकेने केली. अनेक शाखात शिपाई पदावरील काम करणारे कर्मचारी नाहीत, अनेक शाखा कायमस्वरूपी सफाई कर्मचारी नाही, उलटपक्षी बँकेने या पदावर काम करण्यासाठी कंत्राटी लोकांची नेमणूक केलेली आहे. यांना अत्यल्प असा मोबदला देऊन त्यांच्याकडून जादा काम करून घेतले जाते. या स्तरावर काम करणारा  तळागाळातील शोषित समाज असून यांचे शोषण केले जात आहे. याविरोधात कर्मचारी संघटना म्हणून गेली दहा वर्ष सातत्याने पाठपुरावा करूनही या जागेवर बँकेने कायमस्वरूपी नियुक्ती केली नाही. देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असूनही या बँकांमध्ये नोकर भरती होत नाही, गेल्या दोन वर्षात कोरोना  महामारी मुळे जगाची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे, अनेक जण बेरोजगार झाले असून, अनेक खाजगी उद्योगातून नोकर कपात केली जात आहे, या परिस्थितीत सरकारने विविध योजनेद्वारे सामान्यांना आर्थिक मदत करण्यासाठी अनेक विविध योजना या बँकेमार्फत राबविल्या आहेत. त्यामुळे अपुऱ्या कर्मचाऱ्यावर कामाचा ताण वाढून त्यांची मानसिक व शारीरिक स्थिती दयनीय होत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांना सेवा देताना अनेक अडचणींना सामोरी जावे लागत आहे, त्यामुळे सन्माननीय ग्राहक व कर्मचारी यांच्यात दिवसेंदिवस विसंवाद वाढत आहे, संघटना म्हणून आमची मागणी नोकर भरतीची असून शाखा स्तरावर जर पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाले तर ग्राहकांना अनेक विविध योजनांचा फायदा देताना उत्कृष्ट ग्राहक सेवा दिली जाऊ शकते, त्यामुळे अर्थातच ग्राहक वर्ग समाधानी होईल व बँकेचा व्यवसाय वृद्धि हीसुद्धा निकोप पद्धतीने होऊ शकेल. आज अनेक शाखात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे काम करताना अनेक नियमांना डावलून सेवा दिल्या जात आहेत ज्यातून मोठे धोके निर्माण होण्याची शक्यता आहे, या सर्व गोष्टीचा विचार करून या बँकेच्या  उच्च व्यवस्थापनाने त्वरित लक्ष घालून या मागण्या पूर्ण कराव्यात असा आक्रोश आज सर्व कर्मचाऱ्यांत दिसून आला, जर वेळीच बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनानी प्रश्न मार्गी लावला नाही तर पुढील महिन्यात या संघटनेने दोन दिवसाच्या संपाची हाक देऊन ठेवली आहे यावेळी या बँकेतील अधिकारी संघटनाही सोबत येतील अशी आशा संघटनेला आहे तरी वरिष्ठ व्यवस्थापनांनी याप्रश्नी त्वरित लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावा असे आवाहन सर्व संघटनेच्या  वतीने  कॉम्रेड, सुनील कुलकर्णी  उपाध्यक्ष, बँक ऑफ महाराष्ट्र एम्पलॉइज असोसिएशन यांनी  निदर्शनाच्या वेळी केले. यावेळी उस्मानाबाद शहरातील आणि आजूबाजूच्या शाखेतील कर्मचारी उपस्थित होते. शहरातील दोन्ही शाखा समोर निदर्शने करून आजचा संप यशस्वी केला.

समुद्रवाणीत बँकेवर दरोड्याचा प्रयत्न फसला

 




उस्मानाबाद – तालुक्यातील समुद्रवाणी येथे रात्री चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा प्रयत्न फसल्याने बँकेतील रक्कम सुरक्षित राहिली.

प्रथमदर्शनी माहिती नुसार, काल रात्री चोरट्यांनी समुद्रवाणी येथील   महाराष्ट्र ग्रामीण बँकेची खिडकी तोडून आत प्रवेश केला. मात्र त्यांना तिजोरी फोडता आली नाही. खिडकी तोडण्यासाठी त्यांनी गॅस कटर चा वापर केल्याची माहिती आहे. याला लागणारा गॅस शेजारील हॉटेल मधून चोरला असल्याची शक्यता आहे. घटनास्थळी बेंबळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेडंगे आणि त्यांची टीम दाखल झाली असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लवकरच आरोपी पकडू – निवा जैन

पोलीस अधिकारी बदलले की चोर, दरोडेखोर पोलीस यंत्रणेसमोर आव्हान निर्माण करतात. समुद्रवाणी येथे दरोडा टाकण्याच्या प्रयत्न करून ते आव्हान निर्माण केले आहे का असा सवाल नूतन पोलीस अधीक्षक नीवा जैन यांना पत्रकार परिषदेत विचारला यावर त्यांनी सी सी टी व्ही चे फुटेज मिळाले आहेत लवकरच आरोपींना पकडण्यात येईल असे आश्वास्त केले.