उस्मानाबाद जिल्ह्यात पुरात अडकलेल्या 459 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात जिल्हा प्रशासनास यश
एन.डी.आर.एफ.च्या टीमकडून 16 जणांचे बचाव कार्य यशस्वी
उस्मानाबाद,दि.28(प्रतिनिधी):- जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या 136.78 टक्के पाऊस पडला आहे.आज जिल्ह्यातील बारा मंडळात अतिवृष्टी झाली तर तेरणा आणि मांजरा ही धरणं शंभर टक्के भरल्याने नदीपात्रात पाणी सोडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली. परिणामी नदीतीरावरच्या गावांत पाणी शिरले. काही गावांत ग्रामस्थ अडकून पडले. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने ग्रामस्थांच्या बचावाचे कार्य सुरु केले. त्याच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाने एन.डी.आर.एफ.च्या टीमची मागणी केली त्याही टीमने पूरग्रस्तांच्या बचावाचे काम करुन 16 जणांचा बचाव करुन सुरक्षित स्थळी हलविले तर जिल्ह्यातील 459 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले.
मांजरा धरणाच्या धरण क्षेत्रामध्ये सतत झालेल्या पावसामुळे मांजरा धरणाचे सर्व दरवाजे दि.27 सप्टेंबर 2021 रोजी उघण्यात आले. त्यामुळे धरणाखालील गावामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कळंब तालुक्यातील वाकडीवाडी येथे तीन कुटुंबातील एकूण 20 व्यक्ती शेतातील घरामध्ये अडकली होती. जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने त्या सर्वांची सुटका केली आहे. तेरणा नदीकाठी असलेल्या तेर,रामवाडी, इर्ला आणि दाऊतपूर या गावामध्ये पाणी शिरल्यामुळे तेथील लोकांना शाळेमध्ये आणि इतर सुरक्षित ठिकाणी प्रशासनामार्फत हलवले आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे हेलिकॉप्टर पाठविण्याची मागणी केल्यानुसार हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दाऊतपूर येथील शेतामध्ये अडकून पडलेल्या सहा व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. यात चार मोठ्या माणसांचा तर दोन बालकांचा समावेश होता. तसेच कळंब तालुक्यातील सौंदणा येथील पुरामुळे अडकलेल्या 10 व्यक्तींना जिल्हा आपत्ती प्राधिकरणाची टीम आणि एक बोट तसेच एन.डी.आर.एफ. (NDRF) ची टीम तसेच तीन बोटीच्या माध्यमातून व हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुटका करण्यात आली आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील रामवाडी येथील अंदाजे 125 लोक, इर्ला येथील अंदाजे 114 लोक, तेर येथील अंदाजे 35 लोक, दाऊतपूर येथील अंदाजे 90 लोक, बोरखेडा येथील अंदाजे 35 लोक, कामेगाव येथील अंदाजे 40 व्यक्तींना आणि वाकडीवाडी येथील 20 जणांसह अशाप्रकारे एकूण 439 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
जिल्ह्यात आज उस्मानाबाद तालुक्यातील सहा, तुळजापूर तालुक्यातील दोन, कळंब तालुक्यातील तीन तर उमरगा तालुक्यातील एका मंडळात अतिवृष्टी झाली. उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी 66.3,पाडोळी-81, केशेगाव-71, ढोकी-139.5, जागजी-123.8 तर तेर मंडळात 127.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तुळजापूर तालुक्यातील सलगरा-65.5, इटकळ-83.3, कळंब तालुक्यातील मोहा-66.3,शिराढोण-171, गोविंदपूर-107.5 तर उमरगा तालुक्यातील नारंगवाडी मंडळात 69 मिलीमीटर पावसाची म्हणजे अतिवृष्टीची नोंद झाली.
जिल्ह्यात 27 आणि 28 सप्टेंबरच्या रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील इर्ला येथील 30 वर्षीय बालाजी वसंत कांबळे हे भंडारवाडी येथील पूलावरुन तोल जाऊन वाहून गेले आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. जिल्ह्यात या अतिवृष्टीत 20 लहान आणि 17 मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला. तर 180 झोपड्या-घरांची अंशत: पडझड झाली आहे.
जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व महसूल यंत्रणा सतर्क आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या प्रयत्नाने एन.डी.आर.एफ.ची टीम जिल्ह्यात वेळेत पोहचली. प्रथम एन.डी.आर.एफ.च्या 20 जवानांचे एक पथक वाहनाद्वारे आणि तीन बोटी घेऊन दाखल झाले. त्यांनतर हेलिकॉप्टरने आणखी एक टीम दाखल झाली. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार आणि पट्टीच्या पोहणाऱ्या नागरिकांनी महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान, मांजरा आणि तेरणा पात्रालगतच्या सर्व गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
अतिवृष्टीने व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने विशेष मदत द्या – आ. राणाजगजितसिंह पाटील
उस्मानाबाद जिल्ह्यात सप्टेंबर, २०२१ मध्ये अतिवृष्टीने व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने विशेष मदत उपलब्ध करून देण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या एक आठवड्यात अभूतपूर्व असा पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसात तर पावसाने हाहाकार माजविला आहे, अनेक गावात अभूतपूर्व अशी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या अनुषंगाने मी अनेक गावांत जाऊन पाहणी केली असता पूर परिस्थितीमुळे या भागातील सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होवून मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. यात शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे खास करून सोयाबीन पिकाचे. काढणीला आलेले व काढून ठेवलेले सोयाबीन पाण्याखाली गेले असून ऊसा सारखे नगदी पिक देखील आडवी झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे, जनावरे, शेळ्या-मेंढ्या, गोठा, गावातील छोटे व्यावसायिक तसेच शेतीतील इतर नुकसानही मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसते. रस्ते, पूल, बंधारे वाहून गेले आहेत तर वीज वितरण व्यवस्थेचं देखील मोठे नुकसान झाले आहे.
१५ दिवसापूर्वी पिकांची परिस्थिती थोडी सुधारलेली होती त्यामुळे शेतकरी या हंगामात कांही प्रमाणात तरी उत्पन्न मिळेल या आशेवर बसले होते. मात्र पावसाने त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संकटात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीने अजून भर पडली आहे. एकीकडे गत वर्षीचा पीक विमा अद्याप मिळाला नाही. चालू हंगामातील झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी पीक विम्याची अग्रीम मंजुरीचा आदेश काढून देखील अग्रीम निधी अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही. अशा परिस्थितीत मायबाप सरकारने नुकसानीची व्याप्ती पाहता यावर चर्चा न करता सरसकट भरीव निधी देणे अपेक्षित आहे व ती तातडीने देणे योग्य राहील.
यावर्षी कोकणात तर २०१९ साली पश्चिम महाराष्ट्रात महापुर आल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरबाधित शेतकऱ्यांनी घेतलेले सर्व पिकांसाठीचे २०१८-१९ आणि २०१९-२० या दोन वर्षांसाठीचे १ हेक्टरपर्यंतचे पीक कर्ज माफ केले होते. तसेच नुकसानभरपाई म्हणून स्थायी आदेशाच्या पलीकडे जाऊन दुपटीने नगदी स्वरूपात मदत केली होती.
सणासुदीचे दिवस जवळ आले असताना हाता तोंडाशी आलेला घास हिरावला असल्याने जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाले आहेत. आता त्याला झालेल्या नुकसानीपोटी तातडीने आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. ऑक्टोबर, २०१९ मध्ये अवकाळी पावसानं राज्यात अनेक ठिकाणी असेच नुकसान केले होते. तेंव्हा औरंगाबाद येथे नुकसानीची पाहणी केल्यावर आपण सरकारला कोणत्याही अटी न ठेवता तातडीने हेक्टरी ₹ २५,००० ते ₹ ५०,००० मदत देण्याची मागणी केली होती. आता मुख्यमंत्री या नात्याने राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या हाती आहेत त्यामुळे आपण त्वरेने शेतकऱ्यांच्या हितासाठी गेल्यावर्षी केलेल्या न्याय्य मागणीची पूर्तता करून “जे बोलतो ते करून दाखवतो” हा आपला बाणा सत्यात उतरवाल ही अपेक्षा आहे.
आपण पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेच्या पदरात या जिल्ह्यातील जनतेने नेहमीच मोठं माप टाकलेले आहे याची जाण ठेवून आपण तातडीने खालील बाबी करणे अपेक्षित आहे.
१) सणासुदीच्या तोंडावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी तातडीने कोरडवाहू पिकांना सरसकट हेक्टरी ₹ २५,०००/- तर बागायती व फळपिकांना हेक्टरी ₹ ५०,०००/- मदत (पीक विम्या व्यतिरिक्त) १५ दिवसाच्या आत देण्यात यावी.
२) अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांनी घेतलेल्या सर्व पिकांसाठीचे १ हेक्टरपर्यंत बँक कर्ज तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी २०१९ मध्ये केल्याप्रमाणे माफ करण्यात यावे.
३) ज्यांचे घर पाण्यात बुडाले आहे, घर वाहून गेले आहे, किंवा घराचे पूर्णतः नुकसान झाले आहे अशा व्यक्तींना सानुग्रह अनुदान म्हणून ₹ १५,००० प्रति कुटुंब मदत म्हणून देण्यात यावी.
४) दुकानदार, टपरीधारक, कारागीर/बारा बलुतेदार, छोटे गॅरेज, छोटे उद्योग व्यावसायिक यांना नुकसानीपोटी सरसकट ₹ १,००,००० पर्यंत आर्थिक मदत देण्यात यावी.
५) गोठ्यांच्या पडझडीबाबत मदत म्हणून ₹ ५,००० प्रति गोठा देण्यात यावे.
६) पशुधन मोठी जनावरे/दुधाळ जनावरे यांसाठी ₹ ५०,००० व मेंढी-बकरी यांच्यासाठी ₹ १०,००० प्रत्येकी मदत देण्यात यावी.
७) ज्या भागात आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली आहे अशा भागातील नागरिकांसाठी तात्काळ गहू, तांदूळ व इतर अन्नधान्याचा पुरवठा मोफत स्वरूपात करण्याबाबत प्रशासनाला सूचना द्याव्यात.
८) जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पडझड झालेली घरे, रस्ते, पूल ,वीज वितरण व्यवस्था व बंधारे यांच्या दुरुस्तीसाठी आराखडा तयार करून त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करावा व याची कालबध्द अंमलबजावणी व्हावी यासाठी वरिष्ठ अधिकारी नेमण्यात यावा.
हे फक्त जाहीर करूनच नाही तर १५ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा व्हावी यासाठी प्रशासनाला आपण आदेश द्यावेत व आपले देखील यावर वैयक्तिक लक्ष राहावे असे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे
२९ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण
१) दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये १२ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये १२ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. दिनांक २८ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
२) दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील २४ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोविशील्ड लसीचा डोस
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी २४ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
शासकीय कर्मचारी संघटनांची आंदोलने ठरणार निष्फळ?
उस्मानाबाद – आपल्या न्याय हक्क मागण्यांसाठी लढणाऱ्या विविध शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांची आंदोलने निष्फळ ठरणार आहेत. वारंवार होणाऱ्या आंदोलनामुळे शासकीय कामकाज ठप्प होत असल्याने त्याचा विपरीत परिणाम होतो. तो टाळण्यासाठी नव्या मार्गदर्शक सूचना काढल्या असून २०१७ मध्ये काढलेल्या एका शासन निर्णयाचा आधार घेत या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जिल्हा / विभागामध्ये कार्यरत कर्मचारी संघटना तसेच अशा इतर संघटना ज्या श्रमिक अधिनियमाखाली, धर्मादाय आयुक्त किंवा इतर कायद्यान्वये नोंदणीकृत असल्या तरी या अशा संघटनांना जर शासन मान्यता नसेल तर अशा संघटनांकडून येणा-या कुठल्याही निवेदनाची/ अभिवेदनाची/पत्र व्यवहाराची दखल घेण्यात येऊ नये असे परिपत्रकात म्हटले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालये, क्षेत्रिय कार्यालये यांचेकडे संघटनांची निवदेने प्राप्त झाल्यास त्या संघटनांच्या लेटरहेडवर शासन मान्यता प्राप्त असल्याचा सामान्य प्रशासन विभाग, कार्यासन १६-अ व्दारा निर्गमित शासन आदेशाचा क्रमांक व दिनांक स्पष्ट नमूद केल्याखेरिज त्यांच्या पत्रव्यवहाराची वा शिष्टमंडळांची दखलही घेण्यात येऊ नये. असेही परिपत्रकात म्हटले आहे.
कोरोनामुळे तुळजापूरात शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने होणारी यात्रा रद्द पण भावीकांना दर्शन घेता येणार- जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने मंदिर संस्थानातर्फे जबाबदाऱ्या निश्चित
उस्मानाबाद,दि.27(प्रतिनिधी):- राज्य शासनाने मंदिर उघडण्या अनुषंगाने निर्देश दिल्यामुळे तुळजापूर येथे श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाची पूर्व तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने मंदिर संस्थानचे प्रतिनिधी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने होणारी तीन दिवसीय यात्रा यावर्षी भरवण्यात येणार नाही. पण यानिमित्ताने सर्व पूजा आणि विधी होणार असून भावीकांना कोरोनाचे नियम पाळून दर्शन घेता येणार आहे,अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक नीवा जैन, तुळजापूरचे तहसीलदार तथा विश्वस्त सदस्य सौदागर तांदळे, तहसीलदार तथा व्यवस्थापक मंदिर संस्थान योगिता कोल्हे, पोलिस अधिकारी काशीद, वाय.एम.बागुल, सिध्देश्वर इंतुले, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह भराडे, तालुका आरोग्य अधिकारी सुहास पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंचला बोडके, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक विजय चिंचाळकर, एस.टी.चे विभागीय नियंत्रक अमृता ताम्हणकर, अश्वजीत जानराव, जिल्हा पुरवठा विभागातील सचिन काळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एस.व्ही.घोडके, कर्नाटक एस.टी. महामंडळाचे आर.बी.जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेल्लोरे, महामार्ग 52 चे देवेंद्रसिंग, राष्ट्रीय महामार्गाचे अनिल विपट, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एम.डी.बोडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन यावर्षी शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्य शासनाने कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून मंदिर उघडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शारदीय नवरात्र महोत्सवातील सर्व पूजा, विधी सर्व प्रकारचे पावित्र्य राखण्यात येईल. भक्तांना दर्शनाची सोयही कोरोनाचे नियम पाळून करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुळजापूर शहरात कोरोना लसीकरणाचे विशेष शिबीर घेण्यात येत आहेत. प्रामुख्याने पुजारी, सेवेकरी आणि मानकऱ्यांबरोबरच संबंधित प्रशासकीय अधिकारी, मंदिर संस्थानशी संबंधित कर्मचाऱ्यांचे आणि नागरिकांचे लसीकरण करण्यास भर देण्यात येत आहे. नवरात्र महोत्सव काळातील यात्रा बंदी असली तरी पुजारी, सेवेकरी आणि मानकऱ्यांकडून करण्यात येणारी पूजा आणि इतर विधी कोरोनाचे सर्व नियम पाळून करण्यात येणार आहे, असे सांगून यानिमित्त आवश्यक त्या सर्व प्रकारच्या आपत्ती व्यवस्थापनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रामुख्याने वाहतुकीचे व्यवस्थापन, बॅरिकेटींग, सुरक्षा, आरोग्य विषयी बाबींवर अधिक भर देण्यात येणार आहे. असेही ते म्हणाले.
या महोत्सवानिमित्त सुरक्षेच्या अनुषंगाने मंदिरातील सी.सी.टी.व्ही.कॅमेऱ्यांचे काम व्यवस्थीत सुरु असल्याची खात्री करुन घेण्यात आली आहे.तसेच नगरपालिकेने बसविलेले काही ठिकाणचे सी.सी.टी.व्ही.कॅमेरे सुरु करण्याची गरज असेल तर तेही काही मंदिर संस्थानतर्फे करण्यात येणार आहे, असे सांगून श्री.दिवेगावकर यांनी समाज विघातक आणि समाज कंटकाच्या हद्दपारीची कार्यवाही पोलिसांनी तातडीने करावी. तसेच समाज माध्यमातून जनतेत भितीचे वातारण पसरवणाऱ्यांचाही बंदोबस्त करावा. अवैध दारु आणि अंमली पदार्थावर बारीक नजर ठेवण्यात यावी. याबाबत राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांनी स्वत: लक्ष घालावे. या नवरात्र महोत्सवानिमित्त ज्याकडे जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत त्यांची नावे, फोन नंबर 29 सप्टेंबर 2021 च्या दुपारपर्यंत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास संबंधित कार्यालय प्रमुखाने कळवावी, असेही ते म्हणाले.
या महोत्सवानिमित्त वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशांचे आणि सूचनांचे संबंधित अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंर्तगत कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री.दिवेगावकर यांनी सांगितले. यावेळी आमदार पाटील यांनीही विविध सूचना करत हा महोत्सव यशस्वी करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी श्रीमती कोल्हे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे या महोत्सवातील विविध विभागांच्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती दिली.
******
पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
उस्मानाबाद,दि.27(प्रतिनिधी):- येथील जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत , त्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले आहेत . जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत-2021 22 या अर्थिक वर्षासाठी (10 + 1) शेळ्यांचे गट वाटप करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत . जिल्ह्यास एकूण 44 शेळी गटाचे उदिष्ठ आहे. शेळीगटाची एकूण प्रकल्प किंमत रुपये 1 लाख 3 हजार 545 रुपये असून ७५ टक्के अनुदान रुपये 77 हजार 659 रुपये अनुज्ञेय राहील. यामध्ये शेळीगटाचा तीन वर्षाच्या विम्याचा समावेश आहे . शेळी गटाची खरेदी प्राधान्याने पुण्यश्लोक आहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास महामंडळ यांच्याकडून करण्यात येईल.
लाभार्थींची निवड:- दारिद्र रेषेखालील, अत्याल्प भूधारक, अल्प भूधारक,सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात चालू नोंद असलेले),महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र.१ ते ४ मधील) या प्राधान्य क्रमानुसार राहील. महिलांना ३० टक्के आणि दिव्यांगासाठी पाच टक्के आरक्षण राहील. लाभार्थी निवड समिती, शेळी गट खरेदी समिती शासन नियमानुसार खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावा.
जिल्हास्तरीय अनुसुचित जाती उपयोजने अंतर्गत अनुसूचित जाती, नवबौध्द लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी प्रती तालुका ३० प्रशिक्षणार्थी या प्रमाणे एकूण २४० प्रशिक्षणार्थीचे उदिष्ठ आहे. पंचायत समितीस्तरावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थींची निवड अनुसुचित जाती मधून करण्यात येईल. त्यामध्ये ३० टक्के महिला आणि पाच टक्के अपंगासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजनाअंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थींना प्रधान्याने प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण तीन दिवसांचे असेल. शासन निर्णयानुसार प्रती प्रशिक्षणार्थी एक हजार रुपये मर्यादेत (सर्व अनुषंगिक बाबीवर) खर्च करण्यात येईल.
अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करावयाचे आहेत. अर्जासोबत जातीचा दाखला, ग्राम पंचायत शिफारस, साक्षांकित फोटो , आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे.
जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत दुभत्या जनावरांच्या गटाचा पुरवठा करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. 2021-22 या वर्षासाठी उस्मानाबाद जिल्ह्यास एकूण ५६ गाय, म्हैस गटाचे उदिष्ठ आहे. गाय, म्हैस गटाची एकूण प्रकल्प किंमत रुपये ८५ हजार ०६१ रुपयांच्या ७५ टक्के शासन अनुदान ६३ हजार ७९६ रुपये अनुज्ञेय राहील. यामध्ये तीन वर्षाच्या विम्याचा समावेश आहे.
लाभार्थीची निवड : दारिद्र रेषेखालील,अत्यल्प भूधारक,अल्प भूधारक,सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात चालू नोंद असलेले), महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र.१ ते ४ मधील) या प्राधान्य क्रमानुसार राहील. महिलांना ३० टक्के आणि दिव्यांगासाठी पाच टक्के आरक्षण राहील. लाभार्थी निवड समिती, गाय गट खरेदी समिती आणि खरेदी प्रक्रिया शासन नियमानुसार पूर्ण करण्यात येईल. योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावा.
एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत एकदिवसीय सुधारीत कुक्कुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत ५० टक्के अनुदानावर एक दिवसीय सुधारीत कुक्कुट पक्षांच्या 100 पिल्लांचे गट वाटप करणेसाठी 2021-22 या वर्षासाठी एकूण 131 गटाचे उदिष्ठ आहे . प्रकल्प किंमत रुपये १६ हजार रुपये आहे. ५० टक्के शासकिय अनुदान म्हणजेच आठ हजार रुपये अनुज्ञेय राहील. यामध्ये दोन हजार रुपयांची पिल्ले आणि सहा हजार रुपयांचे खाद्य याचा समावेश आहे. उर्वरीत ५० टक्के लाभार्थी हिसा आठ हजात रुपयांमधून लाभार्थीने पक्षांचा निवारा, खाद्याची भांडी, पाण्याची भांडी, औषधी यावर खर्च करावयाचा आहे.
लाभार्थींची निवड : दारिद्र रेषेखालील,भूमिहिन शेतमजूर (तलाठी यांचे भूमिहिन असल्याचे प्रमाणपत्र). मागासवर्गिय (अनु. जाती/जमाती).अत्याल्प आणि अल्प भूधारक, या प्राधान्य क्रमानुसार राहील. महिलांना ३० टक्के आणि दिव्यांगासाठी पाच टक्के आरक्षण राहील. लाभार्थी निवड समिती, शासनाने निश्चित केलेली आहे . योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावा.
जिल्हा वार्षिक आदिवासी उप योजनेअंतर्गत शेळ्यांचे गट वाटप करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
2021-22 या वर्षीसाठी एकूण १८ शेळी गटाचे उदिष्ठ आहे . उस्मानाबाद जिल्ह्यात या योजनेअंतर्गत एकूण प्रकल्प किंमत ७१ हजार २३९ रुपये आहे . ७५ टक्के अनुदान ५३ हजार ४२९ रुपये अनुज्ञेय राहील. यामध्ये शेळीगटाचा तीन वर्षाच्या विम्याचा समावेश आहे. शेळी गटाची खरेदी प्राधान्याने पुण्यश्लोक आहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यांचेकडून करण्यात येणार आहे.
लाभार्थीची निवड : दारिद्र रेषेखालील, अत्याल्प भूधारक, अल्प भूधारक,बचत गटातील लाभार्थी (अ.क्र.१ ते ४ मधील) या प्राधान्य क्रमानुसार राहील. ( सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात चालू नोंद असलेले), महिलांना 30 टक्के दिव्यांगासाठी पाच टक्के आरक्षण असणार आहे. लाभार्थी निवड समिती, शेळी गट खरेदी समिती शासनाने निश्चित केली आहे, त्या प्रमाणे खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. योजनाअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावा.
जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजने अंतर्गत दोन दुधाळ जनावरांचा गट वाटप करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यास 2021-22 या वर्षासाठी एकूण १५ गाय गट वाटपाचे उदिष्ठ आहे . प्रकल्प किंमत ८ ५ हजार ६१ रुपये आहे . ७५ टक्के अनुदान म्हणजेच रुपये ६३,७९६/- अनुज्ञेय राहील. यामध्ये तीन वर्षाच्या विम्याचा समावेश आहे.
लाभार्थीची निवड:- (दारिद्र रेषेखालील, अत्याल्प भूधारक, अल्प भूधारक, सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात चालू नोंद असलेले), महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र.१ ते ४ मधील) या प्राधान्य क्रमानुसार राहील. महिलांना ३० टक्के व दिव्यांगासाठी ५ टक्के आरक्षण राहील. लाभार्थी निवड समिती, गाय गट खरेदी समिती शासनाने निश्चित केली आहे त्या प्रमाणे खरेदी प्रक्रिया पुर्ण करण्यात येईल. योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावा.
अनुसूचित जमातीच्या लाभार्थीना 100 एकदिवसीय सुधारीत कुक्कुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप अर्ज मागणी :-
एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत ५० टक्के अनुदानावर 100 एक दिवसीय सुधारीत कुक्कुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करणेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता एकूण १२५ गटाचे उदिष्ठ असून प्रकल्प किंमत रुपये १६,०००/- आहे. ५० टक्के शासकिय अनुदान म्हणजेच रुपये ८,०००/- अनुज्ञेय राहील. यामध्ये रुपये २,०००/- ची पिल्ले व रु. ६,०००/- चे खाद्याचा समावेश आहे. उर्वरीत ५० टक्के लाभार्थी हिसा रुपये ८,०००/- मधून लाभार्थीने पक्षांचा निवारा, खाद्याची भांडी, पाण्याची भांडी, औषधी यावर खर्च करावयाचा आहे.
लाभार्थीची निवड :- दारिद्र रेषेखालील, भूमिहिन शेतमजूर (तलाठी यांचे भूमिहिन असल्याचे प्रमाणपत्र).मागासवर्गिय (अनु. जाती/जमाती).अत्याल्प व अल्प भूधारक, या प्राधान्यक्रमानुसार राहील. महिलांना ३० टक्के व दिव्यांगासाठी ५ टक्के आरक्षण राहील.
लाभार्थी निवड समिती, शासनाने निश्चित केली आहे. योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावा.
दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम (वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम) :-
या योजने अंतर्गत १०० टक्के अनुदानावर दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम (वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम) अंतर्गत वैरण बियाणे वाटप करण्यासाठी 2021-22 या वर्षासाठी एकूण 875 लाभार्थीचे उदिष्ठ असून यामध्ये रुपये 1500/- मर्यादेत सुधारित वैरण बियाणे / ठोंबे वाटप करण्यात येतील.
लाभार्थींची निवड:- अल्प, अत्यल्प भुधारक शेतकरी, लाभार्थीकडे 3 ते 4 जनावरे असणे आवश्यक आहे.योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावा.असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले आहे.
कोऱ्या फॉर्मवर सही करू नका – आ. कैलास पाटील
उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे विमा कंपनी मार्फत पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइन तक्रार दाखल करताना शेतकरी बांधवांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे पिकविमा प्रतिनिधी यांच्याकडे ऑफलाईन तक्रार दाखल करत आहेत. पंचनामे करणारे विमा कंपनीचे अधिकारी, प्रतिनिधी नुकसान भरपाईच्या फॉर्मवर फक्त शेतकऱ्याचे नाव टाकून कोऱ्या फॉर्मवर कोणतीही नुकसान भरपाईची आकडेवरी न टाकता शेतकऱ्यांच्या सह्या घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. आपण कोरे फॉर्मवर सही केल्यास आपल्या सहीचा फॉर्मवर विमा कंपनीचे अधिकारी आपले झालेले नुकसान कमी दाखवून आपल्याला मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या लाभापासून वंचित ठेवू शकतात. त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी पिक विमा योजनेच्या फॉर्म वर आपली पूर्णपणे नुकसान भरपाईची टक्केवारी आणि योग्य रित्या संपूर्ण फॉर्म भरलेली पडताळणी केल्याशिवाय सही करू नये, असे आवाहन आ. कैलास पाटील यांनी केले आहे.
२८ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण
१) दिनांक २८ सप्टेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये १३ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २८ सप्टेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये १३ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे
२) दिनांक २८ सप्टेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील २४ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोविशील्ड लसीचा डोस
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २८ सप्टेंबर २०२१ रोजी २४ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

































