Home Blog Page 210

समुद्रवाणीत बँकेवर दरोड्याचा प्रयत्न फसला

 




उस्मानाबाद – तालुक्यातील समुद्रवाणी येथे रात्री चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा प्रयत्न फसल्याने बँकेतील रक्कम सुरक्षित राहिली.

प्रथमदर्शनी माहिती नुसार, काल रात्री चोरट्यांनी समुद्रवाणी येथील   महाराष्ट्र ग्रामीण बँकेची खिडकी तोडून आत प्रवेश केला. मात्र त्यांना तिजोरी फोडता आली नाही. खिडकी तोडण्यासाठी त्यांनी गॅस कटर चा वापर केल्याची माहिती आहे. याला लागणारा गॅस शेजारील हॉटेल मधून चोरला असल्याची शक्यता आहे. घटनास्थळी बेंबळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेडंगे आणि त्यांची टीम दाखल झाली असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लवकरच आरोपी पकडू – निवा जैन

पोलीस अधिकारी बदलले की चोर, दरोडेखोर पोलीस यंत्रणेसमोर आव्हान निर्माण करतात. समुद्रवाणी येथे दरोडा टाकण्याच्या प्रयत्न करून ते आव्हान निर्माण केले आहे का असा सवाल नूतन पोलीस अधीक्षक नीवा जैन यांना पत्रकार परिषदेत विचारला यावर त्यांनी सी सी टी व्ही चे फुटेज मिळाले आहेत लवकरच आरोपींना पकडण्यात येईल असे आश्वास्त केले.

दैनिक जनमत २७ सप्टेंबर २०२१ E paper

एक वर्षात १७ कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्या विठ्ठल सहकारीच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करा – अभिजीत पाटील


मगरवाडी ( प्रतिनिधी)पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळख असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्राच्या संचालक मंडळाने २०२०-२१ च्या गळीत हंगामात १७ कोटीचा भ्रष्टाचार केला असून त्यांचावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अभिजित पाटील यांनी केले आहे.  30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

  2020-21 च्या गळीत हंगामात 3 लाख 3 हजार 547 टन ऊसाचे गाळप होऊन 2 लाख 67 हजार 225 पोती साखर तयार झाली. या साखरेची किंमत 82 कोटी 83 लाख 97 हजार 500 रुपये मिळाले. याची एफ आर पी 62 कोटी 22 लाख 71 हजार 350 रुपये शेतकऱ्यांची देणी होतात. मात्र यातील 30 ते 35 कोटी एफ आर पी थकली आहे.तर मोलेसेल पासून 18 कोटी 40 लाख 72 हजार 500 रुपये उत्पन्न झाले.तर वीज निर्मिती मधून 9 कोटी 84 लाख 34 हजार 440 रुपये मिळले. असे एकूण 111 कोटी 9 लाख 4 हजार 440 रुपये एकूण उत्पन्न मिळाले. तर ऊस बिल , तोडणी वाहतूक, कामगार पगार असे एकूण 93 लाख 95 हजार 76 हजार 900 रुपये देणी लागत आहेत. तरी कारखान्याकडे 17 कोटी 13 लाख 27 हजार 540 रुपये शिल्लक राहतात. ही रक्कम कुठे गेली ? असा खडा सवाल पाटील यांनी विचारलाय.तसेच 2018-19 , 2019-20 आणि 2020-21 या तीन वर्षांत कोणकोणत्या बँकांकडून कर्ज घेतले आणि त्याचा विनियोग कुठं केला याची माहिती त्यांनी विचारली आहे. तसेच 2019- 20 आणि 2020-21 या अहवालानुसार कोणकोणत्या संचालक , त्याचे नातेवाईक यांच्याकडे किती कर्ज आहे याची माहिती द्यावी.

 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत आपल्याला हे मुद्दे मांडताना अडचणी निर्माण केल्या जातील , बोलू दिले जाणार नाही अशी शंका त्यांनी व्यक्त केलीय.अभिजीत पाटलांच्या या आरोपांमुळे आता विठ्ठलच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

२७ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात असे असेल लसीकरण

 १) दिनांक  २७ सप्टेंबर  २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये   १२  लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस

       उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये  १२ लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .


लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २  वाजेपर्यंत आहे. दिनांक २६ सप्टेंबर २०२१  रोजी सायंकाळी चार  वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करणे करिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

२) दिनांक २७  सप्टेंबर २०२१ रोजी  उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये  उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय  अंतर्गत शहरी भागातील २५ लसीकरण केंद्रावर  १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोविशील्ड लसीचा डोस

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक २७ सप्टेंबर  २०२१ रोजी  २५ लसीकरण केंद्रावर १८  वर्षाच्या वरील  नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८  वर्षाच्या वरील  वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने   कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८  वर्षाच्या वरील  लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच  लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये


   लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.



फक्राबाद येथून एक महिला सकाळपासून बेपत्ता

 


 पारा (राहुल शेळके): वाशी तालुक्यातील फक्राबाद येथून एक वृद्ध महिला दि.26सप्टेंबर रोजी पहाटे पासून बेपत्ता झाली आहे.महिलेच्या घरच्यानी सगळीकडे शोधाशोध करून ही महिला सापडली नाही.

    याबाबत अधिक माहिती अशी की,पदमीनबाई ज्ञानोबा राख रा.फक्राबाद वय 70वर्ष ही महिला आज पहाटेपासून गायब आहे. घरच्या व गावकर्‍यांच्या म्हणण्यानुसार ती मांजरा नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली आहे. स्थानिक पोलिस, प्रशासन, तलाठी गावकऱ्यांच्या मदतीने शोध कार्य चालू आहे. अद्याप शोध लागलेला नाही. तरी ती महिला कोणाला दिसल्यास वाशी पोलीस ठाणे 02478-276033 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन वाशी पोलिस ठाणे यांनी केले आहे.

लोकअदालतीत प्रलंबीत एकुण १३१७ व दावापुर्व एकुण ६०५ प्रकरणे तडजोडीअंती निकाली


उस्मानाबाद – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दिनांक २५ सप्टेंबर, २०२१ रोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले, त्यामध्ये ई-लोकअदालतीचाही समावेश होता. उस्मानाबाद मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी ठिक १०.०० वाजता प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण के. आर. पेठकर यांचे उपस्थितीत दिपप्रज्वलनाने लोकअदालतीचे उद्घाटन झाले. यावेळी एम. आर. नेरलेकर, जि. न्या. १,  एन. एच. मखरे, जि. न्या. २, एम. एस. पाटील, सदस्य बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा, जयंत देशमुख, प्रभारी जिल्हा शासकीय अभियोक्ता, नितिन भोसले, अध्यक्ष विधिज्ञ मंडळ,  व्ही. एस. यादव, सचिव, जिविसेप्रा, सर्व न्यायीक अधिकारी, भूसंपादन अधिकारी, महसुल अधिकारी, पोलीस अधिकारी, विमा कंपनी अधिकारी, बँक अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, पक्षकार व त्यांचे विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  ए. डी. घुले, अधिक्षक, जिविसेप्रा, उस्मानाबाद यांनी केले.प्रत्येक लोकअदालतीमध्ये मोठया प्रमाणात भूसंपादनाची प्रकरणे तडजोडीने निकाली निघतात मात्र त्याचा मोबदला रक्कम वर्षानुवर्ष भूसंपादन संस्थेकडून अदा केली जात नाही. परंतु उस्मानाबाद जिल्हयामध्ये पहिल्यांदाच भूसंपादन प्रकरणामध्ये तडजोड झाल्यानंतर गोदावरी मराठवाडा खोरे महामंडळ अंतर्गत उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अधिकारी श्री. चावरे यांनी एकुण चार प्रकरणांतील भूसंपादन प्रकरणातील मोबदल्याची रक्कम रुपये ११,००,०००/- (अक्षरी अकरा लाख रुपये फक्त) संबंधीत पक्षकारांना धनादेशाव्दारे लोकअदालतीमध्येच देण्यात आली. त्यामुळे भुसंपादन प्रकरणामध्ये पक्षकारांना मावेजासाठी वर्षानुवर्ष पाहावी लागणारी वाट आता लोकअदालतीमुळे काहीशा प्रमाणात बंद झाल्याचे दिसुन येत आहे. पक्षकारांच्या चेह-यावर समाधान दिसुन येत होते. त्यामुळे भविष्यात पक्षकारांचा लोकअदालतीमध्ये आपले प्रकरण मिटविण्याचा कल दिसुन येण्याची शक्यता आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळणेसाठी पक्षकार बांधवांना व उपस्थित सर्वांना सामाजिक अंतर ठेवणेबाबत सुचना करण्यात आल्या.उस्मानाबाद जिल्ह्यातून मोठया संख्येने प्रलंबित एकुण ८४१३ व दावापुर्व एकुण १३२४५ प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याकरीता या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबीत एकुण १३१७ व दावापुर्व एकुण ६०५ प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आलेली आहेत. त्यामध्ये प्रलंबीत व दावापुर्व दिवाणी स्वरूपाची (१०८३), मोटार अपघात / कामगार नुकसान भरपाई प्रलंबीत प्रकरणे (७७), भू-संपादन प्रलंबीत प्रकरणे (५३), फौजदारी तडजोडपात्र स्वरूपाची प्रलंबीत (२८३), वैवाहिक संबंधीची प्रलंबीत (२२), धनादेशाची प्रलंबीत (१४१), वीज देयकाची दावापुर्व प्रकरणे (१३), ग्रामपंचायतीची करवसुलीची दावापुर्व प्रकरणे (१२५०) सामोपचाराने मिटविण्यात आली. मोटार अपघात / कामगार नुकसान भरपाई प्रकरणांमधील पक्षकारांना रुपये ५०८५४८३९/- नुकसान भरपाई देणेबाबत तडजोड झाली. धनादेश प्रकरणी फिर्यादी पक्षाला रुपये २७७५५२४७/- वसूली करून देण्यात आली. भू-संपादन प्रकरणांमध्ये रुपये ४०२९२८३/- रक्कमेची तडजोड झालेली आहे. ग्रामपंचायतीचे करवसुलीच्या दावापुर्व प्रकरणांमध्ये रक्कम रुपये १८८३६९१/- कर वसुल करण्यात आला. तडजोडपात्र फौजदारी स्वरुपाच्या प्रलंबीत प्रकरणांत रक्कम रुपये ५२२०३८/-, वैवाहिक स्वरूपाच्या प्रलंबीत प्रकरणांमध्ये रक्कम रुपये १२५९९३५/- तर वीज देयकासंबंधीच्या दावापुर्व प्रकरणांमध्ये रक्कम रुपये १५१०१०/- ची तडजोड झाली व दिवाणी प्रलंबीत व दावापुर्व प्रकरणांमध्ये एकुण रक्कम रुपये १२२७८६६५३/- मध्ये तडजोड झाली.तसेच वाहतुक नियमभंगाची एकुण २०१३ प्रकरणे सामोपचाराने मिटली व त्यामध्ये शासनखाती दंडापोटी रक्कम रुपये ६८९७००/- जमा झालेले आहेत.

सख्खा भाऊ पक्का वैरी, बापही निघाला कृत्याचा वाटेकरी अवघ्या 12 तासांत खूनाचा उलगडा


परंडा पोलीस ठाणे : सख्खा भाऊ पक्का वैरी ही बोली भाषेतील म्हण सत्यात उतरले आहे. आरसोली, ता. भुम येथील विलास आबासाहेब गोयकर, वय 33 वर्षे यांच्या गळ्यावर शस्त्राच्या वाराच्या जखमा असलेला मृतदेह 23 सप्टेंबर रोजी देवळाली ते आरसोली रस्त्यालगतच्या चारीत आढळला होता. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी विलास यांचा खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह त्या चारीत टाकला आहे. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- दिलीप आबासाहेब गोयकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो.ठा. गु.र.क्र. क्र. 322 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 302, 201 अंतर्गत नोंदवला आहे.

      गुन्हा तपासादरम्यान कळंबचे सहायक पोलीस अधीक्षक- श्री. आर. रमेश यांसह पोनि- श्री. गजानन घाडगे यांच्यासह स्था.गु.शा. च्या पथकाने व पोनि- सुनिल गीड्डे यांच्यासह परंडा पो.ठा. च्या संयुक्त पथकाने तपास सुरु केला. मयताचा पिता- आबासाहेब रामलिंग गोयकर यांसह फिर्यादी भाऊ- दिलीप यांस वेगळे करुन सखोल विचारपूस केली असता दोघांच्या बोलण्यास तफावत आढळली. एकंदरीत विलास गोयकर (मयत) याने दि. 21.09.2021 रोजी रात्री मद्यधुंद अवस्थेत भाऊ- दिपक यास नित्याप्रमाणे शिवीगाळ करुन धक्काबूक्की केली. यातून चिडून जाउन दिलीप याने भाऊ विलास याच्या डोक्यात गळ्यावर कुऱ्हाडीचे घाव घातल्याने त्याचा मृत्यू झाला. यानंतर त्याने पिता- आबासाहेब यांच्या सहकार्याने विलास याचा मृतदेह पोत्यात भरून मोटारसायकवरून वाहून नेउन त्या चारीत टाकल्याचे निष्पन्न होताच त्या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणांहुन अटक करण्यात आली.


आरोपी पकडण्यात श्वानाचे योगदान

या खुन प्रकरणाचा तपास लावन्या साठी घटना स्थळी उस्मानाबाद च्या श्वान पथकाला पाचारण करन्यात आले होते .

श्वान प्लुटोने घटनास्थळा पासुन आरोपीचा आरोपीच्या घरा पर्यंत माग काढला होता या मुळे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मयत विलास अबासाहेब गोयकर याचा भाऊ दिलीप अबासाहेब गोयकर यास संशयावरून ताब्यात घेतले व त्याच्याकडे खुन प्रकरणाची कसुन चौकशी केली.

 आरोपी दिलीप गोयकर याची शनिवार दि २५ सप्टेंबर रोजी दुपारी परंडा पोलिस स्टेशनच्या आवारात श्वान प्लुटो कडून ओळख परेड घेण्यात आली. श्वान प्लुटोने आरोपी दिलीप गोयकर याच्या अंगावर झेपा घेऊन आरोपीची ओळख करून दिली आहे. उस्मानाबाद चे पोलीस उपनिरीक्षक मस्के पोलीस हेडकॉन्स्टेबल स्वप्नील ढोणे पोलीस नाईक सुरज कोरडे यांच्या पथकाने आरोपीची ओळख करण्या साठी अरोपी सह इतर नागरीकांना परंडा पोलीस स्टेशनच्या आवारात उभे केले होते श्वान प्लुटोने पाकीट च्या वासावरून आरोपी दिलीप गोयकर याच्या अंगावर दोन वेळा झेप घेऊन आरोपीस ओळखले आहे.

   या वेळी परंडा पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे पोलीस उप निरिक्षक हिंगे,पोकॉ शेंदारकर उपस्थित होते.

         उपविभागीय पोलीस अधिकारी एम रमेश व स्थानीक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने व परंडा येथील पोलीस पथकाने खुन प्रकरनातील आरोपीचा १२ तासात तपास लाऊन आरोपी दिलीप गोयकर व मयताचचे वडील अबासाहेब गोयकर यांना दि २४ रोजी रात्री अटक करून परंडा पोलिसांच्या ताब्यात घेतले.

मांडूळ तस्करांचा पर्दाफाश ६ तस्करांना अटक


उस्मानाबाद स्थानिक गुन्हा शाखा पथकाची कारवाई

 परंडा (भजनदास गुडे)

 ( दि २५ )मांडूळची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा उस्माबाद स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पर्दाफाश करून परंडा तालुक्यातील १,नाशीक येथील ४ व उस्मानाबाद येथील १ असे ६ आरोपींना दि २४ सप्टेबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अटक करून मांडूळा सह ४७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे .  मांडूळाची तस्करी करणारी टोळी मांडूळ घेऊन नाशीक येथून उस्मानाबाद येथे येत असल्याची माहिती काडून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सापळा लाऊन पो नि घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोनि निलंगेकर,पोउपनी माने पो हवालदार जगदाळे,पोना चव्हाण,पोका ढगारे,पोका ठाकूर,पोका कोळी,चालक पोहेका अरब यांच्या पथकाने दि २४ सप्टेबर रोजी रात्री ७ – ३० ते ८ वाजेच्या दरम्यान उस्मानाबाद महामार्गाच्या बायपास वर आरोपी दिपक एकनाथ शिंदे,विजय देवराम कटारणवरे,संदिप बाळासाहेब लोखंडे,सुशांत बाळासाहेब गायकवाड,राहणार नाशीक व परंडा तालुक्यातील  कुभेकळ येथील अब्दुल आझम पटेल रा.कुंभेफळ ता परंडा,रामा भीमा कांबळे रा बेगडा उस्मानाबाद यांना अटक करून त्यांच्या ताब्यातील साडेतीन कीलो वजनाचा मांडूळ किंमत चाळीस लाख व एक एर्टीगा गाडी  किंमत सात लाख रु असे एकूण ४७ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.स्थनिक गुन्हा शाखेचे पोलिस उप निरिक्षक माने यांच्या फिर्यादी वरून सर्व आरोपी विरूध्द उस्मानाबाद च्या आनंदनगर पोलिस ठाण्यात वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उस्मानाबादेत उल्कापात? शेतकऱ्याच्या शेतात आकाशातून पडला दगड!





 उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी शहराजवळ एका शेतकऱ्याच्या शेतात उल्कापात झाल्याचे चर्चा होत आहे. प्रभू निवृत्ती माळी यांच्या शेतात बांधावर आकाशातून एक दगड पडला असल्याचे सांगितले जात आहे.तो अर्धवट जळालेल्या स्वरूपात होता. यामुळे दीड इंच खोल खड्डा पडला. शेतात तुंबलेले पाणी काढत असताना माळी यांना विचित्र आवाज ऐकायला आला. त्यांच्यापासून सहा सात फुटावर असलेल्या बांधावरच एक दगड जोरात आदळला.तो सोनेरी गव्हाळ रंगाचा होता तसेच 7 इंच लांबी, तर सहा इंच रुंदी.3.5 इंचापेक्षा अधिक जाडीचा आणि साधारण अडीच किलो वजनाचा हा दगड आहे सध्या लोकांमध्ये उल्कापात झाल्याची चर्चा आहे.

वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी उल्कापात असल्याचे नाकारले

 हा प्रकार तहसीलदारांना कळवण्यात आला. त्यांनी वरिष्ठ भूवैज्ञानिकांना कळवले. मात्र वरिष्ठ भूवैज्ञानिक बी.एम. ठाकूर यांनी हा उल्कापात नसल्याचे सांगितले. वैज्ञानिक दृष्टया या घटनेची पुष्टी होत नाही. उल्कापाताची व्याप्ती मोठी असते एका ठिकाणी दगड पडल्याने त्याला उल्कापात म्हणता येत नाही. घटनस्थळी भेट देऊन याबाबत अधिक माहिती सांगितली जाईल. नागरिकांनी घाबरु नये असे वरिष्ठ भूवैज्ञानिक बी.एम. ठाकूर यांनी आवाहन केले आहे.