Home Blog Page 201

जिल्हा परिषदेच्या विद्युतीकरणाच्या कामातील अनियमिततेच्या चौकशीची संचिका गायब


आनंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…

उस्मानाबाद – जिल्हा परिषदेत गेले काही महिने अनागोंदी सुरू असून टर्म संपत आल्याने खाबुगिरी जोरात सुरू आहे. प्रत्येक फाईल मध्ये आपल्याला काही तरी मिळाले पाहिजे सहखुशिने काहीतरी द्या असे म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या गडबडीचा नवा अंक समोर आला आहे. 

सन २०१९ च्या विद्युतीकरणाच्या कामात अफरातफर झाल्याची तक्रार अन्नय्या स्वामी यांनी केली. त्या प्रकरणात संबंधित ८ अधिकाऱ्यांवर अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला. त्यांच्यावर कारवाई देखील निश्चित झाली होती मात्र ती मूळ संचिकांच जिल्हा परिषदेतून गायब झाली आहे. बांधकाम विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी बळीराम मोरे यांनी आनंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पो.हे.कॉ चौधरी यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.


म्हणे ती फाईल लोकप्रतिनिधीच्या केबिन मध्ये गेली!

गहाळ झालेली फाईल जिल्हा परिषदेची सूत्रे हातात असणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या केबिन मध्ये गेली होती अशी जिल्हा परिषदेत चर्चा आहे. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने ती लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून ठेवून घेतली मात्र वापस दिली नसल्याची देखील चर्चा आहे. त्या कर्मचाऱ्याने कोणाच्या सांगण्यावरून ती फाईल घेतली?  त्या लोकप्रतिनिधीने चौकशीत दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून फाईल गहाळ करण्यासाठी मलिदा घेतला होता का? या प्रश्नांची उत्तरे त्या कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्याची चौकशी झाल्यानंतर समोर येणार आहे.

दैनिक जनमत ३० ऑक्टोबर २०२१ E paper

जिल्ह्यात एक नोव्हेंबरपासून नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम

उस्मानाबाद,दि.28(प्रतिनिधी):- जिल्ह्यात एक नोव्हेंबर 2021 पासून मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दिल्ली येथील भारत निडणूक आयोग आणि मुंबई येथील मुख्य निवडणूक अधिकारी  यांनी दि.एक जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्तं पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे . त्यामुळे एक नोव्हेंबर 2021 पासून जिल्ह्यात नवीन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे त्याअनुषंगाने दि. एक जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी दि.01 नोव्हेंबर,2021 (सोमवार) रोजी प्रसिध्दी करण्यात येईल. दावे आणि  हरकती स्वीकारण्याचा कालावधी सोमवार दि.एक  ते मंगळवार दि.30 नोव्हेंबर,2021 असेल.  विशेष  कालावधी शनिवार, दि.13 आणि   रविवार  दि.14 नोव्हेंबर,2021 असेल. शनिवार, दि.27 आणि  रविवार, 28 नोव्हेंबर, 2021 रोजी  दावे तसेच  हरकती निकालात काढण्यात येणार आहेत. सोमवार,दि. 20 डिसेंबर 2021  पर्यंत मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे .    त्याअनुषंगाने दि.एक जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण होणा-या तरुण पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी नमुना सहा चा अर्ज (सोबत आवश्यक कागदपत्रासह ) आणि  ज्या मतदारांचे मतदार यादीमधील नाव, पत्ता किंवा  इतर दुरुस्ती असल्यास नमुना आठ चा अर्ज भरुन सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तथा तहसील कार्यालयात  किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे पुराव्यासह जमा करण्याचे आवाहन येथील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  कौस्तुभ दिवेगावकर  यांनी केले आहे. 

  तसेच ग्राम विकास विभागाच्या शासन परित्रक दि.25 ऑक्टोबर 2021 प्रमाणे  मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती, नाव वगळणी तसेच नवीन नोंदणी इत्यादी प्रकीया गावातील नागरिकांपर्यत सुलभतेने पोहोचण्याकरिता  दि.16 नोव्हेंबर 2021 रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही  श्री . दिवेगावकर यांनी कळविले आहे. 

****

एसटीची १७.१७ टक्के भाडेवाढ; २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून होणार लागू

 


– तिकिटात किमान ५ रूपयांची वाढ

– साध्या बसचा रात्रीचा प्रवास झाला स्वस्त 

मुंबई दि. २५ ऑक्टोबर – इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ,  टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली. एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच १७.१७ टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असून ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना लागू होणार आहे. २५ ऑक्टोबर २०२१ च्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ होणार असून ती किमान ५ रूपयाने वाढणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर ५ ते १० रूपयांनी कमी करत रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे.

गेल्या ३ वर्षात इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र  स्थिर ठेवले होते. अशा परिस्थितीतही एसटी महामंडळाने कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती. इंधनाच्या वाढत्या दराचा बोझा झेलत एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकिट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे. नव्या तिकिट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच ६ किमी नंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ ५ रुपयाच्या पटीत असून २५ ऑक्टोबर २०२१ च्या मध्यरात्रीपासून (२५ व २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री) लागू होणार आहे. 

२५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून वा तद्नंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुधारीत दराने तिकिट आकारणी केली जाणार आहे. तसेच ज्या प्रवाशाने आगाऊ आरक्षण केले आहे अशा प्रवाशांकडून वाहक सुधारीत तिकिटाच्या रक्कमेची आकारणी करतील, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. तथापि, रातराणी सेवा प्रकारांतर्गत रात्री धावणाऱ्या (जी सेवा सायंकाळी ७ वा. ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वा.पर्यंतच्या कालावधीमध्ये कमीत कमी ६ तास धावते) साध्या बसेसचे तिकिट दर हे दिवसा धावणाऱ्या साध्या बसेसच्या तिकिट दराच्या तुलनेत  १८ टक्के जास्त होते. उदयापासून सदर अतिरिक्त दर रद्द करण्यात आले असून दिवसा व रात्री धावणाऱ्या बसेसचा तिकिट दर सारखाच असणार आहे. त्यामुळे साध्या बसचा रातराणीचा प्रवास तुलनेने स्वस्त झाला आहे.

बळीराजा पार्टी करणार टाळे ठोको आंदोलन

उस्मानाबाद

बळीराजा पार्टीच्या वतीने २५ ऑक्टोबर रोजी विमा कंपनीच्या उस्मानाबाद शाखेस ताळे ठोको आंदोलन करण्यात येणार आहे. सन २०२० मधील पिक विमा मोबदला बजाज इन्शुरंन्स कंपनी हा मोबदला देण्यास टाळाटाळ करत आहे बळीराजा पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वी ही निवेदने देण्यात आली आहेत या निवेदनाची दखल घेतली नसल्याने हे आंदोलन करण्यात  येणार आहे. या टाळे ठोक आंदोलनास रामचंद्र पाटील प्रणित शेतकरी संघटना,आम आदमी पार्टी, भारतीय एकता पार्टीने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे