पक्षांतर्गत ओबीसी आरक्षण ओबीसींना येड्यात काढण्याचा विषय – रमेश बारस्कर
ओबीसी आरक्षणासाठी तुळजापूर ते आझाद मैदान संघर्ष रथयात्रा
मंगळवारी जगदंबेचा आशीर्वाद घेऊन होणार रथयात्रेस शुभारंभ
ज्योती क्रांती परिषदेचे रमेश बारसकर यांची माहिती
उस्मानाबाद, दि. 3 – पक्षांतर्गत ओबीसी आरक्षण ओबीसींना येड्यात काढण्याचा विषय असून ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्र व राज्यातील सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत हक्काचे आरक्षण मिळविण्याकरिता 5 एप्रिल ते 17 मे या काळात महाराष्ट्रभर ओबीसी संघर्ष रथयात्रा काढून समाजात जनजागृती करण्यात येणार आहे. मंगळवार, 5 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता तुळजापूर येथे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेऊन या रथयात्रेचा शुभारंभ करण्यात येणार असून 17 मे रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर समारोप होणार आहे. या भव्य एल्गार मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी दिली.
उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ओबीसी आरक्षण संघर्ष रथयात्रेच्या तयारीबाबत श्री.बारसकर यांनी माहिती दिली. यावेळी महादेव माळी, खलील सय्यद, विशाल शिंगाडे, लक्ष्मण माने, डी.एन. कोळी, रवी कोरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्री.बारसकर म्हणाले, देशात 52 टक्के असलेल्या ओबीसी समाजाला आरक्षणासह इतर सुविधा देण्याची शिफारस बी.पी. मंडल आयोगाने केलेली होती. 1989 साली व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मंडल आयोगाचा प्रस्ताव मान्य करुन ओबीसींना सभागृहात आरक्षण मंजूर केले. त्यावेळी आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात 31 याचिका दाखल झाल्या. त्या निकाली निघण्यासाठी 1992 साल उजाडले. म्हणजेच देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ओबीसींना 45 वर्षे आरक्षणासाठी वाट पहावी लागली. आरक्षण मिळून 25 वर्ष झाली नाहीत तोच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण काढून घेतले आहे. यापुढील काळात शैक्षणिक आणि नोकर्यांमधील आरक्षण काढून घेतले जाईल अशी भीती देखील श्री. बारसकर यांनी व्यक्त केली.
म्हणून ओबीसी आरक्षणाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही तुळजापूर ते आझाद मैदान मुंबई ओबीसी संघर्ष रथयात्रा काढत असल्याचे त्यांनी सांगितले. या रथयात्रेत महाराष्ट्रातून ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
गाळपाच्या प्रतीक्षेत असलेले फड सापडताहेत आगीच्या भक्ष्यस्थानी
पारा येथे दीड एकर ऊस महावितरणच्या तुटलेल्या जम्परिंग मुळे जळून खाक
पारा (राहुल शेळके ): एकीकडे चौदा पंधरा महिने उलटूनही कारखान्याची तोड मिळत नसल्याने फडातच चिपाड होत असलेल्या उसाची चित्तर कथा वाशी तालुक्यातील पारा येथे दिसून येत असताना दुसरीकडे गाळपाच्या प्रतीक्षेत असलेले उस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडत आहेत
वाशी तालुक्यातील अनेक गावात ऊस गाळपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यास्थितीत उन्हाचा तडाखा वाढत आहे. शुष्कता वाढत आहे. यामुळे फडातच असलेल्या अनेकांचे ऊस उसावरून जाणाऱ्या महावितरणच्या तारांच्या घर्षणाने लागलेल्या आगीत भस्मसात होत आहे. मंगळवारी(दि.29) दुपारी पारा येथे शॉर्टसर्किटने आग लागून भराटे यांचा साडेचार एकर ऊस जळून खाक झाला होता. ही घटना ताजी असतानाच शनिवारी दुपारी पारा येथील सर्वे नंबर 335 /अ मधील रामा दगडू वैद्य या शेतकऱ्याच्या शेतातून जाणाऱ्या पिंपळवाडी गावठाण लाईटच्या लोखंडी पोलवरील जम्परिंग तुटून लागलेल्या आगीत दीड एकर ऊस पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या घटनेचा तलाठी साबळे यांनी पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे. या घटनेमुळे हा शेतकरी पूर्णपणे संपला असून लवकरात लवकर कारखान्याने हा उस न्यावा अशी विनवणी कारखाना कर्मचाऱ्यांना करताना दिसून आला. तसेच महावितरण ने या शेतकऱ्यास झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी उपकार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी वाशी उपविभाग यांच्याकडे केली आहे.















































































