Home Blog Page 161

नको त्या गोष्टी लोकांच्या मनात आणून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय – अजित पवार

 



राज्यात सलोखा राहावा यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. मनसे सोडून सर्व पक्षांनी एकच भूमिका घेतलेली आहे. भाजपने तर बैठकीवर बहिष्कार टाकला होता. सुप्रीम कोर्टाने लाऊडस्पीकरबाबत आधीच नियमावली दिली आहे. उद्या एखादा निर्णय घ्यायचा असल्यास सर्वांसाठी एकच कायदा करावा लागेल. उत्तर प्रदेशमध्ये तिथले मुख्यमंत्री योगी यांनी काय करावे, हा त्यांचा अधिकार आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्र सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाणारा आहे, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी केली. 


इतकी वर्ष सर्व चालत आले आहे. आतापर्यंत भाजपला कुणी थांबवले होते? आजच ही मागणी का केली जात आहे? उद्या सुप्रीम कोर्टाने काही आदेश काढला तर सर्व धर्माच्या भाविकांना तो निर्णय लागू होईल, याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहीजे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात जातीय दरी निर्माण करुन आज जातीय सलोखा बिघडवण्याचे काम सुरु आहे. नको त्या गोष्टी लोकांच्या मनात आणून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्राला परवडणारा नाही. सर्वांनी या गोष्टी गांभीर्याने घेऊन मनाचा मोठेपणा दाखवावा लागेल. यातून काही जखमा झाल्या तर नको ते प्रश्न निर्माण होतील, असे अजितदादा म्हणाले.


मनसेला राष्ट्रवादीची फूस नाही

मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असती तर राज ठाकरेंनी आदरणीय पवार साहेबांना जातीयवादी म्हटले असते का? राज ठाकरे आज भाषणे करत असताना ते भाजपवर टीका करत नाहीत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरच टीका करतात. मात्र लोकसभेला त्यांचा अजेंडा वेगळा होता. त्यावेळी त्यांनी फक्त भाजपला टार्गेट केले होते. ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल. २०१९ ला आघाडीला अप्रत्यक्ष फायदा होईल, अशा पद्धतीने त्यांनी सभा घेतल्या होत्या, असे अजित पवार म्हणाले.

दैनिक जनमत २८ एप्रिल २०२२ E paper

 

श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण



तुळजापूर :

श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ यांच्या वतीने श्री तुळजाभवानी मंदिरातील विविध विषयांबाबत मंदीर परिसरात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. श्री तुळजाभवानी आईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना देण्यात येणारी अनावश्यक खर्चिक मोफत दर्शन पास सेवा बंद करावी, कोरोनाचे सर्व नियम शासनाने शिथिल केल्यामुळे प्रथेप्रमाणे देवीचे सर्व धार्मिक विधी पुन्हा चालू करावे, मंदीर प्रशासनाने भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन भाविकांच्या सोयी-सुविधांचा विचार करावा. या सह विविध मागण्यासाठी हे उपोषण करण्यात आले होते. या लाक्षणिक उपोषणास भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना या सह पुजारी बांधवांनी आणि विविध संघटनांनी पाठिंबा दाखवला होता.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होतंय उस्मानाबाद ला अन धुर निघतोय नेरुळ मधून


शिवसेना तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी यांचा पलटवार


उस्मानाबाद (प्रतिनिधी) –

उस्मानाबाद (धाराशिव) येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी जिल्हा रुग्णालयासह जागा हस्तांतरित करण्याबाबत महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी होण्याआधीच प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जनतेची दिशाभूल करण्याचा उद्योग भारतीय जनता पार्टीचे आमदार करत आहेत. तुम्हाला प्रसिद्धीच हवी असेल तर इतरही उद्योग आहेत. केवळ श्रेय लाटण्यासाठी सातत्याने जनतेची दिशाभूल का करता? असा सवाल शिवसेना तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

भाजपा आमदारांचे म्हणणे आहे की, सहा दिवसांपूर्वी भाजपा आमदारांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीसाठी दिलेली आहे.  सामंजस्य करारावर स्वाक्षरी तर होणारच आहे. परंतु त्याआधीच केवळ श्रेय लाटण्यासाठी प्रसिद्धीचा हा खटाटोप बरा नव्हे, याची जाणीव ठेवा. 

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबाद  येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केल्यानंतर 2019 मध्येच समितीने पाहणी करुन अहवाल दिलेला होता. त्यावेळेसच मंत्रिमंडळात  ठराव घेऊन शासननिर्णय का काढला नाही. यापूर्वी उस्मानाबाद येथे मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तुमच्या आताच्या नेत्याने नेरुळला पळविले. आता पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबादला होत आहे, ते आपल्या संस्थेला मिळावे यासाठी तुम्ही भाजपामध्ये गेला. पण आता हे महाविद्यालय शासकीयच राहणार आहे, हेच तुमचे दुखणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबाद येथे होत आहे, परंतु नेरुळमधून धूर का निघत आहे? याचे उत्तर जनतेला द्यावे.


उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे याकरिता खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आणि शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे-पाटील हे महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन येथील सर्वसामान्य जनतेला चांगल्या वैद्यकीय सुविधा आणि उपचार मिळावेत ही आमची प्रामाणिक भावना आहे. त्यासाठीचे श्रेय तुम्हाला घ्यायचे असेल तर घ्या, पण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत सतत प्रसिद्धी पत्रके काढून जनतेची दिशाभूल करणे भाजपा आमदारांनी थांबवावे, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी यांनी केले आहे.

जिग्नेश मेवानी यांना अटक; काँग्रेसने केला निषेध


उस्मानाबाद –  जिग्नेश मेवानी यांच्या अटकेचा काँग्रेस ने निषेध केला असून जिल्हा काँग्रेस कमिटी उस्मानाबाद यांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की गुजरात मधील वडगाम काँग्रेस पक्षाचे आमदार जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांनी गुजरात मधील पालनपुर सर्किट हाऊस येथून तीन दिवसापूर्वी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास बेकायदेशीरपणे अटक करून आमदार जिग्नेश मेवाणी यांना पोलिस कोठडीत पाठविण्यात आलेले आहे मा. पंतप्रधानांच्या नावाने एक ट्विट  केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे समजते निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने देशाच्या पंतप्रधानांच्या नावाने काही उपेक्षा करणारे ट्विट हा अपराध नाही लोकशाही व संविधानाने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे असा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. सरकारने मनमानीपणे सर्व नियम धाब्यावर बसवून यांच्यावर कारवाई केलेली आहे ही अटक बेकायदेशीर असून लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारे आहे आमदार जिग्नेश मेवाणी यांची त्वरित सुटका करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे वतीने करण्यात आली आहे या निवेदनावर जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, अग्निवेश शिंदे, मधूकर तावडे, सिध्दार्थ बनसोडे, राजाभाऊ शेरखाने,रोहित पडवळ, विश्वजित शिंदे, हरिश्चंद्र शेळके,मेहराज शेख, धनंजय राऊत,आयुब पठाण,विनोद वीर, प्रशांत पाटील,शहाजी मुंडे,अशोक बनसोडे,प्रभाकर लोंढे,उमेशराजे निंबाळकर, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत


मनोज आव्हाड खूण प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याची सकल मातंग समाजाची मागणी

उस्मानाबाद – औरंगाबाद येथील मातंग समाजातील तरुण मनोज आव्हाड यांच्या मारेक-यास फाशीची शिक्षा द्यावी या मागणीचे सकल मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की दि.२० एप्रिल रोजी मनोज शेषेराव आव्हाड या तरुणाने मांगीरबाबा यांच्या यात्रेला जाण्यासाठी मारेक-यास २०००/-  रूपयाची मागणी केली होती  दलित असून यात्रा वगरे करतोस जय लहुजी म्हणतोस हा राग मनात धरून मनोज यास मारेक-यांनी चोरीचा आरोप घालुन यांनी लाठ्याकाठ्यांनी गुराप्रमाणे मारहाण केली एवढी निर्दयी मारहान करण्यात आली की आठ-दहा जणांनी मिळून केलेल्या मारहाणीत मनोज याचा जागीच मृत्यु झाला. आरोपींवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सकल मातंग समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

कावड मिरवणुकीने कंडारी यात्रेस सुरुवात

 


कंडारी (शंकर घोगरे)

 भैरोबाच्या नावानं चांगभलं च्या गजरात गुलाल खोबऱ्याची उधळण करत कावडीची मिरवणूक मोठ्या थाटात काढण्यात आली. यावेळी अनेकांनी नवसाचे तोरण बांधले पायघड्या घातल्या . महाराष्ट्रासह आंध्र व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या परंडा तालुक्यातील कंडारी येथील श्री काळभैरवनाथ यात्रेस काल दिनांक 23 रोजी कावड मिरवणुकीने सुरुवात झाली आहे.

    गेली दोन वर्ष करोनामुळे भैरवनाथ   यात्रेवर निर्बंध लादले होते. यावर्षी करोना रुग्णांत लक्षणीय घट झाल्याने यंदा  यात्रेवरील सर्व निर्बंध हटवले असल्याने यात्रा संपन्न होत आहे.

परंपरेनुसार दुपारी साडेबारा वाजता सुतार नेटवरून सनई चौघड्याच्या स्वरात ढोल-ताशांच्या गजरात हलगीच्या तालावर भैरवनाथाच्या कावडीची मिरवणूक काढण्यात आली. मुख्य रस्त्यावरून गणपती मंदिर, मारुती मंदिर, मार्गे भैरवनाथ मंदिरास प्रदक्षिणा घालून मंदिरा समोर ठेवण्यात आली. यावेळी देवाच्या नावानं चांगभलं चा गजर करत गुलाल खोबऱ्याची उधळण करण्यात आली . त्यानंतर गावकऱ्यांनी देवास आंबील पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला. परंपरेनुसार रात्री ठीक बारा वाजता भैरवनाथ जोगेश्वरी विवाह संपन्न झाला. लग्न सोहळ्यासाठी बीड आंबेजोगाई लातूर उस्मानाबाद इतर भागातील भाविक भक्त मोठ्या संख्येने दाखल झाले होते.

 दरवर्षी यात्रेत लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यंदा करोनाचे संकट दूर झाले असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याचा अंदाज आहे. कावड मिरवणुकीच्या वेळी बाळासाहेब पडघन, भैरवनाथ शिंदे, मा. जि प सदस्य धनंजय मोरे, माजी सरपंच विश्वास मोरे ,उपसरपंच राहुल डोके, विशाल देवकर, दिलीप मोरजकर, आदेश निंबोळे ,दादासाहेब घोगरे, सारंग घोगरे, भाऊसाहेब तीबोळे ,नवनाथ तीबोळे, हरी घोगरे, यांचे सह, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ ,भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 आज दिनांक 24 रोजी दुपारी दोन वाजता जंगी कुस्त्यांचे मैदान होणार असून कुस्ती शौकिनांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.