Home Blog Page 157

सेवा पुस्तिकेची द्वितीय प्रत मिळावी यासाठी आमरण उपोषण

 


उस्मानाबाद – सेवा पुस्तिकेची द्वितीय प्रत देण्यात यावी या मागणीसाठी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर एका सहशिक्षकाने दि.९ मेपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उस्मानाबाद येथील श्रीमती‌ सत्यभामा शिंदे माध्यमिक विद्यालयातील सहाय्यक शिक्षक व्ही.टी. कराड यांची वरिष्ठ वेतन श्रेणी, सहाव्या वेतन आयोगाचा फरक, सेवा पुस्तिकेची द्वितीय प्रत अद्यावत करून मिळावी अशी तोंडी व लेखी वेळोवेळी मागणी करूनही संस्था सचिव व मुख्याध्यापक श्रीमती सत्यभामा शिंदे विद्यालय उस्मानाबाद यांनी त्यांच्या मागण्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडेही लेखी स्वरूपामध्ये तक्रार करूनही त्यांनी आजतागायत कसल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. तर मुख्याध्यापकांना देखील दि. २१ एप्रिल रोजी वरील मागण्याबाबतचे आमरण उपोषणाचे पत्र देऊनही मागण्या पूर्ण न झाल्याने  शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर कराड यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.

शिक्षक समन्वय संघाचे धरणे आंदोलन



उस्मानाबाद –

खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलनाला बसले आहेत.शिक्षक समन्वय संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले विना तथा अंशतः अनुदानित शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तरांना कर्मचाऱ्यांना दिनांक  २४ जुन २०१४ तील वेतन अनुदान वितरणाचे सुत्र सतरा लागू करून पूर्ण शंभर टक्के पगार सुरू करून अधिकृत शासन निर्णय २२ मे  पर्यंत निघावा अन्यथा दिनांक २३ मे मे पासून आझाद मैदानावर महाराष्ट्रातील विना/ अंशतः अनुदानित हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थित बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.


जलतरण तलावात पोहायला गेलेल्या मुलाचा मृत्यू

उस्मानाबाद शहरात ज्ञानेश्वर मंदिराजवळ असलेल्या साईलिला हॉटेल  येथील स्विमिंग पूल मध्ये  पोहण्यासाठी गेलेल्या जियान समीर मुल्ला वय 18 वर्षे याचा दि ८ मे रोजी पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. नातेवाईकांनी स्विमिंग पूलच्या बेजबाबदारपणामुळे हा मृत्यू झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांना बोलताना दिली आहे. तसेच स्विमिंग पूल चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आनंद नगर पोलीस स्टेशन मध्ये केली आहे.जियान हा  बार्शी येथील रहिवासी असून उस्मानाबाद येथे आजोळी सुट्टयासाठी आला होता.

उस्मानाबादेत आगडोंब; दोन दुकाने जळून खाक

 


मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे व अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे पुन्हा मोठी हानी टळली

उस्मानाबाद, दि.  ९ –
फर्निचर आणि ऑटोमोबाइल्स व सर्व्हिसिंग सेंटरला अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे साहित्य खाक झाले. उस्मानाबाद शहरातील भानूनगर समोरील रजा कॉलनी भागात आज (दि.8) सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. वेळीच आग आटोक्यात आली नसती तर इतर दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली असती; परंतु नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे इतर दुकाने मात्र आगीपासून बचावली आहेत. आगीचे भीषण रुप लक्षात घेऊन उस्मानाबाद नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांसह एक टँकर तसेच तुळजापूर नगर परिषदेच्या अग्शिमन दलाच्या गाडीला देखील पाचारण करण्यात आले होते.

उस्मानाबाद-औरंगाबाद महामार्गावर भानूनगर समोरील रजा कॉलनी भागात व्यापारी संकुल आहे. या संकुलात कादर शेख यांचे ऑटोमोबाइल्स व सर्व्हिसिंग सेंटर आणि गणेश पावले यांचे फर्निचर विक्रीचे दुकान आहे. सुमारे दहा हजार स्क्वेअरफूट जागेत असलेल्या या दोन्ही दुकानांना आज सायंकाळी अचानक आग लागली. दोन्ही दुकानांमधील साहित्याने पेट घेतल्यामुळे बघता बघता आगीचे आणि धुराचे लोट बाहेर पडू लागले.   आगीने रौद्र रुप धारण केल्याचे पाहून काही सूज्ञ नागरिकांनी तातडीने थेट नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण येलगट्टे यांनाच फोनवर माहिती देऊन अग्निशमन दलाची गाडी तात्काळ पाठविण्याची विनंती केली. त्यावर येलगट्टे यांनी  तातडीने अग्निशमन दलाला कळवून घटनास्थळाची माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे यांनीही आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. ही दुकाने रस्त्यालगत असल्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, अग्निशमन दलाचे पथक तात्काळ गाडी घेऊन घटनास्थळी हजर झाले. अग्शिमन दलाच्या कर्मचार्‍यांनी शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळविले. वेळीच आग आटोक्यात आल्यामुळे बाजूला असलेली इतर दुकाने बचावली. अग्निशमन दलाचे इन्चार्ज सुदाम खरात, फायरमन दत्ता हराळे, चालक संजय कसबे, कुमार नायकल, विकास माने, समीर नरवडे, अक्षय उंबरे, आकाश ढवळे यांच्या पथकाने यासाठी परिश्रम घेतले.


आनंद नगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी

व्यापारी दुकांनाना आग लागल्याची माहिती मिळताच आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दुकानांमध्ये सिलेंडर अथवा एखादी आगीमुळे स्फोट होऊ शकणारी वस्तू असती तर धोका वाढेल याची भीती अनेकजण व्यक्त करत होते. तर काहीजण दुकानामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे बघ्यांच्या जमावाला दूर हटवून अग्निशमन दलाच्या जवानांना वाट मोकळी करुन दिली.घटनेचा पंचनामा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.

प्रभावती रेवनसिद्ध लामतुरे यांचा बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांच्या वतीने सत्कार


 भूम( वसिम काजळेकर)  :- तालुक्यातील प्रति महाबळेश्वर वाटणाऱ्या हाडोंग्रीतील ध्यानकेंद्र येथे उद्यान पंडित पुरस्कार विजेत्या प्रभावती रेवनसिद्ध लामतुरे यांचा बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तालुक्यातील हाडोंग्री येथे रविवार दिनांक ८ रोजी  उस्मानाबाद जिल्हापरिषदचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांच्या उपस्थीतीत आदित्य बाळासाहेब पाटील व अनुष्का आदित्य पाटिल यांच्या हस्ते उद्यान पंडित पुरस्कार विजेत्या प्रभावती रेवनसिद्ध लामतुरे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय सुरवसे,फॉरेस्ट ऑफिसर सदानंदे,ए.वैद्यनाथ ( मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र उ.बाद ) प्रगतशील शेतकरी विक्रम गाढवे,प्रभावती विक्रम गाढवे,ऍड.रामहरी मोटे,लता रामहरी मोटे, यांच्या प्रमुख उपस्थिती होते. यावेळी मान्यवरांनी रासायनिक शेती कडून सेंद्रीय शेती कडे येण्याची का गरज आहे. या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर


अध्यक्षपदी लिंबराज डुकरे तर विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा होणार अहिल्या जन्मोत्सव 




उस्मानाबाद – पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती समिती उस्मानाबाद कडून दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम घेवून अहिल्यादेवी जयंती साजरी होत असते. याही वर्षी अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. काल जत्रा फंक्शन हाॅल मध्ये नुतन कार्यकारिणी निवड व जयंतीनिमित्त घ्यावयाचे विविध कार्यक्रम याबाबत नियोजन बैठक घेण्यात आली. यामध्ये नुतन कार्यकारिणीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. 
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती 2022 चे नुतन अध्यक्षपदी लिंबराज डुकरे, कार्याध्यक्षपदी सुरेश शिंदे, उपाध्यक्षपदी रवि देवकते, सचिवपदी प्रसाद तेरकर, कोषाध्यक्ष समाधान पडुळकर यांची निवड करण्यात आली. तसेच सहकार्याध्यक्ष सचिन चौरे, सहउपाध्यक्ष बाबासाहेब वाघुलकर, सहसचिव ओम एडके, सहकोषाध्यक्ष सागर कोळेकर, प्रसिध्दी प्रमुख सागर दाणे, सह प्रसिध्दी प्रमुख शिवम देवकते, विधी सल्लागार अॅड.किरण चादरे, प्रवक्ता निखील घोडके, सोशल मेडिया प्रमुख गोपाळ देवकते, संघटक आकाश कानडे, नितीन सातपुते, बाबासाहेब चादरे, दादा घोडके, समाधान काकडे, आकाश सलगर, शुभम शेंडगे, दशरथ चौरे, काका तिघाडे, आकाश हाराळे यांचीही निवड करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमात नुतन कार्यकारिणीस मा.नगराध्यक्ष दत्ता बंडगर, मा.जि.प.सदस्य भारत डोलारे, अॅड.खंडेराव चौरे, समितीचे मावळते अध्यक्ष डाॅ.संजय सोनटक्के, डाॅ.संतोष पाटील यांनी मार्गदर्शन केले आणि अहिल्या जन्मोत्सवाच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी सचिन शेंडगे, इंद्रजित देवकते, बालाजी शेंडगे, नरसिंग मेटकरी, राहुल काकडे, श्रीकांत तेरकर, गणेश एडके, अशोक गाडेकर, गणेश सोनटक्के, नवनाथ काकडे, नितिन डुकरे, संदीप वाघमोडे, देवा काकडे, नागेश वाघे, बालाजी वगरे, दत्ता दाणे, मारुती काकडे, नवनाथ गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मनोज डोलारे यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी समितीच्या मागील जयंतीनिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा आढावा उपस्थितांना सांगितला. यावर्षीही अहिल्यादेवी जयंतीनिमित्त समितीमार्फत मोफत सर्व रोगनिदान शिबीर, रक्तदान शिबीर, व्याख्यानमाला, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, कर्तृत्वसंपन्न महिलांचा सन्मान सोहळा , अहिल्यादेवी होळकर चौकाचे सुशोभीकरण, मोफत हाडांची ठिसुळता तपासणी शिबीर, गरजूंना महिलांना शिलाई मशीन/शेळी वाटप, भव्य पारंपरिक मिरवणूक असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचेही प्रा.डोलारे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सोमनाथ लांडगे यांनी केले. अहिल्यादेवींचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत नेण्यासाठी समितीच्या नुतन कार्यकारिणीस समांतर माजी सैनिक कमिटी, वैद्यकीय कमिटी, अभियांत्रिकी कमिटी, शिक्षक कमिटी, वकील कमिटी, वीज कर्मचारी कमिटी, विद्यार्थी युवक कमिटी, रिक्षाचालक कमिटी, व्यावसायिक व नोकरदार वर्ग कमिटी अशा अनेक कमिटी स्थापन करण्यात येणार आहेत.अशी माहिती समितीचे प्रा.लांडगे यांनी दिली.
कार्यक्रमाचे आभार प्रा.बालाजी काकडे यांनी मानले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चारित्र्याच्या संशयावरून पतीने काढला पत्नीचा काटा

 


 पारा( राहुल शेळके ): पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन नराधम पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून अंत्यत निर्दयी पद्धतीने खून केल्याची घटना शनिवारी  (दि.7मे ) रोजी वाशी तालुक्यातील पारा येथे उघडकीस आली आहे.

          याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सखुबाई सुब्राव शिंदे रा. पारा ता. वाशी यांची मुलगी लालुबाई (वय 28वर्ष )हिचा विवाह तेरा वर्षांपूर्वी बापू मच्छिन्द्र काळे रा. इटकूर ता. कळंब यांच्या सोबत झाला होता. लालूबाईला तीन मुले आहेत. लालुबाईचा नवरा बापू काळे हा लग्न झाल्यापासून लालूबाईला दारू पिऊन विनाकारण चारित्र्यावर संशय घेऊन सतत मारहाण करत होता. त्यामुळे गेली पंधरा दिवसापासून लालुबाई आपल्या आईकडे पारा येथे राहण्यास आली होती. नंतर जावई बापू काळे हे सुद्धा गेली आठ दिवसापासून पारा येथे राहण्यास आले होते. दि.6मे रोजी दुपारी बापू काळे याने पत्नीस शेतात जाऊ असे म्हणून गायरानात नेऊन तेथे दोघांची भांडण होऊन त्याने दुपारी तीन वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत पारा शिवारातील गायरान जमिनीत तिला दगडाने डोक्यात, कपाळावर,  चेहऱ्यावर गंभीर दुखापत करून तिला जिवानिशी ठार मारून नातू मयुर बापू काळे याला पळवून घेऊन गेला आहे. अशा आशयाची तक्रार मयताच्या आईने वाशी पोलीसात दिल्यामुळे संशयित आरोपी बापू मच्छिंद्र काळे रा.ईटकुर ता.कळंब याच्याविरोधात कलम 302 नुसार गुन्हा दाखल झाला असून घटनास्थळास उपविभागीय पोलिस अधिकारी डंबाळे, पोलीस निरीक्षक दळवे, स. पो.निरीक्षक कांबळे, पो उ नि काळे, पो. उ. नि. निंबाळकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळीफॉरेन्सिक लॅब पथक,आय बाईक पथक ,तसेच श्वान पथकासं पाचरण करण्यात आले होते.या प्रेताचे शवविछदन प्राथमिक आरोग्य केंद्र पारा येथे करण्यात आले. प्रेतावर अंत्यविधी इटकूर येथे करण्यात आले.या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दळवे  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर काळे करत आहेत.

                यावेळी मयताच्या नातेवाईकांनी आरोपीस लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली आहे.

अजित पुरोहित यांच्या ‘गड्या आपला गाव बरा’ या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

 


 कोकळे येथे होणार प्रकाशन सोहळा संपन्न होणार :-कला सेवा नाट्य मंडळाचे आयोजन ..



कवठेमहांकाळ,दि.07 प्रतिनिधी. कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे येथील जेष्ठ लेखक अजित पुरोहित यांच्या ‘गड्या आपला गाव बरा’ या पुस्तकाचे रविवार दि.8 मे सायंकाळी 5 वाजता कोकळे येथील हानुमान मंदिरा मध्ये आयोजित करण्यात आला असून लेखक व समीक्षक प्रा.डाॅ.आबासाहेब शिंदे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास. अध्यक्षा म्हणून कोकळे गावच्या विध्यामान सरपंच सौ.सुवर्णाताई भोसले आहे.या प्रकाशन समारंभास प्रमुख पाहूणे म्हणून जेष्ठ पत्रकार शिवराज काटकर,कवी किशोर दिपंकर,कवयित्री सौ.मनिषा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित प्रकाशन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती कोकळे येथील कलासेवा नाट्या मंडळाने दिली आहे.लेखक अजित पुरोहित यांची या पुर्वी “सरवा आणि इतर कथा’, ‘चौंडी’ हे दोन दर्जेदार कथा संग्रह प्रकाशित झाले असून ‘गड्या आपला गाव बरा’हे लेखक पुरोहित यांच्या कोकळे या गावाच्या ग्राम संस्कृतीवर आधारीत असल्याने या पुस्तकास अधिक महत्व प्राप्त होणार आहे.

लेखक पुरोहित यांनी लिहिलेल्या दोन कथा संग्रहामुळे मराठी साहित्यात उल्लेखनीय लेखन केल्याने साहित्य चळवळीत मोठी मौलिक भर पडल्याने ग्रामीण भागातील साहित्य चळवळीला नवे बळ आले आहे.श्री पुरोहित यांच्या ‘गड्या आपला गाव बरा’ ह्या पुस्तकात आपल्या कोकळे या जन्म भूमीतील ग्राम संस्कृतीची उल्लेखनीय माहिती असल्याने हे पुस्तक गावचा चिरकाल दस्तऐवज ठरणार असल्याचे या पुस्तकास अधिक महत्व प्राप्त होणार असून या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रविवारी सायंकळी प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे असून साहित्यिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कला सेवा नाट्य मंडळाने केले आहे.

या यशाचे श्रेय मला न देता माझ्या शेतकरी बांधवांना दया – आमदार चौगुले



आमदार चौगुलेंच्या पीकविमेच्या न्यायालयीन लढ्याला यश

सहा आठवडयाच्या आत ५१२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश

उमरगा : 

प्रलंबित पीक विम्याच्या न्यायालयीन लढ्याला यश आल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा ऐतिहासिक दिवस आहे. कारण याच दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. डी. धनुका, न्यायमूर्ती एस जि मेहरे यांच्या खंडपीठाने रखडलेला २०२०-२०२१ चा पिक विमा प्रश्न निकाली काढून सहा आठवड्याच्या आत जवळपास ५१२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश पीक विमा कंपनीला दिले असल्याची माहिती याचिकाकर्ते आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शनिवारी (ता.सात) रोजी शासकीय विश्रामगृह येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी युवानेते किरण गायकवाड, बाजार समितीचे सभापती एम. ए. सुलतान, शिवसेना तालुकाप्रमुख, बाबूराव शहापुरे, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार उपस्थित होते. 

पुढे बोलताना आमदार चौगुले म्हणाले की, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी केंद्र शासन व राज्य शासन यांनी मिळून त्यांच्या हिश्याची एकूण ६३९ कोटी रुपये रक्कम विमा कंपनीच्या खात्यावर जमा केली होती. अतिवृष्टी झाल्याने पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसे पंचनामेही कृषी व महसूल विभागाने केले होते. मात्र ७२ तासांमध्ये पूर्वसूचना दिली नाही. हा तांत्रिक कारण दाखवुन पिक विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा नाकारला होता. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा यासाठी मी पिक विमा कंपनीशी पत्रव्यवहार केला व विधानसभेत ही आवाज उठवला मात्र याचा काही एक उपयोग झाला नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हित नजरेसमोर ठेवून शेवटी मी स्वतःच्याच नावे औरंगाबाद खंडपीठात पिकविमा मिळावा यासाठी जनहित याचिका दाखल केली. विशेष म्हणजे ही याचिका मी स्वतःच्या नावे दाखल केली होती. इतर दाखल झालेल्या दोन याचिका या शेतकऱ्यांच्या नावे दाखल झाल्या होत्या. सुनावणी दरम्यान न्यायालयाने याचिकेचा हेतू प्रामाणिक आहे की नाही हे तपासण्यासाठी मला चार लाख रुपये कोर्टात जमा करण्याचे आदेश दिले होते. ही रक्कम तात्काळ शेतकऱ्यांचे हित नजरेसमोर ठेवून कोर्टात जमा केली. एक वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर व संघर्षानंतर शुक्रवारी माननीय उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत ४१ पानी दिलेल्या निकालपत्रात कंपनीला सहा आठवड्यात जवळपास ५१२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे असे आदेश दिले आहेत. हे पैसे कंपनीने सहा आठवड्यात जमा न केल्यास पुढील सहा आठवड्यात राज्य शासनाने पैसे अदा करावेत असा निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयात ॲड. श्रीकांत वीर यांनी काम पाहिले. तर त्यांना सर्व माहिती संकलित करून न्यायालयीन कामकाजात सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी मोलाचे सहकार्य केले. या कामी ज्या-ज्या शेतकरीबांधव, संघटना, लोकप्रतिनिधी यांनी याबाबत त्यांच्या त्यांच्या पद्धतीने पाठपुरावा केला त्यांचेही मी मनापासुनआभार मानतो. संदीप जगताप यांनी आभार मानले. या यशाबद्दल तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार चौगुले यांचा सत्कार केला.

——————-

न्यायालयीने लढयाचे सर्व श्रेय शेतकऱ्यांना

———————

शेतकऱ्यांच्या हितासाठी लढत राहणे ही माझी नैतीक जबाबदारी असुन पिकविमासंदर्भातील  विषय मी विधानसभेच्या सभागृहात मांडून शासनाच्या निदर्शनात आणुन दिले परंतु यश आले नाही. शेवटी शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी मी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात माझ्या नावे याचीका दाखल केली. न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजुने निकाल दिला. या यशाचे श्रेय माझे नसुन माझ्या शेतकऱ्यांचे असल्याचे सांगुन येणाऱ्या काळात वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्यास मी वरच्या कोर्टात दाद मागणार असल्याचे आमदार चौगुले यांनी सांगितले.

———————