श्री श्री रविशंकर विद्यालयाचे बांधकाम अनधिकृत असल्याची माजी नगरसेवकाची तक्रार
विद्यार्थ्यांच्या जिवितला धोका असल्याने केली चौकशीची मागणी
उस्मानाबाद – श्री श्री रविशंकर विद्यालयाचे बांधकाम अनधिकृत असल्याची तक्रार माजी नगरसेवक चंद्रकांत काकडे यांनी जिल्हाधिकऱ्यांकडे केली असून चौकशीची मागणी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, उस्मानाबाद नगर परिषद हद्दीतील सर्व्हे नंबर 679 मध्ये श्री श्री रविशंकर विद्यालयाची अंदाजे 25 खोल्याचे दोन मजली बांधकाम अनाधिकृत विनापरवाना करण्यात आलेले आहे. सदरील इमारतीचे ले आऊट, बांधकाम परवाना नगर परिषदेकडून घेण्यात आलेला नाही व कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना सदरील दोन मजली अनाधिकृत इमारत उस्मानाबाद शहरात बांधण्यात आलेली आहे. सदरील इमारतीमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असून अनाधिकृत इमारतीमुळे त्यांच्या जिवीतास धोका निर्माण झालेला आहे.
सदरील इमारत ही श्री. श्री. रविशंकर विद्यालय या संस्थेची असून संस्थेचे विश्वस्त हे श्री. नितीन भोसले आहेत. संस्थेचे विश्वस्त हे जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे कार्यकारी अभियंता (बा.) येथे कार्यरत असून सरकारी नौकरीत असताना सदरील संस्था चालवित आहेत. तथापी सदरील इमारत ही स्वतः सरकारी नौकरी असताना शासनाच्या नियमाप्रमाणे अधिकृतपणे बांधकाम करून उभारण्यात आलेली नाही, संस्थेचे विश्वस्त सरकारी अधिकारी असल्यामुळे संस्थेवर कोणीच आरोप करू शकत नाही असा आरोप देखील तक्रारीत करण्यात आला आहे.
याबाबत संस्थेचे विश्वस्त नितीन भोसले यांच्याशी भ्रमणध्वनिवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन न उचलल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही
महावितरणने मान्सूनपूर्व कामे न केल्यामुळे पाऱ्यात वीस तास लाईट बंद
उकाड्यामुळे लहान थोरांचे अतोनात हाल
पारा( राहुल शेळके ): दरवर्षी महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे करण्यात येतात. मान्सून पूर्वी विद्युत यंत्रणेची देखभाल व दुरुस्तीची कामे केली जातात. परंतु यावर्षी वाशी तालुक्यातील पारा येथील 33के व्ही सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील मान्सूनपूर्व कामे महावितरणने न केल्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात सर्व वीज ग्राहकांना वारंवार लाईट जाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार हे मात्र निश्चित.
मान्सूनपूर्व कामांमध्ये उंच वाढत असलेल्या झाडांच्या फांद्या विद्युत यंत्रणेला स्पर्श करीत असेल तर त्या फांद्या तोडणे, फुटलेले पिन आणि इंसुलेटर बदलणे, तपासणी व दुरुस्ती करणे, रोहित्रांचे ऑईल तपासणे, ऑईल गळती थांबवणे, वाहिनींचे खराब झालेले जम्पर बदलणे, जीर्ण झालेले वायर बदलणे, जळलेले तुटलेले वायर बदलणे, उपकेंद्रातील सर्व यांत्रिक बाबीची व यंत्रणेची तपासणी करणे व त्याची दुरुस्ती करणे, तसेच प्रत्यक्ष वेळेवर आढळणाऱ्या त्रुटी दूर करणे यासारखे कामे मान्सूनपूर्व कामांमध्ये येत असतात. मात्र ही कामे महावितरण यंत्रणेने न केल्यामुळे दि.20मे रोजी सायंकाळी सात वाजता गेलेली पारा येथील लाईट दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता आली.फक्त इंसुलेटर फुटल्यामुळे तब्बल 20 तास लाईट गेल्यामुळे सर्वांनाच अंधाराचा तसेच उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. महावितरणने लवकरात लवकर पारा 33केव्ही अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांतील झुकलेले पोल, लोम्बकळणाऱ्या तारा सह मान्सूनपूर्व कामे करावीत म्हणजे पावसाळ्यात येणाऱ्या वारंवार लाईट जाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
स्वाधार योजेनेची अट शिथिल करण्याची विद्यार्थी संघटनेची मागणी
उस्मानाबाद – स्वाधार योजेनेची अट शिथिल करा या मागणीचे निवेदन विद्यार्थी संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकार तर्फे राबवली जाणारी स्वाधार योजना ही फक्त शहरी भागातील महाविद्यालयास लागू करण्यात आली आहे. परंतु अशी अनेक महाविद्यालये आहेत जी शहराजवळ आहेत परंतु शहरी भागात मोडत नाहीत. वास्तविक तिथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची खर्च शहरी भागातील महाविद्यालयासारखाच होतो. या बाबींचा विचार करून सर्वांना लाभ मिळावा व गरजू विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी अट शिथिल करण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून जिल्हा परिषद घेणार प्रतिभावंत खेळाडूंचा शोध
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांचे आवाहन
उस्मानाबाद दि.१८ :
उस्मानाबाद जिल्ह्यास वेगवेगळ्या क्षेत्रातील क्रीडापटूंचा वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यातील विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंनी जिल्ह्याच्या नावलौकीकामध्ये भर घातलेली आहे. जिल्ह्यातील विविध क्रीडा प्रकारांमध्ये नैपुण्य प्राप्त किंवा पारंगत असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्यातील क्रीडा कौशल्य वृद्धिंगत करून जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रातील नावलौकिक वाढविण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धा शाळा स्तर, बीट स्तर,तालुका स्तर व अंतिमतः जिल्हा स्तरावर होणार आहेत. जिल्हा स्तरावरील यशस्वी विद्यार्थ्यांना बालेवाडी येथील क्रीडा संकुलात प्रशिक्षणासाठी पाठविण्याबाबत प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राहुल गुप्ता यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. या गुगल लिंक मध्ये माहिती भरण्यासाठी जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना कळविण्यात आलेले आहे. दिनांक १८/०५/२०२२ पर्यंत जवळपास एक हजार विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी शाळांनी केलेली आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व पालकांपर्यंत हा संदेश जाणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विविध खेळांमध्ये पारंगत असलेल्या मुलांना त्यांच्या पुढील प्रगतीस वाव मिळणे शक्य होईल. याकरिता उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने आवाहन करण्यात येते की आपल्या पाल्यातील क्रीडा कौशल्य विचारात घेऊन सध्या उन्हाळी सुट्टीचे दिवस आहेत त्यामुळे विद्यार्थी ज्या गावांमध्ये वास्तव्यास असेल त्या गावातील शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत शिक्षण विभागाकडून उपलब्ध करून दिलेल्या
https://forms.gle/or8pWAjrmCuxMqKV8
या गुगल लिंक वर माहिती भरण्यात यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.
नोकरी सोडून राजकारणात उतरलेल्या तरुण ग्रामपंचायत सदस्याने दिला राजीनामा
एकाच आठवड्यात देवळाली मध्ये दोन राजीनामे
उस्मानाबाद –
उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली येथील ग्रामपंचायत सदस्य उमाजी गायकवाड यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा गावाचे सरपंच नरसिंह खुणे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. ग्रामपंचायत सदस्यात्वाचा राजीनामा देण्याचे कारण की गावामध्ये अतिक्रमणाचा मुद्दा हा चांगलाच तापलेला आहे गावात अतिक्रमण रोखण्यास ग्रामपंचायतीने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत त्यामुळे नाराज झालेल्या उमाजी गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी गावातील होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न देखील केले होते त्या प्रयत्नाला यश न आल्याने अस्वस्थ होऊन त्यांनी ग्रामपंचायत सदस्यात्वाचा राजीनामा दिला. उमाजी गायकवाड पुणे जिल्ह्यात नोकरीला होते. गावात बदल करायचा या भूमिकेने ते राजकारणात आले होते. दरम्यान देवळाली गावच्या उपसरपंच शितल गायकवाड यांनी देखील अन्य कारणांसाठी आपल्या सदस्यात्वाचा राजीनामा गावाचे सरपंच नरसिंह खुने यांच्याकडे सुपूर्द केला आहे यामुळे गावात यामुळे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत





















































