Home Blog Page 137

शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामूहिकरित्या उपाययोजना कराव्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

                                           


 

उस्मानाबाद,दि.12(प्रतिनिधी) जिल्हयामध्ये सद्यपरिस्थितीत बऱ्याच ठिकाणी सोयाबीन,कापूस, भाजीपाला आणि विविध फळबागेमध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सोयाबीन,कापूस यासारख्या पिकांमध्ये रोप अवस्थेतच गोगलगायीचा प्रादुर्भाव होत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोगलगायींना वेळीच ओळखून खालील प्रमाणे उपाययोजना करणे गरजेचे आहे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी महेश तिर्थकर यांनी केले आहे.


काही शेतकरी विषारी औषध चोळलेले चुरमुरे शेतात टाकून त्याव्दारे गोगलगाय नियंत्रणाचा प्रयत्न करीत आहेत. मात्र असे विषारी चुरमुरे खाऊन पशुपक्षी मरण्याचा धोका संभवतो. त्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा  कृषी विद्यापीठाने केलेल्या पुढील शिफारशीप्रमाणे कार्यवाही करुन गोगलगाय नियंत्रण करावे.असेही आवाहन श्री. तिर्थकर यांनी केले आहे.


v एकात्मिक व्यवस्थापन


शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत, त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा राहणार नाही.सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा शेतातून मोठ्या शंखी गोगलगायी जमा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून त्या पोत्याचे तोंड उघडे न ठेवता घट्ट बंद करावे, जेणेकरून त्यामधील गोगलगायी पोत्यातून बाहेर न जाता मिठाच्या किंवा चुन्याच्या संपर्कात येऊन आत मध्येच मरून जातील.


शेतामध्ये किंवा बागेमध्ये सात ते आठ मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकांच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिक ठिकाणी ठेवावेत. गोगलगायी त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्योदयानंतर त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी आणि  त्यांची अंडी गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट करावी.लहान शंखीसाठी मिठाची फवारणी किंवा कॅल्शीयम क्लोराईडचासुद्धा नियंत्रणासाठी ब-याच ठिकाणी वापर केला जातो.   


शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आत तंबाखू भुकटीचा अथवा चुन्याचा ५ सें.मी. रुंदीचा पट्टा गोगलगायींना शेतात जाण्यास प्रतिबंध म्हणून व नियंत्रणासाठी टाकावा.फळबागेमध्ये झाडाच्या खोडास दहा टक्के बोर्डोंपेस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाही.गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड(स्नेलकिल) दाणेदार या गोगलगाय नाशकाचा वापर करावा.


 सोयाबीन व कापूस यासारख्या पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड (स्नेलकिल) दोन किलो प्रती एकरी या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. तर फळबागेमध्ये झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड (स्नेलकिल)प्रती झाड 100 ग्रॅम पसरून टाकावे.शंखी गोगलगाय प्रामुख्याने पपईची रोपे आणि झेंडूच्या रोपांकडे आकर्षित होतात. म्हणून मेटाल्डिहाईडच्या(स्नेलकिल) गोळ्या पपईच्या पिवळ्या पानांजवळ ठेवतात. त्यामुळे त्या लवकर आकर्षित होऊन मोठ्या प्रमाणात मरतात.जर हे आमिष उपलब्ध न झाल्यास दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गूळ अधिक 25 ग्रॅम यीस्ट यांचे द्रावण तयार करावे. हे द्रावण 50 किलो गव्हाच्या अथवा भाताच्या कोंड्यात टाकून चांगले मिसळावे. 10 ते 12 तास हे मिश्रण आंबवण्यासाठी ठेवावे. त्यानंतर त्यामध्ये थायामिथोक्‍झाम 50 ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळावे. हे आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरुपात टाकावे.सदरील आमिषा पासून पाळीव प्राणी, लहान मुलांना दूर ठेवावे.या गोगलगायनाशक अथवा अमिषाचा वापर प्लॅस्टिक हातमोजे घालूनच काळजीपूर्वक करावा.


सोयाबीन पिकावरील आकस्मिक किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागामार्फत 750 रुपये प्रती हेक्टर अथवा 50 टक्के याप्रमाणे ( कमाल 1 हेक्टर क्षेत्रासाठी ) जे कमी असेल त्या रक्कमेपर्यंत शेतकऱ्यांना अनुदान देय राहील. त्यासाठी  आपल्या कृषी सहाय्यक,कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी,तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावा.अशाप्रकारे शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव ज्या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल त्या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या याप्रमाणे उपाय योजना केल्यास गोगलगायीचे नियंत्रण लवकरात लवकर आणि अधिक प्रभावीपणे होते. अधिक माहितीसाठी  कृषी विभागाशी  संपर्क करावा.असे आवाहनही श्री.तिर्थकर यांनी केले आहे.

मांजरा, तेरणा व तावरजा नदीकाठच्या गावांना अति दक्षतेचा इशारा

 

उस्मानाबाद,दि.12(प्रतिनिधी) मांजरा, तेरणा व तावरजा नदीवरील बराज, को. प. बंधारेच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा सुरु आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अतिवृष्टीची शक्यता असल्याने प्रकल्पात येणा-या पाण्याचे प्रमाण अधिक असू शकते त्यामुळे हे प्रकल्प केंव्हाही निर्धारित पातळीस भरण्याची शक्यता आहे.हे पाणी मांजरा, तेरणा व तावरजा नदीमार्गे सोडावे लागणार आहे. तेंव्हा या नदी काठाच्या ग्रामस्थ आणि शेतक-यांनी दक्षता घ्यावी, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. 

मांजरा, तेरणा व तावरजा नदीकाठावरील शेतकरी किंवा नदीकाठी वस्ती करुन राहीलेल्या ग्रामस्थ व शेतक-यांना हा सावधानतेचा इशारा लातूर पाटबंधारे विभाग क्र. 1 लातूरचे कार्यकारी अभियंता रो.सु. जगताप यांनी दिल आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्याकरिता दिनांक १३ ते १७ जुलै साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका

उस्मानाबाद – प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मूळ शिवसेना कोणाची? शिंदे गटातील आमदाराच्या या कृतीमुळे कळेल

महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून त्यातील वातावरण अजूनही पूर्णपणे शांत झालेले नाही. शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी केली त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शिंदे गटातील आमदार त्यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत असल्याचे सांगत ते मूळ शिवसेना आम्हीच आहोत असे सांगत आहेत. त्यामुळे नेमकी शिवसेना कोणाची? प्रश्न चर्चिला जात आहे. मात्र शिंदे गटातील आमदाराच्या एका कृतीमुळे शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच असल्याचे स्पष्ट होते. आ. सदा सरवणकर यांनी आपल्या विभागप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत इतरांनी देखील आपापल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र तो देताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. शिंदे गट आपणच मूळ शिवसेना असल्याचे सांगत असेल तर तो राजीनामा त्यांनी त्या गटाकडे द्यायला हवा होता मात्र तसे घडताना दिसत नाही. कायदेशीररीत्या आणखी शिंदे गटाने शिवसेना पक्षावर दावा केलेला नाही. त्यामुळे शिवसेना कोणाची हे यावरून स्पष्ट होते.


मनसेचा उद्या होणारा मेळावा पुढे ढकलला

 

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या होणारा मेळावा तूर्तास स्थगित केला असून तो पुढे ढकलत असल्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पत्र काढून कळवले आहे. सध्याची राजकीय परिस्थिती येणाऱ्या महापालिका निवडणुका याबाबत राज ठाकरे काय बोलणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती. मात्र हा मेळावा पुढे ढकलला असल्याने त्याची आता वाट पाहावी लागणार आहे.


पत्रातील मजकूर

सस्नेह जय महाराष्ट्र !


तुम्हाला जरा थोड्या तातडीनं कळवतो आहे.


आपण वास्तविक उद्या एक मेळावा आयोजित केला होता. ज्यात मला तुमच्याशी बोलायचं होतं आणि कामासंबंधी काही सूचना करायच्या होत्या. परंतु कालपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसानं थैमान घातलेलं दिसत आहे. जनजीवन तर विस्कळीत आहेच, परंतु अशा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हा सर्वांना सांगणार होतो तो सांगितला तरी तो प्रत्यक्षात आणता येणं फार अवघड आहे.

अशा परिस्थितीत आपण उद्याचा मेळावा पुढे ढकलत आहोत. पुढची तारीख आणि वेळ लवकरच, थोडा पावसाचा अंदाज घेऊन, तुम्हा सर्वांना कळवली जाईलच.

दरम्यान, तुम्ही स्वतःची तर काळजी घ्याच परंतु अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतो आहे तिथेही तुम्ही लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. मुख्यतः नदीकाठाला जिथे लोक रहात आहेत तिथल्या घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. सांगली कोल्हापूरकडचा आत्ता-आत्ताचा पूर तुम्हाला आठवतोय ना? काही लोकांना तात्पुरत्या निवासात हलवायला लागू शकतं. तिथे अन्नधान्य, पिण्याचं शुध्द पाणी, अंथरूण-पांघरूण (सर्वत्र ओल असते) पुरवावं लागेल. मुख्यतः वृध्द, गरोदर महिला, अपंग आणि लहान मुलं ह्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. झाडं उन्मळून पडतात, ती नंतर पुन्हा लावावी लागतील. अशा खूप गोष्टी आहेत.

एक लक्षात घ्या की अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येईल असं काहीही करू नका.

अर्थात, असं काही होऊ नये, कुठलंही नैसर्गिक संकट येऊ नये, हीच आपली इच्छा आहे, फक्त सतर्कतेसाठी सांगितलं.

लवकरच भेटू

राज ठाकरे

मोटारसायकल चोरी तसेच ट्रॅव्हल्सवरील बॅग चोरणारे दोघे अटकेत

येरमाळा(प्रतिनिधी) मोटारसायकल चोरी तसेच ट्रॅव्हल्सवरील बॅग चोरणाऱ्या दोघांना येरमाळा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, बेंगलोर येथील प्रविणकुमार तुळशीराम जबडे यांनी दि. 13 जून रोजी 03.45 वा. सु. येरमाळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरील भारत पेट्रोलियम किरकोळ विक्री केंद्राजवळ आपला टेम्पो ट्रॅव्हल्स थांबवलेला होता. दरम्यान एका मोटारसायकलवर आलेल्या तीन अनोळखी पुरुषांनी त्या ट्रॅव्हल्सवरील 2,16,000 ₹ किंमतीचे सुवर्ण दागिने असलेल्या तीन पिशव्या चोरुन नेल्या होत्या. यावर जबडे यांनी येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा क्र. 139/2022 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत दि. 16 जून रोजी नोंदवला आहे.

            तपासादरम्यान येरमाळा पो.ठा. च्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दतीचा अभ्यास व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा, ता. वाशी येथील 1) प्रशांत बापु पवार उर्फ सचिन 2) दत्ता दादा काळे या दोघांना आज दि. 11 जुलै रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुशंगाने कसुन व कौशल्यपुर्ण चौकशी केली असता त्यांनी चोरीनंतर त्या बॅग व कपडे जाळल्याचे सांगीतले. तसेच हा गुन्हा करताना वापरलेल्या मोटारसायकलसह अन्य एक पल्सर मोटारसायकल पोलीसांनी त्यांच्याकडून जप्त केली. त्या पल्सर मोटारसायकलच्या सांगाडा- इंजीन क्रमांका आधारे माहिती घेतली असता ती चोरीस गेल्याने येरमाळा पो.ठा. येथे 153/2021 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत नोंदल्याचे समजले. अशा प्रकारे एका गुन्ह्यासह दुसरा गुन्हा सुध्दा उघडकीस आणण्यात आला असुन गुन्ह्यातील तीसऱ्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

            सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक- एम. रमेश यांच्या सुचनांप्रमाणे येरमाळा पो.ठा. चे सपोनि-  दिनकर गोरे, पोउपनि-  नितीन पाटील, पोहेकॉ- प्रशांत जवळगावकर, पोना- किरण शिंदे, संतोष तिघाडे, पोकॉ- गणेश गुळमे यांच्या पथकाने केली आहे.

प्राण्यांची क्रूरतेने वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

नळदुर्ग (प्रतिनिधी) : नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या पथकास दि. 10 जुलै रोजी सकाळी गोपनीय माहिती मिळाली की, नळदुर्ग येथील गफुर कुरेशी व मर्सोद्दीन कुरेशी हे दोघे गफुर यांच्या येडोळा शिवारातील शेतातून गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी पाळून आहे. यावर पथकाने 11.15 वा. सु. गफुर कुरेशी यांच्या शेताता छापा टाकला असता ॲपे मॅझीक वाहन क्र. एम.एच. 11 बीएल 1141 मध्ये 5 लहान- मोठ्या गायी दाटीवाटीने भरुन त्यांच्या चारा- पाण्याची व्यवस्था न करता त्यांची कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने वाहतूक करत असताना आढळले. तसेच त्यांनी शेतातील दावणीला अन्य 10 गायी कत्तल करण्याच्याच उद्देशाने बांधून ठेवल्या असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. यावर नळदुर्ग पो.ठा. चे पोलीस अंमलदार- अमाकांत माळाळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम- 11 (1) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम- 5 व मो.वा.का. कलम- 83/177 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यंदाच्या वर्षी प्रवेश प्रक्रिया होण्यासाठी प्रलंबित विषय मार्गी लावा

 


आमदार कैलास घाडगे पाटील यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याकडे मागणी  

उस्मानाबाद (प्रतिनिधी )- येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात प्रथम वर्षाचे प्रवेश यंदाच्या वर्षी होण्यासाठी तत्काळ कार्यवाही करणे गरजेचे असुन याबाबत जे विषय प्रलंबित आहेत ते मार्गी लावावे अशी मागणी आमदार कैलास घाडगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व्हावे ही कित्येक दशकापासुनची मागणी होती. उध्दव  ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने १३ जानेवारी २०२१ रोजी मंत्रीमंडळ निर्णयाव्दारे शंभर प्रवेश क्षमतेचे व ४३० खाटाचे रुग्णालयाच्या निर्मीतीला मंजुरी दिली.२७ जानेवारी २०२१ रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचा शासन निर्णय देखील झाला.२७ मे २०२१ च्या शासन निर्णयाव्दारे आवश्यक पदनिर्मीतीला मंजुरी देऊन जिल्हा सामान्य रुग्णालय इमारत जमीनीसह शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाला सामंजस्य कराराव्दारे हस्तांतरीत करण्यात आली आहे.एक लाख चौरस फुट बांधकाम असलेली नवीन इमारत उपलब्ध असुन शासकीय वैद्यकिय महाविद्यालयासाठी गट नंबर ९ व १० मधील १६ एकर व गट नंबर ४२६ मधील २० एकर अशी ३६ एकर जमीन वैद्यकिय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या नावावर झालेली आहे.सामंजस्य करारानुसार सार्वजनीक आरोग्य विभागाची १२ एकर जमीन परिक्षणासाठी उपलब्ध आहे.  

20२२ च्या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया होण्यासाठी राष्ट्रीय आर्युविज्ञान आयोगाच्या (एनएमसी)प्रशिक्षणासाठी काही बाबीची पुर्तता होणे आवश्यक आहे.विभागीय निवड मंडळाने आठ सहाय्यक प्राध्यापक,१४ वरिष्ठ निवासी आणि १४ टयुटर या पदासाठी मुलाखती घेऊन संचालक वैद्यकिय शिक्षण यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवले आहे.त्याला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही.प्रथम वर्षासाठी लागणाऱ्या प्रयोग शाळेसाठी साहित्य खरेदीची प्रशासकीय मान्यता  देण्यात आली नाही त्याला तात्काळ मान्यता द्यावी.वरील प्राध्यापक श्रेणी मधील प्रथम वर्षासाठी आवश्यक प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक,सहाय्यक प्राध्यापक यांची ३१ पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाची मान्यता प्रलंबित आहे.या सर्व बाबीची तात्काळ पुर्तता राष्ट्रीय आर्युविज्ञान आयोगाच्या परिक्षणासाठी अत्यावश्यक असुन त्यानंतरच चालु शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया होऊन शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सुरु होऊ शकते.त्यामुळे हे सर्व प्रलंबित विषय तात्काळ मार्गी लावण्यासाठी सबंधिताना आदेश दयावेत अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.