Home Blog Page 136

दैनिक जनमत १७ जुलै २०२२ E paper

दैनिक जनमत १६ जुलै २०२२ E paper

सलगरा परिसरात सोयाबीन पिकावर गोगलगायींचा प्रादुर्भाव ; शेतकरी संकटात

 

सलगरा, दि.१५ – (प्रतिक भोसले)

तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) सह परिसरात सलग गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उगवण झालेल्या सोयाबीन पिकात पाण्याचे डोह साचले आहेत. तर काही ठिकाणी सोयाबीन पिवळे पडत असल्याचे दिसत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सूर्यदर्शनही झाले नव्हते त्याचबरोबर शेतशिवारात पाण्याचे डोह निर्माण झाल्याने नुकतेच आलेले सोयाबीन पाण्याखाली गेल्याने ते पिवळे पडत आहे, तर काही ठिकाणी पेरणी खोळंबली असतानाच दुसरीकडे पेरणी झालेल्या बियाण्याची उगवणही झाली नाही. त्या मुळे हे बियाणे सडते की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. त्या मुळे पेरणीवर झालेला खर्च वाया जातो की काय याची शेतकऱ्यांना चिंता लागली आहे. 

संपूर्ण जुन महिना सरल्यानंतरही दमदार पाऊस झाला नव्हता त्या मुळे अनेकांनी अत्यल्प पावसावर पेरणी उरकली होती. चांगली उगवणही झाली नंतर काही शेतकरी चांगल्या दमदार पावसासाठी आभाळाकडे डोळे लावून बसले होते. मात्र पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने जमिनीत आवश्यक इतका ओलावा न झाल्याने परिणामी उर्वरित शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. ज्या शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच पेरणी केली आहे त्यांच्यावर उन्हाळ्यात सुप्तवस्थेत गेलेल्या गोगलगायी पावसामुळे पोषक वातावरण निर्माण झाल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्या मुळे पेरणी होऊन सोयाबीन वाढीच्या अवस्थेत असलेल्या सलगरा, गंधोरा, किलज, वाणेगाव, वडगाव, शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या फडात शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव वाढला आहे. या गोगलगायी सुर्यप्रकाश नसताना रोपावर हल्ला करून चांगलाच ताव मारत आहेत. पिके रोप अवस्थेत असताना या कोवळ्या पिकांना अर्ध्यातून कुरतडून गोगलगाय पिकांचे नुकसान करीत आहे. बहुतांश भागावरील पीक गोगलगायीनी फस्त केले आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून दुबार पेरणीच्या शक्यतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे उगवताच पिके नष्ट होत असून याचा बंदोबस्त तरी करावा कसा असा प्रश्न आहे. गोगलगायींच्या प्रादुर्भावाने उगवलेली सोयाबीन पिके नष्ट होत आहेत. त्यामुळे वाढ आणि उत्पादन ह्या गोष्टी तर दूरच राहत असून उगवलेले जोपासावे कसे हाच मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात सापडलाय उगवलेल्या कोवळ्या रोपांचा गोगलगायी फडशा पाडत आहेत. गोगलगायींचे नियंत्रण कसे करावे, यासाठी कृषी विभागाने शास्त्रशुद्ध माहिती द्यावी, तसेच या संकटाला तोंड देण्यासाठी आणि परिस्थिती बघून दुबार पेरणीसाठी शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 


शेतकरी – बळवंत सुधाकर गरड

एकात्मिक व्यवस्थापन – 

शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत, त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा राहणार नाही. सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा शेतातून मोठ्या शंखी गोगलगायी जमा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून त्या पोत्याचे तोंड उघडे न ठेवता घट्ट बंद करावे, जेणेकरून त्यामधील गोगलगायी पोत्यातून बाहेर न जाता मिठाच्या किंवा चुन्याच्या संपर्कात येऊन आत मध्येच मरून जातील.

शेतामध्ये किंवा बागेमध्ये सात ते आठ मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकांच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिक ठिकाणी ठेवावेत. गोगलगायी त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्योदयानंतर त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी आणि त्यांची अंडी गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट करावी.लहान शंखीसाठी मिठाची फवारणी किंवा कॅल्शीयम क्लोराईडचासुद्धा नियंत्रणासाठी ब-याच ठिकाणी वापर केला जातो.   

शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आत तंबाखू भुकटीचा अथवा चुन्याचा ५ सें.मी. रुंदीचा पट्टा गोगलगायींना शेतात जाण्यास प्रतिबंध म्हणून व नियंत्रणासाठी टाकावा. फळबागेमध्ये झाडाच्या खोडास दहा टक्के बोर्डोंपेस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाही. गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड(स्नेलकिल) दाणेदार या गोगलगाय नाशकाचा वापर करावा.

कृषी सहायक – संतोष रंदवे




चोरीचा कांगावा, प्रथम खबरीच निघाली आरोपी!

 घरफोडीतील माल मुळ मालकास परत

मुरुम – ज्या व्यक्तीने चोरीची प्रथम खबर दिली त्याच व्यक्तीने चोरीचा बनाव केल्याचा प्रकार येणेगुर येथे घडला असून याबाबत माहिती अशी की येणेगुर, ता. उमरगा ग्रामस्थ- मनिषा अजय माळी, वय 25 वर्षे या कुटूंबीयांसह दि. 17.04.2022 रोजी 01.00 वा. सु. आपल्या घरात झोपलेल्या होत्या. दरम्यान अंगात काळे कपडे व तोंडावर मास्क घातलेल्या तीन अनोळखी परुषांनी माळी यांच्या घराचा मागील दरवाजा उचकटुन आत प्रवेश केला. या आवाजाने मनीषा माळी जागी झाल्या असता त्या तीघांनी मनीषा यांना चाकुचा धाक दाखवून कपाटातील सुवर्ण व चांदीचे दागिने व 9,500 ₹ रोख रक्कम असा एकुण 3,16,035 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला होता. यावरुन मनिषा माळी यांनी मुरुम पो.ठा. येथे गु.र.क्र. 142 / 2022 हा भा.दं.सं. कलम- 392, 457 अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला होता.

            गुन्हा तपासादरम्यान पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी व  अपर पोलीस अधीक्षक  नवनित काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुम पोलीसांनी गतीमान तपास करुन गुन्ह्याच्या कार्यपध्दतीचा व कौशल्यपुर्ण तपास केला असता प्रत्यक्षात चोरी झालेली नसून प्रथम खबरी- मनिषा माळी यांनीच नमूद ऐवज  लपवून चोरीचा कांगावा केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करुन चोरीचे दागिने जप्त केले होते. ते जप्त दागिने मा. न्यायालयाच्या आदेशाने काल दि. 13.07.2022 रोजी मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सुचनेप्रमाणे मुरुम पो.ठा. चे सपोनि- श्री. आर.एम. जगताप यांनी मनिषा यांचे सासु- सासरे- जगदेवी माळी व अरविंद माळी यांना परत केले असुन दागिने परत मिळाल्याने त्या दोघांनी पोलीसांचे आभार व्यक्त केले.

शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली; ३१ जुलै नवी तारीख

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.त्याच कारणाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती ( इ ५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ ८ वी ) दिनांक २० जुलै रोजी होणार होती मात्र अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलनामुळे विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी व विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता ही परीक्षा ३१ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी पूर्वी निर्गमित केलेले प्रवेशपत्र ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने कळवण्यात आले आहे.


आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

 

मुंबई – आज घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक घेतली.

▪ पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय 

▪  राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार. 

▪ केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.०  (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार

▪ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार

▪ राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा. 

▪ अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा. 

▪ बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा. 

▪ आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याची (दिनांक ३१ जुलै, २०२० रोजी बंद करण्यात आलेली ) योजना पुन्हा सुरु करणार