सलगरा येथील शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करत आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे मानले आभार
सलगरा,दि.५ (प्रतिक भोसले)
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खरीप पिकाचे २०२० साली अतिवृष्टीने जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. आता भरपाई मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या मुळे जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार २८७ शेतकऱ्यांना ५१० कोटी रुपयाचा विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी येथे शेतकऱ्यांनी फटाके फोडून घोषणा देत आनंद व्यक्त केला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकविमा तीन आठवड्यात देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. असे असून पण विमा कंपनीने आणि सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नव्हती, त्यानंतर शासनामार्फत व संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामे झाले होते त्यामध्ये ८०% च्या जवळपास शेतीपिकाचे नुकसान झाल्याचे शासनाच्या पंचनाम्यामध्ये नमूद करण्यात येऊन देखील कंपनीने केंद्र सरकारच्या धोरणाचा व शासनाशी झालेल्या करारातील तांत्रिक बाबींचा आधार घेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा देण्याबाबत वारंवार टाळाटाळ केली. त्या नंतर आ. पाटील यांच्या पुढाकारातून काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. खंडपीडाने शेतकऱ्यांच्या बाजुने निकाल देत शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची भरपाई देणेबाबत संबंधित कंपनीला आदेशित केले होते. मात्र कंपनीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने औरंगाबाद खंडपीठाचा निकाल कायम ठेवत तीन आठवड्यात शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देण्याचा आदेश विमा कंपनीला दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता न मिळण्यासाठी कोणत्या त्रुटी कारणीभूत? जिल्हावासियांना बोध होईना
उस्मानाबाद – जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा तितकाच गंभीर विषय असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मान्यता नाकारल्याने हे महाविद्यालय केव्हा सुरू होईल असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. मात्र त्यापूर्वी आणखी एक बाब उजेडात आल्याने यात काही राजकारण आहे का अशी शंका उपस्थित केली जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोन समित्यांनी पाहणी केली. त्यात राज्याच्या एका समितीचा समावेश होता तर दुसरी समिती राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची होती. राज्याच्या समितीने सकारात्मकता दर्शवली तर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग समितीने मान्यता नाकारली. मात्र त्यात कोणत्या त्रुटी होत्या त्या समोर आल्या नाहीत. त्या समोर याव्यात अशी सामान्यांची इच्छा आहे. कोणाच्या दिरंगाई मुळे हा प्रश्न मार्गी निघण्यास अडचण झाली याची उकल करायची असेल तर त्रुटी आणि अहवाल समोर येणे महत्वाचे आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत वैद्यकीय महाविद्यालयाबाबत बोलताना राज्याच्या समितीने सकारात्मकता दर्शवल्याचे सांगितले मात्र राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मान्यता नाकारण्यासाठी ज्या गंभीर त्रुटी आहेत त्या मात्र सांगितल्या नाहीत. सरकार त्रुटींची पूर्तता करण्यासाठी पाठपुरावा करत आहे. वैद्यकीय महाविद्यालय लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी एन एम सी कडे फेर तपासणी करण्याचा आग्रह देखील केला जाणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेतील इतर महत्वाचे मुद्दे पाहण्यासाठी व्हिडिओ पहा….
रा.गे शिंदे महाविद्यालयात पदव्युत्तर विभागात रसायनशास्त्र,प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि एम कॉम अभ्यासक्रमास शासनाची मान्यता
परांडा (दि. ३ प्रतिनिधी) परंडा येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे शिंदे महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर विभागांमध्ये रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र,प्राणीशास्त्र आणि एम कॉम या अभ्यासक्रमा साठी शासनाने मान्यता दिली आहे. तेव्हा परंडा तालुक्यातील पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर विभागात या विषयासाठी प्रवेश घेण्याचा मार्ग सुखकर झाला आहे.
परंडा तालुक्यात उच्च शिक्षणाचा अभाव ओळखून व विद्यार्थ्यांची सोय व्हावी या अनुषंगाने श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठीची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली आहे.तेव्हा आपल्या इच्छेनुसार विद्यार्थ्यांनी वरील चार विषयांमध्ये प्रवेश घेऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करावे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांनी दिली आहे.माहितीसाठी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश सरवदे,डॉ सचिन चव्हाण, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अतुल हुंबे,डॉ.शहाजी चंदनशिवे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अक्षय घुमरे,प्रा.जगन्नाथ माळी,प्रा. अमर गोरे पाटील आणि वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ संभाजी गाते,प्रा.संतोष काळे व प्रा. सचिन साबळे यांच्याशी संपर्क करावा असे त्यांनी कळविले आहे.
रा.गे शिंदे गुरुजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त महाविद्यालयामध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन
परांडा (भजनदास गुडे) परंडा येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे शिंदे महाविद्यालय परंडा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रा गे शिंदे गुरुजी यांच्या ९९ व्या जन्मोत्सवानिमित्त महाविद्यालयामध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दि१सप्टेंबर ते ७सप्टेंबर दरम्यान जयंती सोहळा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांनी दिली आहे.
जयंती उत्सवानिमित्त श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे अध्यक्ष सुनील नाना शिंदे,सचिव संजय बाप्पा निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
महाविद्यालयामध्ये दि. १ ते ७ सप्टेंबर दरम्यान प्रबोधनाचा कार्यक्रम प्रसिद्ध प्रबोधनकार देवा चव्हाण, रांगोळी स्पर्धा,विज्ञान प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन,रक्तदान शिबिर आणि व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.त्यांच्या नेतृत्वाखाली सदर कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने रांगोळी स्पर्धा मध्ये प्रथम पारितोषिक १५०१ रुपये रोख रक्कम,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र. द्वितीय पारितोषिक १००१ रुपये रोख रक्कम,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र तर तृतीय पारितोषिक ७०१ रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच विज्ञान प्रदर्शन स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक वरील प्रमाणे असेल आणि पोस्टर प्रदर्शन मध्ये प्रथम पारितोषिक १००१ रुपये रोख व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक ७०१ रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र आणि तृतीय पारितोषिक ५०१रुपये रोख व प्रमाणपत्र अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
जयंती उत्सवामध्ये महाविद्यालयातील प्रा.डॉ हरिश्चंद्र गायकवाड, देवा चव्हाण बार्शी, प्रा दत्तात्रेय मुळीक,प्रा एस के गायकवाड, प्रा डॉ.शहाजी चंदनशिवे यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत जयंती उत्सवानिमित्त महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले आहे. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी केले आहे.































































