बांधकाम कामगारांसाठी मोठा दिलासा; नोंदणी व नुतनीकरण शुल्क पूर्णतः निःशुल्क

0
272

मुंबई, दि. १३ ऑगस्ट :
राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या हजारो कामगारांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी किंवा नुतनीकरण करताना आकारले जाणारे शुल्क आता पूर्णपणे निःशुल्क करण्यात आले आहे.

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने आज (१३ ऑगस्ट २०२५) जारी केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे की, यापूर्वी बांधकाम कामगारांकडून नोंदणी व नुतनीकरणासाठी रु. २५ शुल्क आकारले जात होते. शासनाच्या २०२२ मधील आदेशानुसार ते कमी करून रु. १ करण्यात आले होते. मात्र, बांधकाम कामगारांच्या मागण्या आणि मंडळाच्या शिफारसी लक्षात घेऊन आता हे शुल्कही रद्द करून नोंदणी व नुतनीकरण प्रक्रिया पूर्णपणे शुल्कमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंडळाच्या कल्याणकारी योजना

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ अंतर्गत करण्यात आली आहे. राज्यातील नोंदणीकृत व सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांसाठी मंडळामार्फत २९ विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. यामध्ये शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्य विषयक योजना, आर्थिक सहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा योजना आणि इतर योजनांचा समावेश आहे.

प्रक्रिया अधिक सुलभ

सन २०२० पासून बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण आणि लाभवाटप प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू करण्यात आली आहे. शुल्क रद्द झाल्याने नोंदणीसाठी कोणताही आर्थिक अडथळा राहणार नाही, तसेच नवीन कामगारांना मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सुलभता मिळेल.

थेट फायदा हजारो कामगारांना

हा निर्णय लागू झाल्याने राज्यभरातील हजारो बांधकाम कामगारांना थेट आर्थिक दिलासा मिळेल. कमी उत्पन्न असलेल्या कामगारांना नोंदणीसाठी पैसे खर्च करण्याची गरज राहणार नाही, तसेच मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग अधिक खुला होईल.

कामगार संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करत शासनाचे आभार मानले असून, हा उपक्रम कामगारांच्या सामाजिक सुरक्षेला आणि कल्याणाला चालना देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here