ईटकुर (बालाजी देसाई) : कळंब तालुक्यातील ईटकूर परिसरात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वाशीरा नदीला महापूर आल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच वाशिरा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेकडो हेक्टर शेतीवरील ऊस व सोयाबीन पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
ईटकूरसह गंभीरवाडी, बोरगाव धनेश्वरी गावात गुरुवारी मध्यरात्री संततधार पाऊस झाला. या पावसामध्ये ईटकुर- पारा रोडवरील तसेच ईटकूर- भोगजी रस्त्यावरील वाशीरा नदीला महापुर आल्याने पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतुक सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती .रस्त्यावर सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत पाणीच पाणी साचल्याने अनेक गावांशी संपर्क तुटला होता. शुक्रवारी दुपारनंतर पाणी कमी झाल्याने वाहतूक सेवा सुरळीत सुरू झाली.
वाशिरा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने नदीचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात घुसले. यामुळे सोयाबीन तसेच ऊस पिके पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. तसेच या पुर परिस्थितीमुळे वाशीरा नदी काठच्या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्यात पाणी शिरल्याने मुक्या जनावरांना चांगलीच तारांबळ उडाली परंतू प्रसंगावधान ओळखून मुक्या जनावरांना पाण्यातून बाहेर काढल्याने कुठल्या ही प्रकारची जीवीत हानी झाली नाही.
या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
- घरांच्या पडझडीचे तलाठ्यांकडून पंचनामा
गुरुवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गंभीर वाडी येथील शिवाजी तानाजी दनाणे यांच्या मातीच्या घराची पडझड झाली होती. या पडझडीची माहिती मिळताच गंभीरवाडी सज्जाचे तलाठी आकाश हजारे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला आहे.