धाराशिव ( आकाश महादेव नरोटे)- राज्यात महायुतीचे सरकार आहे एकीकडे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र तर येतातच कधी कधी तर एकाच गाडीतून प्रवास देखील करतात. धाराशिव जिल्ह्यात मात्र चित्र थोडे उलटे आहे. राज्याचे मंत्री जिल्ह्यात येतात मात्र ज्या पक्षाचे मंत्री आहेत त्याच पक्षाचे नेते त्यांच्या दौऱ्यात असतात. काल राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात आलेले असताना त्यांच्या दौऱ्यात काही अपवाद वगळता जिल्ह्यातील मोठे नेते नव्हतेच. जिल्ह्यात अतोनात नुकसान झालेले असताना शेतकऱ्यांच्या व्यथा बांधावर जाऊन ऐकण्यासाठी पाहण्यासाठी कृषीमंत्री आलेले असताना त्यांच्या दौऱ्यात सत्ताधारी लोकप्रतिनिधी नसणे हा समन्वयाचा अभाव आहे. आ. तानाजी सावंत, आ. राणा जगजितसिंह पाटील हे महायुतीमुळे निवडून आलेले असताना एकमेकांच्या पक्षाचं वावडं नेमकं कशासाठी? हा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा दौरा होता त्या दौऱ्यात भाजपच्या नेत्यांनी पालकमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीकडे पाठ फिरवली पवनचक्कीची कामे, तुळजाभवानी विकास आराखडा, मराठा समाजासोबत बैठक अश्या महत्वाच्या बैठका असताना त्यांच्या बैठकीकडे इतर दोन पक्षाच्या नेत्यांनी फिरवलेली पाठ असमन्वय अधोरेखीत करते.तर याच्या काही दिवस अगोदर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी देखील जनता दरबार घेतला मात्र या दौऱ्यात देखील इतर सहकारी पक्षांचे नेते सहभागी न झाल्याने हा असमन्वय किती मोठा आहे हे दिसून आले. भाजपाचे नेते धाराशिव शहरातील दहीहंडीच्या कार्यक्रमात होते मात्र कृषिमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यात नव्हते त्यामुळे कृषिमंत्र्यांना ते कृषिमंत्री मानत नसावेत जिल्ह्यातील भाजपचे नेते त्यांच्या पेक्षा वरिष्ठ वाटत असावेत. अर्थात भाजपचे नेते पाहणी करायला गेले नाहीत असे नाही मात्र महायुती म्हणून असलेला एकसंधपणा यातून दिसत नाही. मंत्रालयात जाऊन परिस्थिती सांगणे आणि बांधावरची वस्तुस्थिती वेगळी असते याचा विसर महायुतीच्या नेत्यांना पडला असावा.
नागरी सत्कार सोहळ्याची कल्पनाच नव्हती पालकमंत्र्यांचा गौफ्यस्फोट
तुळजापूर विकास आराखड्याचा एक भव्यदिव्य सत्कार सोहळा तुळजापुरात पार पडला. ड्रग्सच्या संबंधित आरोपींचा त्यातील वावर दिसल्याने तो वादात सापडला महालुमंत्र्यांच्या दौऱ्याला त्यामुळे गालबोट लागले मात्र त्याही कार्यक्रमात भाजपाच्या नेत्यांशिवाय कोणीच उपस्थित नव्हते. सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांना निमंत्रण आहे असे सांगण्यात आले होते निमंत्रण पत्रिकेवर त्यांचा फोटो देखील वापरला कार्यक्रमाच्या अनुपस्थितीबद्दल त्यांना विचारले असता त्या कार्यक्रमाची कल्पनाच नव्हती असे उत्तर त्यांनी दिल्याने महायुतीत सारे काही आलबेल नाही हेच दिसून येते.
असमन्वय नेमका कोणामुळे?
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती पत्रकार परिषद घेऊन ही समिती स्थापन केल्याचे सांगितले मात्र त्या दिवशी घेतलेली बैठकी पहिली आणि शेवटची ठरली त्यानंतर कधी बैठक झाल्याचे पाहायला मिळाले नाही. भाजपच्या नेत्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीतील पदाधिकारी विरोध करतात मात्र जाहीर विरोध करत नसल्यामुळे विविध कार्यक्रमांना अनुपस्थित रहात आपला विरोध दर्शवतात. मुख्यमंत्रिपद भाजपकडे असल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारात घेतलं जात नसल्याचा आरोप महायुतीतील पदाधिकारी करतात.
जलसंपदा मंत्र्यांचा दौरा आणि उद्घाटनाचा कार्यक्रम
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील काही दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यात येऊन गेले करजखेडा येथील निम्न तेरणा प्रकल्प दुरुस्ती कामाचे त्यांनी उद्घाटन केले तत्तूर्वी त्यांनी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातीत सोलापूर जिल्ह्यातील एका पंप गृहाचे उद्घाटन केले या कार्यक्रमात देखील महायुतीतील महत्वाचे पदाधिकारी उपस्थित नव्हते हे विशेष.