वाशी प्रतिनिधी (राहुल शेळके): धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारा गावाने १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आनंदोत्सव साजरा केला आहे. गावातील ऋषिकेश जीवन शेळके (वय 21) यांनी भारतीय सैन्यात टेक्निकल पदावर निवड होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या या यशस्वी कामगिरीचा गावकऱ्यांनी जल्लोषात आनंद साजरा केला. शुक्रवारी सायंकाळी गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी पेढे वाटत, डीजेच्या तालावर नाचत त्यांचे अभिनंदन केले.

कष्टकऱ्यांच्या पोटी जन्मलेल्या ऋषिकेशचा जिद्दीचा प्रवास
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले ऋषिकेश शेळके यांचे जीवन संघर्षमय राहिले आहे. त्यांचे वडील जीवन शेळके अल्पभूधारक शेतकरी असून, आई गृहिणी आहेत. अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेल्या ऋषिकेश यांनी शिक्षण घेतानाच सैन्यात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते.
त्यांचे प्राथमिक शिक्षण डोंगरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण जय भवानी विद्यालय, पारा येथे पूर्ण केले. पुढील स्वप्नासाठी त्यांनी ईट येथील वीर भगतसिंग अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. इथे त्यांनी शारीरिक व मानसिक तयारीसाठी कठोर मेहनत घेतली. तीन महिन्यांपूर्वी अहिल्यानगर येथे झालेल्या सैन्य भरती प्रक्रियेत त्यांनी भाग घेतला होता. 21 मार्च रोजी जाहीर झालेल्या निकालात त्यांनी यश संपादन केले आणि भारतीय आर्मीमध्ये टेक्निकल पदावर निवड मिळवली.
गावकऱ्यांचा अभिमान — १५ वर्षांनी सैन्यात गावाचा सुपुत्र
पारा गावातून यापूर्वी १५ वर्षांपूर्वी विलास शेळके यांनी भारतीय सैन्यात प्रवेश मिळवला होता. त्यानंतर तब्बल पंधरा वर्षांनी गावातून ऋषिकेश यांची निवड झाल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. त्याच्या यशाची बातमी गावात पसरताच गावकऱ्यांनी उत्साहात स्वागत करण्याचे ठरवले.
डिजेच्या तालावर नाचत, गुलाल उधळत व पेढे वाटत ऋषिकेश यांची मिरवणूक गावभर फिरवण्यात आली. नागनाथ नाईकवाडी, महादेव लोकरे, जीवन भराटे, युवराज भराटे, शंकर शेळके, शैलेश पाटील, बाजीराव भराटे, उद्धव शेळके, लाला शेळके, महेश खोले, बालाजी कुरुंद, पोपट कुरुंद, बळीराम शिनगारे, रोहित शेळके आदी मान्यवरांसह गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

जय भवानी विद्यालयात ऋषिकेश यांचा सत्कार सोहळा
22 मार्च रोजी पारा गावातील जय भवानी विद्यालयात ऋषिकेश यांचा माजी विद्यार्थी म्हणून सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक सूर्यवंशी सर यांनी ऋषिकेशच्या मेहनतीची प्रशंसा करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
“जिद्द, चिकाटी आणि परिश्रम यांच्या बळावर ऋषिकेशने यश मिळवले आहे. इतर विद्यार्थ्यांसाठी तो एक आदर्श ठरेल,” असे गौरवोद्गार मुख्याध्यापक सूर्यवंशी यांनी काढले.
या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालकवर्ग, शालेय समिती अध्यक्ष शंकर शेळके, माजी विद्यार्थी, तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी ऋषिकेशच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कुटुंबीयांचा अभिमान आणि ऋषिकेशचे मनोगत
यावेळी ऋषिकेश यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,
“माझ्या यशामागे माझ्या आई-वडिलांचे कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि गावकऱ्यांचे आशीर्वाद आहेत. भारतीय सैन्यात देशसेवा करण्याचे स्वप्न लहानपणापासून बाळगले होते. ते आता पूर्ण झाले. मी यासाठी माझ्या संपूर्ण कुटुंबाचे आणि गावकऱ्यांचे आभार मानतो.”
पारा गावातील ऋषिकेश शेळके यांच्या यशामुळे संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे. त्यांची देशसेवेसाठीची सुरुवात अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही. त्यांच्या पुढील प्रवासासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.