Home धाराशिव धाराशिव शहरालगत हातलादेवी परिसरात बिबट्याचा वावर – घाटंग्री येथे जनावरांवर हल्ला

धाराशिव शहरालगत हातलादेवी परिसरात बिबट्याचा वावर – घाटंग्री येथे जनावरांवर हल्ला

0
36

धाराशिव शहरालगत हातलादेवी तलाव परिसर आणि नगरपालिका पंपगृहाजवळ २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.४५ वाजता नागरिकांनी बिबट्याला जाताना पाहिले. सकाळी दिसलेला हा बिबट्या रात्री घाटंग्री परिसरात पोहोचला आणि तेथील अलकाबाई राजेंद्र शिंदे यांच्या शेतातील जनावरांवर हल्ला केला. या हल्ल्यात एक वासरू ठार झाले असून, एक गाय गंभीर जखमी झाली आहे.

बिबट्याच्या वावराने भीतीचे वातावरण

२५ फेब्रुवारी रोजी हातलादेवी परिसरात काही नागरिकांना मोठा वाघसदृश प्राणी दिसला होता. त्यामुळे तो वाघ होता की बिबट्या याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, घटनास्थळी आढळलेले ठसे बिबट्याचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हाच बिबट्या पुढे घाटंग्री परिसरात जाऊन शेतातील जनावरांवर हल्ला केल्याचे समोर आले.

शहराच्या जवळ बिबट्या आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः हातलादेवी परिसर आणि त्याच्या आसपास राहणारे नागरिक रस्त्यावर एकटे फिरताना घाबरत आहेत. स्थानिक प्रशासन आणि वनविभागाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

धाराशिव जिल्ह्यात १२ बिबटे सक्रिय

सध्या धाराशिव जिल्ह्यात १२ बिबटे असल्याची नोंद वनविभागाकडे आहे. त्यांचा मुख्य वावर ऊसशेती असलेल्या भागात जास्त असल्याचे दिसते. पश्चिम महाराष्ट्रालगत असलेल्या गावांमध्ये बिबटे अधिक प्रमाणात फिरत असल्याने शेतकरी आणि स्थानिक नागरिक सतत दहशतीत आहेत.

वनविभागाने याप्रकरणी तातडीने लक्ष घालावे, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकरी करत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here