ऑनलाइन गेमिंगचे व्यसन; २५ लाखांच्या बनावट लुटीचा कट उघड
धाराशिव –
“गंगाधर ही शक्तिमान है!” हे वाक्य केवळ टीव्ही मालिकेतच नव्हे, तर खऱ्या आयुष्यातही लागू पडल्याचे उदाहरण समोर आले आहे. लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक नळदुर्ग शाखेचे मॅनेजर कैलास घाटे यांनी स्वतःच २५ लाख रुपयांची बनावट लूट घडवून आणल्याचे पोलिसांच्या कसोशीनं केलेल्या तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे, यामागे ऑनलाइन गेमिंगचे व्यसन आणि त्यामुळे झालेला आर्थिक डोंगर हे प्रमुख कारण ठरले.
घटना ३० जून रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास सोलापूर महामार्गावरील ईटकळ टोल नाक्याजवळ घडल्याचे सांगण्यात आले होते. कैलास घाटे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, दोन अज्ञात इसमांनी त्यांना अडवून मारहाण केली, डोळ्यात चंटणी टाकली आणि २५ लाखांची रोकड लुटली. त्यांच्या या जबाबामुळे खळबळ उडाली होती.
मात्र स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार आणि त्यांच्या पथकाने केलेल्या तांत्रिक आणि वैयक्तिक तपासातून वेगळेच चित्र समोर आले. सुरुवातीला “पिडीत” म्हणून वावरणाऱ्या घाटे यांची देहबोली, बोलण्यात आलेली विसंगती आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती घेतल्यानंतर पोलिसांना संशय गडद झाला.
तपासात समोर आले की, कैलास घाटे यांना ऑनलाईन गेम खेळण्याचे अतिव्यसन लागले होते. यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे गमावले होते. वाढत्या कर्जबाजारीपणातून सावरण्यासाठी त्यांनी चक्क बनावट लूट घडवून आणण्याचा कट आखला.
सखोल चौकशीदरम्यान पोलिसांनी जबाबदारीने विचारपूस केली असता त्यांनी अखेर सत्य उघड केले आणि लपवून ठेवलेले २५ लाख रुपयेही पोलीसांच्या ताब्यात दिले.
ही कारवाई यशस्वी करणारे अधिकारी व पथक:
पोलिस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली तीन स्वतंत्र पथकांनी हे गूढ उकलले. या पथकात पोलीस निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सचिन खटके, जावेद काझी, अमोल मोरे, अशोक ढगारे, विजय घुगे, फरहान पठाण यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
एकीकडे बँक मॅनेजर पदावर काम करणारा अधिकारी, तर दुसरीकडे ऑनलाइन जुगाराच्या विळख्यात सापडलेला व्यसनी – ही दुहेरी भूमिका कैलास घाटे यांनी साकारली आणि “पिडीतच आरोपी” असल्याचा दुर्मिळ प्रकार समोर आला. पोलीस यंत्रणेच्या सखोल तपासामुळे हा बनाव उघड झाला, अन्यथा हा प्रकार अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून गेला असता.
- ऊर्जा मंत्रालयाने प्रसिद्ध केला ‘राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2024’: महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम आणि त्रिपुरा अव्वल
- अंगणवाडी पाडली; दोघांवर गुन्हा दाखल
- ताकविकी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी : शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरमागे 50 हजार रुपये मदत द्यावी
- धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना : बँकेतून 19 लाखांची रक्कम, शेळ्या व घरफोडीत सोनं-रोख लंपास
- खोट्या विवाहाच्या आमिषाने तरुणाची १.२० लाखांची फसवणूक