सोन्नेवाडीतील अकरा वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू

0
143

गिरवली, दि. २९ (प्रतिनिधी) – भुम तालुक्यातील सोन्नेवाडी येथील अकरा वर्षीय मुलाचा मंगळवारी (दि. २८) दुपारी तलावात बुडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे सोमवारी (दि. २७) रोजी त्याचा वाढदिवस साजरा झाला होता. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे सोन्नेवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सोन्नेवाडी येथील शंभू दत्तात्रय सोन्ने हा पाचवीत शिकत होता. मंगळवारी तो आपल्या आजोबा आणि लहान भावासोबत जनावरे चारण्यासाठी सोन्नेवाडी शिवारात गेला होता. गिरवली फाटा–सोन्नेवाडी रोडलगत एक तलाव आहे. जनावरे चरत असताना शंभूने आजोबांना सांगितले की, “मी जनावरांना पाणी पाजून येतो,” असे म्हणून तो आपल्या लहान भावाला घेऊन तलावाकडे गेला.

लहान भाऊ पाण्याच्या बाहेर थांबला, पण शंभू बराच वेळ परतला नाही. त्यामुळे भावाने आजोबांना ही माहिती दिली. आजोबा तलावावर गेले असता त्यांना शंभूचे कपडे दिसले, मात्र तो दिसत नव्हता. त्यांनी तत्काळ गावातील तरुणांच्या मदतीने शोधाशोध सुरू केली. अखेर शंभूचा मृतदेह तलावात आढळून आला.

वाशी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ईट येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर सोन्नेवाडी येथे त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला.

या दुर्दैवी घटनेमुळे सोन्नेवाडी व परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here