शक्यतो ६० दिवसांत निर्णय; शैक्षणिक प्रयोजनासाठी १०० रुपये, तर नोकरीसाठी एक हजार रुपये शुल्क; सुनावणीही ऑनलाइन होणार
मुंबई, दि. २५ : राज्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यापुढे जात वैधता प्रमाणपत्रासाठी केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाणार असून, अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांच्या प्रती घेऊन जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. विशेष म्हणजे, अर्जदारांची सुनावणीही ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार असून, शक्यतो ६० दिवसांच्या आत जात प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने बुधवारी (दि. २५) शासन परिपत्रक निर्गमित केले आहे.
राज्यातील विद्यार्थी व नागरिकांना शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती, नोकरी, निवडणूक तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. राज्यात १ ऑगस्ट २०२० पासून जात पडताळणी समित्यांचे कामकाज अंशतः ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. मात्र, अर्जदारांना प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी, अर्ज प्रक्रियेतील पुनरावृत्ती टाळण्यासाठी, अर्जाच्या सद्यस्थितीची माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी तसेच नागरिकांचा वेळ व श्रम वाचविण्यासाठी शासनाने संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या सहकार्याने जात प्रमाणपत्र पडताळणीची आधुनिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रे जोडणे, अर्जाची सद्यस्थिती तपासणे, त्रुटींची पूर्तता करणे, सुनावणी आणि वैधता प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित संवाद प्रणालीच्या माध्यमातून अर्जदारांच्या प्रश्नांचे निराकरण आणि मार्गदर्शन करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र ई-मेल आणि व्हॉट्सॲपद्वारे उपलब्ध करून देण्याच्या सुविधेचाही यात समावेश आहे.
आधार क्रमांकावर एकच अर्ज करता येणार
नव्या कार्यपद्धतीनुसार जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाइन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे, दस्तऐवजी पुरावे आणि शपथपत्रांच्या मूळ अथवा प्रमाणित प्रती स्कॅन करून सादर कराव्या लागणार आहेत. नियम १६ नुसार जातीच्या नोंदीबाबतचा आणि मानीव दिनांकापूर्वीच्या रहिवासाचा प्रत्येकी किमान एक दस्तऐवजी पुरावा सादर करणे आवश्यक राहणार आहे. असे पुरावे सादर करता न आल्यास स्वयंघोषणापत्र सादर करण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, आवश्यकतेनुसार समितीला अतिरिक्त पुराव्यांची मागणी करण्याचा अधिकार राहणार आहे.
अर्ज आणि कागदपत्रे ऑनलाइन सादर केल्यानंतर पुन्हा त्यांच्या छापील प्रती काढून समितीच्या कार्यालयात दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही. जात पडताळणीचा अर्ज आधार क्रमांकाशी निगडित असल्याने एका अर्जदाराला एकच अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे अर्ज भरताना आणि कागदपत्रे सादर करताना अर्जदारांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.
अशी होणार अर्जाची पडताळणी
ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर समितीच्या कार्यालयातील लिपिक त्याची तांत्रिक तपासणी करणार आहे. अर्जातील सर्व तपशील भरले आहेत का, कागदपत्रे उघडता येतात का, मूळ कागदपत्रांच्या प्रती सादर केल्या आहेत का आणि त्या वाचनीय आहेत का, याची तपासणी करण्यात येईल. त्रुटी असल्यास त्या नमूद करून अर्ज सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येईल.
लिपिकाने नमूद केलेल्या त्रुटी योग्य असल्यास सदस्य सचिव अर्जदाराकडे त्रुटींच्या पूर्ततेसाठी अर्ज परत पाठवतील. त्रुटी योग्य नसल्यास, दुर्लक्ष करण्याजोग्या असल्यास अथवा अर्ज परिपूर्ण असल्यास सदस्य सचिव अर्जासोबत सादर केलेल्या पुराव्यांची गुणवत्तेच्या आधारे पडताळणी करतील.
जातीचा दावा आणि रहिवास सिद्ध होत असल्यास सदस्य सचिव अर्ज वैध असल्याचा निर्णय नोंदवून तो समितीचे अध्यक्ष व सदस्य तथा उपायुक्त यांच्याकडे पाठवतील. जातीचा दावा किंवा मानीव दिनांकाचा रहिवास सिद्ध होत नसल्यास त्याबाबत अभिप्राय आणि आवश्यक अतिरिक्त पुराव्यांचा तपशील नोंदवून अर्ज समितीकडे पाठविण्यात येईल.
समितीचे अध्यक्ष आणि सदस्य अर्ज व पुराव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी करून निर्णय नोंदवतील. जातीचा दावा आणि रहिवास सिद्ध झाल्यास सर्व सदस्यांनी निर्णय नोंदविल्यानंतर संगणकीय प्रणालीमध्ये वैधता प्रमाणपत्र तयार होईल. समितीचे उपायुक्त डिजिटल स्वाक्षरीने जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करतील.
अर्जदाराने सादर केलेल्या पुराव्यांची संबंधित आस्थापनांकडून पडताळणी करणे आवश्यक असल्यास सदस्य सचिव संबंधित आस्थापनांशी पत्रव्यवहार करतील. दक्षता पथकाकडून चौकशी करण्याची आवश्यकता असल्यास चौकशीचे मुद्दे नमूद करून प्रकरण दक्षता पथकाकडे वर्ग केले जाईल. पुराव्यांमध्ये त्रुटी असल्यास किंवा अतिरिक्त पुराव्यांची आवश्यकता असल्यास आवश्यक पुराव्यांचा तपशील नमूद करून समितीला अर्जदाराकडे प्रकरण परत पाठविता येणार आहे.
सुनावणी दिल्याशिवाय जातीचा दावा अवैध ठरविता येणार नाही
अर्जदाराच्या प्रकरणात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सुनावणीची आवश्यकता असल्यास ती दूरदृश्य प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीनेच घेतली जाणार आहे. विशिष्ट आणि अपवादात्मक प्रकरणांमध्ये परिस्थितीनुसार बार्टीच्या महासंचालकांची खात्री झाल्यानंतर प्रत्यक्ष सुनावणीस परवानगी दिली जाणार आहे.
दक्षता पथकाच्या अहवालानुसार अर्जदाराने सादर केलेल्या पुराव्यांबाबत साशंकता असल्यास नमुना २५ मधील कारणे दाखवा नोटीस बजावून त्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे.
दक्षता पथकाचा चौकशी अहवाल आणि कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर अर्जदाराचा खुलासा समाधानकारक नसल्यास अथवा वाजवी संधी देऊनही जातीचा दावा निर्विवादपणे सिद्ध होत नसल्यास समिती कारणांसह आदेश पारित करून जातीचा दावा अवैध ठरवेल. संबंधित आदेश ऑनलाइन प्रणालीवर उपलब्ध करून दिला जाईल. मात्र, अर्जदाराला वाजवी संधी आणि ऑनलाइन सुनावणीची संधी दिल्याशिवाय समितीला जातीचा दावा अवैध ठरविता येणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
अर्जदाराने जातीचा पुरावा म्हणून रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले असल्यास संबंधित प्रमाणपत्र समितीला ऑनलाइन प्रणालीमध्ये प्रसिद्ध करता येणार आहे.
पाचव्या महिन्यात त्रुटी पूर्ततेची अंतिम संधी
जात प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत पडताळणी समितीने शक्यतो ६० दिवसांच्या आत निर्णय घ्यावा, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. समितीचा निर्णय अर्जदाराला मोबाईल संदेश, व्हॉट्सॲप आणि ई-मेलद्वारे कळविला जाणार आहे. अर्जदाराने त्रुटींची पूर्तता न केल्यास पुढील दोन महिने त्याला ऑनलाइन प्रणालीद्वारे त्रुटी पूर्ततेबाबत सूचना दिल्या जाणार आहेत.
पाचव्या महिन्यात त्रुटी पूर्ततेसाठी ऑनलाइन सुनावणीची अंतिम संधी दिली जाईल. त्यानंतरही अर्जदाराने प्रतिसाद न दिल्यास अथवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यास संबंधित प्रकरण निकाली काढण्यात येणार आहे.
समितीने वैध किंवा अवैध ठरविलेले प्रकरण अपिलीय प्राधिकरणाच्या अथवा न्यायालयाच्या आदेशानुसार संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांना बार्टीच्या महासंचालकांच्या पूर्वमान्यतेने पुन्हा सुरू करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
जात पडताळणीसाठी सुधारित सेवा शुल्क
शैक्षणिक प्रयोजन – १०० रुपये.
ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद) – ५०० रुपये.
शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत) – १,००० रुपये.
सेवाविषयक प्रयोजन – १,००० रुपये.
शासकीय योजनांचा लाभ अथवा सवलती घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक असल्यास – १,००० रुपये.
संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने विद्यार्थी, नोकरीसाठी इच्छुक उमेदवार, निवडणूक लढविणारे उमेदवार आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांच्या वेळेची व श्रमाची बचत होण्याची अपेक्षा आहे.
- जात वैधता प्रमाणपत्रासाठी आता कार्यालयाचे हेलपाटे बंद; संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन
- राज्य मंत्रिमंडळाचे १४ महत्त्वपूर्ण निर्णय; ४२ लाख शेतकऱ्यांना तीन महिने मोफत धान्य
- पर्यावरण संवर्धनाचे धडे देणाऱ्या महाविद्यालयातच झाडांची कत्तल!
- पपई खरेदी करून शेतकऱ्याची ३० हजारांची फसवणूक; व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल
- पुण्यात न्यायालयाबाहेर गोळीबार; खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी मंदार किवळेची हत्या
