25 November 2026, Wednesdayदैनिक जनमत | निर्भीड पत्रकारिता
जाहिरातीसाठी जागा • 728 × 90
जिल्हा बातम्याई-पेपरधाराशिवसोलापूरसातारासांगलीपुणेकोल्हापूर
धाराशिव

राज्य मंत्रिमंडळाचे १४ महत्त्वपूर्ण निर्णय; ४२ लाख शेतकऱ्यांना तीन महिने मोफत धान्य

नर्मदा-तापी वळण योजनेसाठी ५,५४८ कोटींची तरतूद; आर्थिक फसवणुकीची प्रकरणे ९० दिवसांत निकाली काढण्यासाठी स्वतंत्र न्यायाधिकरण; खासगी अनुदानित शाळांसाठी स्वतंत्र कायदा

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) झालेल्या बैठकीत शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे १४ निर्णय घेण्यात आले. राज्यातील ३३ जिल्ह्यांतील ४२ लाख ३० हजार ७८३ पात्र शेतकऱ्यांना पुढील तीन महिने प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करण्यासह महसूल विभागाच्या अर्धन्यायिक कामकाजात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

शेतकऱ्यांना तीन महिने मोफत धान्य

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील दारिद्र्यरेषेखालील तसेच थेट लाभ हस्तांतरण योजनेत समाविष्ट नसलेल्या राज्यातील ३३ जिल्ह्यांतील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना पुढील तीन महिने मोफत धान्य देण्यात येणार आहे. प्रतिव्यक्ती दरमहा तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू याप्रमाणे पाच किलो धान्य दिले जाणार आहे.

नर्मदा-तापी वळण योजनेसाठी ५,५४८ कोटी

नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा-तापी वळण योजनेसाठी ५ हजार ५४८ कोटी रुपयांच्या तरतुदीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या योजनेंतर्गत सहा वळण बंधाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. योजनेच्या माध्यमातून परिसरातील सुमारे २६ हजार ५२६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार असून ११.५० मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे.

आर्थिक फसवणुकीची प्रकरणे ९० दिवसांत निकाली काढणार

ठेवीदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या वित्तीय संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमामध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यासाठी स्वतंत्र एमपीआयडी न्यायाधिकरण स्थापन करण्यात येणार असून प्रकरणे निकाली काढण्यासाठी ९० दिवसांची कालमर्यादा निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महसूल विभागात ‘एक जिल्हा, एक अपील’

महसूल विभागातील अर्धन्यायिक कामकाजासाठी महसूल न्यायालय दावा व्यवस्थापन प्रणाली लागू करण्यात येणार आहे. तसेच महसुली प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी ‘एक जिल्हा, एक अपील’ ही तरतूद लागू केली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ

आरोग्य विज्ञान व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पात्र विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत सुधारित दराने भत्ता देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या भोजन, निवास आणि निर्वाह भत्त्यात भरीव वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वित्तीय सुविधा

शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय रिझर्व्ह बँकेकडे नोंदणी असलेल्या वित्तीय संस्थांच्या माध्यमातून या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

मुद्रांक शुल्कासंबंधी अधिनियमात सुधारणा

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम ३२ (ब) आणि ५३ (१अ) मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या सुधारणांमुळे अभिनिर्णय शुल्क आणि अपील शुल्काच्या दरांमध्ये सुसूत्रता आणली जाणार आहे. यासंदर्भातील विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे.

दोन विद्यापीठांच्या अधिनियमांमध्ये सुधारणा

रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अधिनियम, १९९७ आणि नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम, १९८९ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. कुलसचिव नियुक्ती, परिनियम, वित्त व लेखा समिती, इमारत बांधकाम समिती, वार्षिक अहवाल आणि लेखे यासंदर्भातील परिभाषांमध्ये एकसमानता आणण्यात येणार आहे.

खासगी अनुदानित शाळांसाठी स्वतंत्र कायदा

राज्यातील खासगी अनुदानित शाळांच्या विनियमनासाठी सर्वसमावेशक कायदा करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र खासगी अनुदानित शाळा (विनियमन) विधेयक, २०२६ च्या प्रारूपास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. हे विधेयक विधिमंडळात सादर करण्यात येणार आहे.

माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांच्या कायद्यात सुधारणा

महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ आणि महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ या दोन्ही अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

आरोग्यसेवा व्यवसाय आयोगाच्या कायद्यातून अॅक्युपंक्चर वगळणार

राष्ट्रीय सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यवसाय आयोग अधिनियम, २०२१ मधून अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती वगळण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याच्या विधेयकाच्या प्रारूपास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील ग्रंथपालांना सातवा वेतन आयोग

शासकीय वैद्यकीय, दंत आणि आयुर्वेद महाविद्यालयांतील पूर्णवेळ ग्रंथपालांप्रमाणेच खासगी अनुदानित आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयांतील ग्रंथपालांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली.

लोकसेवा हक्क अधिनियमात सुधारणा

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ मधील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यासंदर्भातील सुधारणा विधेयक विधिमंडळासमोर मांडण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

मौदा नगरपंचायतीला शासकीय जमीन

नागपूर जिल्ह्यातील मौदा नगरपंचायतीला प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी शासकीय जमीन देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या निर्णयामुळे नगरपंचायतीच्या स्वतंत्र प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Exit mobile version