25 November 2026, Wednesdayदैनिक जनमत | निर्भीड पत्रकारिता
जाहिरातीसाठी जागा • 728 × 90
जिल्हा बातम्याई-पेपरधाराशिवसोलापूरसातारासांगलीपुणेकोल्हापूर
धाराशिव

पर्यावरण संवर्धनाचे धडे देणाऱ्या महाविद्यालयातच झाडांची कत्तल!

वीस वर्षांपूर्वी लावलेली झाडे तोडल्याने माजी विद्यार्थी व्यथित; विजेच्या तारांना झाडे घासत असल्याचे प्राचार्यांचे स्पष्टीकरण

धाराशिव : एकीकडे महाविद्यालयाच्या चार भिंतींच्या आत विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे द्यायचे आणि दुसरीकडे महाविद्यालयाच्या आवारातील वर्षानुवर्षे वाढलेल्या झाडांची कत्तल करायची, असा दुर्दैवी प्रकार शहरातील नामांकित रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात घडला आहे. विशेष म्हणजे, सुमारे वीस वर्षांपूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी ही झाडे लावली आणि त्यांचे संगोपन केले, त्याच माजी विद्यार्थ्यांना आज या झाडांची झालेली तोड पाहण्याची वेळ आली.

सुमारे वीस वर्षांपूर्वी या महाविद्यालयात शिक्षण घेणारे काही माजी विद्यार्थी कामानिमित्त महाविद्यालयात आले होते. यावेळी महाविद्यालयाच्या आवारात त्यांनी लावलेली झाडे तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे दृश्य पाहून त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणी जाग्या झाल्या. आपण लावलेल्या झाडांना नियमित पाणी देऊन त्यांचे संगोपन केल्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. मात्र, आज तीच झाडे तोडलेल्या अवस्थेत पाहून त्यांनी तीव्र खंत व्यक्त केली.

विद्यार्थ्यांसाठी ही केवळ झाडे नव्हती, तर त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींचा तो एक जिवंत ठेवा होता. तब्बल दोन दशकांपूर्वी लावलेली झाडे आज अस्तित्वात नसल्याचे पाहून महाविद्यालयाने झाडांसोबतच माजी विद्यार्थ्यांच्या भावनांचीही कत्तल केली, अशा भावना विद्यार्थ्यांनी बोलून दाखवल्या.

पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्याची जबाबदारी असलेल्या शैक्षणिक संस्थेतच असा प्रकार घडणे दुर्दैवी आहे. एखादे झाड लावणे सहज शक्य असले तरी ते वाढविण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. विजेच्या तारांना अडथळा निर्माण होत असेल, तर संबंधित फांद्यांची छाटणी करून झाडे वाचविणे शक्य होते का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

दरम्यान, याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादास मंजुळकर यांच्याशी संपर्क साधला असता, महाविद्यालयाच्या आवारातील झाडे विजेच्या तारांना घासत असल्याने यासंदर्भात वीज वितरण कंपनीला पत्र देऊन कळविण्यात आले होते. विजेच्या तारांना ही झाडे घासत असल्यामुळे ती तोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, पर्यावरण संवर्धनाचे धडे देणाऱ्या महाविद्यालयाने दोन दशकांपूर्वी लावलेली झाडे वाचविण्यासाठी पर्यायी उपायांचा विचार केला होता का, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

Exit mobile version