24 November 2026, Tuesdayदैनिक जनमत | निर्भीड पत्रकारिता
जाहिरातीसाठी जागा • 728 × 90
जिल्हा बातम्याई-पेपरधाराशिवसोलापूरसातारासांगलीपुणेकोल्हापूर
धाराशिव

सांडपाण्याच्या पुनर्वापरातून धाराशिवमध्ये फुलणार हरित उद्यान!

प्रक्रिया केलेल्या पाण्यावर १० हजार वृक्षांचे संवर्धन; जिल्ह्यातील अन्य नगर परिषदांमध्येही ‘मॉड्युलर एसटीपी’ उभारण्याचे नियोजन

धाराशिव : दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सातत्याने सामना करावा लागणाऱ्या धाराशिव जिल्ह्यात उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी सांडपाणी पुनर्वापराचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. धाराशिव शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर वृक्षसंवर्धन, उद्यान विकास, शेती आणि बांधकामांसाठी करण्याचे नियोजन आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या माध्यमातून शहरात १० हजार नवीन वृक्षांचे संवर्धन करण्यासोबतच हरित उद्यान विकसित करण्याचा मानस असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

या उपक्रमासाठी कमी जागेत आणि तुलनेने कमी खर्चात उभारता येणाऱ्या ‘मॉड्युलर सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट’ (एसटीपी) या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या यंत्रणेद्वारे शहरातील सांडपाण्यावर आवश्यक प्रक्रिया करून ते पुनर्वापरासाठी योग्य बनविण्यात येणार आहे. त्यामुळे सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासोबतच पर्यायी जलस्रोत निर्माण करणे शक्य होणार आहे.

धाराशिव जिल्ह्यात कमी पर्जन्यमान आणि अनियमित पावसामुळे उन्हाळ्यात अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण होते. अशा परिस्थितीत नवीन जलस्रोत निर्माण करण्याबरोबरच उपलब्ध पाण्याचा पुनर्वापर करणेही महत्त्वाचे आहे. शहरात दररोज मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यास त्याचा विविध नागरी कामांसाठी वापर करता येऊ शकतो.

धाराशिव शहरात १० हजार नवीन वृक्षांच्या लागवडीसह त्यांच्या दीर्घकालीन संगोपनावर भर दिला जाणार आहे. पाण्याअभावी लागवड केलेली झाडे जगविण्याचे आव्हान निर्माण होते. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा नियमित वापर करून ही अडचण दूर करण्याचे नियोजन आहे. त्यासोबतच हरित उद्यान विकसित करून नागरिकांना विरंगुळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. या उपक्रमामुळे शहरातील हरित क्षेत्रात वाढ होण्यास मदत होणार आहे.

बांधकामासाठीही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. त्यासाठी अनेकदा पिण्यायोग्य पाण्याचा वापर केला जातो. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा बांधकामासाठी वापर केल्यास पिण्याच्या पाण्यावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय शेती आणि सार्वजनिक ठिकाणच्या वृक्षांच्या संवर्धनासाठीही या पाण्याचा वापर करण्याचे नियोजन आहे.

धाराशिव शहरात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणारा हा उपक्रम यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील अन्य नगर परिषदांमध्येही मॉड्युलर एसटीपी उभारण्याचे नियोजन आहे. कमी जागा, तुलनेने कमी खर्च आणि स्थानिक गरजेनुसार उभारणी करण्याची सुविधा ही या तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये आहेत. सांडपाण्याचा पुनर्वापर करून पाणी बचत, वृक्षसंवर्धन, उद्यान विकास आणि नागरी सुविधांच्या विस्ताराला चालना देण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Exit mobile version