24 November 2026, Tuesdayदैनिक जनमत | निर्भीड पत्रकारिता
जाहिरातीसाठी जागा • 728 × 90
जिल्हा बातम्याई-पेपरधाराशिवसोलापूरसातारासांगलीपुणेकोल्हापूर
धाराशिव

धाराशिवमध्ये डिफेन्स कारखाना व लॉजिस्टिक पार्क उभारणार : उद्योगमंत्री उदय सामंत

पुढील आठवड्यात मुंबईत बैठक; वर्षभरात आश्वासनपूर्ती करण्याची ग्वाही

खासदार नोकरी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सहा हजारांहून अधिक उमेदवारांची नोंदणी, शंभरहून अधिक कंपन्यांचा सहभाग

धाराशिव : जिल्ह्यातील तरुणांना रोजगारासाठी पुणे, मुंबईसारख्या शहरांकडे जावे लागू नये, यासाठी धाराशिवमध्येच उद्योग उभारून रोजगारनिर्मिती करण्यास प्राधान्य देण्यात येईल. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केलेल्या मागणीनुसार संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आणि लॉजिस्टिक पार्क उभारण्यासंदर्भात पुढील आठवड्यात मुंबईत बैठक घेण्यात येईल. आज दिलेला शब्द पुढील वर्षभरात पूर्ण करून दाखवू, ही केवळ घोषणा नसून वचन आहे, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘खासदार नोकरी महोत्सव २०२६’चे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी डॉ. जयप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते. खासदार राजेनिंबाळकर यांच्या हस्ते आई तुळजाभवानीची प्रतिमा देऊन उद्योगमंत्री सामंत यांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नोकरीच्या मुलाखतीसाठी पुणे, मुंबई येथे जाणे, त्यासाठी आर्थिक खर्च करणे आणि अनेकदा नोकरी न मिळाल्याने रिकाम्या हाताने परतणे, या अडचणी लक्षात घेऊन जिल्ह्यातच रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार या मेळाव्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

केवळ औद्योगिक वसाहती नकोत, उद्योगांनी भरलेल्या वसाहती हव्यात : ओमराजे

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले, धाराशिव जिल्ह्यातील बेरोजगारीची तीव्रता या रोजगार मेळाव्याला मिळालेल्या प्रतिसादातून स्पष्ट झाली आहे. सहा हजारांहून अधिक उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, त्यापैकी जवळपास ४० टक्के उमेदवारांनी स्थानिक पातळीवरच रोजगार मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जिल्ह्यात उद्योग उभारणीच्या अनेक घोषणा आजवर झाल्या; मात्र आता घोषणांऐवजी प्रत्यक्ष उद्योग सुरू होण्याची आवश्यकता आहे.

कौडगाव, धाराशिव, बार्शी, औसा येथील औद्योगिक वसाहतींसह वडगाव, तामलवाडी, वाशी आणि शिराढोण येथील औद्योगिक विकासाला चालना देण्याची गरज आहे. केवळ जमिनी संपादित करून औद्योगिक वसाहती निर्माण केल्या, एवढ्यावर समाधान मानता येणार नाही. या वसाहती उद्योगांनी भरल्या पाहिजेत आणि त्यातून स्थानिक युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सोलापूर-धुळे चौपदरी महामार्ग, सुरत-चेन्नई महामार्ग, प्रस्तावित जनकल्याण महामार्ग आणि शक्तिपीठ महामार्गामुळे जिल्ह्यात औद्योगिक विकासाच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाची मार्च २०२७ मध्ये इंजिन चाचणी होणार असून, साधारणतः २०२९-३० पर्यंत हा रेल्वेमार्ग कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. दक्षिण भारताशी थेट संपर्क निर्माण होणार असल्याने धाराशिवमध्ये लॉजिस्टिक हब उभारण्यास मोठा वाव आहे. याशिवाय गणेश निबे यांच्या संरक्षण साहित्य निर्मिती उद्योगासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदारांनी केली.

वाशीतील फटाका उद्योग समूह, भूम-परंडा-वाशी परिसरातील खवा उद्योग समूह आणि येडशीतील चर्मोद्योगाला संघटित उद्योग समूहाचे स्वरूप देण्याची मागणीही त्यांनी उद्योगमंत्र्यांकडे केली.

जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांना दुष्काळी परिस्थितीत रोजगाराची आवश्यकता आहे. कोणताही राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज नोकरी न मिळालेल्या उमेदवारांनाही रोजगार संधीपत्राच्या माध्यमातून पुढील तीन महिने ते एक वर्ष त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्यांची माहिती थेट भ्रमणध्वनीवर दिली जाणार असल्याचे खासदार राजेनिंबाळकर यांनी सांगितले.

कोरोना महामारी, महापूर आणि आता दुष्काळाच्या संकटात मतदारसंघातील नागरिकांना एकटे सोडणार नाही. सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांच्या हितासाठी करण्याचा आपला प्रयत्न असून, शिवसेनेत प्रवेश केल्यापासून जिल्ह्यात २४ आरोग्य शिबिरांचे आयोजन केल्याचेही त्यांनी सांगितले.

‘गाव तिथे उद्योजक’ उपक्रमाची धाराशिवमधून सुरुवात

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्यात आगामी आठ ते पंधरा दिवसांत उद्योग विभागाच्या माध्यमातून ‘गाव तिथे उद्योजक’ ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली. या उपक्रमाची सुरुवात धाराशिव लोकसभा मतदारसंघातून करण्यात येईल. उद्योग विभागाचे पथक गावोगावी जाऊन सर्वेक्षण करेल. प्रत्येक गावात उद्योजक निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून ५० लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्याचा मानस असून, या योजनेत ३५ टक्के अनुदान असल्याचे सामंत यांनी सांगितले.

नोकरी मिळवून स्वतःच्या पायावर उभे राहण्याबरोबरच तरुणांनी उद्योग क्षेत्राकडे वळावे. नोकरी करणारेच नव्हे, तर इतरांना नोकरी देणारे उद्योजक तयार झाले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले. सोलापूरच्या गणेश निबे यांनी छोट्या व्यवसायातून सुरुवात करून संरक्षण साहित्य निर्मिती क्षेत्रात मोठी भरारी घेतल्याचे उदाहरणही त्यांनी दिले.

धाराशिवमध्ये उद्योग आणण्याची आणि औद्योगिक वसाहतींच्या विकासाची जबाबदारी माझ्यावर सोपवा. आई तुळजाभवानीला साक्षी ठेवून सांगतो की, खासदारांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या रोजगारांमध्ये स्थानिक युवक-युवतींना संधी मिळावी, यासाठीही उपाययोजना करण्यात येतील, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

येडशी येथील दुर्घटनेत बाधित झालेल्या करंडे कुटुंबातील तरुणाला पुन्हा व्यवसायात उभे करण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.

खासदारांचे चोवीस तास संपर्क कार्यालय; संकेतस्थळाचे लोकार्पण

नोकरी महोत्सवाच्या निमित्ताने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या omraje.in या संकेतस्थळाचे उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या संकेतस्थळाच्या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांना आपल्या तक्रारी, अडचणी आणि सूचना थेट खासदारांपर्यंत पोहोचवता येणार आहेत. संकेतस्थळाच्या कार्यपद्धतीची माहिती श्रीनिवास यांनी दिली.

नागरिकांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी चोवीस तास कार्यरत राहणारे संपर्क कार्यालयही सुरू करण्यात येत असल्याचे खासदार राजेनिंबाळकर यांनी जाहीर केले. या संकल्पनेचे कौतुक करत उद्योगमंत्री सामंत यांनी आपल्या रत्नागिरी मतदारसंघातही अशाच प्रकारचे संपर्क कार्यालय सुरू करून त्याचे उद्घाटन खासदार राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, कार्यक्रमात उद्योगमंत्र्यांच्या हस्ते आरती प्रकाश लोहार, आनंद गायकवाड, आकाश माने, मोहम्मद सय्यद आणि दीपक मधने या निवड झालेल्या उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नोकरीची नियुक्ती प्रस्तावपत्रे वितरित करण्यात आली. तसेच रोजगार संधीपत्राचेही अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवसेना, पवनराजे फाउंडेशन आणि रोजगार मेळाव्याच्या संयोजनात सहभागी सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सोमनाथ गुरव यांनी केले.

Exit mobile version