25 November 2026, Wednesdayदैनिक जनमत | निर्भीड पत्रकारिता
जाहिरातीसाठी जागा • 728 × 90
जिल्हा बातम्याई-पेपरधाराशिवसोलापूरसातारासांगलीपुणेकोल्हापूर
धाराशिव

पपई खरेदी करून शेतकऱ्याची ३० हजारांची फसवणूक; व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

पवारवाडी येथील घटना; वर्षभर पाठपुरावा करूनही शेतकऱ्याला मिळाले नाहीत पैसे

धाराशिव : शेतकऱ्याच्या शेतातील पपई खरेदी करून त्याचे पैसे न देता ३० हजार ४७० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी तालुक्यातील एका व्यापाऱ्याविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेश लक्ष्मण साळुंके (रा. शेळगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमचंद बजरंग मुंढे (वय ४५, रा. पवारवाडी, ता. जि. धाराशिव) हे गेल्या दहा वर्षांपासून आपल्या शेतात पपईचे पीक घेतात. नागेश साळुंके हा इतर व्यापाऱ्यांसोबत अनेकदा त्यांच्या शेतातील पपई खरेदी करण्यासाठी येत असल्याने दोघांची ओळख होती.

४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास साळुंके हा मजूर आणि मालवाहू वाहन (क्र. एमएच १३ डीक्यू ६८४९) घेऊन मुंढे यांच्या शेतात आला. त्याने प्रतिकिलो ११ रुपये दराने शेतातील संपूर्ण पपई खरेदी करण्याचा व्यवहार केला. पपईचे वजन झाल्यानंतर फोनपेद्वारे पैसे देण्याचे त्याने सांगितले. ओळखीचा व्यापारी असल्याने मुंढे यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. यावेळी राघू लाला मुंढे आणि भीमराव श्रीपती मुंढे हेही उपस्थित होते.

साळुंके याने मजुरांच्या मदतीने पपई तोडून वाहनात भरली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मुंबईला जात असल्याचे सांगून तो निघून गेला. त्यानंतर पपईचे निव्वळ वजन २ हजार ७७० किलो भरल्याचे सांगत त्याने वजनाची पावती मुंढे यांना व्हॉट्सॲपद्वारे पाठविली. मुंढे यांनी पपईचे ३० हजार ४७० रुपये मागितले असता, मोबाईलची बॅटरी संपत आली असून मोबाईल चार्ज झाल्यानंतर पैसे पाठवतो, असे साळुंके याने सांगितले.

त्यानंतर मुंढे यांनी वारंवार पैशांची मागणी केली. मात्र, मुलीच्या लग्नासाठी पैसे खर्च झाले, अपघात झाल्यामुळे घरी बसून आहे, अशी विविध कारणे सांगत साळुंके याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर त्याने मोबाईल क्रमांकही बंद केला. त्यामुळे मुंढे यांनी थेट शेळगाव येथे त्याच्या घरी जाऊन चौकशी केली. मात्र, तो तेथेही मिळून आला नाही. त्याच्या नातेवाईकांसह गावच्या पोलीस पाटलांची भेट घेऊन मुंढे यांनी व्यवहाराची माहिती दिली.

जवळपास वर्षभर पाठपुरावा करूनही पपई विक्रीचे पैसे मिळाले नसल्याने अखेर मुंढे यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून नागेश लक्ष्मण साळुंके याच्याविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version