रोहित पवार कुठे होते, याची आधी पडताळणी करा; राजकीय चर्चांपेक्षा दुष्काळाचा प्रश्न महत्त्वाचा
कराड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांना उधाण आले असतानाच आमदार रोहित पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक घेतल्याच्या चर्चेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. गुप्त बैठक म्हणजे काय? पक्षाची गुप्त बैठक असते, हे पहिल्यांदाच ऐकतेय. रोहित पवार कुठे होते, याची आधी पडताळणी करा. ही चर्चा हास्यास्पद असल्याचे सुळे यांनी म्हटले.
प्रीतिसंगम येथे पत्रकारांशी संवाद साधताना सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत विचारण्यात आले. त्यावर त्यांनी ‘रामकृष्ण हरी’ असे म्हणत अधिक भाष्य करणे टाळले. रोहित पवार यांच्यासंदर्भातील राजकीय चर्चा जाणीवपूर्वक घडवून आणल्या जात आहेत का, या प्रश्नावरही त्यांनी थेट भाष्य न करता राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधले.
केंद्रीय मंत्रिपदापाठोपाठ आता मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू असल्याबाबत विचारले असता, गेल्या बारा वर्षांपासून माझा शपथविधी होत आहे, अशी मिश्कील प्रतिक्रिया सुळे यांनी दिली. ज्या धोरणात्मक कामांसाठी जनतेने मला निवडून संसदेत पाठवले, त्याबाबत गांभीर्याने कोणी प्रश्न विचारत नाही, याचे दुःख वाटते. संसदेच्या वित्त समितीसह चार संयुक्त संसदीय समित्यांवर मी कार्यरत आहे. या समित्यांमध्ये सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
दिल्लीत आपल्याला जाणीवपूर्वक एकाकी पाडले जात असल्याच्या चर्चेवरही सुळे यांनी भाष्य केले. राज्यासमोर दुष्काळाचे गंभीर संकट आहे. संसदीय जबाबदाऱ्या आणि दुष्काळ निवारणाच्या कामात आम्ही इतके व्यस्त आहोत की, अशा राजकीय चर्चांकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही, असे त्या म्हणाल्या.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत पक्षाच्या सर्व नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. पाण्याचे टँकर, चारा छावण्यांची मागणी, शेतकऱ्यांना मिळालेली आर्थिक मदत याबाबत मतदारसंघनिहाय, जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय अहवाल मागविण्यात आले आहेत. शरद पवार यांच्यासह रोहित पवार आणि पक्षातील सर्व नेते सातत्याने दुष्काळाच्या प्रश्नाचा पाठपुरावा करीत आहेत. महाराष्ट्रातील जनता संकटात असताना राजकारण करण्याची नव्हे, तर जनतेला न्याय देण्याची ही वेळ असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.
- रोहित पवारांची गुप्त बैठक? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ही चर्चा हास्यास्पद!
- सांडपाण्याच्या पुनर्वापरातून धाराशिवमध्ये फुलणार हरित उद्यान!
- धाराशिवमध्ये डिफेन्स कारखाना व लॉजिस्टिक पार्क उभारणार : उद्योगमंत्री उदय सामंत
- येडशी दुर्घटनेतील कृष्णा करंडे यांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत
- ‘युवाशक्ती जागर यात्रे’चा २५ नोव्हेंबरला तुळजापुरातून प्रारंभ
