Home Blog Page 55

बहुत झाले भावी खासदार, कधी जाहीर करणार उमेदवार?महायुतीच्या मेळाव्याकडून कार्यकर्त्यांच्या अपेक्षा

धाराशिव – लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत मेळावा आयोजित केला असून त्यानिमित्ताने उमेदवार जाहीर करावा अशी सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. महायुतीतील प्रहार आणि रयतक्रांती या संघटना सोडून सर्वांनी आपला भावी खासदार जाहीर केला आहे.

जागा राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला सुटणार!

लोकसभा निवडणुकीचा पूर्वानुभव पहाता धाराशिव लोकसभेची जागा लढण्याचा अनुभव राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे आहे. नैसर्गिक स्थितीनुसार या दोन पक्षांना जागा सोडावी लागेल न सुटल्यास दोन्ही घटक पक्षावर अन्याय होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?

महाविकास आघाडीने जागा, उमेदवार याबाबत स्पष्टता ठेवली आहे त्याविरोधात तगडा उमेदवार अपेक्षित आहे मात्र काम कोणाचे करायचे हे निश्चित नसल्याने महायुतीतील कार्यकर्ते अंग झाडून कामाला लागले नाहीत. तीन पक्षातील नेत्यांशी सुसंवाद असणारी व्यक्तीच उमेदवार असावी, क्लीन चेहरा असावा, कोणतेही राजकीय आरोप नसावेत अश्याच व्यक्तीच्या गळ्यात उमेदवारी देण्यात येणार असल्याचे राजकीय निष्णात सांगतात.

आजचा मेळावा निर्णायक

राजकीय दृष्ट्या आज धाराशिव शहरात स्वस्तिक मंगल कार्यालय येथे होणारा महायुतीचा मेळावा निर्णायक असणार आहे. अप्रत्यक्षरीत्या एकमेकांवर टीका केलेले अनेकजण आज मांडीला मांडी लावून कार्यकर्त्यांच्या समोर बसणार आहेत.

आयएनएस चिता, गुलदार आणि कुंभीर 40 वर्षांच्या वैभवशाली देशसेवेनंतर कार्यमुक्त

भारतीय नौदलाची चीता, गुलदार आणि कुंभीर या युद्धनौका 12 जानेवारी 2024 रोजी चार दशकांच्या गौरवशाली देशसेवेनंतर नौदलातून कार्यमुक्त करण्यात आल्या. पोर्ट ब्लेअर येथे पारंपारिक पद्धतीने कार्यमुक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सूर्यास्ताच्या वेळी या तीनही जहाजांवरील राष्ट्रीय ध्वज, नौदल चिन्ह आणि तीन जहाजांचे डिकमिशनिंग प्रतिक शेवटच्या वेळी खाली उतरवण्यात आले.

चीता, गुलदार आणि कुंभीर ही जहाजे पोलंडच्या ग्डिनिया शिपयार्ड येथे पोलनोक्नी वर्ग जहाजे म्हणून बांधली गेली होती आणि ही जहाजे अनुक्रमे 1984, 1985 आणि 1986 मध्ये भारतीय नौदलात सामील करण्यात आली होती. चित्ता हे जहाज आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात अल्पा काळासाठी कोची आणि चेन्नई येथे तर कुंभीर आणि गुलदार हे विशाखापट्टणम येथे तैनात होते. या जहाजांनी नौदलात सूमारे 40 वर्षे सक्रिय सेवा बजावली. या जहाजांनी 12,300 दिवस समुद्र वास्तव्यात एकत्रितपणे सुमारे 17 लाख समुद्री मैलांचा प्रवास केला आहे. अंदमान आणि निकोबार कमांडचे उभयचर प्लॅटफॉर्म म्हणून, या जहाजांनी सैन्याच्या तुकड्या किनाऱ्यावर उतरवण्यासाठी 1300 पेक्षा अधिक समुद्रकिनारी मोहीमा केल्या आहेत.

आपल्या गौरवशाली सेवा काळात या जहाजांनी अनेक सागरी सुरक्षा मोहिमा आणि मानवतावादी सहाय्य तसेच आपत्ती निवारण कार्यात भाग घेतला आहे. शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याची तस्करी तसेच भारत आणि श्रीलंकेच्या सीमेवरील अवैध स्थलांतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी मे 1990 मध्ये ऑपरेशन ताशा दरम्यान भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या आयपीकेएफ मोहीमेचा भाग म्हणून ऑपरेशन अमन तसेच 1997 मध्ये श्रीलंकेवर चक्रीवादळामुळे कोसळलेले संकट आणि 2004 मध्ये हिंदी महासागरातील त्सुनामी नंतरच्या मदत कार्यात या जहाजांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

चित्ता, गुलदार आणि कुंभीर या भारतीय नौदलाच्या जहाजांनी सागरी सेवा क्षेत्रात एक अमिट छाप उमटवली आहे आणि त्यांची कार्यमुक्ती झाल्यामुळे भारतीय नौदलाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अध्याय संपला आहे.

एअर मार्शल साजू बालकृष्णन, एव्हीएसएम, व्हीएम, अंदमान आणि निकोबार कमांड (CINCAN) चे कमांडर-इन-चीफ आणि व्हाइस ॲडमिरल तरुण सोबती, एव्हीएसएम , व्हीएसएम यांच्यासह नौदल उपप्रमुख, ध्वज अधिकारी, माजी कमांडिंग अधिकारी आणि या तीनही जहाजांचा सेवादल ताफा पोर्ट ब्लेअर येथे संपन्न झालेल्या कार्यमुक्ती समारंभात सहभागी झाला होता. एकाच वर्गाच्या तीन युद्धनौका एकाच दिवशी कार्यमुक्त करण्यात आल्याने हा कार्यक्रम खूप अनोखा बनला होता.

अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्यांवर आता फौजदारी कार्यवाहीचा धाराशिव नगरपालिकेचा इशारा

धाराशिव – शहरातील अनधिकृत नळ कनेक्शनवर नगरपालिकेची नजर राहणार असून त्यांच्यावर फौजजादरी कार्यवाही करण्यात येणार आहे.

तसेच ज्या नागरिकांकडे अनाधिकृत नळ कनेक्शन आहेत अश्या नागरिकांनी दि. २२ जानेवारी पर्यंत नळ कनेक्शन शुल्क व दंडात्मक रक्कम घरगुती नळ कनेक्शनसाठी रक्कम रु. ४,०००/- व व्यावसायिक नळ कनेक्शन साठी रक्कम रु.१०,०००/- भरणा करून सदरील नळ कनेक्शन अधिकृत करून घ्यावे. मुदत संपल्यानंतर शहरातील ज्या नागरिकाकडे अनाधिकृत नळ कनेक्शन असल्याचे निदर्शनास येईल अश्या नागरिकाचे नळ कनेक्शन बंद करून संबंधितावर फौजदारी कार्यवाही करण्यात येईल असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

मराठा समाज बांधवांसाठी जनसुविधा पुरवाव्यात : सुप्रीम कोर्टाचे अधिवक्ते डॉ.राजसाहेब पाटील

मुंबई – मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज बांधव हे आमरण उपोषण करण्यासाठी मुंबईकडे येत असून, त्यांच्यासाठी जनसुविधा, अत्यावश्यक सेवा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी सुप्रीम कोर्टाचे अधिवक्ते डॉ.राजसाहेब पाटील यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात डॉ.राजसाहेब पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, सकल मराठा समाज आपल्या आरक्षण व अन्य विविध मागण्यांसाठी २० जानेवारीपासून मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई येथे मोठ्या संख्येने, आमरण उपोषणासाठी येत आहे. आपणास आग्रहाची विनंती की, मराठा समाजासाठी आमरण उपोषणाचे ठिकाण व मराठा मार्ग येथे वैद्यकीय सेवा, अग्निशमन तथा रुग्णवाहिका व तत्सम अत्यावश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. विविध स्तरातील ग्रामीण भागातील मराठा समाज बांधव, भगिनी, युवा, कष्टकरी, शेतकरी, जेष्ठ नागरिक, लहान थोर यांच्यासाठी अत्यावश्यक सेवा यामध्ये शौचालय, आरोग्य व्यवस्था, वैद्यकीय सुविधा रुग्णवाहिका,प्रथमोपचार, औषधोपचार, औषधी, फिरते दवाखाने, हॉस्पिटल, पोलीस संरक्षण तसेच अन्न व पाणी, निवाऱ्याची, जसे की मंडप, ऊन, वारा व पाऊस, थंडी यांपासून संरक्षण मिळण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच मराठा समाज बांधवांचे संरक्षण, मराठा मार्गावरील व मुंबईमधील उपोषणस्थळी वाहतूक व्यवस्थेचे वाहतूक यंत्रणेमार्फत येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था याचे योग्य नियोजन करण्यात यावे. महाराष्ट्र शासनाने वरील सर्व बाबींचा विचार करावा व जनसुविधा, अत्यावश्यक सेवा,अन्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती या निवेदनात डॉ.राजसाहेब पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

भाजप मध्ये बरेच मोठे प्रवेश होतील – आ. राणाजगजितसिंह पाटील

लोकसभेपूर्वी फुल्ल इन्कमींग

धाराशिव – जिल्ह्यात येत्या काही काळात बरेच जण भाजपचे कमळ हाती घेतील या चर्चेला आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दुजोरा दिला आहे. मात्र नेमके प्रवेश कोणाचे होणार आहेत, केव्हा होणार आहेत हे सांगायला मात्र त्यांनी नकार दिला. काँग्रेसचे नेते बसवराज पाटील यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेवर देखील त्यांनी बोलण्यास नकार दिला.
शहरात आज महायुतीतील घटकपक्ष असलेल्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट), प्रहार, रयतक्रांती यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून महायुतीचा मेळावा १४ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी आ. ज्ञानराज चौगुले, सुरेश बिराजदार, दत्ता साळुंके, राजाभाऊ ओव्हाळ, सुरज साळुंके, मयूर काकडे, सुरज अबाचने आदी उपस्थित होते.

समन्वय समिती चे काम

महायुतीतील घटक पक्षात समन्वय साधण्याचे काम ही समिती करणार असून प्रत्येक आठवड्याला समितीतील सदस्यांची बैठक होणार आहे. शासकीय समित्यांवर कोणाची नेमणूक करायची याबाबत देखील चर्चा याच समितीत होणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीचे बँक खाते गोठवताच शेतकऱ्यांना विमा कंपनी प्रलंबित रक्कम देण्यास तयार

धाराशिव दि.9 (प्रतिनिधी ) प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 मध्ये सोयाबीन पिकाच्या 97 टक्के पुर्वसुचना ह्या क्रॉप कॅलेंडरनुसार 15 ऑक्टोबरपूर्वी प्राप्त झालेल्या असल्याने मार्गदर्शक सूचनेतील मुद्दा क्रं.21.5.10 लागू होत नाही.विमा कंपनीने 50:50 भारांकन न लावता पंचनाम्यातील नमूद नुकसानीचे क्षेत्र व नुकसानीच्या टक्केवारीनुसार नुकसान भरपाई वितरीत करावी.असे आदेश विमा कंपनीस जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती,विभागस्तरीय तक्रार निवारण समिती,राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती व राज्यस्तरीय समितीचे आदेशानुसार विमा कंपनीस दिलेले होते.परंतु विमा कंपनीने वरील समितीच्या आदेशाची अंमलबजावणी करीत नसल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व शेतकरी यांनी पाठपुरावा केल्याने भारतीय कृषि विमा कंपनीच्या विरोधात जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नूसार वसुलीची कार्यवाही प्रस्तावित करुन विमा कंपनीचे बँक खाते गोठविलेले असता विमा कंपनीचे अधिकारी रविश लोहीया,व्यवस्थापक,भारतीय कृषि विमा कंपनी,दिलीप डांगे
उपव्यवस्थापक,भारतीय कृषि विमा कंपनी व मच्छिंद्र सावंत क्षेत्रिय व्यवस्थापक,भारतीय कृषि विमा कंपनी लि.मुंबई यांनी 8 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी यांची समक्ष भेट घेवून वसुलीची प्रस्तावित करण्यात आलेली रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्यास विमा कंपनी तयार असल्याबाबतचे लेखी पत्र देवून प्रस्तावित करण्यात आलेली कार्यवाही परत घेणेबाबत विनंती केली.

त्याअनुषंगाने 8 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांचे अध्यक्षतेखाली विमा कंपनीच्या अधिकाऱ्यासमवेत जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न झाली.प्रस्तावित करण्यात आलेल्या वसुलीच्या रक्कमेपैकी 294 कोटी 8 लक्ष रुपयांपैकी 12 कोटी रुपये हे हंगामातील प्रतिकुल परिस्थिती(Mid Season Adversity) अंतर्गत वितरीत करण्यात आलेले आहे.विमा हप्त्याची रक्कम 50 कोटी रुपये अद्याप विमा कंपनीस प्राप्त नसल्याने उर्वरीत 232 कोटी रुपये द 25 जानेवारी 2024 पुर्वी वितरीत करण्याबाबत विमा कंपनीस आदेश दिले आहे.या आदेशाद्वारे रक्कम वितरित करण्यास विमा कंपनीने सहमती दर्शविलेली आहे.तसेच उर्वरीत रक्कम 50 कोटी रुपये विमा कंपनीस प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनी वितरीत करील असे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी समितीला अवगत केले.

विमा कंपनीने वरीलप्रमाणे विहीत मुदतीत कार्यवाही पुर्ण न केल्यास विमा कंपनीच्या विरोधात परत महसुली वसुली प्रमाणपत्र (आर.आर.सी.) ची कार्यवाही प्रस्तावित करण्याचे अधिन राहून विमा कंपनीच्या विरोधात प्रस्तावित करण्यात आलेली कारवाईस स्थगिती दिलेली असुन 28 जानेवारीपर्यंत 232 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनीस दिलेल्या आहेत.यामध्ये उर्वरीत 50 कोटी काही कालावधीनंतर जमा होणार असल्याने त्यासाठी काही अधिसुचित मंडळाचा विमा उशिरा जमा होईल यांची सर्वांनी नोंद घ्यावी. असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,धाराशिव यांनी कळविले आहे.

उलट्या बोंबा मारण्याचं थांबवावं – वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांचा माजी मुख्यमंत्र्यांना सल्ला

मुंबई – लोकसभा निवडणुका जस जश्या जवळ येत आहेत तस तसे राज्यातील राजकारण तापत चालले आहे. आघाडी, जागावाटप याच्या चर्चा प्राथमिक स्तरावर आहेत. पंतप्रधान मोदी आणि भाजप यांना थेट आव्हान देणाऱ्यांपैकी वंचित बहुजन आघाडी सर्वात आघाडीवर आहे. मात्र या पक्षाला इंडिया आघाडीत घेण्यासंदर्भात सध्या उलटसुलट चर्चा सुरू असतात त्याला विशेषतः काँग्रेसच्या नेत्यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी उत्तर दिले आहे ते म्हणतात की,
काँग्रेस मधील 23 बंडखोर नेत्यांपैकी एक असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांना असा सल्ला दिला आहे की, त्यांनी भडक वक्तव्य करू नयेत आणि इंडिया आघाडी किंवा काँग्रेसच्या नेत्यांशी भेटून चर्चा करावी. त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की आतापर्यंत आम्ही 3 वेळा पत्र लिहिलेले आहेत. अनेकदा माध्यमांमधून, समाज माध्यमांमधून आणि सभांमधून आम्हाला इंडिया आघाडी मध्ये सहभागी व्हायचंय याची जाहीर वाच्यता केलेली आहे, सगळ्या जगाला हे माहिती आहे. मात्र तरीही अद्याप आम्हाला तुमच्या पक्षाकडून किंवा इंडिया अलायन्स कडून कुठलंही अधिकृत निमंत्रण न आल्यामुळे आम्ही त्याचा भाग होऊ शकलो नाही.

राहिला दुसरा मुद्दा, ज्या वेळेला मल्लिकार्जुन खरगे यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावा की न घ्यावं या संदर्भात चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील काही नेत्यांना बोलावलं होतं, त्यात पृथ्वीराज चव्हाण होते. त्या बैठकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास विरोध केला होता. स्वतःच्या पक्षाच्या नेत्याला एक वेगळा सल्ला द्यायचा की वंचितला सोबत घेऊ नका, आणि बाहेर येऊन माध्यमांमध्ये वंचितला वेगळे सल्ले जायचे, सारवासारव करणारी भूमिका मांडायची या भूमिकेचे वागण्याचा नेमकं कारण काय आहे? पृथ्वीराज चव्हाण यांना मी सांगू इच्छितो की याला मराठीत म्हण आहे, चोराच्या उलट्या बोंबा. एकीकडे विरोध करायचा आतून आणि बाहेर येऊन वेगळच काहीतरी सांगायचं त्यामुळे माझी विनंती त्यांना की त्यांनी या अशा पद्धतीच्या उलट्या बोंबा मारण्याचं थांबवावं आणि सरळ सोयीने काही जर चांगलं जुळून येत असेल तर त्याला सहकार्य करावं. असेही सिद्धार्थ मोकळे
व्हिडिओ मध्ये म्हणाले आहेत.

गंधोरा शालेय समिती अध्यक्ष पदी सत्यवान साखरे तर उपाध्यक्ष पदी इसुब शेख

सलगरा,दि.९(प्रतिक भोसले) – तुळजापूर तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा गंधोरा येथे (दि.६जानेवारी) रोजी शालेय व्यवस्थापन शिक्षण समीतीवर अध्यक्ष- सत्यवान साखरे व उपाध्यक्ष- इसुब शेख यांची बिनविरोध निवड केली आहे. जि.प.प्रा.शाळा गंधोरा शाळेचा व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ संपल्यामुळे पालकसभा घेऊन नवीन शालेय व्यवस्थापन समिती पुनर्गठित करण्यात आली आहे. पालक सभेमधून चर्चा करून सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समिती मध्ये घेण्यासाठी पात्र संवर्गनिहाय नावे निवडून घोषित करण्यात आली, ज्या मध्ये एकूण ११ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली. या मध्ये पालक, शिक्षणप्रेमी नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक प्रतिनिधी व सचिव म्हणून मुख्याध्यापक यांची नावे घोषित करून निवड करण्यात आली आहे.

या मध्ये अध्यक्ष- साखरे सत्यवान काशिनाथ, उपाध्यक्ष- शेख इसुब नबी, सदस्य- सोनटक्के लिंबाजी आगतराव, सदस्य- देडे रंगनाथ दामू, सदस्य- भोसले शंकर सुदाम, सदस्य- श्रीमती एकंडे सुमित्रा मारुती, सदस्य- श्रीमती कानडे पद्मिनी कृष्णाथ, शिक्षणप्रेमी नागरिक- पाटील प्रविण पद्माकर, ग्रा.पं.सदस्य- श्रीमती भोसले चंपाबाई बलभीम, सचिव- मुख्याध्यापक जट्टे विश्वनाथ शिवलिंगप्पा, शिक्षक प्रतिनिधी- येळवे अमित प्रकाशराव आदींची निवड करण्यात आली आहे.

या निवडीच्या कार्यक्रमावेळी पोलिस पाटील गजेंद्र कोनाळे, माजी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष शामराव (अण्णा) मुसळे, प्रवीण (बाळू) पाटील, तानाजी भोसले, तुळशीराम एकंडे, संभाजी भोसले, लक्ष्मण पाटील, मोजम मुल्ला, जीवन पाटील, फुलचंद भोसले यांच्या सह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टपाल कार्यालयाची फ्रँचायझी आउटलेट्स उभारण्यासाठी इंडिया पोस्ट 1 फेब्रुवारी 2024 पासून नवीन फ्रँचायझी योजना सुरू करणार

इंडिया पोस्ट ‘क्लिक एन बुक’ सेवा महाराष्ट्रातील 141 टपाल कार्यालयात उपलब्ध

इंडिया पोस्ट अन्वित सेवा मुंबईतील प्रमुख ठिकाणी सुरू होणार

महाराष्ट्र आणि गोवा राज्यात 69 डाक घर निर्यात केंद्रे कार्यान्वित

मुंबई – इंडिया पोस्ट हे 89% ग्रामीण भागातील टपाल कार्यालयांसह 1.55 लाखाहून अधिक टपाल कार्यालये असणारे आणि सातत्याने टपाल कार्यालयांची मागणी असणारे जगातील सर्वात मोठे पोस्टल नेटवर्क आहे. तरीही ग्राहकांकडून विशेषत: नव्याने विकसित होत असलेल्या शहरी समूहांमध्ये आणखी टपाल कार्यालये उघडण्याची मागणी ग्राहकांकडून निरंतर होत आहे. याची पूर्तता करण्यासाठी, पोस्ट ऑफिस फ्रँचायझी आउटलेट्स उभारण्यासाठी इंडिया पोस्ट नवीन फ्रँचायझी योजना 1 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होत आहे.

विक्रयाधिकार केंद्र (फ्रँचायझी आउटलेटद्वारे) काय दिले जाऊ शकते?

अंतर्देशीय स्पीड पोस्टचे बुकिंग नॉन-सीओडी (कागदपत्रे आणि पार्सल), अंतर्देशीय रजिस्टर पत्रे, ई मनी ऑर्डर

टपाल तिकीट आणि लेखनसाहित्याची विक्री

रेव्हेन्यू स्टॅम्पची विक्री, केंद्रीय भर्ती शुल्क स्टॅम्प इ.सह किरकोळ सेवा.

पोस्टल जीवन विमा उत्पादनांसाठी थेट एजंट म्हणून कार्य करणे आणि प्रिमियम संकलनासह संबंधित विक्रीपश्चात  सेवा प्रदान करणे.

फ्रँचायझी कसे बनावे?

फ्रँचायझीसाठी अर्जदारांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. व्यक्ती तसेच संस्था/संघटना/इतर संस्था जसे कोपऱ्यावरील दुकान, पानवाला, किराणावाला, लेखनसाहित्याची दुकाने, छोटे दुकानदार इ.

वय: 18 वर्षांपेक्षा जास्त. उत्पादनांच्या श्रेणीचे व्यवस्थापन आणि विपणन करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींची निवड करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही.

व्यक्ती/संस्था भारतीय डाकसोबत करार करेल.

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त शाळेतून 10वी उत्तीर्ण. स्थानिक भाषा आणि इंग्रजीचे चांगले ज्ञान असलेली; संगणक साक्षर; स्मार्ट फोन वापराबाबत परिचित; वैध पॅन क्रमांक असलेली व्यक्ती फ्रँचायझी होण्यासाठी अर्ज करू शकते.

अर्जदाराला टपाल कार्यालयात सुरक्षा ठेव म्हणून रुपये 10,000/- जमा करावे लागतील.

फ्रँचायझीसाठी कमिशन:

फ्रँचायझींना प्रत्येक रजिस्टर पत्रासाठी 3.00 रु,  200/- पेक्षा जास्त मूल्याच्या प्रत्येक मनी ऑर्डरसाठी 5.00 रुपये, टपाल तिकीट आणि लेखनसाहित्य विक्रीवर 5% कमिशन मिळेल. बुक केलेल्या स्पीड पोस्ट लेखासाठी कमिशन दर अतिशय आकर्षक आहे आणि फ्रँचायझी त्याने केलेल्या मासिक व्यवसायाच्या 7% ते 25% कमिशन मिळवेल.

निवड निकष:

टपाल विभागीय प्रमुख हे फ्रँचायझीला संलग्न करण्यासाठी सक्षम अधिकारी असतील.

इंडिया पोस्टने ‘क्लिक एन बुक’ सेवा देखील सुरू केली आहे, एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म जो ग्राहकांना स्पीड पोस्ट, रजिस्टर पत्रे आणि पार्सल बुक करण्यास अनुमती देतो. सध्या ही सेवा महाराष्ट्र पोस्टल सर्कलच्या 141 टपाल कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे.

या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना टपाल विभागाच्या https://www.indiapost.gov.in/Help/Pages/ClicknBook_individuals.aspx या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. यासाठी फक्त  50/- रुपये पिकअप शुल्क आकारणी केली जाईल. ही  सुविधा 500/- रुपये  पेक्षा जास्त शुल्क असलेल्या वस्तूंसाठी   पिकअप सेवा मोफत प्रदान केली जाईल. यासाठी डीओपीने अधिकृत केलेल्या ऑनलाइन पेमेंट गेटवेद्वारे पेमेंट करावे लागेल.

जे लोक त्यांच्या वस्तूंच्या बुकिंगसाठी नियमित कामकाजाच्या वेळेत पोस्ट ऑफिसला भेट देऊ शकत नाहीत  अशा ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि काम करणाऱ्या व्यक्तींसाठी ही सुविधा फायदेशीर ठरेल .

स्मार्ट आणि डिजिटल पार्सल वितरण प्रणाली (एएनव्हीआयटी सेवा) पार्सल वितरणात एक क्रांती घडवून आणत आहे. ही स्मार्ट आणि विश्वासार्ह वितरण प्रणाली पोस्टल परिसरातून कधीही (24/7) पार्सल/वस्तू गोळा करण्यासाठी आखली गेली आहे. या उच्च-तंत्र असलेल्या सुव्यवस्थित आणि कार्यक्षम वितरण प्रणाली द्वारे लोकांना कोणत्याही खर्चाशिवाय त्यांच्या पार्सलची ओटीपी आधारित डिलिव्हरी प्रदान केली जाईल. ही सेवा सध्या ठाणे शहरातील ठाणे मुख्य पोस्ट ऑफिस, नवी मुंबई शहरातील वाशी सब पोस्ट ऑफिस आणि पुणे  शहरातील इन्फोटेक पार्क सब पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. एएनव्हीआयटी सेवा मुंबई जीपीओ, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, घाटकोपर पश्चिम आणि मुंबईतील आणखी 5 ठिकाणी सुरु केली जाणार असून ही सेवा नवीन क्षितिजांवर आपले पंख पसरवण्यासाठी सज्ज आहे.

निर्यात उपक्रमांना चालना देण्यासाठी आणि निर्यात संबंधी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तसेच निर्यातदारांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी टपाल विभागाने महाराष्ट्र राज्य आणि गोव्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि प्रमुख पोस्ट ऑफिसमध्ये डाक घर निर्यात केंद्रे (डीएनकेएस) सुरू केली आहेत. पार्सल पॅकेजिंग मटेरियल, पोस्टल बिल ऑफ एक्सचेंज (पीबीई),  सीमाशुल्क क्लियरन्स सुविधा, मोठ्या प्रमाणात ग्राहकांसाठी पिकअप सुविधा इत्यादी सुविधा निर्यातदारांना एकाच छताखाली पुरवल्या जात आहेत. आजपर्यंत महाराष्ट्र आणि गोवा राज्यात 69 डाक घर निर्यात केंद्रे (डीएनकेएस) कार्यान्वित झाली आहेत.

नागरिकांसाठी ” राईट टू हेल्थ ” कायदा आणणार -आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत

0

धाराशिव दि.8 (प्रतिनिधी) राज्यातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी लवकरच नागरिकांसाठी
” राईट टू हेल्थ ” कायदा आणणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांनी केले.

आज 8 जानेवारी रोजी शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात 50 खाटांचे सी सी यू ,आय पी एच एल प्रयोगशाळा आणि डी ई आय सी फेझ 2 या कामांचे भुमिपुजन पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत बोलत होते.आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे,पोलीस अधीक्षक अतुल कुळकर्णी,विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ.अर्चना भोसले,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश हरिदास, ऍड. मिलिंद पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री डॉ.सावंत पुढे म्हणाले,यापूर्वी जागरूक पालक सुदृढ बालक,माता सुरक्षित तर घर सुरक्षित आणि बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तसेच प्रधानमंत्री आयुष्यमान योजना आणि आभार अशा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी राज्य शासन घेत आहे.सध्या तरुणाई वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांच्या अधीन होत आहे.त्यामुळे ” आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे ” हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती करण्याची मोहीम राबविण्याबाबत आरोग्य यंत्रणेला प्रा.डॉ.सावंत यांनी निर्देश दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य उपसंचालक अर्चना भोसले यांनी, सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी तर उपस्थितांचे आभार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला यांनी मानले.

याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थीनी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक,अधिकारी,कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.