Home Blog Page 311

दैनिक जनमत E Paper २४ नोव्हेंबर

बाबा नशीब तुम्हाला मुलगा नाही…. ते भावनिक विधान पुन्हा चर्चेत

सुप्रिया सुळेंच्या त्या भावनिक विधानाची जोरदार चर्चा..
राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी बाबा नशीब तुम्हाला मुलगा नाही असं भावनिक विधान केलं होतं. विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीतील अनेक बडे नेते भाजप मध्ये गेले होते. शरद पवार यांच्यासोबत राजकारणात राहिलेल्या त्या नेत्यांच्या पित्याना आपल्या मुलाला भाजप मध्ये जाणं आवडलं नसेल यावरून सुळे यांनी हे भावनिक विधान केले होते. तसेच काहीही संकट आले तर मुली कायम आपल्या वडिलांसोबत असतात असही त्या म्हणाल्या होत्या.
आज राष्ट्रवादीचे बडे नेते आणि सुप्रिया सुळे यांचे बंधू अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या त्या विधानाची जोरात चर्चा सुरू आहे. त्यांच्या भावनिक विधानाची चर्चा त्या वेळी झाली होती आणि आज ती चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. 

दैनिक जनमत E Paper २३ नोव्हेंबर

अणदूर येथील श्री खंडोबा यात्रेस २७ नोव्हेंबर पासून प्रारंभ

अणदूर – तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील कुलदैवत श्री खंडोबाची यात्रा येत्या २७  नोव्हेंबर रोजी भरत आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असून यात्रेची जय्यत करण्‍यात येत आहे.

अणदूरच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ .३० वाजता श्री खंडोबाची महापूजा होईल. दिवसभर भंडारा – खोबरे उधळणे, महानैवेद्य दाखवणे आदी कार्यक्रम पार पडतील. रात्री दहा वाजता श्रीचा छबीना – मिरवणुक काढण्यात येईल. रात्री १२ वाजता नळदुर्गच्या मानकर्यांचे आगमन, त्यानंतर मानपानाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर अणदूर-मैलारपूर(नळदुर्ग) च्या मानकर्यांत खंडोबाची मूळ मूर्ती नेणे व आणण्याचा लेखी करार होईल. मध्यरात्री २.३० वाजता खंडोबाच्या मूर्तीच्या पालखीचे मैलारपूर (नळदुर्ग) कडे प्रस्थान होईल. पहाटे ५ वाजता मैलारपूर (नळदुर्ग) मंदिरात खंडोबाचे आगमन नंतर विधीवत प्रतिष्ठापना केली जाईल.

अणदूरच्या यात्रेनिमित्त श्री. खंडोबाच्या मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे, तसेच भाविकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. श्री खंडोबा मंदिर समिती व श्री खंडोबा यात्रा कमिटी यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहे.

श्री खंडोबा आणि बाणाई विवाहस्थळ

श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असून खंडोबाची महाराष्ट्रात ८  प्रमुख ठिकाणे आहेत, पैकी अणदूर-मैलारपूर (नळदुर्ग) महत्वाचे स्थान म्हणून ओळखले जाते. दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा नळदुर्ग येथे प्रकट झाले, अशी आख्यायिका आहे. श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह नळदुर्ग जि. उस्मानाबाद येथे झाला होता म्हणून या स्थानाला अन्यन्यसाधारण महत्व आहे,  आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अणदूर व मैलारपूर (नळदुर्ग) या दोन्ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे असून दोन्ही ठिकाणचे अंतर चार कि.मी. आहे. खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने व मैलारपूर (नळदुर्ग) येथे पावणे दोन महिने वास्तव्य असते. अणदूरच्या यात्रेनंतर खंडोबाचे मैलारपूर (नळदुर्ग) कडे प्रस्थान होणार आहे.

२८ नोव्हेंबर रोजी कुस्तीचा आखाडा
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ नोव्हेंबर रोजी कुस्तीचा भव्य आखाडा भरणार आहे, या आखाड्यात महाराष्ट्रातील नामवंत पैलवान हजेरी लावणार असून, ११ हजार ते ५१ हजार बक्षिस ठेवण्यात आले आहे, त्याची जय्यत तयारी सुरु आहे,

नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शांततेत साहित्य संमेलनासाठी नगरपालिका देणार दीड लाख रुपये

उस्मानाबाद – एरव्ही गाजनारी गोंधळात पार पडणारी उस्मानाबाद नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शांततेत पार पडली. सभेमध्ये ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दीड लाख रुपयाचा निधी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. गटनेते युवराज नळे यांनी १० लाख रुपयाची मागणी केली होती परंतु शासन निर्णयानुसार दीड लाख देता येत असल्याने नगरपालिकेला तेवढीच मदत करता येणार आहे.वि

षय पत्रिकेतील ३२ विषय चर्चा करून मंजूर करण्यात आले. त्यापैकी शहरातील शाळांची असणारी दुरुस्ती सीएसआर फंडातून करण्यात येणार आहे रक्कम कमी पडल्यास इतर निधी वापरून या दुरुस्ती करण्यात येणार आहेत. मालमत्ता कराचे सर्वेक्षण करताना ज्यांची एजन्सीच्या चुकीने भोगवटादार अशी नोंद झाली आहे अश्या नोंदी  जुने रेकॉर्ड तपासून रद्द केल्या जाणार आहेत. या सर्वसाधारण सभेला नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळर मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

एक रस्ता पाडला महागात!
कचरा डेपोकडे जाणारा रस्ता वेळेत न झाल्याने त्याचे परिणाम शहरवासीयांना भोगावे लागले आहेत. ऑक्टोबर महिन्यात पावसाने उघडीप न दिल्याने कचरा डेपोच्या कच्च्या रस्त्यातून घंटागाडी आत जाऊ शकली नाही परिणामी कचरा संकलन कमी होऊन अस्वछता वाढून साथरोग बळावले. विशेष म्हणजे या रस्त्यासाठी नगराध्यक्षांनी बक्षिसाची रक्कम मंजूर केली आहे. अपुऱ्या पाठपुराव्यामुळे हा रस्ता अद्याप झाला नाही

विद्येचे माहेरघर ते मराठवाड्याचे प्रवेशद्वार सायकल फेरी साहित्य संमेलनासाठी सॉफ्टवेअर अभियंत्याचा अनोखा प्रयोग

उस्मानाबाद, दि. 19- मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात जानेवारी 2020 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाचा प्रचार आणि प्रसिध्दी सर्वदूर व्हावी यासाठी विद्येचे माहेरघर असलेले पुणे ते उस्मानाबाद, अशी सायकल फेरी बुधवारी सकाळी 6 वाजता निघणार आहे. साहित्य संमेलनासाठी सॉफ्टवेअर अभियंत्याने स्वीकारलेल्या या अनोख्या उपक्रमाचे स्वागत करण्यासाठी उस्मानाबादकरही उत्सुक आहेत.

उस्मानाबाद येथे पहिल्यांदाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जात आहे. त्यानिमित्ताने विद्येचे माहेरघर पुणे ते मराठवाड्याचे प्रवेशद्वार उस्मानाबाद असा सायकल प्रवास करण्याचा संकल्प संगणक अभियंता प्रथमेश तुगावकर यांनी केला आहे.

 पुणे रेल्वेस्थानक येथून बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता तुगावकर सायकलसह उस्मानाबादच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. पहिल्या दिवशी सुमारे 100 किलोमीटरचा प्रवास सायकलद्वारे केल्यानंतर बिगवण या ठिकाणी मुक्काम करून दुसर्‍या दिवशीचा मुक्काम कुर्डूवाडी येथे करणार आहेत. तिसर्‍या दिवशी शुक्रवार, 22 नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद शहरात तुगावकर यांची सायकल फेरी पोहोचणार आहे. साहित्य संमेलनाचा प्रचार आणि प्रसिध्दी त्यासोबत तरूणाईमध्ये सायकलविषयी आस्था वाढावी याकरिता त्यांनी हा अफलातून प्रयोग अंगीकारला आहे.

नोकरीनिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असलेले तुगावकर हे मूळचे उस्मानाबाद येथील रहिवाशी आहेत. सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत असलेले तुगावकर लवकरच विदेशातील एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीमध्ये रूजू होत आहेत. तत्पूर्वी आपल्या गावी होत असलेल्या साहित्य संमेलनाबद्दलची आस्था व्यक्त करण्यासाठी त्यांनी उत्स्फूर्तपणे सायकलफेरी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. संमेलनाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, उस्मानाबाद जिल्ह्यातील साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान त्यानिमित्ताने महाराष्ट्रासमोर यावे, असा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.

साहित्यसेवा करण्याची ही छोटी संधी ः तुगावकर

कविता, गझल लेखन त्याबरोबरच आपण एक सायकलिस्ट आहोत. दररोज ऑफिसला जातानाही आपण सायकलचा वापर करतो. सायकलींची संस्कृती तरूण पिढीमध्ये वाढावी यासाठी व्यक्तीगत पातळीवर आपण सतत प्रयत्नशील असतो. त्यातूनच साहित्य संमेलनाचे निमंत्रण सर्वांना देण्यासाठी या सायकल फेरीचे आयोजन केले आहे. मराठवाडा आणि त्यातल्या त्यात उस्मानाबाद परिसराने मराठी, उर्दू आणि दखणी या तीन भाषांना जन्म दिला आहे. हे साहित्यिक योगदान खूप मोठे आहे. त्याची सेवा करण्याची छोटीशी संधी आणि त्याचा प्रचार, प्रसार करण्यासाठी आपण विद्येचे माहेरघर ते मराठवाड्याचे प्रवेशद्वार असा सायकल प्रवास करणार असल्याची माहिती प्रथमेश तुगावकर यांनी दिली

लहान मुलांचे शोषण होत असल्यास चाईल्ड -लाईनच्या ‘1098’ या नंबरवर संपर्क करावा- डॉ. वसुधा दिग्गज दापके- देशमुख


उस्मानाबाद – घटनेने   बालकांना हक्क दिले आहेत पण त्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सर्व समाजाने  एक होऊन काम  करायचे आहे. प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा उचलला तरी आपण समाजात मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करू शकतो, व त्यांचे बालपण अबाधित राहू शकतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ  डॉ. वसुधा दिग्गज दापके- देशमुख यांनी केले.

चाईल्ड- लाईन व सह्याद्री फाऊंडेशन्स उस्मानाबाद  यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चाईल्ड- लाईन से दोस्ती’  या उपक्रमाअंतर्गत सांजा ता.जि.  उस्मानाबाद येथील जि. प. आंतरराष्ट्रीय माध्यमिक शाळेमध्ये ‘नकोसा स्पर्श’ (चांगला व वाईट स्पर्श) याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच संजय (नाना) सूर्यवंशी हे होते. अध्यक्षीय भाषणात बोलताना  शिक्षकांनी बालकांची मानसिक स्थिती ओळखून त्यांच्याशी  संवाद साधण्याचे आवाहन केले. बाल संरक्षण अधिकारी श्रीमती वैशाली पाटील, विधी व पर्यवेक्षक  अधिकारी  अँड. जयश्री भाले यांनी यावेळी बालकांच्या सुरक्षेविषयी विचार व्यक्त केले. 
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भालचंद्र मोहिते, वनकळस टी.एन. श्रीमती सलगर, घायाळ, यंदे,चाईल्ड- लाईन चे समन्वयक ज्ञानेश्वर गिरी, टीम मेंबर विकास चव्हाण, राजेंद्र कापसे, सह्याद्री फाऊंडेशन्सचे गजानन पाटील, यांच्यासह पालक, तसेच गावातील महिला उपस्थित होत्या. 
 सूत्रसंचालन विद्यार्थ्यीनी कु. विद्या डोलारे यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरवसे आर. जी. व आभार श्रीमती दारफळकर एस.एस. यांनी मानले.