नगरपालिका विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध सत्कार करताना मात्र प्लास्टीकचा पुष्पगुच्छ?
सत्कार करताना मात्र प्लास्टीकचा पुष्पगुच्छ?
उस्मानाबाद/प्रतिनिधी
गेल्या वर्षभरापासुन रिक्त असलेल्या उस्मानाबाद नगरपालिकेच्या विषय समिती सभापती निवडी अखेर शुक्रवारी पार पडल्या. भाजपयुक्त राष्ट्रवादीने विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड करत वर्चस्व सिध्द करुन नगरपालिकेत आपली जागा पक्की केली. मात्र चर्चा होती सभापती निवडीनंतर सत्कार करताना दिलेल्या पुष्पगुच्छाची, पुष्पगुच्छात फुलांसोबत असलेल्या प्लास्टीकची.
महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यापासुन प्लास्टीक वापरावर बंदी आहे. प्लास्टीक वापरणार्यावर नगरपालिकेने कारवाया करत दंड वसुल केला आहे. मात्र उस्मानाबाद नगरपालिकेच्या नुतन विषय समित्यांच्या सभापतींचा सत्कार करताना मात्र प्लास्टीक असलेला पुष्पगुच्छ वापरल्याने तसेच तो पुष्पगुच्छ आणताना भली मोठी प्लास्टीकची पिशवी वापरल्याने सामान्यांना वेगळा न्याय आणि प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना वेगळा न्याय असतो का? अशी चर्चा नगरपालिकेत सुरु होती. विशेष म्हणजे हा सत्कार खुद्द जिल्हाधिकार्यांनी निवडणुकीसाठी प्राधिकृत केलेल्या उपविभागीय दंडाधिकारी रामेश्वर रोडगे, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, उपमुख्याधिकारी पृथ्वीराज पवार यांच्या हस्ते आणि समक्ष करण्यात आल्याने चर्चेला उधान आले आहे.
शुक्रवारी सकाळी ११.०० वाजता विषय समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया अध्यक्षांच्या दालनात सुरु झाली. भाजप आणि राष्ट्रवादी मिळुन २३ असे संख्याबळ होत असल्याने शिवसेना, कॉंग्रेस आणि विधानसभा निवडणुकीवेळी शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीने अर्ज भरणे टाळले. सभेला सुरुवात होताच समितीवर किती सदस्य असावे. यावर विचार विनिमय करुन १३ सदस्य संख्या निश्चित करण्यात आली. प्रत्येक विषय समिती सभापती पदासाठी एकच अर्ज आल्याने सात समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध झाली. स्थायी समितीचे नगराध्यक्ष हे पदसिध्द सभापती असतात. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी राणी दाजी पवार, उपसभापती पदी अनिता पवार. आरोग्य व स्वच्छता विठाबाई पेठे, शिक्षण समिती राजकन्या अडसुळ, पाणि पुरवठा अंजना पवार, बांधकाम समिती युवराज नळे तर नियोजन समितीच्या सभापती पदी नगरपालिकेचे उपाध्यक्ष अभय इंगळे यांची निवड झाली आहे.
खा. ओमराजे निंबाळकर, हिम्मतराव पाटील, राजू पाटील यांच्यासह सहा जणांवर कलम 307 अंतर्गत जीवे मारण्याचा गुन्हा दाखल !
पंचायत समिती सदस्य पळवापळवी प्रकरण
सोलापूर –
माळेवाडी येथे घडलेल्या कथित मारहाण प्रकरणात उस्मानाबाद चे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर अकलूज पोलीस ठाण्यात सतीश दंडनाईक यांच्या तक्रारीवरून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी हिम्मतराव पाटील यांनी अकलूज येथे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. सतीश दंडनाईक हे कळंब पंचायत समिती सदस्य हे माळेवाडी बोरगाव येथे आहेत याची खात्री करण्यासाठी गेले असता हिम्मतराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी दंडनाईक यांच्यासह गणेश भातलवंडे व गाडीचालक चव्हाण यांना पकडून त्यांच्या घरी नेले व तेथे मारहाण केली.
व ते फोनवर खासदार ओमराजे निंबाळकर यांना ओरडून सांगत होते की मी याला पकडले आहे त्यावेळेला सोडू नका त्याला धडा शिकवा असे मोबाईल चे स्पीकर फोन वरून खासदार ओमराजे यांनी सांगितल्याचे मी ऐकले आहे असे दंड नाईक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे त्यानुसार कलम ३०७, १४३, १४७,१४८,१४९,३२३, ५०६, १०९, १३५ अन्वये ओमराजे यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सोलापूर-उस्मानाबादला मंत्रीमंडळात ठेंगा
उस्मानाबाद/ विठ्ठल एडके
महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यासमवेत सहा मंत्र्यांनी शपथ घेतली होती. मात्र सोमवारी झालेल्या मंत्रीमंड
ळाच्या विस्तारात सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याला स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाकडून ठेंगाच दाखवण्यात आला आहे.
राज्यात ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्यात शिवसनेचा एकही आमदार नाही. त्यामुळे सेनेने त्या ठिकाणी मंत्रीपद देण्याचा विषयच नाही. मात्र शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार आणि तीन आमदार अशी संख्या असताना देखिल उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादच्या शिवसैनीकांना कोणतेही मंत्रीपद न देता नाराजच केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम परंड्याचे आ. तानाजी सावंत विधान परिषदेवर आमदार असताना शेवटच्या तीन महिन्यासाठी कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले होते. मात्र आत्ता तर भुम-परंडा विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत मोठ्या मताधिक्याने निवडुन आलेले असताना देखिल शिवसेनेने त्यांना डावलले आहे. मंत्रीमंडळाच्या संभाव्य यादीत आ. तानाजी सावतं यांचे शेवटच्या क्षणापर्यंत नाव होते. मात्र रात्रीत अशी कोणती सुत्रे हालली की तानाजी सावंत यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही. त्याच प्रमाणे उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आ. ज्ञानराज चौगुले हे शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. तसेच शिवसेनेच्या तिकीटावर निवडून येण्याची तीसरी वेळ आहे. त्यामुळे त्यांना देखिल मंत्रीमंडळात स्थान मिळणे अपेक्षीत होते. मात्र उस्मानाबाद जिल्ह्याला शिवसेनेच्या कोट्यातुन मंत्रीपदासाठी ठेंगाच दाखवला आहे.
सोलापूर जिल्ह्यात कॉंग्रेसच्या आ. प्रणिती शिंदे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र पुन्हा एकदा मुंबईतील आ. वर्षा गायकवाड यांना स्थान दिल्यांने सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपदापासुन वंचितच रहावे लागले आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. बबनदादा शिंदे, संजयमामा शिंदे, आ. भारत भालके, मोहळचे आ. माने असे चार आमदार असताना देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसने मंत्रीमंडळात स्थान दिलेले नाही. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख तिन्ही पक्षांनी देखिल सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याला मंत्रीमंडळ विस्तारात ठेंगाच दाखवला आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांमधुन नाराजी व्यक्त केली जात आहे.
बाहेरचेच पालकमंत्री, विकासाला खिळ बसणार
सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील एकाही आमदारांचा महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात समावेश झाला नाही. त्यामुळे सोलापूर आणि उस्मानाबादला बाहेरचा पालकमंत्री मिळणार आहे. मंत्रीमंडळात जिल्ह्याला स्थान नसल्याने सोलापूर आणि उस्मानाबादच्या विकासाला खिळ बसणार आहे.



































































