Home Blog Page 277

पंढरपूर शहरवासीयांचे सर्व रहिवाशी आणि व्यावसायिक कर माफ करून नगरपालिकेचे गाळा भाडे माफ करा, मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांची मागणी

मगरवाडी / प्रतिनिधी
     विठ्ठल जाधव
 
आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुविधेसाठी प्रतिवर्षी नगरपालिकेच्या वतीने कोट्यावधी रुपयांचा खर्च होतो. यासाठी शासन पाच कोटी रुपयांचे अनुदान देते. हे अनुदान याही वर्षी मिळाले. यात्रा बंद असल्यामुळे नगरपालिकेकडे ही रक्कम शिल्लक आहे, तथापि लॉकडाऊनमुळे यात्रेकरूंच्या केंद्रीभूत अर्थकारणावर अवलंबून असणाऱ्या या शहराची अवस्था बिकट झाली आहे. म्हणून नगरपालिकेने तो निधी वापरात आणत शहरवासीयांच्या सर्व करमाफीसहित नगरपालिकेचे गाळा भाडे माफ करावे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप धोत्रे यांनी केली आहे.

धोत्रे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनसेच्या वतीने मुख्यमंत्र्यांसह पंढरपूरच्या मुख्याधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना निवेदन देऊन विनंती करण्यात येत आहे की, यंदाच्या लॉकडाऊनमुळे पंढरपूरची अवस्था अत्यंत खालावली आहे. येथे नागरिक आर्थिक अडचणीमध्ये आहेत. व्यापाऱ्यांचाही कुठलाही व्यवसाय झालेला नाही. त्यामुळे सर्वांनाच आर्थिक चणचण भासत आहे. अशामध्ये सरकारने काही सोयी-सुविधा देऊ केल्या आहेत, परंतु पंढरपूरचे स्थानिक कर आणि भाडे नगरपरिषदेने माफ केल्यास त्यांना थोडाफार आर्थिक आधार मिळू शकतो. येथील नगरपालिकांच्या गाळ्याचे भाडे देखील हजारो रुपयांचे असून तेही यात्रा आणि त्यातील गर्दी लक्षात ठेवूनच वाढीव दर आकारण्यात आलेले आहेत. यात्रेनंतर तीन महिने झाले तरीही एकही यात्रेकरू पंढरपूरमध्ये फिरकला नाही, त्यामुळे प्रचंड तोटा झालेला आहे.

मुख्यमंत्री महोदयांनी पाच कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातील कोणतीही विकासकामे यंदा होऊ शकली नाहीत. त्यामुळे यात्रेच्या संदर्भातील कामे झाली नाहीत. म्हणून या रकमेचा विनियोग करत ते सर्व धारकांचे भाडे तसेच सर्व कर भरून घ्यावेत आणि नागरिकांना, व्यापाऱ्यांना कर आणि गाळे भाड्यातून सूट द्यावी, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने देण्यात आला आहे.यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड, उपाध्यक्ष महेश पवार, नागेश इंगोले, समाधान डूबल इत्यादी उपस्थित होते .

कोट –  आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर याना भेटलो असता मुख्यमंत्र्यांनी फक्त चेक दिलाय अजून निधी आला नाही असे सांगितले,, तरी मुख्यमंत्री साहेबानी त्वरित निधी द्यावा ,,,

दैनिक जनमत २२ जुलै E पेपर

दैनिक जनमत २१ जुलै E पेपर

माजी आमदार नारायण आबा पाटील यांना पितृशोक

जेऊर ( प्रतिनिधी )आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तसेच जेऊर येथील भारत शैक्षणिक संकुल चे माजी अध्यक्ष व माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे वडील गोविंद बापू गंगाराम पाटील वय 90 यांचे अल्पशा आजाराने आज अकलूज येथील इनामदार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना निधन झाले. कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांच्या मागे त्यांच्या सुविद्य पत्नी चार मुले तीन मुली सुना नातवंडे पण तू असा मोठा परिवार आहे. गोविंद बापू पाटील हे बापू या नावाने परिचित होते कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांचा आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभारणीत सिंहाचा वाटा होता सन 1993 मध्ये आदिनाथ साखर कारखाना उभा राहिल्यानंतर बापूंचा त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्याहस्ते कारखाना स्थळावर एका कार्यक्रमात पादत्राणे चप्पल ची जोडी देऊन यथोचित सत्कार करण्यात आला होता करमाळा तालुक्यातील राजकीय क्षेत्रात ते दिग्गज मानले जात होते  कर्मयोगी गोविंद बापू पाटील हे राष्ट्रवादीचे नेते माननीय शरद चंद्रजी पवार सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटील माजी आमदार तथा स्वतंत्र सैनिक स्वर्गीय नामदेवराव जगताप  यांचे ते राजकीय सहकारी म्हणून देखील ओळखले जात होते. कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांनी आदिनाथ साखर कारखाना उभारणीसाठी 23 वर्षे पायात चप्पल घातली नाही जोपर्यंत आदिनाथ मधून साखर निघत नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही अशी आदिनाथ मंदिर येथे बापूंनी शप्पथ घेतली होती. गोविंद बापू यांनी कारखाना उभा केला आणि साखर कारखान्यातून साखर बाहेर आल्यानंतरच चप्पल पायात घातली अशा या विकास प्रिय नेतृत्व राजकारणाला तालुका मुकला आहे आहे
कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांच्यावर त्यांच्या मूळगावी    लव्हे तालुका करमाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार संजय मामा शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य तसेच विविध गावचे सरपंच सहीत विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच निकटवर्तीय नातेवाईक उपस्थित होते

सोशल डिस्टंसिंगच्या नियमांची अंमलबजावणी कठोरपणे होणार -पालकमंत्री ना.जयंतराव पाटील

तासगाव/सांगली प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यात मंगळवार दि.२१पासून शंभर टक्के लाॅकडाऊन आशा आशयाचे मेसेज  पालकमंत्री ना.जयंतराव पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांचा हवाला देऊन सोशल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारे तथ्य नाही . तथापि दिवसेंदिवस जिल्ह्यात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या पाहता सोशल डिस्टंसिंगचे नियम, मास्कचा अनिवार्य वापर आणि वैयक्तिक स्वच्छता याबाबतच्या संबंधित नियमांची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना दिले आहेत, असे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे .

गुरुवार दिनांक १६ जुलै रोजी पालकमंत्री ना. जयंतराव पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह प्रमुख प्रशासकीय  अधिकाऱ्यांशी झूम द्वारे संवाद साधला. यामध्ये  तूर्तास लॉकडाऊन करू नये, पण कोरोणा प्रादुर्भाव टाळण्यासाठीच्या उपाययोजनांची , सोशल डिस्टंसिंग संदर्भातील नियमांची अधिक कडक व काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात मंगळवार दिनांक २१ जुलै पासून ३१ जुलै पर्यंत शंभर टक्के लाॅक डाऊन होणार अशा आशयाच्या कोणत्याही बातम्यांवर कृपया जनतेने विश्वास ठेवू नये हे असे आवाहन पालकमंत्री ना. जयंतराव पाटील यांनी केले आहे .

त्याच वेळी *सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळल्यास, अनावश्यक गर्दी केल्यास सर्व लोकप्रतिनिधींची व यंत्रणांची पुन्हा बैठक घेऊन लाॅकडाउन संदर्भात पुढील निर्णय घेण्यात येईल, असा इशाराही पालकमंत्री ना. जयंतराव पाटील यांनी दिला आहे*.

तसेच नागरिकांमध्ये कोणालाही ताप, सर्दी ,खोकला, मळमळ ,वास न येणे ,मानसिक गोंधळलेली स्थिती , स्नायू दुखी आदींबाबत कोणतीही लक्षणे जाणवल्यास तात्काळ फिवर क्लिनिक अथवा आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा . गरोदर स्त्रिया, लहान मुले, ५० वर्षावरील नागरिक तसेच कमोरबिडीटी असणाऱ्यांनी अधिक सजगपणे काळजी घ्यावी .कोणतेही दुखणे अंगावर काढू नये. वेळेवर उपचार सुरू झाल्यास पुढील संभाव्य धोका तसेच वाढणारा प्रादुर्भाव या दोन्ही बाबी टाळता येतील. त्यामुळे दुखणे अंगावर काढू नका . काहीही लक्षणे जाणवल्यास त्वरित आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा. अनावश्यक गर्दी करू नका. मास्कचा वापर अनिवार्यपणे करा. सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळा आणि वैयक्तिक स्वच्छतेबाबत काटेकोर काळजी घ्या ,असे आवाहनही पालकमंत्री ना. जयंतराव पाटील यांनी केले आहे.

वायफळे ग्रामपंचातीसमोर शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन

  • जवानाला दमबाजी केल्याचे प्रकरण : उपसरपंच अशोक नलवडे यांच्या राजीनाम्याची मागणी

तासगाव : प्रतिनिधी

वायफळे (ता. तासगाव) येथील दिलीप नलवडे या जवानाला क्वारंटाईन कालावधीत विविध अडचणींना सामोरे जावे लागले. आपल्या समस्या या जवानाने सोशल मीडियावर मांडल्यानंतर उपसरपंच अशोक नलवडे यांनी या जवानाला दमबाजी केली. याप्रकरणी नलवडे यांनी जाहीर माफी मागून राजीनामा द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी वायफळे ग्रामपंचायतीसमोर शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी धरणे आंदोलन केले.

     आंदोलनस्थळी ते म्हणाले, दिलीप नलवडे या जवानाला वीज व पाण्याची सोय नसलेल्या अंधाऱ्या खोलीत दोन – तीन दिवस क्वारंटाईन करणाऱ्या ग्रामपंचायत आणि आपत्ती व्यवस्थापन समितीची चौकशी करावी. या जवानाला दमबाजी करून अपमानास्पद वागणूक देणाऱ्या उपसरपंच अशोक नलवडे यांच्यावर कारवाई व्हावी. त्यांनी जाहीर माफी मागत नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.

      बाळासाहेब देसाई हायस्कुल या शाळेची इमारत धोकादायक बनली आहे. याठिकाणी वर्ग भरवू नयेत. या शाळेच्या नूतन इमारतीच्या कामास तातडीने आरंभ करावा. तसेच हायस्कुल शाळेची कौले फुटली आहेत. त्यामुळे शाळा गळत आहे. खोलीत घुशीने उकिर काढला आहे. कौलात झाले उगवायला लागली आहेत. खोल्यांना खिडक्या नाहीत. दारे तुटली आहेत. एकूणच शाळेची इमारत धोकादायक बनली आहे. त्यामुळे यापुढील काळात ही शाळा क्वारंटाईनसाठी वापरू नये.

     आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष जोतिराम जाधव, वायफळे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील, राजेश पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी पाठींबा दिला. तर पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, गटविकास अधिकारी दीपा बापट यांनी भेट दिली.

     दरम्यान, उपसरपंच अशोक नलवडे यांनी जवानाच्या बाबतीत जो काही प्रकार घडला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. शिवाय बाळासाहेब देसाई हायस्कुल या शाळेचे काम एक वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे लेखी आश्वासन दिले. त्यांनतर पवार यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

स्वयंस्फूर्तीने स्वयंशिस्त पाळा अन्यथा लॉकडाऊनचा पर्याय खुला- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

तासगाव प्रतिनिधी
 नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वयंशिस्त पाळावी. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. त्यासाठी सार्वत्रिक सामाजिक दबाव निर्माण करावा. मास्क अनिवार्यपणे वापरावा. या बाबींकडे दुर्लक्ष केल्याने, अनावश्यकपणे गर्दी वाढल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यास लॉकडाऊन हा अंतिम पर्याय राहील असे सांगून जिल्ह्यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची सक्तीने अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले. ताप, सर्दी, खोकला, डायरिया, स्नायूदुखी, मानसिक गोंधळलेली स्थिती आदि लक्षणे जाणवल्यास तात्काळ फिवर क्लिनिक, आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा.  50 वर्षावरील व कोमॉर्बिडिटी असणाऱ्या रूग्णांनी कोणतेही दुखणे अंगावर काढू नये. त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच खाजगी डॉक्टरांनी कोरोनाची लक्षणे असणारा रूग्ण तपासणीसाठी त्यांच्याकडे आल्यास त्वरीत डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलकडे संदर्भित करावा. लवकर निदान झाल्यास लवकर उपचार सुरू होतील आणि पुढील दुष्परिणाम टाळता येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात वृत्तपत्रांचे संपादक, आवृत्ती प्रमुख यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे उपस्थित होते.
दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वयंशिस्त पाळावी. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे स्वयंस्फूर्तीने पालन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, नागरिकांमधील हलगर्जीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्यास लॉकडाऊनचा पर्याय खुला राहील. तथापी हा पर्याय अंमलात आणावा लागू नये यासाठी प्रत्येकाने मीच माझा व माझ्या कुटुंबाचा रक्षक या भावनेतून कोरोनाला हरविण्यासाठी दक्षता घ्यावी. बँका, बेकरी, दुकानदार यांनी त्यांच्याकडे होणाऱ्या गर्दीचे नियत्रंण करावे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी देखील पीपीई किट व अन्य संरक्षक सामग्रीचा वापर अनिवार्यपणे करावा. ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी स्वत:चे थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर घेऊन मॉनिटरींग करावे. ऑक्सिजनची पातळी ९२ च्या खाली आल्यास त्वरीत आरोग्य तपासणी करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्ह्यात रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट कीट उपलब्ध झाले असून सांगली, विटा, कवठेमहांकाळ येथे शासकीय रूग्णांलयामध्ये याचा वापर सुरू करण्यात आला आहे. महानगरपालिका क्षेत्रातील कंटेनमेंट झोन मध्येही याचा वापर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आयसीएमआरची परवानगी असणाऱ्या खाजगी लॅबला ही कोरोना तपासणीची परवानगी देण्यात आली असून तपासणीसाठीचे शुल्क २२०० रूपये व घरी जाऊन सॅम्पल घेतल्यास २८०० रूपये शुल्क शासनाने निश्चित केले आहे. कोविड हॉस्पीटल मिरज येथे आयसीयु बेडची क्षमता वाढविण्यात येत आहे तर भारती हॉस्पीटल येथेही क्षमता वृध्दी करण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेशी संलग्नीत असणारी खाजगी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल्सही कोविड-19 उपचारासाठी घेण्यात येतील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, येत्या काळात होणाऱ्या विविध सण, उत्सवांमध्ये कोणत्याही प्रकारची मिरवणूक निघणार नाही, लोक जमा होणार नाहीत याबाबत संबंधित घटकांना सूचित करण्यात आले असून यास विविध घटकांनी सहमती दर्शविल्याचे सांगितले. तसेच अफवा पसरविणाऱ्या जवळपास ११ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून हा काळ अत्यंत संवेदनशिल आहे, त्यामुळे सामाजिक माध्यमे किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून अफवा पसरवू नयेत, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.