Home Blog Page 237

दुर्मिळ अशा शृंगी घुबडाला मिळाले जीवदान

 

उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील भंडारवाडी येथील पर्यावरणप्रेमी सिध्देश्वर भंडारे यांना सकाळी त्यांच्या शेतात शिंगवाले अर्थात शृंगी घुबड जखमी अवस्थेत आढळून आले. त्याला उडता येत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पक्षी अभ्यासक तथा मानद वन्यजीव रक्षक प्रा.मनोज डोलारे यांच्याशी संपर्क साधला.
वनपरिमंडळ अधिकारी अमोल घोडके, प्रा.मनोज डोलारे, प्रा.विवेक कापसे यांच्या चमूने ताबडतोब घटनास्थळी भेट देवून प्रथमोपचार केले.
याबाबत माहिती देताना प्रा.मनोज डोलारे यांनी सांगितले की, सदर घुबड हे शृंगी (शिंगवाले) घुबड असून त्याच्या उजव्या पंखाचे हाड मोडले असल्याने त्याला सध्यातरी उडता येणे शक्य नाही. झालेली जखम ही काही दिवसांपूर्वी झालेली असल्याने जखमेचा संसर्ग वाढला आहे. उलूक कुळातील घारीपेक्षा मोठा असणा-या ह्या घुबडाच्या डोक्यावर दोन्ही बाजूंना काळ्या पिसांचा एकेक झुपका असतो. हे झुपके शिंगासारखे दिसतात म्हणूनच त्याला शृंगी हे नाव पडलंय. इंग्रजीत त्याला Indian Eagle Owl/Great Horned Owl अशी नावे आहेत. मत्स्य घुबडाप्रमाणे हा संपूर्ण निशाचर नाही, कारण तो दिवसाढवळ्यासुध्दा हिंडताना दिसतो. खडकावर किंवा झुडपाच्या आश्रयाने तो आपला दिवसाचा वेळ घालवतो. सायंकाळी खोल, गंभीर घुमणा-या आवाजाने याच्या अस्तित्वाची जाणीव होते.
पंखाची जखम जास्त असल्याने त्या शृंगी घुबडाला उपचारासाठी उस्मानाबाद येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. तेथे डाॅ.सुदर्शन मुंढे आणि त्यांचे सहकारी डाॅ.महेश हंगरकर यांनी उपचार केले.
यावेळी वनपरिमंडळ अधिकारी अमोल घोडके यांनी सांगितले की जखम पूर्णपणे भरुन येण्यास जवळपास दहा लागणार आहेत. उडता येत नसल्याने आणि तो पूर्णतः मांसाहारी असल्याने त्याची काळजी घेण्याची गरज आहे. तोपर्यंत आमची वनविभागाची टीम आणि प्रा.मनोज डोलारे त्याची काळजी घेणार आहोत. उडण्याक्षम झाल्यानंतर त्याला परत भंडारवाडीच्या शिवारात सोडले जाणार आहे.
घुबड पक्षाविषयी अधिक माहिती देताना प्रा.मनोज डोलारे म्हणाले की, पक्षी जगतात सर्वांत जास्त बदनाम झालेला पक्षी म्हणजे घुबड. पाश्चात्य जगात बुद्धिमानपणाचे प्रतीक मानले जाणारे आणि पुराणांमध्ये लक्ष्मी देवीचे वाहन असणारे घुबड आपल्याकडे अपशकुनी का समजले जाते हा प्रश्नच आहे. निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका असलेला हा पक्षी आज शुभ-अशुभाच्या चक्रात अडकला आहे. निशाचर असल्याने आणि त्याचे भीतीदायक डोळे आणि घूत्कार यामुळे मानव त्याला घाबरतो. वस्तुतः निसर्गात टिकून राहण्यासाठी निसर्गाने त्याला तसे बनवले आहे.
घुबडांच्या जगभरात जवळपास २०० जाती आहेत. अंटार्क्टिका सोडला तर पूर्ण पृथ्वीभर त्यांचा वावर आहे. भारतात जवळ जवळ ६० प्रजाती आणि उप-प्रजातींचे घुबड आढळतात. आपल्याकडे बार्न आउल किंवा गव्हाणी घुबड, पिंगळा हे प्रामुख्याने आढळतात. याशिवाय डोक्याजवळची काही पिसे शिंगासारखी उभी राहत असल्याने शृंगी घुबड हे जंगलातून किंवा कडेकपाऱयातून दृष्टीस पडते.
मोठय़ा झाडांच्या ढोलीत जोडीजोडीने दिसणारे पिंगळा हे घुबडाचेच भाईबंद आहेत. यातलाच रानपिंगळा ही जात दुर्मिळ श्रेणीत पोहोचली आहे. घुबड अत्यंत उत्कृष्ट शिकारी असतात. हे लहान किडे, उंदीर किंवा पक्षी खातात. मोठी घुबडे ससे, घुशी, साप यावर उपजीविका करतात. भक्ष्य मोठे असल्यास पंखात पकडून लचके तोडून खातात. लहान प्राणी अख्खा गिळतात. अन्नाचे पचन झाल्यावर न पचलेली भक्ष्याची हाडे, पिसे, केस या पदार्थांचे गोळे बनवून ते ओकून टाकतात.
घुबड शेतकऱयांच्यासाठी उपयुक्त पक्षी आहे. उंदीर, घुशी हे प्रमुख भक्ष्य असल्याने मानवाला उपकारकच आहे. घुबड त्याची शिकार अख्खी गिळतो आणि वर्षभरात सुमारे १००० उंदीर खातो. उंदीर हे घुबडांचे आवडते खाद्य असल्यामुळे त्याला शेतकर्‍यांचा मित्र ही समजले जाते.
काही ठिकाणी घुबडांना पाळण्यासाठी पकडले जाते तर जादूटोणा करण्यासाठी घुबडांची शिकार केली जात आहे. तसेच घुबडांबद्दल समाजात अजूनही अपसमज आहेत.
२०१६ मध्ये लालबागच्या राजाला पण घुबडावर विराजमान केले होते. समाजातून घुबडाबद्दलचे अपसमज दूर करण्यासाठी हे प्रयत्न हळूहळू का होईना सफल व्हावेत आणि या देखण्या आणि उपयुक्त पक्ष्याला आपण त्याचा मान मिळवून देऊ.

दैनिक जनमत १२ जून E paper

दैनिक जनमत ११ जून E paper

तासगाव व नागेवाडी कारखान्याच्या थकित ऊस बिलासाठी खासदार संजयकाका पाटील यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन


‘स्वा. शेतकरी संघटनेच्या वतीने चिंचणी नाक्यात रास्ता रोको

(तासगाव प्रतिनिधी)

      तासगाव आणि नागेवाडी कारखान्याने अनेक शेतकऱ्यांची ऊस बिले थकवली आहेत. ऊस नेऊन पाच महिने होत आले तरी अनेक शेतकरी बांधवाना एक रुपयाही दिली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्ष जोतीराम जाधव यांच्यासह कार्यकर्त्यां शेतकऱ्यांनी सोमवारी येथील चिंचणी नाक्यात रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या मार्केट यार्डातील कार्यालयावर पर्यंत चालत घोषणा देत जाऊन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

      यावेळी शुक्रवारपर्यंत शेतकऱ्यांना पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची ग्वाही कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांनी दिली आहे. 

      खासदार पाटील यांच्या तासगाव आणि नागेवाडी कारखान्याने जानेवारीपासून गाळप झालेल्या उसाची बिले अद्याप दिली नाहीत. ही बिले मिळावीत, यासाठी शेतकरी कारखाना स्थळावर हेलपाटे मारत आहेत. मात्र त्यांची कोणीही दखल घेत नाही स्वतःला   शेतकऱ्यांचे नेते म्हणून घेणारे खासदार पाटील यांनी कष्टाळू शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली १६ एप्रिल रोजी नागेवाडी कारखान्यासमोर आंदोलन केले होते. यावेळी खासदारांनी तिस एप्रिलपर्यंत बिले देण्याचा शब्द दिला होता. मात्र एप्रिलनंतर मे संपून जून महिना सुरू झाला तरी अद्याप शेतकऱ्यांना बिले मिळावी नाही. खासदारांनी आपला शब्द पाळला नाही, असा थेट आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

     दरम्यान, खासदार पाटील यांच्याकडून ऊस बिले देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने सोमवारी संतप्त शेतकऱ्यांनी तासगाव येथील चिंचणी नाक्यात रास्ता रोको केला. त्यानंतर *’बुडव्या साखर सम्राटांचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, ऊस बिल आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, एकच गट्टी, राजू शेट्टी’* अशा घोषणा देत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर सम्राट यांचा निषेध केला,

 लॉकडाऊनमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामासाठी बि – बियाणे, खते घेण्यासाठी बळीराजाकडे पैसे नाहीत. हक्काचे पैसे मिळवण्यासाठी कारखानदारांच्या दारात जाऊन भीक मागावी लागत आहे. पण आता आम्ही अटीतटीची लढाई लढू. ऊस बिल पदरात पाडूनच घेऊ. संजयकाका पाटील यांना शेतकऱ्यांनी दोनवेळा खासदार केले. मात्र त्यांनाच ठेंगा दाखवला जात आहे. जर शुक्रवारपर्यंत बिले मिळाली नाहीत तर खासदारांच्या बंगल्यासमोर बेमुदत ठिय्या मारणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष जोतीराम जाधव यांनी दैनिक जनमत शी बोलताना व्यक्त केली आहे.

      आंदोलनात जिल्हा अध्यक्ष खराडे यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अशोक खाडे, दामाजी डुबल, राजेंद्र माने, शशिकांत माने, संदेश पाटील, सचिन पाटील, महेश पाटील, अनिल पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते:

यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी चोख पोलिस पोलिस बंदोबस्त ठेवला होता. त्यावेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, साहेब पोलीस निरीक्षक केराम, पोलीस उपनिरीक्षक गुरव,एल आय बी चे आप्पासाहेब साबळे, इत्यादींनी बंदोबस्ताचे चोख व्यवस्था ठेवली होती बराच वेळ ट्राफिक व्यवस्था कोडमोडल्यानंतर ट्राफिक विभागाच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठे योगदान दिले होते हे विशेष होय.