Home Blog Page 2

परंडा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी चुरशीचे मतदान;७३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद!

९ फेब्रुवारीच्या निकालाकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष…


परंडा | भजनदास गुडे (दि. ७ फेब्रुवारी)
परंडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ५ आणि पंचायत समितीच्या १० जागांसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५२.८३ टक्के मतदान उत्साहात आणि चुरशीने पार पडले. तालुक्यात एकूण १३० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणूक रिंगणातील एकूण ७३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, आता सर्वांना ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीची प्रतीक्षा आहे.
सकाळपासूनच मतदानास उत्साहात सुरुवात झाली होती. दिवसभर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू होती. अनेक मोठ्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या.
दुपारी ३:३० वाजेपर्यंत तालुक्यात सरासरी ५२.८३ टक्के मतदान झाले होते.
शेळगाव गण व गट – ५४.७१%,
आनाळा गण व गट – ५४.००%,
जवळा गण व गट – ५४.१४%,
डोंजा गण व गट – ५०.१७%,
लोणी गण व गट – ५१.४२%.
यामध्ये महिला २६,९६० आणि पुरुष २९,७०५ असे एकूण ५६,६६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अनेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी व पंचरंगी लढती होत असल्याने उमेदवारांच्या समर्थकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. यामुळे काही मतदान केंद्रांच्या परिसरात किरकोळ प्रकार घडले असले तरी तालुक्यात एकूणच शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
यावेळी तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सायंकाळी साडेपाच वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतर उपस्थित मतदारांचे मतदान पूर्ण झाल्यावर मतपेट्या सीलबंद करण्यात येणार होत्या. परंडा शहरातील करमाळा रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह येथे बसेस व इतर खासगी वाहनांद्वारे या मतपेट्या सुरक्षितपणे आणण्यात येणार आहेत. या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आता सर्वांच्या नजरा ९ फेब्रुवारीच्या निकालाकडे लागल्या आहेत.

ईटचा ‘रणसंग्राम’ शांत; उमेदवारांचे राजकीय भवितव्य ‘पेटी’बंद!


ईट ( सोमेश्वर स्वामी )
लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुरळा आज ईट गटात शांत झाला. सकाळपासूनच मतदारांमध्ये असलेला प्रचंड उत्साह आणि नेत्यांच्या प्रतिष्ठेच्या लढाईनंतर, आता ईट जि.प. व पं.स. उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत (EVM) कैद झाले असून, निकालाच्या प्रतीक्षेने सर्वांची धाकधूक वाढली आहे.

विजयाचा गुलाल कोणाचा?

ईट गटात यंदा चौरंगी आणि अटीतटीची लढत पाहायला मिळाली. प्रचाराच्या रणधुमाळीत उमेदवारांनी गावोगावी सभा आणि वैयक्तिक गाठीभेटी घेऊन मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. ग्रामीण भागातील मतदारांनी दिलेला कौल कोणाच्या बाजूने झुकणार, ईटच्या विकासाची धुरा कोणाच्या खांद्यावर जाणार आणि ‘विजयाचा गुलाल’ कोणाच्या नशिबात आहे, याचे उत्तर आता ९ फेब्रुवारीला स्पष्ट होईल.

नेत्यांच्या प्रतिष्ठेची ‘कसोटी’

या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदारांनी आपला ‘अधिकार’ बजावून उमेदवारांच्या नशिबावर शिक्कामोर्तब केले आहे. ईटच्या या राजकीय सारीपाटावर कोण बाजी मारणार आणि कोणाचा ‘चेकमेट’ होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. सध्या तरी उमेदवारांचे भवितव्य ‘चिडीचूप’ असून, पेटीत बंद झालेल्या या निकालाचा गुपित ९ तारखेलाच उघडणार असल्याने याची प्रतीक्षा भुम तालुक्यातील नागरिकांना लागली आहे.

तेर मध्ये आम आदमी फोडतोय प्रस्थापितांना घाम!

तेर गटातून आम आदमी पार्टीच्या रत्नमाला पिंपळे यांनी उमेदवारी दाखल करताच धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच त्यांना गावागावातून मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरत असून, त्यामुळे तेर गटातील प्रस्थापित राजकीय समीकरणे अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे.

सामाजिक कामांच्या जोरावर निवडणूक रिंगणात उतरलेल्या रत्नमाला पिंपळे यांची ओळख हळूहळू प्रभावी उमेदवार म्हणून होत आहे. त्यांचे पती तानाजी पिंपळे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून, शिक्षण, पर्यावरण आणि जनहिताच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे. लहान मुलांसाठी शैक्षणिक संकुल उभारणीचा पुढाकार, तेर येथील घाट परिसरात स्वच्छता मोहीम, तसेच सुमारे दोन हजार झाडांचे वृक्षसंवर्धन करून पर्यावरणपूरक विकासाचा संदेश त्यांनी दिला आहे.

शेतकरी प्रश्नांवरही रत्नमाला पिंपळे आक्रमक भूमिका घेताना दिसल्या आहेत. ऊस बिलाच्या थकबाकीविरोधात आंदोलन करून त्यांनी थेट रस्त्यावर उतरून लढा दिला. त्याचबरोबर गरीब व होतकरू मुलींसाठी सायकल वाटप, महिलांसाठी मार्गदर्शन शिबिरे, तसेच बचत गटातील महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनातही पिंपळे कुटुंबाची भूमिका ठळक राहिली आहे. तानाजी पिंपळे हे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक असून, आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यामुळे आरक्षण, शेतकरी हित, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून रत्नमाला पिंपळे यांची ओळख तयार होत आहे.

‘राजकारण म्हणजे सेवा’ या आम आदमी पार्टीच्या भूमिकेचा पुरस्कार करत रत्नमाला पिंपळे यांनी तेर गटात स्वच्छ, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभाराचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे येत्या काळात तेर गटातील निवडणूक अधिक चुरशीची ठरण्याची शक्यता असून, ‘आप’च्या या उमेदवारामुळे विरोधकांना खरोखरच घाम फुटणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मेघराज पाटील यांचा तालुका प्रमुख पदाचा राजीनामा उबाठा शिवसेनेला जय महाराष्ट्र

मेघराज पाटील यांच्यावर काही दीवसातच पक्षाची मोठी जबदारी देणार – सावंत

परंडा ( दि ३१जानेवारी)परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद,पंचायत निवडनुकीच्या प्रचारादरम्यान राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून उबाठा शिवसेना पक्षाचे परंडा तालुका प्रमुख मेघराज पाटील यांनी तालुका प्रमुख पदाचा राजीनामा देत शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्री आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मार्ग दर्शना खाली शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.
उबाठा शिवसेना पक्षाचे प्रामाणिकपणे कान करत असताना माझा राजकीय बळी घेण्यात आला.असा गंभीर आरोप करत मेघराज पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.दि.३१ जानेवारी रोजी परंडा शहरातील प्रितम मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी उबाठा शिवसेना पक्षाच्या तालुका प्रमुख पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.या नंतर माजी मंत्री आमदार प्रा . डॉ.तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच मेघराज पाटील यांचा माजी मंत्री,आमदार
तानाजीराव सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेघराज पाटील यांचा प्रवेश शिंदे गटासाठी फायदेशीर ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या वेळी बोलताना माजी मंत्री आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत म्हणाले की मेघराज पाटील यांची पक्षात अवेहलना होऊ देणार नाही लवकरच त्यांच्यावर पक्षाच्या मोठ्या पदाच्या जबाबदारी बरोबर च महत्त्वाच्या शासकीय कमेटीचे पद काही दिवसातच दिले जाईल असे आश्वासन सावंत यांनी मेघराज पाटील यांना दिले आहे.
या वेळी शिवसेना शिदें गटाचे जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके,युवासेना तालुका प्रमुख राहूल डोके,नवनाथ जगताप,संजयकुमार बनसोडे,विशाल देवकर,रत्नकांत शिंदें,दत्ता रणभोर,वैभव पवार,माऊली गोडगे,गणेश चव्हाण यांच्यासह मेघराज पाटील समर्थक शिवसेनीक,कार्यकर्ते मोठ्या संख्यांने उपस्थित होते.

ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू


बारामती | प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर धक्का देणारी मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते अजित पवार यांचा बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात मृत्यू झाला आहे.या दुर्घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे.
मुंबईहून आज सकाळी प्रचार दौऱ्यासाठी अजित पवार हे विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती एअरपोर्टवर लँडिंग करत असतानाच विमानाचा तोल गेला आणि ते विमानतळ परिसरातच कोसळले. अपघात इतका भीषण होता की विमानाला आगीने वेढले गेले आणि काही वेळ परिसरात धुराचे लोट पसरले होते.
प्राथमिक माहितीनुसार, या विमानात अजित पवार यांच्यासह त्यांचे चार सुरक्षारक्षक व अन्य कर्मचारी होते. अपघातानंतर अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन पथकांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. मात्र आगीमुळे आणि तीव्र धडकेमुळे सहा जणांचा मृत्यू झाला असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

चार प्रचारसभा नियोजित होत्या

आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एकूण चार प्रचारसभा होणार होत्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी या सभांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुपे जिल्हा परिषद गटासाठी स्वतंत्र सभा देखील नियोजित होती. या सभांमधून अजित पवार हे थेट कार्यकर्ते, उमेदवार आणि मतदारांशी संवाद साधणार होते. मात्र, या दुर्दैवी घटनेमुळे सर्व प्रचार कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
या भीषण अपघाताचे काही व्हिडिओही समोर आले असून त्यामध्ये विमान पूर्णतः जळालेल्या अवस्थेत दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे दिल्लीहून तातडीने महाराष्ट्राकडे रवाना झाल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळातून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

भाजप आमदारांच्या तेर मधून कमळाचा उमेदवार नाही !

धाराशिव – आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे गाव असलेल्या तेर मधून भाजपाच्या उमेदवारांना माघार घ्यावी लागली आहे. तेर पंचायत समिती गणातून भाजपच्या चिन्हावर उमेदवार होता मात्र त्याला माघार घ्यावी लागली असल्याने पंचायत समितीसाठी ईव्हीएम वर कमळ नसणार आहे. सुरेखा बाळासाहेब कदम यांना भाजपकडून ए फॉर्म देण्यात आला होता तर तनुजा अजित कदम यांना बी फॉर्म देण्यात आला होता मात्र उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोघांनीही अर्ज मागे घेतल्याने तेर पंचायत समिती गणातून भाजपचा उमेदवार नाही.

तेर पंचायत समिती गणात भाजपला आता अपक्षाला संधी द्यावी लागणार असून सामान्य कार्यकर्त्यांना संधी देणाऱ्या भाजपकडे तेर पंचायत समिती गणात उमेदवार नसणे ही मोठी नामुष्की आहे. हजारो कार्यकर्ते लढण्यासाठी तयार असताना एका गणात राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपच्या अधिकृत उमेदवारांवर माघार घेण्याची वेळ येत असेल तर हा सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय असल्याचे बोलले जात आहे.

पक्षीय संविधानाच्या विरोधात जाऊन अर्चना पाटील यांना भाजपची उमेदवारी?

घराणेशाहीसाठी पार्टीने नियम बदलला?

धाराशिव – नाही.. हो… नाही म्हणत भारतीय जनता पार्टीने तेर गटातून अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली असून ए फॉर्म असलेल्या जया नाईकवाडी यांनी अर्ज मागे घेतल्याने अर्चना पाटील यांना भाजपची उमेदवारी मिळाली आहे. मात्र ही उमेदवारी देताना भारतीय जनता पार्टीने आपल्याच म्हणजेच स्वतःच्या पक्षाच्या पार्टी कॉन्स्टिट्यूशन च्या नियमांना मूठ माती दिली आहे. राजकीय पक्षाकडून उमेदवारी हवी असल्यास त्या पक्षाचे सक्रिय सदस्य असणे महत्वाचे आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या संविधानानुसार सक्रिय सदस्य असण्यासाठी पक्षात तीन वर्ष काम केलेले असणे आवश्यक आहे. अर्चना पाटील यांनी 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. सध्या 2026 मध्ये त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली आहे. दीड वर्षापूर्वी एका राजकीय पक्षाचे सदस्य असताना आणि भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय सदस्य नसताना त्यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने हा पक्षीय संविधानाच्या तरतुदीचा भंग असून हा राजकीय, नैतिक, संवैधानिक चर्चेचा विषय असून भारतीय जनता पक्ष स्वतःच्या पक्षाचे संविधान पाळत नसल्याची टिका या माध्यमातून होऊ शकते.

याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तर पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांना या संवैधानिक तरतुदीबाबत माहिती नसल्याने दिलेली उमेदवारी कायदेशीर आहे की नाही हे कळू शकत नाही. मात्र पक्षाच्या वतीने अधिकृत प्रतिक्रिया आल्यास वाचकांसाठी ती प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच सक्रिय सदस्यत्वाची तरतुदी बाबतची माहिती भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध असलेल्या माहितीवरून देण्यात आली आहे.

आधी माघार पुन्हा मागच्या दाराने उमेदवार..

अर्चना पाटील यांनी दोन गटातून भारतीय जनता पक्षाकडून अर्ज दाखल केल्याचे स्वतः सांगितले होते मात्र त्यानंतर त्या लढणार नाहीत अशी वावडी उठवण्यात आली मात्र अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असताना आणि राजकीय कारकिर्दीतील अध्यापदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

लोणी जिल्हा परिषद गटात रेवण ढोरे यांच्या सौभाग्यवती राणी ढोरे मैदानात

लोणी गटाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मतदानरुपी आर्शीवाद द्या – राणी ढोरे

परंडा (प्रतिनिधी)जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी लोणी जिल्हा परिषद गटात शिराळा ग्रामपंचायतीचे मा.सरपंच रेवण ढोरे यांच्या सौभाग्यवती राणी रेवण ढोरे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी आर्ज दाखल करून निवडणूकीच्या रणांगणात उतरल्या आहेत.
परंडा तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडनुकीत भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट,उबाठा शिवसेना या प्रमुख पक्षाचे उमेदवार पक्षाच्या चिन्हावर निवडनुका लढवीत आसल्याचे चित्र सद्या तरी दिसत आसून जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी शिवसेना शिंदे गटात बंडखोरी करत अपक्ष उमेदवार उभे करूण या निवडनुकीला सामोरे जात आहेत.
परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५ गटातील व पंचायत समितीच्या१०गणातील जागा सर्वच प्रमुख पक्ष व शिवसेना बंडखोर धनंजय सावंत स्वतंत्रपणे लढवीत आसले तरी खरे निवडनुकीचे चित्र दि.२७जानेवारी रोजी स्पष्ट होणार आसले तरी स्व:ज्ञानेश्वर पाटील,उबाठा शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांचे कट्टर समर्थक रेवण ढोरे यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने आर्थीक आणि उमेदवारीची दिलेली ऑफर धुडकाऊन लावत त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करुन सौभाग्यवती राणी रेवण ढोरे यांचा इतर मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षीत आसलेल्या लोणी जिल्हा परिषद गटात उमेदवारी आर्ज दाखल करून सर्वच पक्षाच्या नेत्याना चिकीत केले आहे.
राणी रेवण ढोरे यांनी लोणी जिल्हा परिषद गटात निवडनुकीसाठी उमेदवारी आर्ज दाखल केल्यापासुन लोणी जिल्हा परिषद गटातील गावा-गावातील मतदारांच्या भेटी घेऊन लोणी गटाचा चेहरा मोहरा बालण्यासाठी मतदान रुपी आशीवाद द्या असे आवाहाण मतदारांना करीत आहेत.राणी ढोरे यांनी प्रचारादरम्यान मतदारांच्या गाटी-भेटी, कॉर्नर सभेवर भर दिला असून विरोधी उमेदवारा पेक्षा त्यांनी प्रचारात आघाडी घेत प्रचाराची पहिली फेरी पुर्ण केली आहे.
रेवण ढोरे यांचे पिताश्री व राणी ढोरे यांचे सासरे स्वःऔदुंबर(आप्पा)ढोरे निष्ठावंत शिवसैनिक तर होतेच पण स्वा: ज्ञानेश्वर पाटील यांचे कट्टर समर्थवक होते.त्या दोघांचे रुणानुबंध त्यांचे पुत्र उबाठा शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील व शिराळा ग्रामपंचायतीचे मा. सरपंच व लोणी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार राणी ढोरे यांचे पती रेवण ढोरे यांनी तेवड्याच निष्ठेणे जपले आहेत.हेच रुणानुबंध लोणी जिल्हा परिषद निवडनुकीत राणी ढोरे यांच्या कामी येणार आसल्याची चर्चा लोणी जिल्हा परिषद गटातील मतदारातून केली जात आहे.

राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांमधून माल लुटणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक

सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांमधून माल लुटणाऱ्या दोन सराईत आरोपींना धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत मोठी कामगिरी केली आहे. या कारवाईत तब्बल ८ लाख २८ हजार ६५९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी ट्रक चालक रामजी शोभनाथ यादव हे सोलापूर–धुळे महामार्गावरून कंटेनरमधून नवीन टायर वाहतूक करत असताना तेरखेडा परिसरातील लक्ष्मी पारधी पिढी जवळ त्यांच्या कंटेनरमधील टायरची चोरी करण्यात आली होती. या घटनेमुळे महामार्गावरील मालवाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव, श्री. विनोद इज्जपवार यांनी पथकाला तपासाच्या सूचना दिल्या.

त्या अनुषंगाने दि. २१ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना गुप्त माहिती मिळाली की अनिल मच्छींद्र पवार (रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) याने त्याच्या साथीदारांसह हायवेवरील कंटेनरमधून नवीन टायरची चोरी केली असून, ते टायर तसेच चोरीच्या मोटारसायकली लक्ष्मी पारधी पिढीच्या पाठीमागील जंगल परिसरात लपवून ठेवण्यात आल्या आहेत. तसेच आरोपी तेरखेडा गावात येणार असून त्याच्याकडील मोटारसायकलही चोरीची असल्याची माहिती मिळाली.

पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली असता संशयित इसम पथकास पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या इसमालाही अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी आपली नावे अनिल मच्छींद्र पवार (वय ३४, रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) आणि नाना तानाजी शिंदे (वय २७, रा. भिकारसारोळा, ता. जि. धाराशिव) अशी सांगितली.

प्राथमिक चौकशीत आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी इतर दोन साथीदारांसह मिळून हायवेवरून जाणाऱ्या कंटेनरमधून नवीन टायरची चोरी केल्याची तसेच पानगाव परिसरात चोरी केल्याची कबुली दिली. याशिवाय वाशी, बेंबळी, येरमाळा आणि भादा पोलीस ठाणे हद्दीतून मोटारसायकली चोरून त्या लक्ष्मी पारधी पिढीच्या पाठीमागील जंगल परिसरात लपवून ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

त्यावरून पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन झडती घेतली असता २९ नवीन टायर, ४ चोरीच्या मोटारसायकली, गुन्ह्यातील रोख रक्कम तसेच गुन्हा करताना वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण ८,२८,६५९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक श्री. सचिन खटक, पोलीस हवालदार नितीन जाधवर, बबन जाधवर, चापो. महबुब अरब आणि रोहित दंडनाईक यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे महामार्गावरील चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या पुरस्कार वितरणात राजकारण;निकष पूर्ण न करणाऱ्यांचा गौरव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून गेल्या आठवड्यात विभागांतर्गत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मात्र या पुरस्कार वितरणात ठरवून दिलेले निकष डावलून राजकीय हस्तक्षेप झाल्याची जोरदार चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे. पात्रतेऐवजी जवळीक आणि ओळखीच्या आधारे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कर्मचाऱ्याने आवश्यक असलेली PRE परीक्षा उत्तीर्ण न करता देखील त्याला पुरस्कार देण्यात आला. तसेच किमान दहा वर्षांची सेवा ही मूलभूत अट असताना, केवळ दोन वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्याचाही गौरव करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शासकीय पुरस्कार हे सार्वजनिक सन्मानाचे प्रतीक असताना त्यांचे वाटप खाजगी मालमत्तेप्रमाणे केले जात असल्याची कुजबूज कर्मचारी वर्गात आहे.

जिल्हा परिषद स्तरावरील या पुरस्कारांसाठी शासनाने स्पष्ट आणि कठोर निकष निश्चित केले आहेत. त्यामध्ये किमान दहा वर्षांची सेवा, मागील पाच वर्षांचे अतिउत्कृष्ट किंवा उत्कृष्ट गोपनीय अहवाल, सचोटी व चारित्र्य, कोणतीही विभागीय चौकशी अथवा न्यायालयीन प्रकरण नसणे, कामातील दखलपात्र कार्यक्षमता, प्रशासकीय कौशल्य, संगणकीकरणातील योगदान, शासकीय खर्चात बचत व महसूलवाढीसाठी केलेले प्रयत्न, तसेच शासन व जिल्हा परिषदेची प्रतिमा उंचावण्यासाठी दिलेले योगदान यांचा समावेश आहे.

याशिवाय लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींवर वेळेत केलेली कार्यवाही, नस्ती व्यवस्थापन, निर्णय प्रक्रियेसाठी दिलेले सहकार्य, नाविन्यपूर्ण कल्पनांचा अविष्कार, दर्जेदार व निःपक्षपाती कामाची पद्धत आणि कार्यसंस्कृती रुजविण्यासाठी केलेले प्रयत्न या बाबींचाही पुरस्कारासाठी विचार होणे अपेक्षित आहे.

मात्र प्रत्यक्षात या सर्व निकषांकडे दुर्लक्ष करून काही निवडक व्यक्तींनाच लाभ मिळाल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्व विभागीय व शासनस्तरीय समित्यांकडून निवड झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे शासन स्तरावर एकत्रितरीत्या जाहीर करण्याची प्रक्रिया कितपत पारदर्शक राहिली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मात्र सध्याच्या पुरस्कार वितरणावरून पारदर्शकता, न्याय आणि गुणवत्तेला डावलून राजकारणच हावी झाले असल्याची भावना व्यक्त होत असून, याबाबत चौकशीची मागणीही कर्मचारी वर्तुळातून जोर धरू लागली आहे.