Home Blog Page 147

कोरोना काळात अनाथ झालेल्या मुला, मुलींना भारतीय जैन संघटना घेणार दत्तक

 


उस्मानाबाद (प्रतिनिधी)-

कोरोना काळात आई किंवा वडीलांचे तसेच दोघांचेही छत्र हरवलेल्या मुला, मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी भारतीय जैन संघटना दत्तक घेणार आहे. याची नाव नोंदणी सुरू असून पुणे येथील वाघोली प्रकल्पात शिक्षणासह सर्व प्रकारच्या भौतिक गरजा विद्यार्थ्यांना मोफत पुरवण्यात येणार आहेत.

राज्यात कोविडमुळे अनाथ झालेल्या सुमारे ७०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्याचा निर्णय भारतीय जैन संघटनेने घेतला आहे. या विद्यार्थ्यांचा इयत्ता १२ वीपर्यंतचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च संघटनेकडून केला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून माहिती मागवण्यात येत आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आई किंवा वडील तर काही जणांना दोघांनाही गमवावे लागले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या उदरनिर्वाहासोबतच पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्याचा निर्णय भारतीय जैन संघटनेने घेतला आहे.  उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही संघटना दत्तक घेणार आहे. इयत्ता पाचवी ते सातवी वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संघटनेच्या वाघोली (पुणे) येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील वसतिगृहात व्यवस्था केली जाणार आहे. एका कुटुंबातील एक किंवा दोन विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांना पुनर्वसन वसतिगृहात पाठविण्यासाठी त्यांच्या कायदेशीर पालकांची संमती बंधनकारक करण्यात आली आहे.  जिल्ह्यातील इच्छुकांनी संघटनेचे अॅड. शांतीलाल कोचेटा, कंचनमाला संगवे, अॅड. रोहन कोचेटा, पत्रकार उपेंद्र कटके यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिशा समितीच्या बैठकीत खासदारांचे निर्देश

सोमवारी झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत समितीच्या सदस्या कंचनमाला संगवे यांनी याची माहिती दिली. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी गटविकास अधिकाऱ्यांना उपक्रमासाठी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक गावाच्या ग्रामसेवकांनी गावात माहिती देऊन अशा विद्यार्थ्यांच्या नोंदी घेण्याबाबत सांगण्यात आले आहे. संबंधितांनीही ग्रामसेवकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांचेही पत्र ग्राह्य

कोरोनात अनाथ झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांची नोंदणी शासनदरबारी नाही. तांत्रिक अडचणी येत असल्याने नोंदी झाल्या नाहीत. यामुळे आता संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोना काळात पालकांचा मृत्यू झाल्याचे पत्र दिले तरीही ते ग्राह्य धरणार असल्याचे संगवे यांनी बैठकीत सांगितले. याबाबत अंतिम निर्णय संघटनेने राखून ठेवला  आहे.

राजीव गांधी नगर भागात नालीची कामे निकृष्ट; नागरिकांचे उपोषण


उस्मानाबाद – राजीव गांधी नगर येथील नगरपालिका मार्फत करण्यात आलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी दलित महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.  जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राजीव गांधी नगर येथे होत असलेल्या रोड व नाल्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून या कामाची चौकशी सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या मार्फत करण्यात यावी अशी मागणी केली आहे या निवेदनावर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब तुपसुंदरे, प्रशांत पवार,अजय मोरे,अमोल राजेनिंबाळकर, दयानंद सांडसे, शिवाजी कदम, प्रशांत कदम,दिलीपसिंह राजपूत, विजयकुमार पलसे, रोहिणी कदम,किरण मसे, रत्नमाला राऊत, विश्वनाथ चव्हाण,पी.बी.हलरे, प्रविण म्हसे, मनोजकुमार शेरकर,अजय मोरे,पवन कोळी, किशोर ढेंगळे,अमित उंबरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


दैनिक जनमत १४ जून २०२२ E paper

माळूंब्रा येथील शहीद जवान दत्तात्रय वाघमारे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 



तुळजापूर, दि. 13 (प्रतिनिधी) : 


तुळजापूर तालुक्यातील माळूंब्रा येथील रहिवाशी असलेले शहीद जवान दत्तात्रय लक्ष्मण वाघमारे वय (51) यांचे एनडीए (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) पुणे येथे कर्तव्यावर असताना रविवारी (दि.12) रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी माळूंब्रा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या सन्मानार्थ तामलवाडी पोलीस दलाने बंदुकीतून हवेत फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. यावेळी उपस्थित असलेल्या पंचक्रोशीतील नागरिकांनी अमर रहे..अमर रहे.. दत्तात्रय वाघमारे अमर रहे..अशा जयघोषात आपल्या लाडक्या भूमिपुत्राला साश्रूनयनांनी जड अंत:करणाने अखेरचा निरोप दिला. दत्तात्रय वाघमारे शहीद झाल्याची वार्ता गावामध्ये समजल्यानंतर शोक व्यक्त करण्यात आला. सोमवार (दि.13) रोजी वाघमारे यांचे पार्थिव पुण्याहून माळूंब्रा येथे आणण्यात आले. वाघमारे यांच्या गावातील घराजवळ पार्थिव कांही वेळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीत तिरंग्यात लपटलेले पार्थिव गावातील प्रमुख रस्त्यावरून स्मशानभूमीकडे नेण्यात आले. शहीद जवान दत्तात्रय लक्ष्मण वाघमारे हे 1971 साली  सैन्यदलात दाखल झाले होते. येथे तेरा वर्षे त्यांनी देशसेवा करून परत 2005 साली डिफेन्स सिक्युरिटी फोर्स मध्ये दुबार भरती झाले होते. वरील दोन्ही दलांमध्ये त्यांनी तब्बल तीस वर्ष देश सेवा केली. पुणे येथील खडकवासला कॅम्पमध्ये कर्तव्यावर असताना रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दत्तात्रय वाघमारे यांचे निधन झाले. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने व शासनाच्या वतीने पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तामलवाडी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सन्मानार्थ बंदूकीतून हवेत फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. शहीद जवान दत्तात्रय वाघमारे यांचे चिरंजीव अजय वाघमारे यांनी त्यांच्या चितेस मुखाग्नी दिला. यावेळी मल्हार राणा पाटील, गजानन वडणे, राजसिंह राजेनिंबाळकर, आनंद कंदले, यशवंत लोंढे, नायब तहसिलदार संतोष पाटील, तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढीच्या महापूजेचे मंदिर समितीकडून निमंत्रण

पंढरपूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील – मुख्यमंत्र्यांची ग्वाही


           



मुंबई, दि. 13 : – पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी एकादशीच्या (10 जुलै) विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. वर्षा शासकीय निवासस्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिले. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, ज्ञानेश्वर जळगांवकर, मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.

            निमंत्रण देण्यासाठी आलेल्या विश्वस्तांशी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी चर्चाही केली. “पंढरपूरातील विकास कामांचे चांगल्या पद्धतीने नियोजन करा. वारकऱ्यांच्या सुविधांसाठी तसेच परिसराच्या विकास कामांसाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही,”अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

            गतवर्षी सत्यभामा मंदिर परिसरात केलेल्या वृक्षारोपणाची मुख्यमंत्र्यांनी आवर्जून माहिती घेतली. पंढरपूर मंदिर परिसरातील विविध विकास कामांसाठी शासनाने ७३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याअंतर्गत कामांबाबत चर्चा झाली. अशा पद्धतीने निधी देण्याचे जाहीर करून, तो लगेचच उपलब्ध करून दिल्याबद्दल समितीने समाधान व्यक्त केले.

            मंदिर समितीच्यावतीने श्री. औसेकर महाराज यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचा श्री विठ्ठलाची मूर्ती, वीणा, शेला-पागोटे देऊन सत्कारही केला.

अभिजीत पाटील यांचे पॅनल निवडणूक रिंगणात उतरणारच !

 विठ्ठलच्या सत्ताधारी आणि विरोधकमधील धडकी कायम 


मगरवाडी – विठ्ठल जाधव 

पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर करखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीत उतरण्यासाठी मागील अनेक महिन्यापासून पूर्ण ताकदीने जी तयारी सुरू आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकात धडकी भरली होती. परंतु उमेदवारी अर्जाच्या छाननी वेळी दस्तुरखुद्द पॅनल प्रमुख असलेले अभिजित पाटील यांच्या विरोधात काही मुद्यावर हरकती घेतली होती. त्याचा लवकरच फैसला होणार आहे. यामुळे विठ्ठलच्या निवडणुकीत ताकदीने लढण्यासाठी मोठे बळ मिळणार आहे.

   अभिजित पाटील यांनी विठ्ठलच्या निवडणुकीत उतरताना केवळ स्वतःला चेअरमन मिळावे या भूमिकेतून   निवडणूक लढविण्यासाठी तयारी केलेली नाही. केवळ सभासद आणि कामगार यांच्या हिताचे निर्णय घेणारे संचालक मंडळ असावे याच भूमिकेतून निवडणुक लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

  अभिजित पाटील यांनी कारखाना सभासद कार्यक्षेत्र असलेल्या विविध भागांतून आपला गावभेट,  आणि बहुतावशी सभासद यांच्या वैयक्तिक भेटी घेतल्या आहेत. यामुळे प्रत्येक सभासद यांच्यापर्यंत कारखाना चांगला चालवून दाखविणारे म्हणुन  त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

  अभिजीत पाटील यांच्या पॅनलमधुन उमेदवारी मिळावी म्हणून  प्रत्येक गटातून अनेक उत्साही कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये काही अर्ज छाननी वेळी नामंजूर करण्यात आले आहेत. असे असले तरी तगडे पॅनल या विठ्ठलच्या निवडणुकीत उतरविण्यासाठी मोठी व्युहरचना आखली जात आहे. केवळ संचालकांच्या वैयक्तिक हिताचे निर्णय न घेता सभासद आणि कामगार यांच्याच हिताचे निर्णय घेणारे पॅनल या निवडणुकीत उत्तरविणार असल्याचेही अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे.

 सध्या मागील  अनेक महिन्यापासून विठ्ठलच्या निवडणुकीत उतरून एक आदर्श निर्माण करण्यासाठी अभिजीत पाटील यांनी पाऊल टाकले आहे. कारखाना अडचणीत असतानाही प्रति टन 2500रुपये भाव नक्की देणार असल्याचे जाहीर करून टाकल्याने जिल्ह्यातील साखर कारखानदार  यांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही  2500 रुपये भाव देण्याची अभिजित पाटील यांनी केलेली  घोषणा ही मोठी धक्कादायक बाब असल्याने, यांना विठ्ठलच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अनेक प्रकारे अडचणी करण्यासाठी अनेक गुप्त शक्ती प्रयत्न करीत आहेत. मात्र या निवडणुकीत सभासद आणि कामगार यांच्या दृष्टीने  स्वतःच्या प्रपंचाशी निगडित असलेली ही विठ्ठलची निवडणूक असल्याने,आतापर्यंत नुकसान केलेल्या लोकांना विठ्ठलची सत्ता देणार की आपल्या फायद्यासाठी कोणाला मतदान करणार हे मतमोजणी झाल्यावरच समजणार आहे .

पै.हनुमंत पुरी यांनी केली आयुर्वेदिक सफेद मुसळीची यशस्वी शेती

उस्मानाबाद
 उस्मानाबाद जिल्हा हा अवर्षण जिल्हा म्हणून सर्वत्र ओळखला जातो .मात्र उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कुस्तीचे प्रचंड वेड आहे.चांगल्या गुणवत्तेचे कसलेले भरपूर पैलवान जिल्ह्यामध्ये सर्वांना पाहण्यास मिळतात . परंडा तालुक्यातील कंडारी हे गाव महाराष्ट्र चॅम्पियन पैलवानांचे गाव म्हणून ओळखले जाते . याच गावातील डबल उपमहाराष्ट्र केसरी पै.बाळासाहेब पडघम , महाराष्ट्र चँपियन आदेश बापू तिंबोळी, पै.हनुमंत पुरी, पै सागर सुरवसे, पै.हरी घोगरे , लक्ष्मण जाधव पै.कृष्णा घोगरे यांच्यासह अनेक चॅम्पियन पैलवान गावात आहेत. घराघरात नामवंत पैलवान पाहण्यास मिळतात. यावर्षी उस्मानाबाद जिल्हा तालीम संघाला सातारा मुक्कामी झालेल्या महाराष्ट्र महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये आपल्या जिल्ह्याला लाखमोलाचं पदक देणारा पैलवान सागर सुरवसे सुद्धा याच  गावचा सुपुत्र.पैलवान ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान हनुमंत पुरी हे कंडारी गावचा भूषण तर  उस्मानाबाद जिल्ह्याचा मान-सन्मान आणि स्वाभिमान होय. कंडारी गावातील सर्व पैलवान गरिबीची जाण असणारे, अल्पभूधारक जमिनीची सेवा करून कुस्ती मेहनत करत असतात. अगदी कोरवाहू व बागायती जमिनीत घाम गाळून मुर्दमकी जोपासली जाते. याच गावातील मातीची पोत आणि कुस्तीची पत महाराष्ट्र पातळीवर सर्वांना अवगत आहे. पै .हनुमंत पुरी यांनी धरणी मातेची सेवा करण्याचं ठरवल,नुसत ठरवलच नाही तर प्रत्यक्ष काळ्या मातीमध्ये काबाडकष्ट करीत तशी कार्यवाही सुद्धा केली .धरणी मातेची सेवा करीत असताना भारतीय आयुर्वेदिक औषधी वनस्पती  यांचे उत्पादन घेण्याचे ठरवले . या शेतीसाठी त्यांनी पुणे येथील नामांकित वैदय डॉ. अक्षय देशमुख यांचे मार्गदर्शन घेतले .आपल्या शेतात काय पिकते यापेक्षा बाजारामध्ये काय विकते हे पैलवान चाणाक्ष व चतुर पैलवानाला नक्कीच माहिती असते. हेच डोक्यात घेऊन पैलवान हनुमंत पुरी कृर्षीक्षेत्राचा अवलंब केला .  याच पद्धतीचा अवलंब करून  पैलवान हनुमंत पुरी यांनी आपल्या शेतामध्ये आयुर्वेदिक सफेद मुसळी हे वनऔषधी पिकाची लागवड केली . नियमाप्रमाणे नैसर्गिक खतांचा वापर सुद्धा केला . कमी पाण्यात – कमी क्षेत्रात- जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी सर्व कुटुंबांना सोबत घेत काबाडकष्ट केले . त्यासाठी पिकाची संपूर्ण माहिती घेतली . पैलवान हनुमंत पुरी वडिल नानासाहेब पुरी आई द्रौपदी पुरी यांच्या माध्यमातून सफेद मुसळीची शेती चांगल्या पद्धतीने केली. भारतीय बाजारपेठेत आयुर्वेदिक सफेद मुसळीला अनन्यसाधारण महत्व आहे . बाजार पेठेत याची किंमत प्रति किलो 850/-ते 900/- रु.एवढी आहे . साधारणपणे एका एकरामध्ये – 1500 किलो एवढे विक्रमी उत्पादन घेतले . कुस्ती, शिक्षण सोबत कृर्षी सेवा करण्यासाठी पैलवान हे सदैव अग्रेसर असतात .एकदा चांगला पैलवान चांगल्या पद्धतीने नवनवीन शेती प्रयोग करतो .आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतीमध्ये नवोपक्रम पै .हनुमंत भाऊ पुरी यांनी हाती घेतला .खरं तर एक चांगला शेती उपक्रम हनुमंत पुरी यांनी सफेद मुसळीच्या माध्यमातून सर्वांना दाखवून दिला आहे . पैलवानाने इतरांच्या हाताकडे पाहण्यापेक्षा आपल्याच मनगटांच्या जोरावर स्वतःची आर्थिक उन्नती करावी . असा मुलभूत संदेश पै.हनुमंत पुरी यांनी आदर्श घालून दिला आहे. क्रिडा क्षेत्रामध्ये कुस्ती प्रकारात अव्वल चॅम्पीयन ठरलेला कंडारी गावचा सुपुत्र पै.हनुमंत पुरी कृर्षी क्षेत्रासुद्धा कुस्ती मेहनत चालू ठेवून अव्वल व आदर्शवत ठरत आहे . हे सर्व पैलवानांसाठी आर्थिक उन्नतीसाठी व स्व प्रगतीसाठी दिशादर्शक आहे.

चोरीच्या ट्रॅक्टरसह दोन आरोपी अटकेत


उस्मानाबाद : ब्रम्हगाव, ता. वाशी येथील रानोजी भिमराव वायसे यांचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्अर क्र. एम.एच. 45 ए 5304 हा दि. 04- 05 जून रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला होता. या प्रकरणी रानोजी वायसे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन दि. 09 जून रोजी रात्री 00.34 वा. वाशी पो.ठा. येथे गुन्हा क्र. 135 / 2022 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.   गुन्हा तपासादरम्यान  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. च्या पोनि- रामेश्वर खनाळ, सपोनि- मनोज निलंगेकर, पोहेकॉ- अमोल निंबाळकर, विनोद जानराव, जावेद काझी, प्रकाश औताडे, धनंजय कवडे पोना- शौकत पठाण, अजित कवडे, नितीन जाधवर, शैला टेळे, यांच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, तो ट्रॅक्टर उस्मानाबाद येथून जाणार आहे. यावर पथकाने सांजा चौकात सापळा लाउन बालाजी अरुण काळे व आत्माराम सुभाष काळे, दोघे रा. सरमकुंडी, ता. वाशी या दोघांना नमूद ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले. पथकाने ट्रॅक्टरच्या ताबा- मालकी विषयी त्या दोघांना विचारणा केली असता ते पोलीसांना समाधानकारक उत्तरे देत नव्हते. यावर पथकाने त्या ट्रॅक्टरच्या इंजीन व सांगाडा क्रमांकाच्या आधारे तांत्रिक तपास केला असता तो ट्रॅक्टर उपरोक्त गुन्ह्यातील चोरीचा असल्याचे समजले. यावर पोलीसांनी गुन्ह्यातील नमूद ट्रॅक्टर जप्त करुन त्या दोघांना अटक केली असून गुन्ह्याचा उर्वरीत तपास चालू आहे.