Home Blog Page 128

कारीत बैलपोळा सण उत्साहात साजरा


वाजत-गाजत गावातून मिरवणूक

कारी (प्रतिनिधी)

 शेतकऱ्यांना शेती कामासाठी वर्षभर साथ  देणाऱ्या लाडक्या सर्जा-राजा अर्थात बैलजोडीचा पोळा हा सण शुक्रवारी (दि२६) मोठ्या उत्साहात वाजत गाजत साजरा करण्यात आला.ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी बैल जोडीचे पुजन केले.कारी परिसरातील शेतकऱ्यांनी पोळ्याचा सण उत्साहात साजरा केला.बैल जोडीस रंगरांगोटीसह, फुगे, झुल, चंगाळ बांधून आकर्षक सजावट करण्यात आली होती.बैलांचे पूजन करून पुरण पोळीचा नैवेद्य खाऊ घालण्यात आला.यावेळी बैल जोडीची वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली.

दैनिक जनमत २७ ऑगस्ट २०२२ E paper

दैनिक जनमत २६ ऑगस्ट २०२२ E paper

बैलपोळा सणावर मंदीचं सावट?

 

कारी (दि२५)प्रतिनिधी

 तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून पोळा सण रडत पडत झाला होता. परंतु यावर्षी मात्र काही अंशी बऱ्या प्रमाणात पोळा सण साजरा होईल अशी अपेक्षा गृहीत धरून व्यापारी बांधवांनी आपली दुकाने मोठ्या प्रमाणात मालाची साठवणूक करून थाटली आहेत . परंतु ग्राहक मात्र अद्यापही अपेक्षेप्रमाणे फिरकलेले दिसत नाहीत .

    गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच सणावर संकटाचे सावट होते. यामुळे कुठलेही सण साजरे झाले नाहीत. आता मात्र कोरोनाच सावट जवळपास संपुष्टात आल्यामुळे प्रत्येक सण प्रत्येक कुटुंबात आपापल्या ऐपतीप्रमाणे साजरा होत आहे.

      शुक्रवार दि26 ऑगस्ट 2022 रोजी पोळा सण साजरा होत आहे, पोळा सण म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठा महत्त्वाचा आणि ज्याच्या माध्यमातून काळ्या आईची सेवा केली जाते अश्या बैला प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत अद्यापही शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्न पडलेले नाही, पिके शेतात आहे , परंतु उत्पन्न मात्र हातात नाही,

       यातच हा पोळा सण आलेला आहे, या पोळा सणात ग्राहकाकडून चांगला प्रतिसाद मिळेल या अपेक्षेने प्रत्येक व्यापारी बांधवांनी मोठ्या प्रमाणात माल भरलेला आहे, ग्राहकांचं लक्ष आकर्षिले जाईल अशा प्रकारे मांडणी केलेली आहे, परंतु अद्यापही अपेक्षेप्रमाणे ग्राहक वर्ग बाजारपेठेत वर्दळ करताना दिसत नाही, म्हणजे अद्यापही कोरोनाच सावट संपुष्टात आलेला असले तरी पिक विमा किंवा इतर पीक कर्जासारखी रक्कम शेतकऱ्याच्या हातात मिळालेली नाही, यामुळे मोठ्या आनंदात शेतकरी बैलपोळा सण साजरा करेल असं वाटत नाही, शेवटी ज्याच्या मदतीने वर्षभर शेती केली जाते, त्या पशुना, जनावरांना बैलांना बैलपोळ्याच्या निमित्ताने सर्वतोपरी पारंपारिकता करावी लागणार आहे यात शंका नाही.

ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा सुरू करा शिवराज्याभिषेक सोहळा समितीची मागणी

 


उस्मानाबाद – शहरातील ट्रॅफिक सिग्नल्स सुरू करणे तसेच शहरातील रस्ते खड्डे मुक्त करावे या मागणीचे निवेदन शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. आहे निवेदनात म्हटले आहे की गेल्या चार वर्षापासून  शहरातील ट्रॅफिक सिग्नल्स हे बंद अवस्थेत आहेत. शासनाने लाखो रुपये खर्च करून वाहतुकीचे नियमन करण्यासाठी, वाहतूक यंत्रणा सुरळीत होण्यासाठी ट्रैफिक सिग्नल ची उभारणी करण्यात आलेली आहे. परंतु नगर परिषदेच्या ढिसाळ कामकाजामुळे सदरचे ट्रैफिक सिग्नल्स बंद आहेत. यामुळे शहरांमध्ये दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. ट्रैफिक सिग्नल बंद असल्यामुळे अपघात होऊन जनतेच्या जीवित व वित्त हानी होत आहे. जनतेच्या व वाहतुकीच्या सोयीसाठी बसवलेली ही ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा खेळणी म्हणून उभी आहे. तसेच शहरातील बन्याच भागातील रस्त्यावर खूप खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यामुळे सामान्य नागरिक, लहान मुले, शाळकरी विद्यार्थी वयोवृद्ध, स्त्री-पुरुष नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. या खड्ड्यामुळे देखील शहरात दररोज अपघात होत आहेत या सर्वांची जबाबदारी नगरपरिषदेची आहे असे निवेदनात म्हटले आहे

तरी नगरपरिषद यांनी तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देऊन गंभीरपणे विचार करून शहरातील ट्रैफिक सिग्नल सुरु करावे. तसेच शहरातील खड्डे मुक्त रस्ते जनतेला द्यावेत ही मागणी आहे ही मागणी पूर्ण झाली नाही तर समितीच्या वतीने आंदोलन करण्यात  येईल असा इशारा दिला आहे.

या निवेदनावर शिवराज्याभिषेक सोहळा समिती अध्यक्ष शशिकांत खुने, धर्मराज सुर्यवंशी, दत्तात्रय साळुंखे,रवि मुंढे,शतानंद दहिटणकर,कंचेश्वर डोंगरे, निशिकांत खोचरे, अमोल पवार, अच्युत थोरात,ऍड प्रशांत जगदाळे,सुनिल मिसाळ, विकास जाधव, गणेश नलावडे, आनंद जाधव, रियाज शेख, धनंजय साळुंके,अशोक गुरव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

वाळुसाठी तहसीलदाराने घेतली २० हजारांची लाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई


उस्मानाबाद – एरव्ही वाळूच्या अवैध धंद्यांबाबत आम्ही धुतल्या तांदळासारखे आहोत असे दाखवणाऱ्या महसूल प्रशासनाचा खरा चेहरा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई मुळे समोर आला आहे.

उमरगा येथील तहसिलदार राहुल मधुकर पाटील यांना प्रतिट्रक वाळूसाठी पाच हजार रूपयाप्रमाणे २० हजार रूपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उमरगा तहसिलदारांच्या निवासस्थानात ही कारवाई करण्यात आली.

उमरगा तालुक्यातील एका व्यक्तीस त्यांच्या शेतामध्ये घराचे बांधकाम करायचे असल्याने त्यांना चार ट्रक वाळूची आवश्यकता होती. म्हणून ते आज पंचांसह उमरगा येथील तहसिलदार राहुल मधुकर पाटील यांची भेट घेण्यासाठी त्यांचे शासकीय निवासस्थानी गेले. वाळूबाबत त्यांना बोलले असता तहसिलदार राहुल पाटील यांनी मध्यस्थामार्फत चार ट्रक वाळू घेण्यासाठी व त्या वाहनावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांना एका ट्रकला पाच हजार रुपये प्रमाणे चार ट्रक वाळूसाठी २० हजार रुपये लाचेची मागणी केली. ही लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारल्यानंतर एसीबीच्या पथकाने तहसिलदार पाटील यांना रंगेहाथ पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे (औरंगाबाद), अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते, पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, विशाल डोके, जाकेर काझी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

बैलपोळा सणानिमित्त रंगीबेरंगी साहित्यांनी दुकाने सजली




सलगरा,दि.२४ (प्रतिक भोसले) – 

श्रावण महिन्याची सुरूवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सर्जा-राजाचा सण म्हणजेच ‘पोळा’ पोळ्याचे महत्त्व शेतकरी वर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्‍याचा सखा, मित्र, सर्जा-राजाचा हा दिवस मानाचा असतो. शेतकरी व त्याच्यासाठी अपार कष्ट करणार्‍या बैलांचा सण अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. वर्षभर शेतात काम करणार्‍या सर्जा – राजांना सजवत पूजन करून त्यांना पुरणपोळी खाऊ घालण्याचे महत्त्व पोळ्या दिवशी आहे. शेतकरी हा सण उत्साहाने व आनंदाने रुढी-परंपरेने साजरा करतो. म्हणून बैल पोळाच्या पार्श्वभूमीवर सजावटीच्या साहित्याने दुकाने यंदा दहा-बारा दिवस अगोदरच उभारली गेली आहेत.

___________________________________________

यंदा बैल पोळ्यासाठी लागणार्‍या बहुतांश साहित्याच्या किमती काही प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे पोळ्यावर महागाईचे सावट दिसून येत आहे. बैलांना सजवण्यासाठी आवश्यक असणारे पैजण, शिंगासाठी शेंदुरी, कलर, घुंगरमाळा, गळ्यातील चामडीचे पट्टे, येसण, सुताचे गोंडे, कासरा, मणी माळा, तिरंगा माळ, पिवडी, यांच्या सह ईतर शोभेच्या साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. 

दुकानदार, कालिदास भानुदास लोमटे

____________________________________________

यंदा कोरोना निर्बंधमुक्त बैलपोळा साजरा होणार असल्याने शेतकरी आनंदात आहेत, बैलांना सजविण्यासाठी लागणारे साहित्य परिसरातील गंधोरा, वाणेगाव, वडगाव, जवळगा, किलज, बेलवाडी आदी गावांमधून येणारे शेतकरी हौसेने खरेदी करताना दिसत आहेत. 

दुकानदार, बालाजी दिगंबर माळी

___________________________________________

आजूबाजूच्या गावातूनही शेतकरी इथे बैल पोळ्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी येऊ लागले आहेत, मात्र महागाई मुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसत आहे. विशेष म्हणजे गेल्या २ वर्षांपासून कोरोनामुळे पोळा सण साधेपणाने साजरा केला जात होता, मात्र यावेळी कोणतेही निर्बंध नसल्याने सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्या मुळे काही झालं तरी पोळ्याला बैलजोडीची हौस करायला आम्ही मागं-पुढं बघणार नाय असा सूर शेतकऱ्यांमधून येत आहे. 

दुकानदार, माधव (दाजी) दशरथ लोमटे