उस्मानाबाद – सेवा पुस्तिकेची द्वितीय प्रत देण्यात यावी या मागणीसाठी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर एका सहशिक्षकाने दि.९ मेपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उस्मानाबाद येथील श्रीमती सत्यभामा शिंदे माध्यमिक विद्यालयातील सहाय्यक शिक्षक व्ही.टी. कराड यांची वरिष्ठ वेतन श्रेणी, सहाव्या वेतन आयोगाचा फरक, सेवा पुस्तिकेची द्वितीय प्रत अद्यावत करून मिळावी अशी तोंडी व लेखी वेळोवेळी मागणी करूनही संस्था सचिव व मुख्याध्यापक श्रीमती सत्यभामा शिंदे विद्यालय उस्मानाबाद यांनी त्यांच्या मागण्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडेही लेखी स्वरूपामध्ये तक्रार करूनही त्यांनी आजतागायत कसल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. तर मुख्याध्यापकांना देखील दि. २१ एप्रिल रोजी वरील मागण्याबाबतचे आमरण उपोषणाचे पत्र देऊनही मागण्या पूर्ण न झाल्याने शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर कराड यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.