तुळजापूर : मंदिर रक्षणाच्या भूमिकेवर ठाम – आ. जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर जोरदार हल्ला

0
99

आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या बाबतही बोलले आ. आव्हाड

तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिराची पाहणी करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना भाजप कार्यकर्त्यांनी गाडी अडवून रोखण्याचा प्रयत्न करत मोठा गोंधळ घातला. यानंतर आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत मंदिराच्या संवर्धनाबाबत आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आणि राज्य सरकार तसेच मंदिर प्रशासनावर जोरदार टीका केली.

“प्रत्येक दगड बोलका आहे”
आव्हाड म्हणाले, “तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्राच्या पुरातन इतिहासाचे जिवंत स्मारक आहे. गाभाऱ्यात उभे राहून छत्रपती शिवाजी महाराज कसे देवीसमोर नतमस्तक झाले असतील, हे मी डोळे मिटून अनुभवतो. या मंदिरातील प्रत्येक दगडाने हा इतिहास पाहिलेला आहे. जर हे दगड बोलू लागले, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू येतील. आज हेच दगड तोडून टाकण्याचा, फेकून देण्याचा प्रकार सुरू आहे. जे अफजलखान आणि औरंगजेबाला जमले नाही, ते आजच्या काळातील त्यांच्या विचारसरणीचे वारस करणार आहेत.”

केंद्रीय व राज्य पुरातत्त्व अहवालांवर प्रश्नचिन्ह
केंद्रीय व राज्य पुरातत्त्व खात्यांच्या अहवालांमध्ये मतभेद असल्याच्या प्रश्नावर आव्हाड यांनी माजी आर्किओलॉजिकल डायरेक्टर ए. के. सिन्हा यांच्या अहवालाचा हवाला दिला. “सिन्हा यांनी स्पष्ट लिहिले आहे की मंदिराला स्पर्श करण्याची गरज नव्हती. दगडालाही श्वास असतो, त्याला ऑक्सिजन मिळतो. चुकीच्या पद्धतीने भेगा भरण्याचे काम केल्याने मंदिराचे आयुष्य कमी होईल,” असे ते म्हणाले.

बहुजनांचा सहभाग संपवण्याचा आरोप
मंदिरातील पूजापद्धतीत बदल आणि बहुजन पुजार्‍यांचा सहभाग कमी करण्याच्या आरोपांवर आव्हाड म्हणाले, “आजपर्यंत इथले सर्व पुजारी बहुजन समाजातील होते. आता नवीन पद्धती, तलवारीचे विधी आणून हा वारसा संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भक्तीस्थळाचा वापर राजकारणासाठी करणे योग्य नाही. बहुजनांचा सहभाग संपवून, त्याच बहुजनांना पुढे करून मनोविकास साधण्याचा डाव आहे.”

विचारांवर ठाम
माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्याशी वैयक्तिक स्नेह असल्याबाबत विचारले असता ते माझ्या बापासारखे आहेत असे आव्हाड म्हणले तसेच आमदार राणा पाटील हे मंदिराचे विश्वस्त आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू असल्याच्या प्रश्नाबाबत आव्हाड म्हणाले, “विचारांपुढे कुणी चालत नाही – मग तो मित्र, बहीण, आई-वडील का असेना. शाहू, फुले, आंबेडकर यांनी कधीच तडजोड केली नाही. तसंच मीही विचारधारेत तडजोड करणार नाही.”

“देवीचा शाप लागेल” – इशारा
पुढील भूमिकेबाबत आव्हाड म्हणाले, “विकासाला विरोध नाही, पण चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कामाला मी विरोध करणारच. पारंब्यांची निर्दयी तोड झाली आहे. अशाच पद्धतीने दगड तोडले गेले, तर देवीचा शाप यांना लागेल. मंदिराचे अयोग्य काम मी होऊ देणार नाही.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here