धाराशिव – मुंबईकडे विक्रीसाठी नेत असलेला गांजाचा साठा स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांनी सापळा रचून जप्त केला. येडशी येथे ट्रॅव्हल पॉईंटजवळ एका इसमाला अटक करून ८.२७ किलो वजनाचा, १ लाख ६५ हजार ४०० रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार व पथक १२ जून रोजी रात्री १२.०५ च्या सुमारास गस्त घालत असताना, हॉटेल समाधान समोर संशयास्पदरीत्या थांबलेला एक इसम काळ्या बॅगसह आढळून आला. पथकाने त्याला थांबवून बॅगबाबत विचारणा केली असता, त्याने त्यामध्ये गांजा असल्याचे कबूल केले.
त्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या मदतीने पंचनामा करून ८.२७ किलो गांजा जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव वसंत भालचंद्र शिंदे (रा. वाखरवाडी, ता. जि. धाराशिव) असे असून, तो हा गांजा ढोकी येथून मुंबईकडे विक्रीसाठी नेत असल्याची माहिती पुढील तपासात उघड झाली आहे.
सदर गुन्ह्याची नोंद धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र. नं. १२५/२५ कलम ८ (क), २०(ब)(२)(ब) एनडीपीएस कायद्यानुसार करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोनि मारुती शेळके, सपोनि सुदर्शन कासार, उपनिरीक्षक उद्धव हाके, हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, पोना राजकुमार वाघमारे, पोका सुधीर भांतलवंडे, चपोअ रत्नदीप डोंगरे, रामलिंग बनाळे आणि डॉग स्कॉडचे सुजित वडणे व संतोष शाहीर यांनी संयुक्तपणे पार पाडली.