धाराशिव जिल्ह्यातल्या एका खेडेगावात सध्या सुरू असलेल्या राजकारावरून दोन मित्र गप्पा मारत आहेत. गावांचं देखील शहरीकरण झालं असल्याने चावडी, पार, अशी जुनी ठिकाणं आता राहिली नाहीत तिथं सध्या कोणीच बसत नाही. बाभळीच्या झाडाखाली एक टपरी असून तिथं गुटखा मिळत असला तरी रावसाहेब आणि आबासाहेब हे दोन दोस्त पान खात खात चर्चा करत आहेत. खेडेगाव म्हणाल्यावर मोठं नाव घ्यायला जड जातं त्यामुळे गावातल्या लोकांनी त्याचे संक्षिप्त नाव दिले असून रावश्या आणि आबाश्या अशी त्यांची नावं आहेत.
रावश्या – काय रं आबाश्या असा एक टक बघत कशाचा विचार करायलास
आबाश्या – (कोणी तरी आपल्याला बोलतंय पण त्याला उत्तर द्यायचं म्हणून स्वर काढत) हम्म्म
रावश्या – अरे मी तुला बोलतोय ( आबाश्या च्या पाठीवर थाप मारत)
आबाश्या – दचकून, काही नाही जरा वंगाळ स्वप्न पडलं
रावश्या – कसलं स्वप्न?
आबाश्या – लगा आपण आणखी पेरणी केली नाही अन् मला स्वप्न पडलं की सोयाबीनचा भाव पडला, शेतात केलेला खर्च बी निगाला नाय
रावश्या – आरं आत्ताच त्याचा इचार कशाला करायचा, इमा हाय, इमा आणणारं स्पेशालिस्ट आमदार आपल्या जिल्ह्यात हायत
आबाश्या – इम्याचं कशाला घेऊन बसला एक रुपयात इमा उतरवीत होते ते बंद केलंय आन आपत्ती आल्यावर मिळणाऱ्या मदतीच्या घटकासह काही तरी बदल केलेत त्यामुळं इमा भरून बी मिळल की नाही याची ग्यारंटी नाय
रावश्या – पुढचं पुढं बघू ताण नगस घेऊ
आबाश्या – इम्याच कवच राहिलं नाही पाऊस जरा बरा हाय पण पुढं पावसानं वढ दिली तर पाणी नाय
रावश्या – आरं ते आपल्या हातात नाय
आबाश्या – खरं हाय पण, ते पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी आपल्या जिल्ह्यात येणार होतं, आपल्या तळ्यात ते पाणी येणार होतं ते आलं असतं तर पिकाला अडचण आली नसती
रावश्या – ती दि सोडून त्याचा इचार करू नग
आबाश्या – का नाय करायचा आपल्या हक्काचा इशय हाय
रावश्या – व्हय हक्काचा हाय पण येऊस्तर काय खरं नाय
आबाश्या – कसं खरं नाय काल दादानी प्रेस घेतली त्यात प्रयत्न चालू हायत, ईश्वास असून सकारात्मकतेने घ्या असं म्हणालेत
रावश्या – आरं त्याचा जी आर निघाला, 7 टी एम सी पाण्याच्या बाबतीत काम सुरू आहे, १६ टी एम सी साठी प्रयत्न सुरू हायत त्यांचं
आबाश्या – (दाढी खाजवत) 39 टी एम सी चा काय विषय होता
रावश्या – लगा मला पण नाही समजला
आबाश्या – इलेक्शन च्या अगुदर दोनदा पाणी येईल म्हणून सांगितलं व्हतं, ते तर नाहीच आलं पण ही 16 टी एम सी अन् 39 टी एम सी चा विषय समोर आल्यानं कायच घोळ कळना गेलाय
रावश्या – लय ताण नको घेऊ जरा पेपरवाल्यसनी, यूटुब वाल्यासनी इशय समजू दी मग, इरोधातल्या दोन दादासनी इशय समजू दी कुणी तरी सांगलच की
आबाश्या – कुणी सांगणार नाहीत जे ते त्याच्या राड्यात हायती, पण इतका वेळ इचार करून एक वळ आठवली
रावश्या – कसली वळ?
आबाश्या – पहिलं पाणी आलं नाही, दुसरं कागदावर हाय त्याचं बी काय खरं नाय, तवर तिसरा इशय आणलाय
रावश्या – ही कसली वळ?
आबाश्या – वेगळी वळ हाय, हिंदीत हाय
रावश्या – मग सांग की लगा लवकर
आबाश्या – पहिली शादी हुइ नहीं तब तक तिसरी शादी मुबारक
रावश्या – आर मला कायच समजलं नाय
आबाश्या – कर अभ्यास याच्यावर…