आरडीसींच्या दालनाचे बांधकाम अवैध, अनधिकृत वातानुकूलित यंत्रणा बसवल्याची तक्रार

0
82

धाराशिव, दि. 05 ऑगस्ट 2025: धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) यांच्या दालनात अवैध बांधकाम आणि अनधिकृत वातानुकूलित यंत्रणा बसवल्याचा गंभीर आरोप करणारा तक्रार अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. केशेगाव (ता. व जि. धाराशिव) येथील रहिवासी श्री. लहू रामा खंडागळे यांनी हा अर्ज दाखल करून याप्रकरणी सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

अर्जानुसार, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात खिडकीच्या आत एक भिंत बांधून बांधकाम मानांकन नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. हे बांधकाम केव्हा, कोणाच्या परवानगीने आणि वैध आहे की अवैध, याची तपासणी करण्याची मागणी अर्जदाराने केली आहे. तसेच, दालनात परवानगीशिवाय वातानुकूलित यंत्रणा बसवल्याचा दावा करत, याची परवानगी वरिष्ठांकडून घेतली आहे की नाही, याचीही चौकशी व्हावी, असे अर्जात नमूद आहे.

श्री. खंडागळे यांनी पुढे मागणी केली आहे की, जर हे बांधकाम अवैध ठरले, तर बांधकामाचा खर्च संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनातून वसूल करावा. तसेच, अवैध बांधकाम पाडून आणि अनधिकृत वातानुकूलित यंत्रणा तात्काळ काढून टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय हे प्रशासनाचे केंद्रीय कार्यालय असून, येथील बांधकामे कायदेशीर आणि नियमानुसार असणे अपेक्षित आहे. या तक्रारीने कार्यालयातील पारदर्शकता आणि नियमांचे पालन यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here