धाराशिव : तांबरी विभागातील एका सेवानिवृत्त लिपिकाच्या मालकी हक्काच्या भूखंडावर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून, बनावट लेटरपॅड आणि खोट्या शिक्क्यांचा वापर करून फेरफार प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी धाराशिव शहर पोलिसांनी सुहास केशवराव पाटील यांच्यासह चौघांवर अॅट्रॉसिटी कायद्यासह भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी सोमनाथ दादाराव डाके (वय ७०, रा. तांबरी विभाग, धाराशिव) हे राज्य परिवहन विभागातून लिपिक पदावरून सेवानिवृत्त झालेले असून, त्यांनी २०१६ मध्ये उस्मानाबाद गृहनिर्माण सहकारी संस्थेकडून प्लॉट क्रमांक ९, १०, ११, १७, १८ आणि २१ अधिकृत कागदपत्रांद्वारे खरेदी केले होते. त्यांनी या प्लॉट्सच्या फेरफारासाठी आवश्यक कागदपत्रांसह सिटी सर्वे कार्यालय व तलाठी कार्यालय, धाराशिव येथे २०२३ मध्ये अर्ज सादर केला होता.
मात्र, संतोष व्यंकटेश हंबीरे आणि सुहास केशवराव पाटील यांनी मुद्दाम फेरफार प्रक्रिया थांबवण्यासाठी बनावट लेटरपॅड आणि खोट्या शिक्क्यांचा वापर करून खोटे दस्तऐवज तयार केले. हे दस्तऐवज त्यांनी ११ जुलै २०२३ रोजी सिटी सर्वे कार्यालय आणि १४ जुलै २०२३ रोजी तलाठी कार्यालयात सादर करून, फेरफार प्रक्रिया डाके यांच्या विरोधात थांबवण्याचा प्रयत्न केला.
या बनावट कागदपत्रांच्या आधारावर शासकीय कार्यालयांची दिशाभूल करण्यात आली. तसेच, हंबीरे आणि पाटील यांनी सोपान अंबादास जाधव आणि सिताबाई सोपान जाधव या दाम्पत्याला डाके यांच्या भूखंडावर अतिक्रमण करण्यास प्रवृत्त केले. संबंधित प्लॉटवर पत्र्याचे शेड, जुनी जीप, निकामी टायर आणि भंगार साहित्य ठेवून अतिक्रमण केले गेले. हे सर्व प्रकार जातीय द्वेषातून आणि दहशतीच्या उद्देशाने केल्याचे फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे.
या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात १६ एप्रिल २०२५ रोजी FIR क्रमांक 0197/2025 अन्वये खालील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे :
- सोपान अंबादास जाधव – रा. तांबरी विभाग, धाराशिव
- सिताबाई सोपान जाधव – रा. तांबरी विभाग, धाराशिव
- संतोष व्यंकटेश हंबीरे – रा. अक्षर सदन, संघर्ष कार्यालय, गवळी गल्ली, धाराशिव
- सुहास केशवराव पाटील – रा. तांबरी विभाग, धाराशिव
या आरोपींविरुद्ध BNS 2023 अंतर्गत कलम ३४०(१) (बनावट कागदपत्र तयार करणे), ३(५) (अतिक्रमण व नुकसान) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, १९८९ अंतर्गत कलम ३(१)(g), ३(१)(u), ३(१)(z) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.