अहवाल नसताना मंदिर विकास आराखड्याचे कामकाज कोणाच्या आदेशाने?
धाराशिव – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरा बाबतची संदिग्धता, संभ्रमावस्था पुन्हा कायम राहिली आहे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज मुंबईमध्ये बैठक घेऊन गाभाऱ्याच्या मजबुतीकरणासोबतच धार्मिक परंपरा आणि श्रद्धेला बाधा न आणता उपाय शोधण्यावर शासनाचा भर असल्याने मंदिराच्या कळसाबाबत तसेच गाभाऱ्याच्या दुरुस्तीबाबत एएसआय (पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग) तज्ज्ञांची, आय.आय.टी. तज्ज्ञांची मदत घेण्याबाबतचा संपूर्ण अहवाल 30 दिवसात तात्काळ तयार करण्यात यावा, अशी सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे म्हटले यामुळे पुन्हा एकदा तुळजापूरचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी माध्यमांना आणि देवीभक्तांना खोटी माहिती दिली असल्याची चर्चा होताना दिसत आहे. 12 मार्च रोजी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी शिखर उतरवावे लागणार आहे असे म्हटले ते वाक्य पूर्ण करून त्यांनी येत्या 15 दिवसांत एएसआय (पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग) चा अहवाल घेणार असल्याचे म्हणले 12 मार्च रोजी बोललेल्या वक्तव्याला 160 दिवस पूर्ण झाले मात्र तो अहवाल नेमका काय आहे हे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले नाही. आणि अहवाल असताच तर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत 30 दिवसात पुन्हा अहवाल देण्याचे आदेश का दिले असावेत हा चर्चिला जाणारा विषय आहे.
तुळजापूर विकास आराखडा आणि मंदिर जीर्णोद्धाराचे काम कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात सापडले आहे. तुळजाभवानीचे भक्त या वादामुळे नाराज झाले आहेत दुखावले गेले आहेत त्यांच्या भावनांना ठेस पोचली आहे. जर आज सास्कृतिक कार्यमंत्री अशी शेलार यांनी पुरातत्व सर्वेक्षण विभागाला अहवाल देण्याचे आदेश दिले असतील तर यापूर्वी जे काम सुरू झाले आहे ते पुरातत्व विभागाला अंधारात ठेवून सुरू झाले आहे का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची पोस्ट

श्री तुळजा भवानी मंदिर व संकुल जतन संवर्धन व विकास आराखडा या संदर्भात आज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे बैठक घेतली. यावेळी गाभाऱ्याच्या मजबुतीकरणासोबतच धार्मिक परंपरा आणि श्रद्धेला बाधा न आणता उपाय शोधण्यावर शासनाचा भर असल्याने मंदिराच्या कळसाबाबत तसेच गाभाऱ्याच्या दुरुस्तीबाबत एएसआय (पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग) तज्ज्ञांची, आय.आय.टी. तज्ज्ञांची मदत घेण्याबाबतचा संपूर्ण अहवाल 30 दिवसात तात्काळ तयार करण्यात यावा, अशी सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.
कुलस्वामिनीचे हे परंपरागत, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थान आहे. त्यामुळे श्रद्धा, परंपरा आणि विज्ञान यांचा समन्वय साधत संवर्धनाची दिशा ठरवली जाईल. संवाद आणि समन्वयातून या विषयावर निर्णय घेतला जाईल. याबाबतचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या मान्यतेने पुढील दिशा ठरविली जाईल.
या बैठकीस आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार श्रीकांत भारतीय, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, धाराशिवचे जिल्हाधिकारी पुजारा, पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक डॉ.तेजस गर्गे, तसेच मंदिराचे महंत, पुजारी आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या श्रीलक्ष्मी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.