धाराशिव :
सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एका मोठ्या आर्थिक फसवणुकीची नोंद धाराशिव येथे करण्यात आली आहे. बाबासाहेब कचरु वाडेकर (वय 51), रहिवासी – अधिकारी वसाहत, धाराशिव साखर कारखाना, चोराखळी, ता. कळंब, जि. धाराशिव यांनी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्याशी मोबाईल क्रमांक 725958038 वरून संपर्क साधण्यात आला.
या क्रमांकाचा वापर करणाऱ्या व्यक्तीने धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन/सी.एम.डी. अमर पाटील यांचा फोटो डी.पी. (डिस्प्ले पिक्चर) म्हणून वापरून स्वतःची ओळख लपवत अमर पाटील असल्याचा बनाव केला. त्यानंतर फिर्यादी वाडेकर यांना विश्वासात घेऊन एका बँक खात्यावर (खाते क्रमांक 20100043466464) तब्बल 1 कोटी 10 लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले.
हि घटना दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी सकाळी 6.57 वा.पासून ते 17 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1.22 वा.च्या दरम्यान घडली. सदर प्रकरणी वाडेकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून सायबर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 318(4) तसेच माहिती तंत्रज्ञान सुधारित अधिनियम 2008 चे कलम 66(सी) आणि 66(डी) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, बनावट ओळख वापरून इतक्या मोठ्या रकमेची फसवणूक करण्यात आलेली असल्याने, हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे.
तपास सायबर पोलीस विभागामार्फत सुरू असून नागरिकांनी अशा बनावट संदेशांपासून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.