धाराशिव जिल्ह्यातील रामवाडी शिवारात पानबुडी मोटर चोरी झाल्याच्या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुन्ह्याचा तपास लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, 3 मार्च 2025 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाने तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषणातून काही संशयितांची नावे शोधून काढली. त्यानंतर पथकाने लातूर जिल्ह्यातील मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाऊन संशयिताला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरीस गेलेली दोन पानबुडी मोटर (किंमत 35,000 रुपये), चोरीसाठी वापरलेले चारचाकी वाहन (8,00,000 रुपये) आणि दुचाकी (90,000 रुपये) असा एकूण 9,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर मुद्देमाल ढोकी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 75/2025 अंतर्गत जप्त करण्यात आला.
या गुन्ह्यात आरोपी आकाश पप्पू कसबे (रा. दत्तनगर, मुरुड, जि. लातूर) याला अटक करण्यात आली असून, पुढील कारवाईसाठी त्याला ढोकी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या पथकात पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फहरान पठाण, चालक रत्नदीप डोंगरे आणि नितीन भोसले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.