धाराशिव – तालुक्यातील हिंगळजवाडी येथे चोरीस विरोध करणाऱ्या शेतकऱ्यावर चोरट्यांनी जीवघेणा हल्ला करून त्यांचा निर्दयीपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.
प्राप्त माहितीनुसार, हिंगळजवाडी गावालगतच्या गायराण शेतजमिनीतील शेडमध्ये बांधलेल्या शेळ्या चोरताना चोरट्यांनी शेडसमोर झोपलेल्या तानाजी भगवान मुळे (वय 65) यांना अडथळा समजून डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. ही घटना दिनांक ०३ मार्च रोजी मध्य रात्री १२.३० च्या नंतर घडली.या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी संजय राजेंद्र पवार, जितेंद्र प्रभू पवार (रा. तेर, धाराशिव), अमोल ईश्वर काळे आणि ईश्वर रामा काळे (रा. हिंगळजवाडी, धाराशिव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास सपोनि हजारे करत आहेत.
या निर्घृण हत्येच्या घटनेमुळे गावात तीव्र संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आरोपींना अटक करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.