चोरीच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीची पलटी,ट्रॉली सोडून ट्रॅक्टर हेड घेऊन अज्ञात चोर पसार

0
34

परंडा (दि. ८ फेब्रुवारी) – परंडा शहरातील माळी गल्ली येथे एका अज्ञात चोराने ट्रॅक्टर हेडसह ट्रॉलीची चोरी केली. मात्र, ट्रॉली पलटी झाल्याने चोर घाबरून ट्रॉली सोडून ट्रॅक्टर हेड घेऊन पसार झाला. ही घटना दि. ८ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अज्ञात चोर ट्रॅक्टर हेडसह ट्रॉली चोरी करून परंडा शहरातील माळी गल्ली मार्गे जॅकवेल रोडवरून भोत्रा रोडकडे जात असताना पहाटे सुमारे तीन वाजता ट्रॉली पलटी झाली. या अपघातामुळे घाबरलेल्या चोराने पलटी झालेली ट्रॉली जागेवरच सोडून ट्रॅक्टर हेड घेऊन पळ काढला. ट्रॉली पलटी होताना झालेल्या जोरदार आवाजामुळे माळी गल्लीतील नागरिक जागे झाले.

रहदारीच्या रस्त्यावर पलटी झालेली ट्रॉली दिसून आल्यानंतर नागरिकांनी ट्रॅक्टरचे हेड गायब असल्याचे लक्षात घेतले. यावरून चोरीची घटना असल्याचा संशय आल्याने काही नागरिकांनी त्वरित परंडा पोलिस ठाण्यात फोन करून माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद इंजपवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी आडसुळ, विश्वनाथ शिंदे, चालक सगर यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जेसीबी मशीनच्या साहाय्याने पलटी झालेली ट्रॉली उचलून परंडा पोलिस ठाण्यात आणली.

ही ट्रॉली कोणाची आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. दुपारपर्यंत ट्रॅक्टर व ट्रॉली चोरी संदर्भात परंडा पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती. त्यामुळे ट्रॅक्टर दुसऱ्या तालुक्यातील असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here