धाराशिव | ८ फेब्रुवारी २०२५
“गुलामाला गुलामीची जाणीव झाली की, तो बंड करतो.” या ठाम विधानासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता रोहन मल्लिनाथ कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर करत प्रशासनाच्या कार्यशैलीवर जोरदार प्रहार केला आहे. त्यांच्या राजीनाम्याचा ठळक मुद्दा बनला आहे – “I’m Not Slave Anymore” (मी आता गुलाम नाही).
कांबळे यांच्या राजीनाम्यामुळे केवळ धाराशिव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे. त्यांनी आपल्या पत्रात प्रशासकीय कामकाजातील असंतोष, अतिरिक्त जबाबदाऱ्या, मानसिक ताण, आणि कामाच्या असह्य परिस्थितीवर परखड भाष्य केले आहे.
राजीनाम्यातील ठळक मुद्दे:
- अतिरिक्त कामाचा ताण:
रोहन कांबळे यांनी आपल्या पदाची नेमणूक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) म्हणून झाली असली तरी, पोलीस विभागाच्या जबाबदाऱ्या, शासकीय विश्रामगृहांची व्यवस्थापन, निवडणूक कार्यक्रमांतील प्रतिनियुक्ती, लोकप्रतिनिधींच्या बैठकींचे आयोजन, आणि मंत्रालयाच्या कामकाजापर्यंत अनेक अतिरिक्त जबाबदाऱ्या त्यांच्यावर लादल्या गेल्या. - मानसिक व आर्थिक पिळवणूक:
“कार्यालयीन वेळ संपल्यानंतर देखील मला वैयक्तिक वेळेत सरकारी कामे करावी लागतात,” असे नमूद करत कांबळे यांनी मानसिक ताणाचे विदारक चित्र मांडले आहे. सततच्या कामामुळे वैयक्तिक आयुष्यावर होणारा परिणाम आणि आर्थिक गैरसोयींबाबत त्यांनी असंतोष व्यक्त केला आहे. - भारतीय संविधानाचा आधार:
त्यांनी आपल्या पत्रात भारतीय संविधानाचा उल्लेख करत म्हटले आहे की, “स्वतंत्र भारतात वेठबिगारीस बंदी आहे, परंतु सध्याची कामाची परिस्थिती ही वेठबिगारीसारखीच आहे.” - व्यवस्थेवरील रोष:
“मी गुलाम नाही,” या शब्दांतून त्यांनी व्यवस्थेतील अन्यायकारक कामकाजाला विरोध दर्शवला आहे. उपविभागीय अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी ताण कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी मान्य केले आहे, परंतु कामाचा व्याप इतका मोठा आहे की, तो प्रयत्न अपुरे ठरले.
प्रशासनाला दिलेला संदेश:
कांबळे यांनी आपल्या राजीनाम्यात फक्त वैयक्तिक त्रासाची व्यथा मांडलेली नाही, तर व्यवस्थेतील त्रुटींवरही थेट बोट ठेवले आहे. “सामाजिक सलोखा जपणे हे माझे कर्तव्य आहे, म्हणूनच मी जातीच्या अस्मितेचा मुद्दा न करता व्यवस्थेला विरोध करण्याचा पर्याय निवडला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
“I’m Not Slave Anymore” हे केवळ एक वाक्य नाही, तर व्यवस्थेतील अन्यायाविरोधातील संघर्षाचे प्रतीक बनले आहे. रोहन कांबळे यांचा राजीनामा हा केवळ वैयक्तिक असंतोषाचा परिणाम नसून, तो सार्वजनिक बांधकाम विभागातील कामकाजाच्या पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करतो.
प्रशासन या प्रकाराकडे कसे पाहते आणि या समस्यांवर उपाययोजना करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.