धाराशिव, ता. 8:
जिल्ह्यातील विविध महामंडळांच्या कार्यप्रणालीचा आढावा घेण्यासाठी आणि लाभार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी एक महत्वपूर्ण बैठक सोमवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 4 वाजता होणाऱ्या या बैठकीचे आयोजन आमदार कैलास पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
ही बैठक जिल्ह्यातील सर्व महामंडळांचे मुख्य अधिकारी, तसेच सर्व प्रमुख बँकांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. महामंडळांच्या माध्यमातून दिले जाणारे विविध लाभ, योजनांची अंमलबजावणी, तसेच लाभार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचा सखोल आढावा घेतला जाणार आहे.
आमदार कैलास पाटील यांनी सांगितले की, “जिल्ह्यातील नागरिक, विशेषत: ज्या लाभार्थ्यांना महामंडळाच्या योजनांमध्ये नोंदणी, कर्ज प्रकरणे, अनुदान मिळवणे किंवा इतर कोणत्याही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे.” तसेच, अशा अडचणींच्या सोडवणुकीसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ, आधार सामाजिक न्याय महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, तसेच जिल्ह्यात कार्यरत असलेल्या इतर महामंडळांचे अधिकारी योजनांची माहिती देणार असून, लाभार्थ्यांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
बैठकीचे प्रमुख मुद्दे:
- विविध महामंडळांच्या योजनांचा आढावा
- तांत्रिक अडचणींचे निराकरण
- नवीन योजना व त्यांच्या अंमलबजावणीसंबंधी चर्चा
- बँकांच्या माध्यमातून लाभ दिल्या जाणाऱ्या कर्ज प्रकरणांचा आढावा
आमदार कैलास पाटील यांनी शेवटी सांगितले की, “ही बैठक केवळ चर्चा न राहता प्रत्यक्षात समस्या सोडवण्याचा प्लॅटफॉर्म ठरणार आहे. त्यामुळे ज्यांना योजनांशी संबंधित काहीही अडचणी आहेत, त्यांनी वेळेवर उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा.“
ठिकाण: जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव
वेळ: दुपारी 4 वाजता, सोमवार, 10 फेब्रुवारी 2025