धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात बेकायदेशीर जुगार अड्ड्यांविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी युवासेनेचे ॲड. संजय भोरे यांनी पत्रकार परिषदेत केली. प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
बेकायदेशीर जुगार अड्ड्यांविरोधात वारंवार तक्रारी
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर-सोलापूर, सोलापूर-धाराशिव-छत्रपती संभाजीनगर बावी पाटी,राष्ट्रीय महामार्गालगतच्या आरसीसी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बेकायदेशीर जुगार अड्डा चालू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या अड्ड्यावर २४ तास जुगार खेळला जातो तसेच विविध नशेच्या पदार्थांचे सेवन केल्याचे आढळून आले आहे. यामुळे परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रशासनाची उदासीनता आणि पोलिसांवर गंभीर आरोप
जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचे ॲड. संजय भोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. प्रशासनाने याबाबत कोणताही लेखी प्रतिसाद दिलेला नाही. काही पोलिस अधिकारी या बेकायदेशीर धंद्यांना अप्रत्यक्ष संरक्षण देत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, काही पोलिस कर्मचारी दररोज हप्ता घेत असल्याचीही चर्चा आहे.
आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भोरे यांनी दिला आहे. निष्क्रिय प्रशासनाचा निषेध करण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर प्रतिनिधिक स्वरूपात जुगार खेळून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्याची योजना आखण्यात आली आहे. जर प्रशासनाने अजूनही दुर्लक्ष केल्यास मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय पातळीवरही प्रश्न उपस्थित
या प्रकरणाची माहिती गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनाही देण्यात आली असून, त्वरित चौकशी आणि कारवाईची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळत असताना प्रशासनाने संवेदनशीलता दाखवावी, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
“प्रशासनाने आता तरी जागे व्हावे!”
प्रशासनाने बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा युवासेना रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशारा देत ॲड. संजय भोरे यांनी पत्रकार परिषदेत सरकारला सज्जड इशारा दिला आहे.